न्हावी

Submitted by सौरभ.. on 18 March, 2012 - 09:03

साधारण २-३ वर्षांपुर्वी कधितरी अमेरिकेत आलो असेन. (ok. ३००-४०० वर्षांपुर्वी शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा नेमका कोणत्या दिवशी काढला एवढी जुनी आणी अवघड तारीख नाहीये ती. जिज्ञासुंसाठी ऑगस्ट २००७ ला आलो.) या आधीच्या आमच्या सर्व शिक्षित पिढ्यांपैकी शिकण्यासाठी पुण्याबाहेर पाऊल कुणीही टाकल नव्हतं. त्यामुळे यायच्या आधी प्रश्नच प्रश्न डोक्यात होते. MS कशाशी खातात ? 'course register' करायचे म्हणजे नेमक काय करायच ? Funding नावाची वस्तु कुठे मिळते ? ( यासाठी भिक्षेकर्याच सोंग घेऊन दारोदार भटकाव लागत हे नंतर कळल.) आणी हे सगळ गरज पडली तर English मधे लोकांना कसं विचारायच ? यासारखे प्रश्नासुर समोर उभे होते. अशा अभुतपुर्व गोंधळात पहिली semester सुरु झाली. त्यातुन 'भिक्षेची झोळी' रिकामीच असल्यामुळे university च्या kitchen मधे कामाला सुरवात केली होती. यात ३-४ महिने निघुन गेले. एका दिवशी सकाळी आंघोळीनंतर भांग पाडताना 'आपले केस वाढले आहेत' याचा साक्षात्कार झाला. घरी जरा केस वाढले की 'अरे केस कापुन ये आता तरी ...' असा आरडाओरडा आई-आजी सुरु करायच्या.इथे ती सोय नव्हती. म्हणुन नाईलाजाने येण्यार्या शनिवार रविवारी केस कापावेत असं ठरवल. College ला जाताना घराच्या कोपर्यावरच एक सलून सारख वाटणार दुकानही लक्षात होत.
मग शनिवारी सकाळी ९-१० च्या सुमारास अर्धवट झोपेत पायात चपला चढवुन त्या दुकानात जाऊन बसलो.समोर receptionist होती. पण अजुनही झोपेचा अंमल कायम असल्यामुळे ती receptionist, आजुबाजुची चकाचक डोक्यात उतरत नव्हती.आपला नंबर आला की बोलावतील या आशेवर बसुन होतो. आजुबाजुला थोडीफार गडबड दिसत होती.थोड्या वेळानी एक मध्यमवयीन बाई आत शिरली आणी थेट receptionist कडे गेली. तिथे त्यांची थोडी गुफ्तगु झाल्यावर तिने त्या बाईंना सन्मानान आत नेऊन बसवल. ही बाई रांग मोडुन कशी घुसली ? हा संतापजनक प्रश्न डोक्यात येत जात असतानाच त्या receptionist नी माझ्याकडे येऊन 'Do you have appointment ? ' अस गोड आवाजात विचारल. या प्रश्नानी डोळ्यावरची झोप खाडकन उतरली आणी आपण सलुन सोडुन dentist च्या दवाखान्यात तर घुसलो नाही हे तपासण्यासाठी मी आजुबाजुला नजर फिरवली.पण ते सलुनच होत. चारी भिंतिंवर वेगवेगळ्या brands ची hair products, posters आणी doctor सारखा एप्रन घालुन केशकर्तन करणार्या बहुतांशी बायका आणी तुरळक पुरुष !! . 'Appointment नाही' असं मी तिला सांगताच, आम्ही फक्त appointment नीच haircut करतो आणी पुढचे ३-४ दिवस भरलेले आहेत ही कुवार्ता दिली. सोन्यासारखा शनिवार असल्यानी डोक्याला फारसा त्रास न देता 'मी नंतर फोन करुन appointment घेईन ' अस सांगुन बाहेर पडलो.
काही 'अनुभवी' लोकांना विचारल्यावर, 'इथे अशीच पध्दत आहे' आणी appointment शिवाय केशकर्तन कमी ठिकाणी असत असं कळल्यावर, ' कशाला या भानगडीत पडा ?, सरळ केस वाढवुन ponytail बांधुया असा विचार मनात आला. पुढच्याच फोनवर घरी आईला हे सांगताच आमच्या मातेनी , 'तु तश्या अवस्थेत परत ये...मी तुला घरात काय, building मधेही घेणार नाही' असा आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे appointment घेणं आलं. आता या आधी कधी doctor चीही appointment घेतली नव्हती. लहानपणापासुन काही दुखल्या खुपल्यास family डॉक्टरांसमोर जाऊन उभं रहायचं. त्यांनी दिलेल लाल औषध ( थोड मोठ झाल्यावर पांढर्या गोळ्या ) घेतल्या की जगातले सर्व रोग बरे होतात हा विश्वास होता. त्यामुळे १० वी च्या इंग्रजीच्या डाके सरांच नाव घेऊन फोन लावला. डोक करायची appointment पाहिजे असं सांगितल्यावर 'कोणाची देऊ ? Anybody favorite ? याआधी आमच्या इथे कोणाकडे appointment घेतली होतीस ?' हे प्रकरण इतक complicated असेल याची खरच कल्पना नव्हती. मग 'माझ कोणी favorite नाही. मी तुमच्या इथे पहिल्यांदाच केस कापुन घेतो आहे.' हे तिला समजावुन सांगितल. ते ऐकल्यावर 'ok. मग मी तुला Lisa ची appointment देते. वेळेवर ये. उशीर झाला तर आम्ही appointment cancel करतो' अशी धमकीही वर दिली.
