दुर्गम दुर्ग -मोरोशीचा भैरवगड…..
काळालाही आव्हान देणारा दुर्गम दुर्ग,जीवाचा थरकाप उडवणारी चित्तथरारक चढाई,सरळसोट कातळकडा,अंगावर येणारा ओव्हरहँग आणि निमुळत्या पायऱ्या महाराष्ट्रातील हाडाच्या भटक्यांना याची दिवसाउजेडी स्वप्ने नाही पडली तर नवलच…!
हजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर! आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर यावी इतकी खोली, सकाळी अकरा वाजताही सूर्यकिरणे अडवली जातील अशा डोंगरांचा शेजार! त्याच्या एका बाजूला सरळसोट भिंत आणि दुसर्या बाजूच्या पोटात कोरलेली वेडीवाकडी कातळवाट! त्या भिंतीखाली थोडंस मोकळं पठार, त्याखाली बर्यापैकी उताराच्या वाटा आणि पायथ्याला वळसा मारून माळशेजकडे जाणारा कल्याण-नगर रस्ता! - भैरवगड या वर्णनापेक्षाही अधिक काहीतरी आहे!