सामान्यतः केस वाढल्याची जाणीव इतरांना प्रथम आणि स्वतःला शेवटी होते. बायको, मुलं किंवा मित्र जेव्हा यावर भाष्य करतात तेव्हा आपल्याला नाभिकाची आठवण होते. प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यातील सर्वात कंटाळवाण्या दोन घटना, त्या म्हणजे दाढी आणि केशकर्तन! या घटना पुढं ढकलता येतात पण टाळता येत नाहीत.
साधारण २-३ वर्षांपुर्वी कधितरी अमेरिकेत आलो असेन. (ok. ३००-४०० वर्षांपुर्वी शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा नेमका कोणत्या दिवशी काढला एवढी जुनी आणी अवघड तारीख नाहीये ती. जिज्ञासुंसाठी ऑगस्ट २००७ ला आलो.) या आधीच्या आमच्या सर्व शिक्षित पिढ्यांपैकी शिकण्यासाठी पुण्याबाहेर पाऊल कुणीही टाकल नव्हतं. त्यामुळे यायच्या आधी प्रश्नच प्रश्न डोक्यात होते. MS कशाशी खातात ? 'course register' करायचे म्हणजे नेमक काय करायच ? Funding नावाची वस्तु कुठे मिळते ? ( यासाठी भिक्षेकर्याच सोंग घेऊन दारोदार भटकाव लागत हे नंतर कळल.) आणी हे सगळ गरज पडली तर English मधे लोकांना कसं विचारायच ?