ठरलेल्या दिवशी दिलेल्या वेळेच्या आधीच तिथे जाऊन बसलो. आधीचा customer गेल्यावर receptionist नी मला Lisa च्या खुर्चीकडे पाठवल. तिथे गेल्यावर त्या Lisa नी तोंडभरुन हास्य केल. आमची साता जन्माची ओळख आहे आणी आम्ही लहानपणी बालवाडीत फुगडी खेळायचो अश्या थाटात सुरवात केली. "Welcome. How are you today ? Let me take your coat. Please have a seat..."
या अनपेक्षित स्वागतान गांगरुन जाऊन मी त्या खुर्चीवर अवघडुन बसलो. 'ह्या सगळ्या स्वागताचे किती पडतील ?' हा प्रश्न डोक्यात वळवळत होताच. सगळ्या गोष्टी स्थिरस्थावर झाल्यावर माझ्याकडे बघत तिनी विचारलं,
"So, what you want to do today ? "
..ऑं ?? ( उटणं लावुन आंघोळ !!! जमेल ?? )
न्हाव्याकडे केस कापणे आणी दाढी ही दोनच काम होतात अशी माझी समजुत होती.
आता हिला नेमक काय सांगायच अश्या संभ्रमावस्थेत काही सेकंद गेल्यावर ' मला फक्त केस कापायचे आहेत. बस्स.' हे समजावुन सांगितलं. ते कळल्यावर प्रयोगशाळेत फिरत्या टेबलावर प्रयोगासाठी ठेवलेल्या उंदराला फिरवाव तशी ती खुर्ची फिरवत माझ्या डोक्याकडे बघत पुढचा प्रश्न केला,
"किती इंच केस ठेवायचेत तुला ?"
खरं सांगतो, ती ' तु देशस्थ ॠग्वेदी ब्राम्हण दिसतोस ' म्हणाली असती तरी मी जितका दचकलो नसतो तितका या प्रश्नानी दचकलो.
किती इंच केस ठेवायचेत ?? या प्रश्नाच उत्तर कस शोधायच हे आजतागायत मला उमगलेल नाही. अंदाजच करायचा झाला तर साधारणपणे अशी procedure असावी. आधी घरी फुटपट्टनी आपले वाढलेले केस मोजायचे. मग आरश्यासमोर ध्यान लावुन किती इंचाचे केस आपल्या रुपड्याला शोभुन दिसतील यावर गहन विचार करायचा. तो आकडा ठरला की इयता २ मधल गणित पणाला लावुन पहिल्या अंकातुन दुसरा अंक वजा करायचा.मग तो आकडा आपल्या वहीत टिपुन घेउन खुर्चीवर बसल्यावर तिच्या तोंडावर फेकायचा. या खुर्चीवर पोचे पर्यंत कराव्या लागलेल्या धकाधकीनी माझ डोक आधीच शिणल होत. त्यामुळे 'बाईगं, तुला माझ्या डोक्याच काय करायचय ते कर, फक्त माझ्या डोक्याला त्रास देऊ नकोस' असं सांगावं असा एक विचार मनात आला.पण मग नंतर होण्यार्या परिणामांनाही सामोर जावं लागलं असतं. म्हणुन 'medium करा. side नी कमी.' या भारतीय न्हाव्याला देण्यात येण्यार्या आदेशाच ईंग्रजीत रुपांतर करत करत, इंच इंच लढवत ते केशकर्तन शेवटाला नेलं. बोटाच्या पेरांनी लांबी मोजत, अर्धा मिलिमिटर जरी एकडेतिकडे झाल तरी जणु तिला अफगाणिस्तानात तालिबान्यांचे केस कापायला पाठवल जाईल अश्या भितीनी घाबरत विचारत तिनी माझ डोक भादरलं. या सगळ्या प्रक्रियेचं output आरशात बघुन आणि भारतातल्या पंचवार्षिक केशकर्तनाइतकं बिल चुकत करुन, 'come again' च्या डागण्या सोसत तोंडात मारल्यासारखा चेहरा करुन बाहेर पडलो.
घराकडे परत चालत येताना आमचा शंकर न्हावी डोळ्यासमोर उभा राहिला. पत्र्यामारुतीच्या समोर त्याचं पिढीजात सलुन आहे. माझ्या आजोबांच, नंतर माझ्या वडिलांच आणि माझ अश्या तीन पिढ्यांची डोकी त्याच्या हाताखालुन गेली. त्याला किंवा आपल्या कुठल्याच न्हाव्याला हे इंचाबिंचाचे प्रश्न कधी पडलेच नाहीत. लहानपणी केस वाढल्यावर आजोबा हाताला धरुन त्याच्यासमोर बसवायचे आणी ' एकदम कमी कर रे...म्हणजे २ महिने बघायला नको' असा आदेश द्यायचे. नंतर नंतर तर त्याला काही सांगावच लागायच नाही. खुर्चीवर बसल्यावर काही न विचारता तो कात्री आणी तोंडाचा पट्टा सुरु करायचा ते थेट केस कापुन संपेपर्यंत.
आधीच्या अनुभवानी पोळल्यामुळे मी पुढच्यावेळी दुसर्या सलुन मधे जायच ठरवलं. एक दिवस उशीरा संध्याकाळची appointment घेऊन दुसर्या बाई समोर बसलो. आधीच्या ठेचेन आलेल चमचाभर शहाणपण वापरुन इंचाचे आकडे कुशलतेने ( माझ्या मते...) पेरत तिला समजावुन सांगितल. आता मागच्या प्रमाणे मोजत, घाबरत, विचारत गाडी चालणार आणी आपण हवे तसे केस कापुन घेऊ या आनंदात मी होतो. पण ते ऐकल्या ऐकल्या तिनी मला काहीही न विचारता आणी बोलायची एकही संधी न देता कात्री, कंगवा आणी विविध clippers वापरुन माझ्या डोक्याची कापणी केली आणी आरसा समोर धरला. ( नंतर वट्ट डोलर्स मोजुन घेतना 'अरे, फारच चटकन झाला की तुझा haircut, आता मला लवकर सलुन बंद करता येईल' हे ऐकवलं..)

