उरली थोडी वहीत पाने...!
Submitted by चैतन्य दीक्षित on 4 April, 2011 - 10:55
उरली थोडी वहीत पाने, अन् थोडी लेखणीत शाई
फक्त एवढ्यावर आयुष्या कसा तुझा होऊ उतराई?
तुझ्या भव्यतेची हिमशिखरे, सहस्रसूर्यापरी लकाकी
प्रगल्भतेचा अथांग सागर, वर्णायाला आहे बाकी ।
अजुन सुखाची नवी पालवी, अन् दुःखाचे जुनाट काटे
अजून नाही लिहिलेले मी, तव रस्त्यांचे अनंत फाटे ।
अनेक हळवे, गहिवरले क्षण, तसेच अधिरे स्पर्श तुझे अन्
लिहू कसे मी कठोर निर्णय, नवरंगांचे हर्ष तसे अन्?
कितीक खाडाखोडी होत्या, सुवाच्य तरिही होते काही,
कितीक असतिल खाडाखोडी, सुवाच्य तरिही असेल काही ।
हिऱ्यासारखे असंख्य पैलू, गूढ तुझे अन् माझे नाते
लिहिणे यावर अशक्य केवळ, तरी लेखणी लिहीत जाते ।
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा