भैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क!!

Submitted by आनंदयात्री on 7 December, 2011 - 02:19

हजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर! आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर यावी इतकी खोली, सकाळी अकरा वाजताही सूर्यकिरणे अडवली जातील अशा डोंगरांचा शेजार! त्याच्या एका बाजूला सरळसोट भिंत आणि दुसर्‍या बाजूच्या पोटात कोरलेली वेडीवाकडी कातळवाट! त्या भिंतीखाली थोडंस मोकळं पठार, त्याखाली बर्‍यापैकी उताराच्या वाटा आणि पायथ्याला वळसा मारून माळशेजकडे जाणारा कल्याण-नगर रस्ता! - भैरवगड या वर्णनापेक्षाही अधिक काहीतरी आहे!

कल्याण डेपोला शनिवार, ३ डिसेंबरला रात्री सगळे जमलो तेव्हा एक थरारक ट्रेक आपल्या नशिबात वाढून ठेवला आहे, याची मला अजिबात कल्पना नव्हती. 'ऑफबीट'च्या ब्लॉगवर टेक्निकल ट्रेक असं लिहिलं होतं, माहितीसाठी फोटो टाकलेले होते तरीही त्या फोटो-माहितीवरून भैरवगडाचा रोमांच कळला नाही. तो अनुभव प्रत्यक्षच घ्यायला हवा.

यावेळी "ऑफबीट"च्या भैरवगड ट्रेकचे लीडर होते - प्रीती, राजस आणि कदाचित टेक्निकल असल्यामुळे - सुन्या आंबोलकर. यष्टीमध्ये दोन-अडीच तासांचा प्रवास करून कल्याण-नगर रस्त्यावरील 'मोरोशी' या भैरवगडाच्या पायथ्याला असणार्‍या गावाला पोचायचे होते. एसटीमध्ये बसल्या बसल्या झोप घेता येईल अशा कल्पनेत जुन्या ओळखीच्या ट्रेकमेट्सची ख्याली-खुशाली विचारून झाली. थोड्याच वेळात "एसटी आली" असा आवाज झाला आणि प्रचंड गर्दी असल्यामुळे एसटी थांबत असतानाच खिडक्या उघडून खालूनच आतमध्ये बॅगा टाकून दिल्या. थोड्यावेळाने कळले, ती आमची एसटी नव्हतीच! मग पुन्हा खालूनच आतल्या प्रवाशांना सांगून त्या बॅगा काढून घेतल्या. (त्या धांदलीत बहुधा आमच्यापैकी कुणाच्याच नसलेल्या एक-दोन बॅगाही खाली आल्या असाव्यात असे नंतरच्या गोंधळावरून वाटले). मग आमचीही एसटी थोड्याच वेळात आली आणि कशाबशा दोन सीट्स मिळवल्या. मोरोशीपर्यंत प्रवास उभ्यानेच करावा लागणार होता.

एसटी सुरू झाली आणि आमची गाणीही! ट्रेकच्या मूडमध्ये असलो की एसटी, बाकीचे पेंगुळलेले लोक, काळ-वेळ याचं भान राहत नाही! (आजूबाजूचे लोक बर्‍याचदा आमचे हे 'उद्योग' चालवून घेतात.) पण तेव्हा मात्र आमची सूर-ताल(आणि प्रसंगी शब्दही) या सर्वांना सोडून चाललेली गाणी ऐकून कंडक्टर खवळला! "तुमचं हे जे काय आहे ते मुरबाड गेल्यावर करायचं" - इति कंडक्टर! ट्रेकमधल्या आमच्या एका जिव्हाळ्याच्या कार्यक्रमाचा असा उद्धार झालेला पाहून २२ फुल ऐवजी ४४ हाफ तिकीटे काढावीत असा "सूडविचार" माझ्या मनात येऊन गेला! अखेर कंडक्टर शेवटच्या सीटपर्यंत राउंड मारून गेला, लाईट बंद झाले आणि आमची गाणी मुरबाड यायच्या आधीच पुन्हा सुरू झाली!