पण आता मी निर्ढावलो आहे. घरचच सलुन आणी घरचाच न्हावी असल्याच्या आत्मविश्वासात त्या खुर्चीवर बसुन इंचाच्या गप्पा मारत अपेक्षित haircut करुन घेण्याइतक ईंग्रजी सुधारल आहे. नेहेमिच्या सलुन मधला haircut करणारा Peter ओळखीचा झाला आहे.शेवटी मी एकदा त्याला अनेक दिवस पोटात डचमळणारा अस्सल घाटी प्रश्न विचारुन टाकला. 'किती सुट्तात हो महिन्याचे ??' . मिळालेल्या आकड्याच्या धक्क्यातुन मी अजुनही सावरतो आहे आणी याअमेरिकन लोकांची software लिहिण्यापेक्षा त्यांची पाण्यानी वा बिनपाण्यानी करण जास्त फायदेशीर आहे या निष्कर्षाला पोचलो आहे !!.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मिळालेल्या आकड्याच्या धक्क्यातुन मी अजुनही सावरतो आहे आणी याअमेरिकन लोकांची software लिहिण्यापेक्षा त्यांची पाण्यानी वा बिनपाण्यानी करण जास्त फायदेशीर आहे या निष्कर्षाला पोचलो आहे !!.
Rofl

अहो ते आधी सॉफ्टवेअरच लिहीत असतील, तुम्ही आल्याने त्यांच्या नोकर्‍या गेल्या. पण हरकत नाही, काहीतरी तर केले पाहिजे ना!! नि कुठलेहि काम करायची लाज म्हणून नाही इथे!!

