युट्यूब वर रेस्प्या पाहाणं एक टैमपासे माझा. त्यात ही एक रेस्पी दिसली. चांगली वाटली म्हणून आधी जशीच्या तशी केली पण नंतर जरा व्हेरीएशन केले तर जास्त चांगले लागले चवीला. म्हणून इथे ही रेसीपी देतो आहे. नक्की करून पाहा. सुरेख चव येते. घरामध्ये भाजी वगैरे काही नसतांना अतिशय चविष्ट असा प्रकार जमतो. भात, पोळी, फुलका, भाकरी कशाही बरोबर सुरेख लागतो.
तर साहित्य -
- एक वाटी विनासालाची मुगाची डाळ
- अर्धी वाटी हिरवे मटारदाणे (फ्रोजन/ताजे कुठलेही चालतील)
- एक मोठा टोमॅटो
- एक मध्यम कांदा
- दोन हिरव्या मिरच्या
- एखादा आल्याचा तुकडा
- ६/७ लसूण पाकळ्या
- जरासा खडा मसाला - एखादा दालचिनीचा तुकडा, ४/५ काळीमीरी चे दाणे, एखाददुसरी हिरवी वेलची, लहानसं तमालपत्र इ.
- लाल तिखट
- हळद
- हिंग
- मीठ
- तेल (आवडत असेल तर साजुक तूप)
- वरून घालायला कोथिंबीर
- मुगाची डाळ जरा भाजून मग पुरेश्या पाण्यात भिजत घालावी. मी मायक्रोव्हेव मध्ये १ मिनिट + १ मिनिट अशी भाजली.
- लसूण सोलून ओबडधोबड चिरून घ्यावा. कांदा, टोमॅटो आणि मिरची मध्य आकारांत चिरून घ्यावी. मटारदाणे फ्रोजन असतील तर थॉ करून घ्यावेत. आल्याचा तुकडा किसून घ्यावा. थोडी कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. दोन वाट्या पाणीही गरम करावे.
- गरम कढईमध्ये पुरेसं तेल (आवडत असेल तर तूप) तापवून मोहोरी आणि खड्या मसाल्याची फोडणी करावी आणि त्यात लसूण, आलं हिरवी मिरची जरा सोनसळू द्यावी. मग कांदा घालून कडा लालतांबूस झाल्या की टोमॅटो; हा पूर्ण गळला की धूवून ठेवलेली डाळ निथळून मग यात घालावी. मंद आचेवर डाळ बर्यापैकी कोरडी होईस्तोवर तेलाच्या मसाल्यात परतावी. आता यात मटार, मीठ, हळद, तिखट घालून पुन्हा एकदा सगळं नीट मिसळून घ्यावं आणि मग कढत पाणी बेताबेतानं घालून डाळ झाकण घालून जरा कोरडीशीच शिजवून घ्यावी.
- पूर्ण शिजली की वरून कोथिंबीर घालून सजवावी आणि गरमगरमच खायला घ्यावी.
- डाळ आधी थोडी भाजणे आणि नंतर फोडणी-मसाल्यातही भाजणे यांमुळे बरीच हलकी होते आणि पुढे एक ५/७ मिनिटांतच शिजते तस्मात कढत पाणी घालतांना जरा बेताबेतानच घालणं महत्त्वाचं
- साखर/गूळ अजिबात वापरायचा नाहीय (मी वापरून पाहिलाय पण चव हवी तशी नाही जमत नंतर)
- खड्या मसाल्यात उन्नीस-बीस चलताय
- यिल्ड मोकळ्या भातापेक्षा जरासं मिळून आलेलं तरीही डाळीचे दाणे जाणवतील असं अपेक्षित
- हिरवे मटार दाणे आणि पिवळी डाळ असं दिसायलाही सुरेख दिसतं
हि डिश आमच्या कडे केल्या
हि डिश आमच्या कडे केल्या जाणार्या डाळ कांद्याची बहिण वाटतेय.
मी मात्र तूरडाळीची करते, रात्रभर भिजवून, थोडी शिजवून (मावे करून वगैरे) घेतली तर पदार्थ खूप कोरडा होतो.
तु पण एकदा रात्रभर नॉर्मल पाण्यात भिजवून ठेवून सकाळी करून पहा.
बाकी तुझी लिखाणाची शैली एक नंबर आहेच.
सारखं सारखं कौतुक नाही करणार :नामुबा:
आम्ही मुगाची मोकळी डाळ करतो
आम्ही मुगाची मोकळी डाळ करतो दाणे आणि कांदा घालून त्याच्याच जवळपास जाणारी कृती आहे. पण ती मसालेदार करण्याचे इंप्रॉव आवडले.
सॉलिड मस्त आहे, फोटोपण छान.
सॉलिड मस्त आहे, फोटोपण छान. अशी उचलून खावीशी वाटतेय.
छान लिहीली आहे रेसीपी.
छान लिहीली आहे रेसीपी.
छान.
छान.
मस्तच दिसतेय. आमच्याकडेही
मस्तच दिसतेय. आमच्याकडेही होते पण खडा मसाला पडत नाही त्यात. एकदा करून पहायला हवीच.
छान रेसिपी योकू, आम्ही पण
छान रेसिपी योकू, आम्ही पण करतो अशी मसूर डाळ भिजवून
'सोनसळू देणे' शब्द मस्त आहे!!
आमी या डिश ला पेंडपाला म्हणतो
आमी या डिश ला पेंडपाला म्हणतो। फक्त खडा मसाला ऐवजी काळा मसाला घालते। असाच तूर आणि मटकीच्या डाळीचा पण मस्त होतो पेंडपाला। डब्यात द्यायला छान पदार्थ आहे.
हो सोनसळू देणे हा शब्दप्रयोग
हो सोनसळू देणे हा शब्दप्रयोग आवडला। रेसिप्या मस्त लिहिता तुम्ही.
वा! छान. आम्ही पण करतो हा
वा! छान. आम्ही पण करतो हा प्रकार पण खडा गरम मसाला नसतो. आम्ही खातांना वाटीत वरुन फोडणी, बारीक चिरलेला कच्चा कांदा आणि कोथिंबीर घालून खातो. मस्त लागते करुन बघा. शिजताना मग तेल, मोहरी-जिरं कमी घालायचे.
आम्ही पण करतो हा प्रकार पण
आम्ही पण करतो हा प्रकार पण खडा गरम मसाला नसतो. >>> + १ मी मटकीची डाळ वापरते
आज केली ही दाल...
तिकडे पाहून आज केली ही दाल... दाटसरपणाची कल्पना नाही आली. असो दाल आवडली..
मसुराची जास्त चांगली लागेल असं वाटतंय... Next time..