मोरोशीला उतरलो तेव्हा बारा वाजून गेले होते. रस्त्यालगतच्या एका घर कम हाटेलात संयोजकांनी आधीच कल्पना देऊन ठेवलेली असावी. सुनसान रस्ता, उगवतीकडे काळोखात अस्पष्ट दिसणारी भैरवगडाची रांग, थोडीशी थंडी आणि त्या घरवाल्यांनी ऑफर केलेला चहा! क्या बात! कोण नाही म्हणेल? मग चहाचा राऊंड झाला. त्यांच्या अंगणात परिचयाचा कार्यक्रम पार पडला. मी नुकतेच घेतलेले हंटर शूज 'टेस्ट' करण्यासाठी घातले होते. त्यांच्या लांबलचक लेस त्या वेळात मी लावून घेतल्या.

प्रीतीने कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त घाबरवून सोडणार्‍या सूचना दिल्या. 'या भागात भरपूर विषारी साप आहेत. ते रात्रीच्याच वेळी अधिक अ‍ॅक्टीव्ह असतत. मान्सून नंतर या भागात येणार आपण दुसरे किंवा तिसरेच असू, त्यामुळे एकत्र चाला, प्रत्येकाकडे टॉर्च.... इ इ इ ' नुकत्याच झालेल्या वासोटा ट्रेकमधल्या अनपेक्षित "हिस्स" प्रसंगामुळे ही खबरदारी असावी. आम्हाला मुख्य चढणीचा भाग पार करून पठारावरच्या भैरोबाच्या वाडीपर्यंत जायचे होते. तिथे मुक्काम करून मग दुसर्‍या दिवशी सकाळी गड चढायचा होता. तिथलाच एक गावकरी वाटाड्या म्हणून येणार होता. पाऊण वाजता बॅगा पाठीवर टाकून निघालो. थोडे अंतर रस्त्यानेच चालून मग शेतातून एक पायवाट पकडली. नाकाबंदीसारखं काहीतरी रस्त्यावर लागलं होतं. तिथल्या पोलिसाने "भैरवगड का? वाटाड्या घेतला आहे का?" वगैरे चौकशी केली.

पायवाटेने थोडे अंतर चाललो असू, तेवढ्यात आमच्या वाटाड्याने एका बंद घराच्या पडवीत नेले आणि इथेच आराम करा असे म्हणू लागला. रानात वाट काट्यांची आहे, साप आहेत, रात्री चढता येणार नाही वगैरे वगैरे कारणे दिल्यावर आम्हाला 'वेगळीच' शंका आली. लीडरलोक्सांनी त्याला बाजूला नेऊन काय तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकला. आणि मग त्या वाटेने वीसएक टॉर्च एकापाठोपाठ लखलखू लागले. सवयीने आमच्या जागाही आता ठरून गेल्या आहेत. नेहमीप्रमाणे सुशील आणि मी सुन्याबरोबर बॅकलीडला होतो. उतरताना आम्ही बरोब्बर फ्रंटलीडला असतो. वाट शोधायची असेल तर आम्ही कुठेही असतो - झाडीत, घळीत, निवडुंगात इ.इ. लीड-बिड ह्या सगळ्या मोहमयी गोष्टी आहेत! everyone will walk either behind us or in front of us असं सोप्पं सूत्र आहे! असो. 'पहिलटकरांना' "चले चलो"चा नारा देत, मागे कुणीही राहणार नाही याची काळजी घेत दोन-अडीच तास उभट चढ, सपाट पठार यावरून चालून अखेर भैरोबाच्या वाडीजवळ आलो. इथे दोन-चार उत्साही लोक शेकोटीसाठी लाकडं शोधायला निघून गेले.

शेकोटी पेटवली आणि पाच पर्यंत फक्त भुतांच्याच गप्पा टाकल्या.

उघड्यावर तासभर झोप लागली असावी. थंडी वाढल्यामुळे तमाम जनता कुडकुडत होती. मी पावणेसहा पासून जागाच होतो. काळोख संपत जातानाची ही वेळ फार सुंदर असते. एकही शब्द न बोलता, कसलाही विचार न करता, शांतपणे श्वास घेत फक्त स्वस्थ पडून होतो. साडेसहाच्या सुमारास आकाश हळूहळू उजळायला लागलं आणि आजूबाजूचा नजारा दिसायला लागला.

मुक्कामाची जागा नि:संशय सुंदर होती. डोंगरकड्यापासून वीसएक फुटांवर आम्ही पथार्‍या पसरल्या होत्या. विरूद्ध बाजूला भैरवगडाची भिंत. बाजूला घळ आणि लगेचच अजून एक भैरवगडापेक्षाही उंच डोंगर. तिथून उजवीकडे पार नानाच्या अंगठ्यापर्यंत गेलेली डोंगररांग. नुकताच गिलावा दिला असावा असे सरळसोट कडे आणि त्यांच्या समोर दूरवर नजर जाईल तिथपर्यंत जमीन!

