हे आणि ते - १: पाहुणचार

Submitted by चायवाला on 25 December, 2013 - 08:34

गेल्या आठवड्यात एक गंमतीदार अनुभव आला. माझी एक आजी तिच्या भाचीच्या मुलाच्या लग्नानिमित्त तिच्याकडे उतरली होती. लग्नघर असल्याने आणि अर्थातच वार्धक्यामुळे आजीला माझ्या घरी येणं शक्य नसल्याने तिनेच सुचवल्याप्रमाणे तिला भेटायला मी तिथे गेलो. तिच्या माहेरच्या मंडळींशी ख्यालीखुशाली विचारणार्‍या गप्पा झाल्या. त्यांचा आधीपासून परिचय होताच, त्यामुळे गप्पांना वैयक्तिक संदर्भही लाभला. पण त्या बोलण्याला गप्पा असं म्हणणं म्हणजे विंदू दारा सिंगला अभिनेता म्हणण्यासारखं आहे.

मी बहुतेक अत्यंत चुकीच्या वेळेला तिथे पोहोचलो होतो. झीवरचा सौरभ हा राधाच्या होऊ घातलेल्या नवर्‍याच्या माजी लफड्याला घेऊन राधाचं आजी लग्न मोडायला निघालेला असा ज्वलंत विषय सुरू असताना मी तोंड उघडण्याचं धारिष्ट्य केलं आणि मी विचारलेला प्रत्येक प्रश्नावर आणि दिलेल्या प्रत्येक उत्तरावर "आँ?! क्कॉय? हां हां, हो का? क्कॉय? हां बोल आता" अशा प्रतिक्रिया उपस्थित काकु-आत्या इत्यादी मंडळींकडून मिळत गेल्या. आजीला कमी ऐकू येतं त्यामुळे मला तिच्याशी जोराने बोलावं लागत होतं आणि रोज अशा पद्धतीने बोलण्याची सवय नसल्याने तोच वरच्या पट्टीतला आवाज इतरांशी बोलताना लागत होता. मला इथे आमंत्रण नव्हतं मान्य, पण मी आल्यावर लक्ष देऊन चार शब्द नीट बोलले गेले असते तर मी काय त्या बावर्‍या राधा आणि बावळट शिरोमणी सौरभच्या भानगडीत विघ्न आणून त्यांच्या सिरिअलचा बट्ट्याबोळ करणार होतो का? असो. तर, टीव्हीवर चाललेली बोंबाबोंब, लग्नघरातली गडबड, माझा मोठा आवाज या अभूतपूर्व गोंधळात आजीची सदिच्छा भेट मी कशीबशी उरकली आणि पुढ्यातला चिवडा लाडू पोटात ढकलून, तिथून अक्षरश: पळ काढला.

तिथून बाहेर पडलो आणि गेल्याच महिन्यात आलेला एक अतिशय छान अनुभव आठवला. माझ्या एका कलीग-कम्-मैत्रिणीकडे सहकुटुंब जेवायला आमंत्रण होतं. शनिवारी संध्याकाळी साडेसातला जायचं असं ठरलं होतं पण मुलांना तयार करण्याच्या गडबडीत पोहोचायला आठ वाजलेच. आम्ही पोहोचलो तेव्हा ती आणि तिचा नवरा, दोघांनीही "या..." म्हणून सुहास्य वदनाने स्वागत केले. औपचारिक हसू लगेच ओळखू येतं मला, हे मात्र तसं नव्हतं हे स्पष्ट दिसत होतं. ते "या" बोलले नसते तरी निव्वळ ते स्मितहास्य पाहूनच ते अगदी मनापासून केलेलं स्वागत आहे हे मला जाणवलं असतंच. सुरवातीच्या गप्पा झाल्यावर पावभाजी हा मेनू असल्याचं समजलं. "अगदी last moment ठरलं पाव भाजीचं" मैत्रीण म्हणाली. आमच्या 'कुटुंबाला' पावभाजी अत्यंत प्रिय असल्याने तिच्या चेहर्‍यावर विशेष आनंद पसरला. मलाही उगाच भारंभार पदार्थ नसल्याने बरं वाटलं. बरेच पदार्थ असणं चुकीचं नाही, पण मग एकाचीही धड मजा घेता येत नाही. तेव्हा पावभाजी जिंदाबाद करत गप्पा मारत मारत सगळ्यांनी सही झालेल्या पावभाजीवर ताव मारला. पोट भरल्यावर नवचैतन्य उत्पन्न झाल्याने पोरांनी यथेच्छ दंगा केला. हा सगळा प्रकार मैत्रिणीच्या नवरोबाने शांsssत राहून सहन केला. मला खूपच राग आला होता, पण दोघांच्याही चेहर्‍यावर राग तर सोडाच थोडीशी नाराजी सुद्धा दिसली नाही. या सगळ्यात नंतर कधीतरी दोघांनी आम्हाला सगळं घर दाखवलं. काही वेळाने पुलंच्या म्हैस कथेतल्याप्रमाणे दोन ट्रकवाले, दोन एसटीवाले, आणि दोन मुंग्या या समोरासमोर भेटल्या की काहीतरी टिकटिक टिकटिक टिकटिक टिकटिक झालंच पाहीजे या न्यायाने दोघा बायकांचं स्वयंपाकघरात काहीतरी गुफ्तगू झालं. मग पुन्हा गप्पा झाल्या आणि आल्यापासून साधारण दोनेक तासांनी आम्ही निघालो.

दुसर्‍या दिवशी मी दोघांनाही पावाभाजी आणि पाहुणचार आवडल्याचा आणि मुलांच्या दंग्याबद्द्दल खेद व्यक्त करणारा एसएमएस केला तेव्हा दोघांनीही उत्तर पाठवताना भेटीबद्दल आनंद व्यक्त करुन 'मुलंच ती मुलांसारखंच वागणार' असा समजूतदार सूर लाऊन आम्हाला आश्वस्त केलं.

त्या शनिवारी रात्री उशीरा झोप आणि रविवारी लवकर उठल्याने झोप अनावर होऊन मी रविवारी दुपारी बराच वेळ झोपलो. त्यामुळे रात्री जागरण झालं. मला सकाळी लवकर उठून चालायला जायचं असल्यामुळे ती झोप सोमवारी सकाळीही पूर्ण झाली नाही. मंगळवारच्या झोपेवरही याचा परिणाम झाला आणि माझं काम हळु हळु होऊ लागलं. लक्ष केंद्रित करण्यावर झालेल्या परिणामामुळे मी लक्षपूर्वक काम करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करु लागलो आणि त्या भानगडीत इतरांशी बोलणं कमी झालं. या मौनामुळे त्या मैत्रिणीचा गैरसमज झाला आणि तिने मला विचारलं की "का रे बाबा शनिवारी तू आमच्याकडे येऊन गेल्यानंतर काही घडलं का? I am finding you a little aloof. आमच्याकडून काही चूक झाली आहे का?" खरं तर तसं काहीही नव्हत. पण तिने हा विचार केला याचंच मला खूप कौतुक वाटलं. झोपेच्या खोबर्‍याची कथा सांगून तिचा गैरसमज मी लवकरच दूर केला, पण भेटीनंतर काहीही कारणाने का असेना 'काही चुकलं का' असं विचारणं हे संवेदनशील मन असल्याचा संदेश देऊन गेलं. या निमित्ताने आधी लक्षात न आलेली आणखी एक आणि महत्त्वाची गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे त्यांच्या पाहुणचाराची छान पद्धत. त्या दिवशी आम्हाला झालेल्या उशीरामुळे आमची वाट बघत असताना वेळ घालवायला त्यांनी कदाचित टीव्ही सुरू केलेला असावा. आम्ही घरात पाऊलही ठेवण्याच्या आत तो बंद झालेला होता. मला आत्ता आठवलं की मैत्रिणीच्या नवर्‍याला रिमोट खाली ठेवताना मी बघितलं होतं बहुतेक. आम्ही घरात पाऊल ठेवण्यापासून तिथून निघून लिफ्टमधे शिरण्याच्या वेळेपर्यंत टीव्ही नाही, मधूनच पेपर किंवा मासिकं चाळणं नाही, काही लहानसहान काम करणं नाही, की आम्ही आल्यामुळे इतर कामं बाजूला राहिली आहेत असा साधा भास देखील आम्हाला झाला नाही - दोघांनीही संपूर्ण लक्ष आमच्यावरच केंद्रित केलेलं होतं आणि हे सगळं सहज होत होतं - दोघांच्याही वागण्यात कृत्रिमपणाचा लवलेश नव्हता. आम्ही काही सारखे कुणाकडे जातो असं नाही. पण बर्‍याच काळानंतर आम्हाला पाहुणे म्हणून गेल्यावर इतका छान अनुभव आला. शिवाय संपूर्ण वेळ आमच्याकडेच लक्ष दिल्याने अगदी राजेशाही पाहुणचार झाल्यासारखं वाटलं. समोरच्याच्या मनाचा आणि आनंदाचा इतका बारकाईने विचार करणार्‍या या साध्या स्वभावाच्या दांपत्याने केलेल्या आदरातिथ्य आणि त्याबद्दल केलेल्या पाठपुराव्याचं खूप कौतुक वाटलं. खरंच, 'अतिथी देवो भव' या वचनाचा खरा अर्थ त्यांनी जाणला होता.


विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलय.
कालच मी या लेखाचा विचार करत होते.
शुक्रवारी माझ्या एका मैत्रिणीने खास आग्रहाचं आमंत्रण देऊन मला आणि बहिणीला परवा रात्री जेवायला बोलवलं.
साडे आठ पर्यंत तिचा काहीच कॉल न आल्याने मी तिला कॉल केला तेंव्हा ती म्हणाली ती बाहेर आहे आणि आम्हाला बोलवलय हे साफ विसरलीये.
मी म्हणाले हरकत नाही. तसाही मी तुला येत नाहीये सांगायलाच फोन केलाय Uhoh
त्यावर तीने मलाच सुनवलं की मी कशी नेहमीच अशी आयत्या वेळेस टांग देते Uhoh
असो!

त्यानंतर म्हणाली उद्या ये नक्की! आणि आठ ते साडे नऊ वगैरे येऊ नकोस कारण त्यांच्या सिरिअल्स असतात.
त्यावर मी म्हाणाले साडे नऊ नंतर मला घरी जायला उशीर होईल. मग सात वाजता येतो आम्ही त्यावर ही म्हणे इतक्या लवकर कोणाच्या घरी स्वयंपाक बनतो का? Uhoh
मग मी म्हणाले मग राहु देत . नंतर सुट्टीच्या दिवशी बघुयात तर पुन्हा मलाच बरंच काही ऐकुन घ्यावं लागलं Sad

मला तिचा अति राग आल्याने मी शांत बसले. तिला काहीच उत्तर दिलं नाही पण फोन ठेवल्या ठेवल्या मला अगदी हाच लेख आठवला.

रिया, अचाट अनुभव आहे. खर्‍यापेक्षा खोट्याचे आणि माणसांपेक्षा आभासी जगाचे आकर्षण अधिक वाटू लागल्याने असे होत असावे.

खुप छन लिहिले आहे... असे अनुभव येतातच.... खास करुन जेव्हा महा एपिसोड असतात... ते हि शनि.. रवि... कोनाकडे जायचे म्हनजे विचार करावा लागतो....

पन एक मात्र नक्कि.... हा लेख वाचुन लगेच ठरवले... कोनाला घरी बोलावले कि.. टि.व्ही बन्द करायचा.....

पन एक मात्र नक्कि.... हा लेख वाचुन लगेच ठरवले... कोनाला घरी बोलावले कि.. टि.व्ही बन्द करायचा.....
>>
लेख सार्थकी लागला म्हणायचा का? Happy

लेखकु, अचाटपेक्षाही गलिच्छ अनुभव होता हा. मुळात मी कधी कोणाच्या घरी जेवायला वगैरे जातच नाही. पण मी अनेकदा नाही म्हणल्यामुळे 'मी किती शिष्ठ आहे' हे तिच्या आईने माझ्या आईला सुनावलं म्हणून मी जायला होकार दिला होता.आता पुढच्या वेळेला मात्र मला मी कशी' शिष्ठच' आहे ते प्रूव्ह करायची संधी तीने आयती दिलीये आणि मी ती सोडणार नाहीये.