Lol Lol

इथे भारतात सुद्धा एकदा मला केस जरासे कापणे, सरळ करणे आणि हायलाइट करणे मिळून १२०००रु. सांगितले होते Uhoh घरचा खाष्ट प्राणी म्हणाला तेवढ्यात मी ३०० हेअरकट्स करीन Proud

आजकाल अजून एक म्हणजे केस कापायला गेलं की विचारतात कुठला/ली स्टायलिस्ट हवा/वी? रु.४५० की ५५० की ६५०? फरक काय विचारलं की म्हणतात "४५० वाला नया बंदा है और ६५० वाली सिनियर मॅडम है, उनका अपॉइंटमेंट लगेगा" Uhoh अशा त्या नव्या "बंद्या"च्या हातात कोण बरं आपले केस देईल? पण मी देते बिंदास. Proud

असो. मला तुमचे सगळेच लेख आवडताहेत Happy

उटणं लावून अंघोळ Rofl
हे इंचाचं आपल्याही बाबतीत Proud हे मिडीयम, हे कमी करा Lol

जपानलाही साधारण असंच झालं होतं. तिथे क्युबी हाऊस नावाचा प्रकार असतो.
दुकानाबाहेर उंचावर तीन दिवे लटकत असतात. लाल पिवळा आणि हिरवा. अधूनमधून ते दिवे पेटत विझत असतात, ते भादरून घ्यायला आलेल्या लोकांच्या संख्येप्रमाणे. लाल दिवा दिसला तर बाहेरूनच परत जावे!
क्युबी हाऊस म्हणजे १० मिन्टात केस कापणारे सलून. आमच्या सिनीअरांनी नेहेमीप्रमाणेच सांगितलं होतं, की १० मिनीटाच्या वर एक सेकंद जरी झाला तरी २० मिन्टांचे पैसे घेतात. फेकाडू लेकाचे.

तिथे पहिल्यांदा गेलो, तेव्हा तिथला एक बिरबल मला म्हटला होत, "काय म्हाराजा?? कसं कसं म्हन्ता?"
"काही नाही. हे मिडीयम, हे जास्ती कमी करा. पण फार जास्ती कमी करू नका."
"आता केस कापल्यावर कमीच होणार ना?" बिरबल म्हणे Uhoh

रेटः १० मिनीटांचे १००० येन. *सर्वात स्वस्त. आमच्या कंपनीतली एक ललना २०००० येनचे केस कापे म्हणे Uhoh

ammi , श्री, झक्की , नताशा, ऋयाम धन्यवाद !:
@ऋयाम - माझे युरोप मधे असलेले मित्रही अश्याच तक्रारी करत असतात ! Happy

Happy छान लिहिलं आहेस. जुने दिवस आठवले.

तू पहिल्यापासून एकदम चांगल्या सलून मधे तरी जातो आहेस रे. आम्ही तर आधी व्हिएतनामी बायकांकडून केस कापून घ्यायचो. तुझ्यासारखी आमची पण झोळी रिकामी होती, त्यामुळे स्वस्तातले स्वस्त 'न्हावी' शोधत गेलो आणि '३.९९ Haircut' मधे शिरलो. आत केस कापणार्‍या सगळ्या बायकाच होत्या. आता भारतात पुरुषांचे केस पुरुषच कापतात, त्यामुळे आधी वाटलं ब्युटी पार्लर मधेच आलो कि काय. मग चार चार वेळा आत बाहेर करून खात्री केली कि इथे पुरुषांचे केस कापले जातात आणि मग नंबर आल्यावर जाऊन बसलो!
त्या बायकांना इंग्रजी सुद्धा येत नव्हतं. त्यामुळे किती इंच कापा, कानावर बारीक करा वगैरे काही संवाद नाहीत. त्यांना फक्त आकडा सांगायचा. १ म्हणजे एकदम बारिक; जवळजवळ गोटाच, २ म्हणजे मध्यम आणि ३ म्हणजे फारसे कापू नका. (हे सुद्धा एक दोन वेळा डोक्यावर अपेक्षेपेक्षा भलतच काहीतरी झाल्यावर कळालं). मग आम्ही म्हणायचं "नं. २", पुढची १०-१५ मिनिटं स्वस्थ बघत बसायचं आणि १५ मिनिटानी बाईचं 'Thank You' ऐकू आलं कि तिला ५ डॉलरची नोट देऊन डोक्यावर उरलंसुरलं जे असेल ते घेऊन गपचूप घरी यायचं! असा क्रम असायचा. हे असं पुरी २ वर्ष दर एक दीड महिन्यानी चाललं.