टाईमपास करत सगळं आवरून निघायला आठ वाजले. भैरोबाची वाडी निर्मनुष्य आहे. पूर्वी इथे वस्ती होती असं म्हणतात. आता एखाद-दुसरं पडकं घर आहे. तिथलीच लाकडं आणून आमचा आदल्या रात्रीचा 'शेकोटीचॅट' पार पडला होता. भैरवगडाला पायथ्याला डाव्या दिशेने पूर्ण वळसा घालून वाट जाते.
त्यावाटेवर ही काकडीसारखी दिसणारी वनस्पती दिसली..

वाटेत एके ठिकाणी पाण्याचे टाके आहे. तिथे बाटल्या भरून घेतल्या.
टाक्याजवळ सुन्या - द लीडर!

डाव्या हाताला गेलो की भैरवगडाकडे एक सोंड चढून वाट जाते. (ही एकमेव वाट आहे). 'खरा' ट्रेक इथून सुरू होतो.

तिथून बाजूच्या डोंगररांगेचा फोटॉ -

एक थोडासा घसरडा पॅच पार केला की आपण गडाच्या मागच्या बाजूला येतो. आणि.... इतका वेळ पायवाटेशी असलेला संपर्क संपतो. इथून फक्त आणि फक्त सरळसोट कातळ लीडरवरच्या विश्वासापेक्षाही स्वत:वर अधिक विश्वास ठेऊन चढायचे.

या टप्प्यावर एके ठिकाणी एक खोलगट रिकामं टाकं असावं अशी जागा आहे. तिथे सर्वांनी बॅगा ठेवल्या. इथून वर ट्रॅवर्स मारून चढायचे असल्यामुळे, पाय ठेवण्यास योग्य खाच नसल्यामुळे आणि मागे लगेचच एक्स्पोजर असल्यामुळे (दोन-तीन पावलांवर खोल दरी असली की वाटेच्या त्या बाजूला 'एक्स्पोजर' असे म्हणतात) लीडर्सनी तिथे बिले लावले होते. अप्पर बिलेपाशी विश्वेश, तर लोअर बिलेपाशी सुन्या उभा होता. तो पॅच घाबरत, धडधडत किंवा आरामात पार करून एखादा वर आला की त्याच्या कमरेला लावलेला बोलाईन (हा नॉटचा एक प्रकार आहे) सोडायला अस्मादिक तिथे हजर होते. (जल्ला एकदा हे रॉक क्लायबिंगचे तंत्र शिकायचे आहे!) कुठलाही गोंधळ न होता, शिस्तबद्धपणे सर्वच्या सर्व २२ जण एकामागून एक तो पॅच चढण्याचा पराक्रम करते झाले. त्याचे हे फोटो -
सुन्या आणि प्रीती

सुन्या आणि वर विश्वेश बिले लावत असताना -

ज्याच्या भरवशावर ही चढाई झाली तो अँकर -

हे आमच्यातले सर्वात 'तरूण' नारायणकाका (यो रॉक्सच्या वासोट्यावरील लेखात यांच्या उडीचा फोटॉ आहे)

यानंतरही गडाचा माथा बराच वर आहे. त्या पॅचपासून पुढे अरूंद, अनियमीत अशा चिक्कार पायर्‍या आहेत. (हे सगळे इंग्रजांचे उद्योग असावेत!)

गडाच्या माथ्यावर अस्ताव्यस्त वाढलेला निवडुंग! त्याचे टोचणारे काटे टाळत प्रसंगी रांगत, घसरत चढावे लागते. हे एवढे सगळे उपद्व्याप करून जेव्हा वर पोचतो, तेव्हा स्वागताला असतो - आजूबाजूचा नितांतसुंदर नजारा. अफाट पसरलेला व्ह्यू इथून दिसतो. साधारण ईशान्येला हरिश्चंद्रगड-तारामती शिखर आणि सुप्रसिद्ध कोकणकडा, त्याच्या उजवीकडे घड्या पडलेल्या डोंगररांगा, पश्चिमेकडे नानाचा अंगठा, नैऋत्येकडे नाणेघाटाचे पठार, बोरांड्याच्या नाळेने नाणेघाट चढून गेल्यावर लागणारे वीजेचे टॉवर्स आणि उत्तर-पश्चिमेकडे नजर पोचेल तिथपर्यंत विस्तीर्ण सपाट प्रदेश, एवढा मामला आहे!!