सहज म्हणून लहानपणी आई सांगायची ती कोल्हा आणी करकोच्याची गोष्ट आठवली. अशा लोकांकडे न जाणंच योग्य असतं.. ते त्यांच्या कर्माने, आपण चांगुलपणा करत रहावा वगैरे आजकाल ऑल बीएस Angry

लेखकु, शेवटचा पॅरा अती म्हणजे अतीच आवडला. त्या दोघांचं हे अकृत्रीम वागणं जितकं म्हत्वाचं तितकंच ते तुमच्याही लक्षात आलं हे महत्वाचं!
नाहीतर बर्‍याच जणांचं स्वतःचंच तुणतुणं चालू असतं... समोरच्याचा विचार करणारे खूप कमी... आणि दोन्ही टोकं एकमेकांचा विचार करणारी तीही काही विशेष करतोय असं जाणवूही न देता सहज... तर सोने पे सुहागा!! मस्त लिहीलंय. फ्रेश वाटलं एकदम. पुलेशु.

रिया... Uhoh ऐतेन...
तू ऐकून घेतलंस??? मी दोन खडे बोल सुनावले असते. निदान हसत एखादा चिमटा, कोपरखळी तरी.
Angry

आम्ही घरात पाऊल ठेवण्यापासून तिथून निघून लिफ्टमधे शिरण्याच्या वेळेपर्यंत टीव्ही नाही, मधूनच पेपर किंवा मासिकं चाळणं नाही, काही लहानसहान काम करणं नाही, की आम्ही आल्यामुळे इतर कामं बाजूला राहिली आहेत असा साधा भास देखील आम्हाला झाला नाही

हा भाग कौतुकास्पद आहे !!
आजकाल सगळीकडे मुलांसाठी कार्टून चालू असणार्या वाहिन्या लावल्या जातात आणि वेळ जावा म्हणून मुलांवर डाफारणे चालू असते.
मस्त लिहिलंय .

मला बाकी सगळे करणे जमेल पण लहान मुलांनी माझ्या घरात धुमाकुळ घातला तर माझा संयम एकदम कोसळतोच.. मध्ये अध्ये कुठली स्टेजच नाही. माझ्या घरातली एखादी वस्तू फुटली किंवा मोडली तर मी व्यवस्थीत आडून आडून ते त्यांच्या आईवडिलांना सांगते किंवा माझी नाराजी जाणवुन देते. 'मुलंच ती मुलांसारखंच वागणार' हे कितीही खरं असलं तरी पालकांनी इतरांच्या घरात गेल्यावर मौल्यवान वस्तु हाताळण्याविषयी मुलांना काहितरी ट्रेनिंग द्यायला हवं असं मला तरी वाटतं. आणी ते अशक्य नक्कीच नाही हे आमच्या घरात आलेल्या काही खरोखरीच्या गुणी बाळांनी मला पटवुन दिलंय. Happy

असो.. फारच अवांतर झालं. लेख छान आहे.

पियु, इतरांच्या घरी गेल्यावर कसं वागावं याचं प्रशिक्षण जवळजवळ सगळेच पालक देतात. पण शेवटी लहान मुलांचे वागणे हे अतिशय बेभरवशाचे असते. एके दिवशी अगदी ध्यानीमनी नसताना मोठी माणसे काय वागतील अशा शहाणपणाने आणि पोक्तपणे ती वागतात तर इतर एका दिवशी अगदी,,,,,,,,,,,,,,,,,लहान मुलांसारखं Wink

मोठी माणसं कसं लहान मुलांच्या सारखं किंवा त्याहून बेक्कार वागतात त्यासाठी हे वाच.

मस्त लेख..
असाच एक गलिच्छ अनुभव एकदम क्लोज फ्रेंड कडुन आल्यापासुन मी तिच्याकडे जाणंंच सोडलंय..

पण तिला फोन करुन सुनवलयं मी नंतर फोनवर की तिने किती घाण बिहेव्ह केलं ते, पण आमच्यात त्या घटनेनंतर दुरावा आला तो अजुन ही गेला नाहीये. .