आता मी पण "किती इंच कापू" विचारणार्‍या 'न्हावीणीकडे' जातो. पण भारतात केस कापताना हिंदी चित्रपटांपासून ते राजकारण, क्रिकेट पर्यंत गपा मारणार्‍या आणि नंतर मस्त मालीश करून देणार्‍या न्हाव्याची सर तिला नाही.

शिका लेको शिका!
कमीतकमी हजामत कशी करतात ते शिकलात तर एकमेकांची करून पैसे वाचवता येतील
पन ते जाऊन्द्यात. हितं सात-पाच बारा अस्ला हिशोब जमेना, २-३ वर्सं झाली म्हंताय आमेरिकेत जाय्ला?

न्हावी
सौरभ.. | 18 March, 2012 - 18:33

ल्येख लिव्लाय बाराला.

आन >>जिज्ञासुंसाठी ऑगस्ट २००७ ला आलो.<< आसं बी म्हन्ताय..
कठीन हाय आम्रिकेचं...

(ता.क. वर इब्लिसपणा केला आहे. बा़की लेख झक्कास जमलाय. सबब हलकेच घेणे)

@इब्लिस - नका...नका...एवढा त्रास करुन घेऊ जीवाला...लेख २-३ वर्षांपुर्वीचाच आहे...मा.बो. वर आत्ताच join झालो ...म्हणुन आत्ता टाकला इथे एवढच..
(ता.क. : ता.क. बद्दल मनःपुर्वक आभार ! Happy )

मिळालेल्या आकड्याच्या धक्क्यातुन मी अजुनही सावरतो आहे आणी याअमेरिकन लोकांची software लिहिण्यापेक्षा त्यांची पाण्यानी वा बिनपाण्यानी करण जास्त फायदेशीर आहे या निष्कर्षाला पोचलो आहे !!.

>>
Rofl

अहो ते आधी सॉफ्टवेअरच लिहीत असतील, तुम्ही आल्याने त्यांच्या नोकर्‍या गेल्या >>
>>>
Lol

हो .. माझा झुरिच मधला अनुभव थोडा असाच आहे ...

"किती सेंटिमिटर ?" असे तिने तिच्या तोडक्या इंग्रजीत विचारल्यावर . .
"तेवढे सेंटिमिटर ठेवायचे का कापायचे?" असे मि विचारले होते . .

माझं जर्मन आणि तिचे इंग्रजी "अगाध" असल्यामुळे मजा आली होती . . .

बिचारी कात्री ला इंग्रजीत "त्सीसोर" म्हणत होती . .
मि काय जर्मन पाजळले होते आता आठवत नाही . . Lol

बाकी लेख मस्त Happy

अगदी बरोब्बर लिहिलेयस मित्रा........ प्रथम कन्यका अशा जागी बघून छाती आणि मेंदूत धडधड वाढते..... माझ्या वाटयाला एक मेक्सिकन बाला आली होती. कन्येने सुरुवातीलाच "माझा नवरा आर्मी मध्ये असतो" हे जाहीर करून टाकले होते ('तुझे थोबाड पाहता सर्वच मुलींनी तुला तसे सांगायला हवे' -मित्रवर्ग)...... पण नंतर मात्र तिच्या संमोहनातच अडकलो. "केस बारीक करून मिळतील. जास्ती /कमी असल्या तक्रारी नंतर चालणार नाहीत. " असे प्रेमळ बोलणे पेठेतल्या न्हाव्याकडून ऐकायची सवय असल्याने सुरुवातीला ही ललना जरा जड गेली. पण तिने मायेने केसांची ३ वर्षे काळजी घेतली.......अगदी अपॉईंटमेंटसुद्धा मोबाईलवर तातडीने देऊ लागली....... आज तिच्या आठवणीने डोळे भरून आले...... तिचे आणि तिच्या (आर्मीतल्या) नवर्‍याचे भले होवो.........