हे आणि ते - १: पाहुणचार

Submitted by चायवाला on 25 December, 2013 - 08:34

गेल्या आठवड्यात एक गंमतीदार अनुभव आला. माझी एक आजी तिच्या भाचीच्या मुलाच्या लग्नानिमित्त तिच्याकडे उतरली होती. लग्नघर असल्याने आणि अर्थातच वार्धक्यामुळे आजीला माझ्या घरी येणं शक्य नसल्याने तिनेच सुचवल्याप्रमाणे तिला भेटायला मी तिथे गेलो. तिच्या माहेरच्या मंडळींशी ख्यालीखुशाली विचारणार्‍या गप्पा झाल्या. त्यांचा आधीपासून परिचय होताच, त्यामुळे गप्पांना वैयक्तिक संदर्भही लाभला. पण त्या बोलण्याला गप्पा असं म्हणणं म्हणजे विंदू दारा सिंगला अभिनेता म्हणण्यासारखं आहे.

मी बहुतेक अत्यंत चुकीच्या वेळेला तिथे पोहोचलो होतो. झीवरचा सौरभ हा राधाच्या होऊ घातलेल्या नवर्‍याच्या माजी लफड्याला घेऊन राधाचं आजी लग्न मोडायला निघालेला असा ज्वलंत विषय सुरू असताना मी तोंड उघडण्याचं धारिष्ट्य केलं आणि मी विचारलेला प्रत्येक प्रश्नावर आणि दिलेल्या प्रत्येक उत्तरावर "आँ?! क्कॉय? हां हां, हो का? क्कॉय? हां बोल आता" अशा प्रतिक्रिया उपस्थित काकु-आत्या इत्यादी मंडळींकडून मिळत गेल्या. आजीला कमी ऐकू येतं त्यामुळे मला तिच्याशी जोराने बोलावं लागत होतं आणि रोज अशा पद्धतीने बोलण्याची सवय नसल्याने तोच वरच्या पट्टीतला आवाज इतरांशी बोलताना लागत होता. मला इथे आमंत्रण नव्हतं मान्य, पण मी आल्यावर लक्ष देऊन चार शब्द नीट बोलले गेले असते तर मी काय त्या बावर्‍या राधा आणि बावळट शिरोमणी सौरभच्या भानगडीत विघ्न आणून त्यांच्या सिरिअलचा बट्ट्याबोळ करणार होतो का? असो. तर, टीव्हीवर चाललेली बोंबाबोंब, लग्नघरातली गडबड, माझा मोठा आवाज या अभूतपूर्व गोंधळात आजीची सदिच्छा भेट मी कशीबशी उरकली आणि पुढ्यातला चिवडा लाडू पोटात ढकलून, तिथून अक्षरश: पळ काढला.

तिथून बाहेर पडलो आणि गेल्याच महिन्यात आलेला एक अतिशय छान अनुभव आठवला. माझ्या एका कलीग-कम्-मैत्रिणीकडे सहकुटुंब जेवायला आमंत्रण होतं. शनिवारी संध्याकाळी साडेसातला जायचं असं ठरलं होतं पण मुलांना तयार करण्याच्या गडबडीत पोहोचायला आठ वाजलेच. आम्ही पोहोचलो तेव्हा ती आणि तिचा नवरा, दोघांनीही "या..." म्हणून सुहास्य वदनाने स्वागत केले. औपचारिक हसू लगेच ओळखू येतं मला, हे मात्र तसं नव्हतं हे स्पष्ट दिसत होतं. ते "या" बोलले नसते तरी निव्वळ ते स्मितहास्य पाहूनच ते अगदी मनापासून केलेलं स्वागत आहे हे मला जाणवलं असतंच. सुरवातीच्या गप्पा झाल्यावर पावभाजी हा मेनू असल्याचं समजलं. "अगदी last moment ठरलं पाव भाजीचं" मैत्रीण म्हणाली. आमच्या 'कुटुंबाला' पावभाजी अत्यंत प्रिय असल्याने तिच्या चेहर्‍यावर विशेष आनंद पसरला. मलाही उगाच भारंभार पदार्थ नसल्याने बरं वाटलं. बरेच पदार्थ असणं चुकीचं नाही, पण मग एकाचीही धड मजा घेता येत नाही. तेव्हा पावभाजी जिंदाबाद करत गप्पा मारत मारत सगळ्यांनी सही झालेल्या पावभाजीवर ताव मारला. पोट भरल्यावर नवचैतन्य उत्पन्न झाल्याने पोरांनी यथेच्छ दंगा केला. हा सगळा प्रकार मैत्रिणीच्या नवरोबाने शांsssत राहून सहन केला. मला खूपच राग आला होता, पण दोघांच्याही चेहर्‍यावर राग तर सोडाच थोडीशी नाराजी सुद्धा दिसली नाही. या सगळ्यात नंतर कधीतरी दोघांनी आम्हाला सगळं घर दाखवलं. काही वेळाने पुलंच्या म्हैस कथेतल्याप्रमाणे दोन ट्रकवाले, दोन एसटीवाले, आणि दोन मुंग्या या समोरासमोर भेटल्या की काहीतरी टिकटिक टिकटिक टिकटिक टिकटिक झालंच पाहीजे या न्यायाने दोघा बायकांचं स्वयंपाकघरात काहीतरी गुफ्तगू झालं. मग पुन्हा गप्पा झाल्या आणि आल्यापासून साधारण दोनेक तासांनी आम्ही निघालो.