असाच एक गलिच्छ अनुभव एकदम क्लोज फ्रेंड कडुन आल्यापासुन मी तिच्याकडे जाणंंच सोडलंय..>>>

हे आपण फक्त मैत्रिणी च्या बाबतीत करु शकतो...नातलगांशी नाही करु शकत...तेही सासरच्या... Sad
अवघडजागेच दुखण असतात काही लोक. हेमावैम.

पियु, तुझ्याशी सहमत!
मी आडुन वगैरे काही नाही अगदी स्पष्टपणे सुनावते.
'बाळा, जरा शांत बस पाहु इथे. इथेच याच वस्तुंशी खेळ हं! फारच बाई त्रास देतो तुमचा मुलगा! कसं सांभाळाता घरात त्याला?' पासुन ते 'लहान मुलं असली तरी वस्तू तितक्याच महाग आणि महत्वाच्या आहेत हो! जवळ घेऊन बसता का त्याला?' इथं पर्यंत सगळं! आई वडील अपोआपच मुलांना जवळ घेऊन बसतात आणि माझ्या घरातल्या वस्तू वाचतात.
बाकी पाहुणचाराच्या बाबतीत मी पक्की आहे. पण त्रास देणारी मुलं आणि त्यांना न आवरणारे आई-वडील अशांना मी शक्यतो एकदाच घरी बोलवते Wink

लेखकुच्या वरच्या प्रतिसादाशी अजिबात सहमत नाही. कित्येक बाळं अगदी गुणी वागतात.. अगदी प्रत्येक वयात! मी आणि माझी बहिणही लोकांच्या घरी खुप सरळ वागायचो...लहानपणी देखील.!

हेही फारच अवांतर झालं!

रिया, काहीच्या काही. मुलांना जवळजवळ सगळेच आई-वडील आवरायचा प्रयत्न करतात. अगदी ओरडतातही, प्रसंगी धम्मकलाडूही देतात. पण शेवटी मुलं ही मुलं असतात एवढं समजून घेतलं तरी (आणि तर) खूप होतं. एवढं सोप्पं आहे ते.

मी आणि माझी बहिणही लोकांच्या घरी खुप सरळ वागायचो...लहानपणी देखील.!>> Rofl

असो.

मुलांना जवळजवळ सगळेच आई-वडील आवरायचा प्रयत्न करतात. अगदी ओरडतातही, प्रसंगी धम्मकलाडूही देतात. पण शेवटी मुलं ही मुलं असतात एवढं समजून घेतलं तरी (आणि तर) खूप होतं. एवढं सोप्पं आहे ते.

>> लेखकु, खरंच पर्सनली घेऊ नकोस. जस्ट बिकॉज तू तुझ्या मुलांचा उल्लेख केलाय म्हणुन आम्ही त्यांना बोलत नाहीये. आम्ही इन जनरल 'नॉट सो वेल मॅनर्ड' मुलांविषयी बोलतोय. 'शेवटी मुलं ही मुलं असतात किंवा मुलंच ती मुलांसारखंच वागणार' हे मान्य आहेच. पण मग त्यांच्याच वयाच्या इतर 'वेल मॅनर्ड' मुलांसारखं ह्या मुलांना वागु देत की. अर्थात हे माझं अतीशय वैयक्तीक मत आहे आणि मी ते फक्त माझ्या घरी येणार्‍या पाहुण्यांना लागू होते. दोष मुलांचा नसतोच. पालकांचा असतो.

मी आणि माझी बहिणही लोकांच्या घरी खुप सरळ वागायचो...लहानपणी देखील.!>> हसून हसून गडबडा लोळण
>> यात हसण्यासारखे काय आहे ते कळले नाही. तू खरंच गुणी बाळं पाहिली नाहियेत का? इतरांच्या घरी गेल्यावर त्यांच्या वस्तुंना त्यांना विचारल्याशिवाय अज्जिबात हात लावायचा नाही इतकं तरी (किमान) नक्की शिकवता येतं. आणि आपल्या सगळ्यांच्याच पालकांनी ते नक्की शिकवलं असेल याची मला खात्री आहे. जे पाहुणे घरात येण्याआधी आठवुन आठवुन एक एक वस्तु लपवुन ठेवावी लागते असे पाहुणे (लहान व मोठे) खुप मनस्ताप देतात.

