ओरिसा: छुईं आळू पोटळं भजा (फोटोसहित)

Submitted by सावली on 16 May, 2011 - 21:32

मागची आळूपोटळं तरकारी अजुनतरी कोणी करुन बघितलेली दिसत नाही. ते बहुधा भयापोटी असावे. पण ते तोंडली परवर कन्फ्युजन मुळे असावे असे मानायला मला वाव आहे. म्हणुनच आज दुसरी रेसिपी टाकते आहे. अर्थातच हि रेसिपीही माझी नाहीच. मात्र नवर्‍याच्या शिकवण्याबर हुकुम हि रेसिपी मी करते. (म्हणजे भलतीच सोपी असणार बघा!)

छुईं आळू पोटळं भजा (फोटो नंतर देईन)

छुईं - शेवग्याची शेंग
आळू - बटाटा
पोटळं - परवर

भुवनेश्वर आणि त्याच्या आसपास शेवग्याच्या शेंगा यायच्या काळात इतक्या भरभरुन येतात की झाडं त्या भाराने वाकुन जातात. काही फांद्या तर वजन सहन न होऊन तुटतात. ज्यांच्याकडे झाडं आहेत त्यांच्या त्या खाऊन संपत नाहीत आणि शेजारीपाजारी, नातेवाईक यांनाही भरभरुन वाटल्या जातात. त्याच्या पानांची, फुलांची सुद्धा भाजी केली जाते आणि आवडीने खाल्ली जाते. त्यावेळी प्रत्येक जेवणात एकातरी पदार्थात शेंगा दिसतातच!

भजा म्हणजे परतलेली कोरडी भाजी. हि कुठल्याही भाजीची करतात. वांगी, बटाटा, फ्लॉवर, कारलं, शेवगा, शिराळं अशा अनेक भाज्यांची. यात कुठलाही मसाला नाही. फक्त मुळ भाज्यांचीच चव असते. तिखट्जाळ खाणार्‍यांच्या जिभेला कदाचित मानवणार नाही पण भाजी मसाल्याविना मुळ चवित खाण्यात एक वेगळीच गंमत असते. हळद घातल्याने भाजीचा असा एक उग्र वास असतो तो निघुन जातो.

शेवग्याच्या शेंगाचे शास्त्रीय नाव Moringa oleifera. साधारण वर्षभरापुर्वी कोणीतरी मला सांगत होतं की मोरींगा झाडापासुन बनलेले मोरिंगा म्हणुन एक औषध आहे ते तब्येतीला खुप चांगले असते, त्यात बरेच विटॅमिन्स मिनरल्स वगैरे मिळतात.. थोडक्यात "तु विकत घे". मी त्यावेळी इंटरनेट वर शोधल्यावर हा मोरिंगा म्हणजेच आपला शेवगा हे कळलं. त्या मैत्रीणीलाच मग मी आम्ही कसे शेवगा शेंगा, पानं, भाजी खातो ते सांगुन नामोहरम केलं. आणि हि आवडणारी भाजी अधिकच आवडीचीही झाली. आपल्या कडे असलेल्या भाज्यांच्या अगणित प्रकारांबद्दल अधिकच आपुलकी आणि अभिमान वाटला.

तर हा छुईं आळू पोटळं भजा

लागणारा वेळ:
आठवत नाही.

लागणारे जिन्नस:

१. ५/६ परवर (खाली फोटो बघा.)
२. दोन मध्यम बटाटे
३. दोन तीन शेवग्याच्या शेंगा
४. तेल १ टे.स्पु. साधारण ( मस्टर्ड ऑईल असेल तर ते. भाजी शिजल्यावर वास नक्की येत नाही)
५. हळद, मीठ चवी पुरते (तिखट ऑप्शनल)

क्रमवार पाककृती:

१. परवर स्वच्छ धुवून त्याचे जरा उभे काप करावे (साधारण अर्धा सेमी /कमी जाडीचे). फार जाडजुड नकोत पण छोटे तुकडे करु नका.
२. बटाटाही स्व्च्छ धुवून त्याचे सालीसकट उभे काप करावे (साधारण अर्धा सेमी/कमी जाडीचे)
३. शेवग्याच्या शेंगा धुवुन सालं काढत बोटभर लांबीचे तुकडे करायचे. सालीचा वरचा थर निघाला पाहीजे पण अगदी सगळी साल काढू नका.
४. एका परसट नॉन स्टीक पॅन मधे तेल घालुन चांगले तापले की सगळ्या कापलेल्या भाज्या घालाव्या.
५. नीट परतुन हळद, आणि मिठ घालावं, हवे असल्यास तिखट घालावे पण मुळ रेसिपीत नाहीये.
६. झाकण घालुन मंद आचेवर थोडावेळ शिजु द्यावे. मिठ घातल्याने पाणी सुटेल त्या पाण्यात शिजतं. हे पाणी खुपच कमी झाल्यास/ खाली लागत असल्यास अर्धा वाटी पाणी टाकुन पुन्हा झाकण घालुन कोरडे शिजवावे. थोडी खाली लागुन सोनेरी झाली की मस्त खमंग लागते.
७. शिजल्यावर वरण भाता बरोबर खावी

वाढणी प्रमाणः

दोन माणसांसाठी ( अजुन दुसरी भाजीही बरोबर असल्यास)

अधिक टिपा:

१. हि कुठल्याही भाजीची करतात. वांगी, बटाटा, फ्लॉवर, कारलं, शेवगा, शिराळ अशा एका किंवा अनेक भाज्यांची. सगळ्यात वाढवणीसाठी बटाटा घालता येतो.
२. स्टेप ४ च्या आधी १ टि.स्पु आलं लसुण पेस्ट घातली तरी वेगळीच चव येते.
३. स्टेप ५ मधे थोडं भाजणी पिठ भुरभुरता येतं, यामुळे पदार्थात खमंगपणा येतो. (हि खास माझी टिप )
४. पुन्हा अधिक प्रश्न विचारु नयेत, माझे एक्स्पर्टीज लिमिटेड आहेत. Wink

माहितीचा स्रोत:
नवरा

मी भाजणी पिठ टाकुन केली आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परवर सोडलं तर ही शेवग्याच्या शेंगांची आणि बटाटयाची भाजी आम्ही करतो. शेवग्याच्या फुलांचीही भाजी करतात, मस्त होते. तुमच्या पद्धतीने कशी करतात, लिही.