दुसर्‍या दिवशी मी दोघांनाही पावाभाजी आणि पाहुणचार आवडल्याचा आणि मुलांच्या दंग्याबद्द्दल खेद व्यक्त करणारा एसएमएस केला तेव्हा दोघांनीही उत्तर पाठवताना भेटीबद्दल आनंद व्यक्त करुन 'मुलंच ती मुलांसारखंच वागणार' असा समजूतदार सूर लाऊन आम्हाला आश्वस्त केलं.

त्या शनिवारी रात्री उशीरा झोप आणि रविवारी लवकर उठल्याने झोप अनावर होऊन मी रविवारी दुपारी बराच वेळ झोपलो. त्यामुळे रात्री जागरण झालं. मला सकाळी लवकर उठून चालायला जायचं असल्यामुळे ती झोप सोमवारी सकाळीही पूर्ण झाली नाही. मंगळवारच्या झोपेवरही याचा परिणाम झाला आणि माझं काम हळु हळु होऊ लागलं. लक्ष केंद्रित करण्यावर झालेल्या परिणामामुळे मी लक्षपूर्वक काम करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करु लागलो आणि त्या भानगडीत इतरांशी बोलणं कमी झालं. या मौनामुळे त्या मैत्रिणीचा गैरसमज झाला आणि तिने मला विचारलं की "का रे बाबा शनिवारी तू आमच्याकडे येऊन गेल्यानंतर काही घडलं का? I am finding you a little aloof. आमच्याकडून काही चूक झाली आहे का?" खरं तर तसं काहीही नव्हत. पण तिने हा विचार केला याचंच मला खूप कौतुक वाटलं. झोपेच्या खोबर्‍याची कथा सांगून तिचा गैरसमज मी लवकरच दूर केला, पण भेटीनंतर काहीही कारणाने का असेना 'काही चुकलं का' असं विचारणं हे संवेदनशील मन असल्याचा संदेश देऊन गेलं. या निमित्ताने आधी लक्षात न आलेली आणखी एक आणि महत्त्वाची गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे त्यांच्या पाहुणचाराची छान पद्धत. त्या दिवशी आम्हाला झालेल्या उशीरामुळे आमची वाट बघत असताना वेळ घालवायला त्यांनी कदाचित टीव्ही सुरू केलेला असावा. आम्ही घरात पाऊलही ठेवण्याच्या आत तो बंद झालेला होता. मला आत्ता आठवलं की मैत्रिणीच्या नवर्‍याला रिमोट खाली ठेवताना मी बघितलं होतं बहुतेक. आम्ही घरात पाऊल ठेवण्यापासून तिथून निघून लिफ्टमधे शिरण्याच्या वेळेपर्यंत टीव्ही नाही, मधूनच पेपर किंवा मासिकं चाळणं नाही, काही लहानसहान काम करणं नाही, की आम्ही आल्यामुळे इतर कामं बाजूला राहिली आहेत असा साधा भास देखील आम्हाला झाला नाही - दोघांनीही संपूर्ण लक्ष आमच्यावरच केंद्रित केलेलं होतं आणि हे सगळं सहज होत होतं - दोघांच्याही वागण्यात कृत्रिमपणाचा लवलेश नव्हता. आम्ही काही सारखे कुणाकडे जातो असं नाही. पण बर्‍याच काळानंतर आम्हाला पाहुणे म्हणून गेल्यावर इतका छान अनुभव आला. शिवाय संपूर्ण वेळ आमच्याकडेच लक्ष दिल्याने अगदी राजेशाही पाहुणचार झाल्यासारखं वाटलं. समोरच्याच्या मनाचा आणि आनंदाचा इतका बारकाईने विचार करणार्‍या या साध्या स्वभावाच्या दांपत्याने केलेल्या आदरातिथ्य आणि त्याबद्दल केलेल्या पाठपुराव्याचं खूप कौतुक वाटलं. खरंच, 'अतिथी देवो भव' या वचनाचा खरा अर्थ त्यांनी जाणला होता.


विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखकु, अवांतरच लिहीत आहे. :). मुलांची वागणे बेभरवशाचे असतेच हे बरोबरे. पण आईवडिलांनी अशावेळी जरा घट्टपणे मुलांना गडबड करु नका हे सांगणे व ती ते करताहेत तो दंगा बंद करतीलच ह्याकडे लक्ष देणे बरे तसेच घरी आलेल्या छोट्यांना यजमानांनीच स्वतः मोडतोड व्हायच्या आत 'तसे करु नका' हे प्रेमाने सांगायला हरकत नाही.
कन्येची लहानपणीची खेळणी अजुन जपलीत. एकदम छोट्यांना गुंतवायला ठेवता येते. पेपर-रंग, छोटे पुस्तके तर असतातच. (अवांतर प्र. समाप्त).

अनुभव वाचनीय.

ते कोण अमान्य करतं? Uhoh असो.
अवांतरप्रतिसादसमाप्ती Wink

सुनिधी, बरोबर. ते पालक करतातच. निदान आम्ही तरी करतोच. पण एक उदाहरण म्हणून लेखनाच्या ओघात लिहील्यावर सरसकटीकरण केलं गेलं म्हणून इतके प्रतिसाद वाढले. असो.

तू स्वतःवर घेऊ नकोस रे Happy
कोणी तुला बोलत नाहीये.
पण आता हे अगदीच अवांतर नाही. यावरुन मला एक लक्षात आलं - म्हणजे तुमचं रत्न त्रास देत असेल आणि यजमानांनी त्याला तसं करु नये म्हणून सांगितलं तर त्यांना लगेच पाहुणचारलेसही म्हणू नये Wink

रिया, मुलांचा किस्सा हा फक्त लेखनाच्या ओघात आला म्हणून लिहीला. नाहीतर त्याला फारसे महत्व नाही. उलट यजमानच ओरडतील याचीच वाट बघत होतो. असो.
आता विषयाशी संबंधित प्रतिसाद आले तरी चालतील Wink

तुला उद्देशुन मी काहीच लिहित नाहीये रे!
ती वरची पोस्ट सुद्धा तुला किंवा या लेखाला उद्देशुन नाही.
पाहुणचाराबद्दलच एक मत मी मांडलं Happy

मी प्रियांकाच्या बहुतांशी प्रतिसादांशी सहमत आहे. इतकेच नाही, तर मी लेखकु ह्यांच्या ह्या आग्रहाशी असहमत आहे की लहान मुले शेवटच्या क्षणी कशी वागतील हे परमेश्वरसुद्धा सांगू शकत नाही.

माझे अतिशय स्पष्ट मत आहे की मुले ज्या पालकांच्या ताब्यात नाहीत त्या पालकांना संस्कारांची नितांत गरज आहे.

हे खासगी मत आहे, 'लेखकु' हा सदस्य माझा जुना माबोमित्र आहे, तरीही हे मत नोंदवत आहे आणि मला फिकीरच नाही आहे की माझ्या ह्या मतामुळे मैत्रीवर काय परिणाम होईल.

-' बे फि की र' !

"मुलंच ती, ती तशीच वागणार" हे वाक्य मी इथे कोरियात २-३ च घरात ऐकलं. ज्यांना मुलं आहेत, त्यांच्याकडे जाताना बरच मोकळं वाटते, तिथे मुलांना एकमेकांशी खेळायला मिळते, वगैरे.
पण काही अनुभवातुन एक शिकलो, की मुलांची आवडती खेळणी, मोबाईलमध्ये १०-१२ व्हिडीओज, सोबत ठेवणे अश्या गोष्टी जवळ बाळगणे सुरु झाले. बॅग जरा वजनदार होते कधीकधी, पण मुलं बरेचदा आनंदात राहतात. समोरच्याच्या घरी थोडावेळतरी त्यांना धिंगाणा घालण्यापासुन वळवता येते.
बाकी मुलं कोणत्या वेळी काय करतील, हे सांगता येणारा पालक बहुदा अंतर्ज्ञानी किंवा रिंगमास्टर प्रकारातलाच असावा Happy

बेफी तुमचं मत वाचलं, माझा विरोध सरसकटीकरणाला आहे. "दंगा न करणारी मुलं ही नॉर्मल नसतात" हे जसं सरसकटीकरण ठरू शकेल (असं मला वाटतं खरं Wink ) तसंच एखाद्या प्रसंगावरुन उलट मत बनवणेही. विजय देशमुखांचा प्रतिसाद विशेष आवडला, कल्पना उत्तम आहे. असो, मला काय म्हणायचं आहे हे सांगून झालेलं आहे.

बाकी मुलं कोणत्या वेळी काय करतील, हे सांगता येणारा पालक बहुदा अंतर्ज्ञानी किंवा रिंगमास्टर प्रकारातलाच असावा>>
विजय, अगदी बरोबर.

आता अवांतर प्रतिसाद थांबतील ही आशा. Happy

छान लिहिलंय.
पाहुणचार जिथे असा ( म्हणजे दुसर्‍या प्रकारातला ) होतो त्या घरीच जायला मला आवडतं. खरं तर माझ्यासाठी काही घरं अशी आहेत, जिथे मी येतोय असे आधी सांगायची / कळवायची सुद्धा गरज नसते.

सॉरी पुन्हा अवांतर पण लेखकुंशी सहमत ..
मुलं कळती झाल्यावर उपाय करु शकतो जसे आधिच समजावुन नेणे , हळु शब्दात सांगणे..ई अनेक उपाय ..
पण एक वय अस असत की त्यांना आपण बोलतोय ते नीट समजतही नाही.. आईला नक्की काय म्हणायचय हे कळत नाही.. समजच आलेली नसते..
आणि लहान मुलं एका मर्यादेनंतर जरा अनाकलनियच असतात ..

जर तुमच्या कडे येणार्या पाहुण्यासोबत बच्चे कंपनी असेल तर वर ठेवलेल्या सगळ्या मौल्यवान वस्तु कपाटात कुलुप बंद ठेवाव्यात. जर ते शक्य नसेल तर पाहुण्यांना सांगावे तुमची मुल घरीच ठेवा किंवा अश्या पाहुण्यांना घरीच बोलाऊ नका. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी.
अगदीच न सांगताच टपकले तर आपण लगेच आवरायला घ्यावे किंवा असेल तसेच चला बागेत जाउन येउयात म्हनुन बाहेर निघावे आणि पाहुण्यांना जवळच्या बागेचा पत्ता द्यावा. रात्री खुपच उशिरा टपकले तर शतपावलीच्या निमित्ताने बाहेर पडावे आणि तासभर शतपावलीच करावी.

रिया अस म्हणतात की जे मुल लहानपणी खुप मस्तीखोर/हट्टी असतात ते मोठे झाल्यावर खुप शांत/समंजस होतात आणि याच्या उलट पण असत....तुझ काय मत आहे Wink

छान लिहिलंय Happy

'काही चुकलं का' असं विचारणं हे संवेदनशील मन असल्याचा संदेश देऊन गेलं. >>>> हे एरव्हीही करावं. काहीतरी बिनसलंय हे लक्षात आलं तर आवर्जून विचारावं आणि समोरच्याने ते मोकळेपणाने सांगावं. गैरसमज टळतात आणि पुढचे दुरावे टळतात.