ह्म्म्म!
मला स्वतःला अनुभव आला की अनुमोदन देईन बहुदा Proud Wink
पण सगळेच पालक धम्मकलाडू देत नाहीत. आमच्या नात्यातले एक जण कौतुकाने सांगतात,' फारच त्रास देतो हो हा! आत्ता तरी शांत बसलाय. काही बोलल्लीस ना त्याला तर सरळ फेकुन देईल तो फ्लॉवर पॉट' Uhoh
एक जणाने (वय वर्ष ५) माझ्या आजीला बॅटने मारलं आणी त्याची आई ते कौतुकाने बघत होती. हे बरोबरेय का?
असल्यांबद्दल स्पेशली बोलतेय मी! तेंव्हा मग 'तुम्ही नकाच ना आणत जाऊ त्याला त्यापेक्षा' असं सांगते मी सरळ Angry

पियु,
मी आणि माझी बहिणही लोकांच्या घरी खुप सरळ वागायचो...लहानपणी देखील.!>> हसून हसून गडबडा लोळण
>> यात हसण्यासारखे काय आहे ते कळले नाही.
>>>
बहुदा तो मला हसला ग Happy म्हणजे असचं मस्करीत!की "तू" लहानपणी सरळ वागायचीस? असं Happy
तस असेल तर आय डिड नॉट माईंड Happy

बाकी पुन्हा एकदा तुझ्या पोस्टीला अनुमोदन Happy

पण मग त्यांच्याच वयाच्या इतर 'वेल मॅनर्ड' मुलांसारखं ह्या मुलांना वागु देत की.>>>

तू जनरलाईज करत नाहीयेस का? या वाक्याचा अर्थ काय? मुलं वेल मॅनर्ड किंवा मिसमॅनर्ड असं क्वचित असतं. बहुतेक मुलं याच्या मधली असतात. मी पहिल्या पोष्टीत काय लिहीलं आहे ते नीट वाच. लहान मुले अतिशय बेभरवशाची असतात असं एक वाक्य आहे. कितीही शिकवलं तरी शेवटच्या क्षणी कसं वागतील हे प्रत्यक्ष परमेश्वरही सांगू शकत नाही. पुन्हा त्याच घरी गेल्यावर मागच्या वेळी दंगा करणारी हीच मुलं का असं वाटावं असं सुद्धा मुलं वागतात. आणि एखाद्या वेळी दंगा केल्यावर लगेच त्यांचे मॅनर्स किंवा त्यांच्या आईवडिलांना दोष देत सुटणं यात काहीच अर्थ नाही. असे जनरलाईज (मराठी शब्द??) करू नये कृपया.

असो. आता मी तरी बास करतो. नाहीतर अवांतर पोष्टींचा खच पडायचा.

पुन्हा त्याच घरी गेल्यावर मागच्या वेळी दंगा करणारी हीच मुलं का असं वाटावं असं सुद्धा मुलं वागतात. आणि एखाद्या वेळी दंगा केल्यावर लगेच त्यांचे मॅनर्स किंवा त्यांच्या आईवडिलांना दोष देत सुटणं यात काहीच अर्थ नाही. असे जनरलाईज (मराठी शब्द??) करू नये कृपया.

>> ओके. नाही करत सरसकटीकरण (मी जनरलाईजेशन ला वापरते तो मराठी शब्द).
पण मग मुलांनी दंगा केलाय एवढं तरी पालकांनी मान्य करावं. मुलं जे करतात त्याचं कौतुक तरी करू नये.

असो. इति लेखनसीमा.

पण मग मुलांनी दंगा केलाय एवढं तरी पालकांनी मान्य करावं. मुलं जे करतात त्याचं कौतुक तरी करू नये.
???
+१
आणि त्याबद्दल मुलांना रागवावं सुद्धा! आणि त्यांनी पुन्हा असं वागु नये याची काळजीही घ्यावी

असो. इति लेखनसीमा.! Proud

Pages