गडावर बाकी काहीही नाही. दरवाजा नाही, निवासी बांधकाम नाही, तटबंदी नाही, बुरूज नाही! गडाचा वापर माळशेजसारख्या महत्त्वाच्या प्रदेशावर केवळ टेळणीसाठीच होत असावा.

अर्ध्या तासात परत फिरलो. आता उतरताना तर आणखी अवघड प्रकार होता. कारण कडा, कातळ, एक्सपोजर हे सगळे आता डोळ्यांसमोर असणार होतं.

तिथे भीतीचे अ‍ॅटॅक येण्यापेक्षा अशावेळी कड्याकडे तोंड आणि दरीकडे पाठ करून उतरणे हा उत्तम उपाय असतो. १० पायर्‍यांच्या एका पॅचवर माझी काही सेकंद ज्ज्जाम टरकली होती. पाठीमागे खोल दरी असताना पाय ठेवायला जागा नाही असे वाटणे, ही भीती फार भयानक असते. इतकी, की पुढच्या पॅचला असली भीती टाळण्यासाठी सरळ दरीकडे तोंड करून उतरावे का, असा (अ)विचार मी करत होतो.

(अवांतरः अनुभवांती असे वाटते की, नवख्या ट्रेकरला चढ/उतरताना दिली गेलेली त्याच्या दृष्टीने सर्वात भीतीदायक सूचना ही आहे - "तू जिथे हात ठेवला आहेस तिथे पाय ठेवायला हवा होतास!") असो. तर उतरतांना पन्नास फुटाच्या एका पॅचजवळ लीडर्सलोकांनी रॅपलिंगचा वापर केला आणि आम्ही सर्व २२ बहाद्दर वीर सुखरूप खाली परतलो.
हा दोरावर मी, खाली सुन्या -

ढाकचा रॉकपॅच हा आपण केलेला सर्वात थरारक ट्रेक होता' ही माझी समजूत चुकीची होती. ढाक जर यत्ता पहिली असेल तर भैरवगड यत्ता चौथी ('स्कॉलरशिप-अ‍ॅबॅकस' वगैरे परीक्षांसकट यत्ता तिसरी) असायला हरकत नाही! असो. आयुष्य सार्थकी वगैरे लावलेला अनुभव घेऊन पुन्हा पायथ्याकडे आलो. जेवणाच्या पुड्या सोडल्या आणि मागच्या तीन तासांचा थरार खाण्याबरोबर चवीने चघळला. येताना पुन्हा टाक्याजवळ पाणी भरून घेतले आणि उतरायला सुरूवात केली.

उतरताना माझा निसर्गदत्त आणि स्वाभाविक वेग अडवून सर्वांत पुढे जाऊ द्यायला सुन्या मास्तरांनी सपशेल नकार दिला आणि थोड्याच वेळात स्वतःच गायब झाले! ए-ओ च्या हाका देत त्याच्या मागून जाणारा सुशील गोंधळला आणि सुशीलला डोळ्यांसमोर ठेवून उतरणारे आम्ही चार जण अडकलो. अखेर ट्रेकमध्ये वाट चुकण्याची माझी जुनी (गौरवशाली वगैरे) परंपरा पाळली गेली म्हणून मी विलक्षण 'खूश' झालो. मागचा ग्रुप बराच मागे होता आणि प्रीती-राजसबरोबर असल्यामुळे सुरक्षित होता. समोर खालच्या दिशेने जाणारी वाट होती. गावाची दिशा माहित होती. परिस्थिती अवघड वगैरे अजिबातच नव्हती. थोडे उतरून खाली आलो, तर सुन्याला शोधत असलेले अजून तीन जण भेटले! मग आम्ही ८-९ जण वाट शोधू लागलो. आमच्या हाका ऐकून गावाच्या विरूद्ध दिशेकडून मला एक अनो़ळखी आवाज ऐकू आला. त्या आवाजाचा वेध घेत मी पुढे जाऊ लागलो तर "शिद्धा जा शिद्धा जा" अशी हिंदी सूचना ऐकू आली. अस्सल मराठमोळ्या सह्याद्रीच्या कुशीत ही हिंदी हाक कुठून आली असा विचार करत मी पुढे गेलो. कुठल्या दिशेने "शिद्धा जा"यला हवं होतं हे कळणं फार आवश्यक होतं, नाहीतर भलतीकडेच उतरलो असतो. "सीधा जा" हे असल्या 'प्रायोगिक' भाषेत सुचवणारा तो आवाज म्हणजे काल रात्री काट्यांत शिरायला बुजणारा आमचा गाईड कम गावकरी होता. काल त्याने अंगभर कांबळ पांघरलं होतं. त्यामुळे आज मी त्याला ओळखलंच नाही. मागून आलेल्या सुशीलने त्याची ओळख पटवून दिली. आता आम्ही न चुकता गावात पोहोचणार हे नक्की झाले होते. तिथून अर्धा पाऊण तास चालून जेव्हा हायवेवरच्या 'जय मल्हार' या हॉटेलची पाटी दिसली तेव्हा "फायनली आपण पोचलो" हा आनंद जगातल्या कुठल्याही आनंदापेक्षा जास्त होता. सुन्या कालच्याच घर कम हाटेलात चहा-नाष्त्याबद्दल सांगायला मावळ्याच्या गतीने पुढे निघून आला होता हे आम्हाला नंतर कळले. (आम्हाला वाटत होतं की, हाही हरवला!)