सुशांत दादा, मी फक्त बाहेर समंजस असल्यासारखी वागायचे! त्यामुळे माहीत नाही jibh dakhavanari.gif

विजयजी, तुम्ही माझी आधीची पोस्ट वाचली तर लक्षात येईल की मुलांनी घरच्या मोठ्या माणसाला मारलं तर त्याचं कौतुक करणारे पालक मी पाहिलेत. अशांना आवरायला हवं ही आपेक्षा ठेवणं चुकीचं कसं असेल? मुलं कशी वागु शकतात ते सांगु शकत नाही हे एकदम बरोबर पण मग इथे पालक कसे वागु शकतात हे पालक ठरवू शकतातच की... वेळीच मुलांना रोखणं, त्यांना याबद्दल रागावणं आणि अगदीच गरज पडली तर मुलांना मांडीवर बसवुन ठेवणं हे सगळंच जमण्यासारखं आहे.
यजमानांचा त्रास जसा मुलांना होईला नको तसाच मुलांचाही त्रास यजमानांना होईला नकोच!
बाकी मी लोकांच्या घरी प्रचंड शहाण्यासारखी वागणारी मस्तीखोर मुलं पहिली आहेत.

छान लिहिलंय.
माझ्या दुर्दैवाने साबा ही घरी असंच करतात. कितीदा सांगुन झालं तरीही. उलट आलेल्या पाहुण्यांसमोर सिरीयल बघुन त्यांना स्टोर्‍याही सांगतात.

बाकी मुलांबद्दल सगळ्यांशीच सहमत Happy
काही मुलांना खरंच समज असते. दुसर्‍यांच्या घरी कसं वागायचं, खेळायचं ह्याची. आणि काही मुलं डोक्यात जातील इतकी व्रात्य असतात. त्यांचे पालकही तेवढेच निर्धास्त असतात.

स्मिते Sad
मग काय करतेस तू?
सरळ पाहुण्यांना आतल्या (टीव्ही नसलेल्या) खोलीत घेऊन जात जा गप्पा मारायला

खरे सांगायचे तर 'मुलांचे इतर लोकांकडे गेल्यावर बेशिस्त वागणे' ह्या विषयावर एक स्वतंत्र धागा असायला हवा. वैविध्यपूर्ण अनुभव वाचायला मिळतील.

छान लिहिलंस! दुसर्‍या प्रसंगातले मैत्रीणीच्या कुटुंबाचे वागणे आवडले! असेच व्हायला हवे ना? नाहितर आपण आपले बोलत असतो आणि यांचे काहितरी वेगवेगळे चाललेले असते.

माझ्या एका मैत्रीणीचा नवरा आम्ही सगळे जमून गप्पा मारत असलो तरी फोनवर बोलत असतो अधून मधून :रागः
आणि दुसरीकडे गेला तरी ते आयबीएन लोकमत लाव रे जरा.. असे चालू असते. नाही म्हणावे तरी पंचाईत,

एकीला सारखं व्हाट्सअ‍ॅप वर कुणाचे मेसेज आलेत का ते पहायची सवय! Uhoh

लहान मुलांपेक्षा मोठ्यांनाच सांगायची वेळ येते...!!

एकीला सारखं व्हाट्सअ‍ॅप वर कुणाचे मेसेज आलेत का ते पहायची सवय!
>>
आईईग्ग्ग!
मला पण आहे ही सवय Sad
मुळात मी खुप वेळ आय कॉण्टॅक्ट मेंटेन करू शकत नाही म्हणून मी अधुन मधुन मोबाईलकडे वगैरे पहाते.
पण हे चूकच आहे.
नविन वर्षाचा संकल्प- घरात कोणी पाहुणे आले की मोबाईल दुssssssssssर ठेवायचा आणि आपण कुठे गेलो तर ते आय कॉण्टॅक्ट साठी वगैरे भिंतीकडे किंवा इकडे तिकडे पहायचं (पण सारखं असं करणं किती बेक्कार दिसेल Sad दुसरं काही चालेल पण नो टू मोबाईल )

लेखकु
छान लिहिलय!
पण मग मुलांनी दंगा केलाय एवढं तरी पालकांनी मान्य करावं. मुलं जे करतात त्याचं कौतुक तरी करू नये.>>>>>
पूर्णपणे सहमत.आमच्याकडे १ जोडपं त्यांच्या २ मुलांसह आले होते.ती ७-८ वर्षांची मुलगी ,घरच्या मोठ्या बाहुल्याच्या पोटावर, बसून धबाधब गुद्दे मारत होती.तिचा धाकटा भाऊ सोबत होताच.मुलांचं सोडा ,राग आईवडलांचा येत होता.मांजर जशी पहडून पिल्लांची मस्ती पहात असते,त्याप्रमाणे ते वडील मांजराळ डोळ्यांनी
मुलीची मस्ती फक्त पहात होते.

रिया यजमानांचा त्रास जसा मुलांना होईला नको तसाच मुलांचाही त्रास यजमानांना होईला नकोच!>>>> सहमत.

कधीकधी गडबडही होते. मुलांना आवरावं तर मित्रच म्हणतो, अरे खेळुही देणार नाही का आता त्याला ? Happy
असो. मुलांना बाहेर कसं वागावं हे शिकवणं आवश्यक आहेच, पण ते तसेच वागतील असही नाही, हेही लक्षात ठेवावेच लागते. मुलांशी खेळणे गरजेचे आहे, म्हणुन मित्राशी बोलुच नये का? बर्‍याच गोष्टी त्या वेळी जश्या सुचतील तश्या केल्या जातात. त्याला (किमान माझा तरी) इलाज नाही. काही अनुभव असतील तर नक्की कळवा, कामात पडतील.

:लहान मुल मोड ऑनः

काय हे गेला अर्धा तास झाला कुनाच ल्क्षच नाहिय माझ्याकडे. तेच तेच बोलताना ह्या लोकांना कंटाळा येत नाही का? किती बोअर मारतात हे लोक. काल त्या काकांकडे तर बरोब्बर उलट काहीतर सांगत होते. श्या त्यापेक्षा सोसायटीत वॉच्मन्काकाकडे सोडुन आले असते तर बरं झालं असतं. नाहितर एकटचं घरी बसलेल परवडलं. पण ऐकुन कोण घेतयं. कित्ती वेळ बसायच अवघडुन असं. ह्या आई बाबा लोकांना ह्यांचे आई बाबा असे कुठे घेउन जात नसतील बहुतेक. गेले तरी इतक काय 'इग्नोर' करत नसणार. नाहितर इतक्यात विसरले कि काय असे केल्यावर कसे वाटतयं.

आता नेमके काय केल्यावर यांचे माझ्याकडे 'नीट' लक्ष जाइल. ह्यम....

:लहान मुल मोड ऑफः

अगदी कालच बस मधे एक बाई आपल्या मुलाला ओरडली तेव्हा तो मुलगा निर्लज्ज पणे हसु लागला...काय झालेले माहित नाही...पण आई ने एक फटका जोरात दिला...त्या मुलाने शिवी दिली रडता रडता तुझ्या ####@@** ....... मी आणि बाकी लोकं शॉक्ड....मुलगा रॉक्ड
आई ला लाज वाटलीच असणार तीने अजुन एक लावुन दिली परत मुलगा बोल्ला मा@@##
परत सर्व शॉक्ड........
मी न रहावुन विचारलच शेवटी काय वय आहे मुलाचं?? त्या म्हणाल्या ७....
त्यांच्या चेहर्यावर लाज्,शरम, ओशाळेपण सर्व म्हणजे सर्व भाव दिसत होते...पण त्यांनी पुढे मारलं नाही....नाहीतर अजुन काहितरी ऐकायला मिळालं अस्त.....तीला आणि आम्हाला पण.....या प्रकाराला काय म्हणावं ???? हॉरिबल आहे......

Pages