तिलापिया फ्राय

लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

-तिलापिया (किंवा कॅटफिश)चे ३ फिले
-१ चमचा हळद
-१ चमचा किंवा थोडे जास्त लाल तिखट
-१ चमचा मालवणी मसाला / बिअर बाटली मसाला/ गरम मसाला + धनेजिरे पावडर
-१ चमचा चिंचेचा कोळ/आमचुर पावडर्/लिंबाचा रस
-अर्धा इंच आलं
-२ मध्यम आकाराच्या लसणाच्या पाकळ्या
-३-४ हिरव्या मिरच्या
-ओलं खोबरं
-रवा / तांदुळाची पिठी
-चवीप्रमाणे मिठ
-तेल

क्रमवार पाककृती: 

१. फिले घरी आणल्यावर धुऊन कोरडे करून त्याचे साधारण दीड ते दोन इंचाचे तुकडे करायचे.
२. हळद, तिखट, मिठ, लिंबाचा रस, मसाला हे एकत्र करून माश्याच्या तुकड्यांना चोळून बाहेर १५-२० मिनीटे किंवा फ्रिज मधे २४ तास पर्यंत ठेवायचं.
३. आलं, लसूण, मिरच्या, खोबरं ह्यांचं चॉपर मधे वाटण करून घ्यायचं.
४. माश्याच्या तुकड्यांना खोबर्‍यांचं वाटण लावून मग ते रवा किंवा तांदुळाच्या पिठीत घोळवून घ्यायचे.
५. सढळ हाताने तेल पॅन मधे घालून सोनेरी/ ब्राऊन रंगावर परतायचं की फ्रायफीश तयार !

वाढणी/प्रमाण: 
२-३ माणसांना माश्यांची साईड-डिश म्हणून पुरेसे होतात.
अधिक टिपा: 

१. शोनूने मागे ही कृती पार्ल्यात टाकली होती. करायला अतिशय सोपी. मासे आधी बनवले नसतील आणि सुरुवात करायची असेल तर अगदी योग्य !
२. खोबर्‍यांचं वाटण लावायचं नसेल तरी चालतं. फक्त मसाल्याचं मिश्रण चोळून रव्यात घोळून तळता येतात.
३. खोबर्‍याचं मिश्रण लावलं तर आपल्याला जो स्वाद आवडतो त्याप्रमाणे घटक कमी-जास्त करावे. मला आल्याचा स्वाद आवडतो त्यामुळे मी आलं जास्त घालतो.
४. तांदळाची पिठी वापरली तर फ्राय्-फिश मऊ होतात, रवा वापरला तर क्रिस्पी होतात. दोन्हीचं मिश्रण करून ही चांगले लागतात.
५. बिअर बाटली मसाला म्हणजे काय ते मला माहित नाही, शोनूला विचारा. स्मित कुठलाही मसाला चालतो. प्रत्येक वेळी वेगळा वापरला तर वेगळी चव. स्मित

माहितीचा स्रोत: 
शोनू
Submit to kanokani.com

सोप्पी आहे करायला (असे नवरा म्हणाला) स्मित फोटो टाक.

छान आहे रेसिपी. मी सुद्धा रवा + तांदुळाचे पीठ असेच तळते. बीअर बाटली मसाला म्हणजे काय हे विचारायचे होते पण आता शोनूला विचारते स्मित

खोबर्‍याच मिश्रण फीशफ्राय करताना लावतात हे पहिल्यांदाच वाचत आहे .

मी कोथिंबीर, पुदीना, आलं, लसूण, थोडे धने, जीरे वाटून लावते. तसंही छान लागतात.

वसई, विरार या भागात रहाणार्‍या इस्ट इंडियन ( उच्चारी कॅटलिक ) कॅथॉलिक लोकांचा हा एकदम टीपिकल मसाला ( ओगले आजींचा जसा काळा मसाला तसा फर्नांडिस, डिकोस्टा वगैरेंचा हा मसाला.

पावसाळ्याच्या आधी, सगळे जिन्नस उन्हात सुकवून , मोठाल्या उखळांमधून कुटून बीअरच्या गडद रंगाच्या बाटल्यांमधून भरून ठेवत असत. दोन चार कुटूंबांचा मसाला एकत्र बनत असे व असा मसाला बनवायचा मोठा प्रोग्रॅम चालायचा २-३ दिवस.

मुंबई मधे ओळखीच्या इस्ट इंडीयन लोकांकडुन नाहीतर मंगलोर स्टोअर्स किंवा बांद्रा/मालाड/ ओर्लेम पश्चिमेला वगैरे कॅटलिक भागातल्या दुकानात मिळतो.

त्यातल्या त्यात मालवणी मसाल्याच्या जवळ पास चव असते.
मसाला करुन पहायचीच हौस असेल तर इथे आहे एक कृती
http://www.bottlemasala.com/Bottle_Masala_Recipe.html

यम्म!!

मासे करताना मी नेहमी लसूण जरा जास्त घेते. तसंच, इंडीयन स्टोअर मधे मिळणारा फिश फ्राय मसाला (शानचा वापरलाय मी) सुध्दा चांगला आहे.

अडमा, कधीतरी तांदळाची पिठी किंवा रवा न लावता पण फ्राय करून बघ. खरपूस चव लागते एकदम!