निनावं

Submitted by अंशा on 17 August, 2012 - 13:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१)नारळाचे दूध...... २ वाट्या
२)चणाडाळ पीठ.... दिड वाटी
३)गव्हाचे पीठ....... अर्धी वाटी
४)गूळ.... दिड वाटी
५)वेलची पूड.. आवडीप्रमाणे
६)तूप.... २ चमचे

क्रमवार पाककृती: 

१)नारळाचे जाडसर दूध काढून घेणे.त्यातील २ वाट्या बाजूला काढून ठेवणे.
२)डाळीचे व गव्हाचे पीठ वेगवेगळे मावेमधे(तूप घालून ३ व दिड मिनिटे क्रमशः) किंवा गॅसवर भाजून घेणे.
३)गूळ बारीक चिरुन घेणे.
४)वेलची पूड करणे.
५)नारळाच्या दूधात गूळ विरघळवून घेणे.
६)वरील मिश्रणात दोन्ही पीठे मिक्स करणे.(गूठळी होऊ देऊ नये.)
७)नारळाचे दुध,गूळ,दोन्ही पीठे हे मिश्रण एका भांड्यात घेऊन ते बारिक गॅसवर शिजवणे.कालथ्याने सतत
ढवळत रहाणे.
८)साधारण पेस्टसारखे स्वरूप आल्यावर भांड्यावर झाकण ठेऊन एक वाफ आणणे.(भांड्याखाली तवा ठेवावा.)
९)वरील मिश्रण केकच्या टिनमधे घालून प्रीहिटेड ओव्हनमधे १८०डिग्रीला २० मिनिटे भाजणे.(टिनला आधी तूप लावून घेणे.
१०) गार झाल्यावर त्याच्या वड्या कापणे.

वाढणी/प्रमाण: 
वरील प्रमाणात १२ वड्या होतात.
माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा अंशा, मस्त ! फोटोही सही ! टिपीकल सीकेपी पदार्थाचे सोपे व्हर्जन Happy

या पदार्थाबद्दलची कथा : सीकेपी बायकांना नवनवीन पदार्थ करण्याची भारी हौस. अनेक वेगवेगळे पदार्थ बायकांनी करायचे अन त्या नव्या पदार्थांचे नामकरण ( नावं ठेवणं नाही, बरं का Wink ) पुरुषांनी करायचे असा प्रघात. बायकांनी इतके नवे नवे पदार्थ केले की पुरुषांकडची नावे संपली.

त्या नंतर दाट्याला ( हरतालिकेचा आधीचा दिवस ) अजून एक पदार्थ केला गेला तो हा. पुरुषांकडची नावे संपल्यामुळे त्यांनी याचे नाव ठेवले गेले ते, "निनावं" ! Happy

पारंपारिक निनावं करताना हरभर्‍याची डाळ ( एक किलो) आणि गहू ( एक मूठ ) आधी वेगवेगळे भाजून ते जाडसर दळून आणायचे. अन मग पुढची कृती अंशाने सांगितली त्या प्रमाणे. पूर्वी मावे नसल्याने चुलीवर खाली-वर जाळ ठेऊन मंदाग्नीवर केलं जाई निनावं.
नंतर गॅस आल्यावर निनावं घाटल्यानंतर, खाली जाड तवा त्यावर जाड बुडाचे पातेले अन त्यावर गरम केलेली काहील ( जाड बिडाचा तवा ) ठेऊन मंद गॅसवर केलं जाई निनावं. खाली न लागता घाटत घाटत, हात अगदी भरून येतो पण नंतर खाताना जो काही आनंद होतो, तो अवर्णनीय !
असं निनावं घाटत-शिजत असताना घरात काय घमघमाट येत असे Happy

पारंपारिक पद्धतीत वेलची ऐवजी जायफळाची पूड असे. त्याचा वेगळा स्वाद येतो. महत्वाचे म्हणजे नारळाचे दूध गाळूनच घायचे, त्याचा चोथा बाजूला करायचा. तरच निनावं जिभेवर अक्षरशः विरघळतं Happy

धन्यवाद अंशा मस्त आठवणी जाग्या झाल्या. आता केलच पाहिजे या दाट्याला निनावं Happy

अवल....खाली न लागता घाटत घाटत, हात अगदी भरून येतो पण नंतर खाताना जो काही आनंद होतो, तो अवर्णनीय ! नक्कीच! पण ह्यावेळी हे काम नवर्‍याने केल्याने बरेच कष्ट वाचले! Happy

झंपी..... खरच,ज्यांना नारळ,गुळ यांची एकत्र चव आवडते,त्यांना नक्कीच आवडेल.

जाई.साहित्ययात्री..... नक्कीच!
दिनेशदा.... Happy
अश्विनीमामी.... तळलेला नसला तरी खमंग आहे.:)

यालाच माझी आई रवळी म्हणते बहुतेक...ती करताना पाहिलंय...बरंच घाटत असायची (ती ते मंद आचेवरचं करते ओव्हन इ. नाही)
मस्त लागतं पण एक दोन तुकडेच बास होतात....(मला तरी) Happy

छान आहेत फोटोज आणि रेसिपी..फोटो मूळ रेस्पिलाच लावा की..

@सामी...... हो तर Happy पर्याय नक्कीच आहे.वर अवलने तो लिहिला आहे तोच इथे परत पोस्टतेय.
निनावं घाटल्यानंतर, खाली जाड तवा त्यावर जाड बुडाचे पातेले अन त्यावर गरम केलेली काहील ( जाड बिडाचा तवा ) ठेऊन मंद गॅसवर निनावं भाजता येतं.बिडाचा तवा नसेल तर साधा पण जाड तवा ठेवला तरी चालतो.
@वेका..... खरं तर मूळ रेसिपीलाच फोटो जोडायचे होते पण माझा हा १लाच(लिहिणे व फोटो जोडणे)
प्रयत्न असल्याने ते जमले नाही. Sad