अंबाजोगाईवरून आलेली कल्याण एसटी पकडली आणि बसण्याची अपेक्षाच न ठेवता दोन तास उभे राहण्याची मानसिक तयारी ठेवली. झालेही तसेच. अशावेळी माझ्या फारसं आकारमान नसणार्‍या तब्येतीचा हमखास एक फायदा होतोच - मी उभ्या जागीच, WTC जसा सरळ खाली कोसळला, तसा सरळ खाली बसतो. दोन-तीन इंच अधिक जागा मिळाली तर मांडी घालूनही बसता येते! येताना मी तेच केले. मग यथासांग आठ वाजता कल्याण, स्लो ट्रेनने साडेनऊ वाजता दादर असा भैरवगड थरारनाट्याचा शेवटचा अंक पार पाडून दिवसाचा पडदा पडला, तेव्हा ज्ज्जाम थकलोही होतो आणि खूssssशही होतो...

अशा ट्रेकहून आलो की नेहमीच वाटतं, की 'दिवस चांगला गेला' याचा भटक्यांच्या प्र'चलित' शब्दकोशातला अर्थ असल्या अनुभवांपेक्षा अजून वेगळा काही असेल का?

- नचिकेत जोशी

(फोटॉ - सोहम बॅनर्जी, राहुल खोत, नचिकेत जोशी)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो बघूनच नजरेला चकवा बसतोय.
या गडांवरच्या शिड्या, कठडे कधी दुरुस्त होणार ?
मला म्हाराष्ट्र देशींच्या गडकिल्ल्यांचा सार्थ अभिमान आहेच, पण परदेशात अनेक ठिकाणी मी असे बघितलेय, कि जिथे जिथे चढण, निसरड्या जागा आहेत, तिथे तिथे भक्कम कठडे असतात. निदान एक वाट तरी, सर्वसामान्य शारिरीक कुवतीच्या लोकांना घेण्याजोगी असते. ज्यांना थरारच अनुभवायचा आहे त्यांच्यासाठी वेगळी (आणि तरिही सुरक्षित ) वाट असते. अर्थात हे सरसकट विधान नाही, जेवढे बघितले त्यावरच आधारीत.
आणि त्या काकड्या नाहीत रे !!

नचिकेत,
तो ट्रेक, तो थरार, तुम्हां सर्वांचा उत्साह आणि हिम्मत.... Hats off

लिखाण, फोटो, वर्णन .... सगळंच मस्त.

अरे बापरे काही फोटो बघून बसल्याबसल्या पोटात गोळा आला.
पण खरंच आनंदयात्री नाव सार्थ आहे तुझं!
आणि सर्वात तरुण नारायण काकांचं वय काय? इतका कठीण ट्रेक किती वयापर्यंत करू शकतात याची फक्त उत्सुकता आहे म्हणून विचारते.

शब्दातीत थरार आहे हा, प्रचंड आवडले वर्णन. ह्या ग्रुप बरोबर भटकंती करायला आवडेल. नंबर मिळतील का?
नचिकेत जोशी आपले लिखाण कायमच निवडक १० त जाते Happy Happy Happy

ढाकचा रॉकपॅच हा आपण केलेला सर्वात थरारक ट्रेक होता' ही माझी समजूत चुकीची होती. ढाक जर यत्ता पहिली असेल तर भैरवगड यत्ता चौथी ('स्कॉलरशिप-अ‍ॅबॅकस' वगैरे परीक्षांसकट यत्ता तिसरी) असायला हरकत नाही! >> AM ला सातवी पास होशिल. Biggrin

आनंदयात्री - त्या "काकड्या" नसून कावळी नामक एक विषारी वनस्पती आहे. Cryptolepis bhchanane . या संबंधीची एक सत्य पण कटु कहाणी लवकरच मा बोवर टाकणार आहे.
तुम्ही केलेले भैरवगडाच्या ट्रेकिंगचे वर्णन जरा सावकाशीने वाचेन.

सर्वांचे मनापासून आभार!
दिनेशदा, शशांक - त्या काकड्या नाहीयेतच. म्हणूनच अवतरणचिन्ह टाकले. थांबा, काढतो ते वाक्य! Happy

डेविल - Lol
(पण AM यावेळी हुकणार आहे माझा... Sad )

मानुषी, पेशल ठांकू Happy
वय वगैरे नाही विचारलं, पण पन्नाशीच्या पुढे नक्की असावेत... (दगडूला माहित असेल कदाचित)

सुरश, नक्की सामील व्हा ग्रुपमध्ये.
हा ब्लॉग अ‍ॅड्रेस - offbeatsahyadri.blogspot.com

विश्वेश, - येस्स्स!! तुझी पोस्ट म्हणजे दुर्मिळ गोष्ट!! Happy

अबब.................. कायच्या काय आहे ? प्रचि २३ तर दड्पुनच टाकणारा Happy

WTC जसा सरळ खाली कोसळला, तसा सरळ खाली बसतो.>> Lol Rofl Lol

नच्या... एकदम जबराट ट्रेक.. जबराट फोटोज.. जबराट वर्णन... खूप खूप आवडले.. मस्त मस्त !!
हा ट्रेक राहीलाच माझा Sad

ढाकचा रॉकपॅच हा आपण केलेला सर्वात थरारक ट्रेक होता' ही माझी समजूत चुकीची होती. ढाक जर यत्ता पहिली असेल तर भैरवगड यत्ता चौथी ('स्कॉलरशिप-अ‍ॅबॅकस' वगैरे परीक्षांसकट यत्ता तिसरी) असायला हरकत नाही! >> AM ला सातवी पास होशिल>>१०० ++++

तुम्हाला ढाकची थरार अनुभवयाचा असेल तर पहिला ट्रेक तोच करावा... कारण हा भैरवगड, हरिश्चंद्र व्हाया नाळीची वाट, अलंगमदन हे माध्यमिक इयत्तेतले ट्रेक आधी केले तर ढाकबहिरी ट्रेकच्या थराराची हवाच निघून जाते.. हा माझा स्वनुभव.. Happy

इतका कठीण ट्रेक किती वयापर्यंत करू शकतात याची फक्त उत्सुकता आहे म्हणून विचारते.>> साल्हेर जो सर्वात उंच जागेवरील किल्ला म्हणून ओळखला जातो तिथे वाटेत एक चष्मावाले काका डोक्यावर सुनिल गावस्करसारखी पांढरी टोपी व हातात काठी घेउन चढताना भेटले होते... ! हरिश्चंद्र व्हाया नाळीच्या वाटेने जाताना आमच्या ग्रुपमध्ये एक सत्तरीतले वयस्कर काका होते !!! आणि तरुणांना लाजवतील असा जोश असलेले हे मिस्टर नारायण (यांना काका बोलूच शकत नाही) रिटायर्ड आहेत सो साठी नुकतीच ओलांडली असेल.. त्यामुळे वयाची मर्यादा सांगणे कठीण आहे.. हा सगळा खेळ आवड, मनाची कणखरता नि फिटनेस यावर अवलंबून आहे..

अखेर ट्रेकमध्ये वाट चुकण्याची माझी जुनी (गौरवशाली वगैरे) परंपरा पाळली गेली>>> Lol
वर्णन नेहमीप्रमाणेच म स्त!
एकंदर महाकठिण ट्रेक असावा असं प्रत्येक फोटो पाहत असताना वाटत होतं.. उकाका म्हणतात तसं दूर्गभ्रमंती करणारा गझलकार आहेस Happy

Pages