उरली थोडी वहीत पाने...!

Submitted by चैतन्य दीक्षित on 4 April, 2011 - 10:55

उरली थोडी वहीत पाने, अन् थोडी लेखणीत शाई
फक्त एवढ्यावर आयुष्या कसा तुझा होऊ उतराई?

तुझ्या भव्यतेची हिमशिखरे, सहस्रसूर्यापरी लकाकी
प्रगल्भतेचा अथांग सागर, वर्णायाला आहे बाकी ।

अजुन सुखाची नवी पालवी, अन् दुःखाचे जुनाट काटे
अजून नाही लिहिलेले मी, तव रस्त्यांचे अनंत फाटे ।

अनेक हळवे, गहिवरले क्षण, तसेच अधिरे स्पर्श तुझे अन्
लिहू कसे मी कठोर निर्णय, नवरंगांचे हर्ष तसे अन्?

कितीक खाडाखोडी होत्या, सुवाच्य तरिही होते काही,
कितीक असतिल खाडाखोडी, सुवाच्य तरिही असेल काही ।

हिऱ्यासारखे असंख्य पैलू, गूढ तुझे अन् माझे नाते
लिहिणे यावर अशक्य केवळ, तरी लेखणी लिहीत जाते ।

उरली थोडी वहीत पाने, अन् थोडी लेखणीत शाई,
लिहीन म्हणतो, जमेल तितके, तुझे नि माझे थोडे काही

- चैतन्य.

गुलमोहर: 

उरली थोडी वहीत पाने, अन् थोडी लेखणीत शाई,
लिहीन म्हणतो, जमेल तितके, तुझे नि माझे थोडे काही

सुं द र ...................... अप्रतीम

हिऱ्यासारखे असंख्य पैलू, गूढ तुझे अन् माझे नाते
लिहिणे यावर अशक्य केवळ, तरी लेखणी लिहीत जाते ।

.... छान लिहिलंयस चैतन्य
Happy

कितीक खाडाखोडी होत्या, सुवाच्य तरिही होते काही,
कितीक असतिल खाडाखोडी, सुवाच्य तरिही असेल काही ।>>> मस्त ओळी! आवडल्याच!

उरली थोडी वहीत पाने, अन् थोडी लेखणीत शाई,
लिहीन म्हणतो, जमेल तितके, तुझे नि माझे थोडे काही>>> दुसरी ओळ जरा.....

कविता आवडली. या वयात (जर आपण सांगितलेले वय 'खरे' असले तर - येथे डोळा मारणारा बाहुला गृहीत धरावात) असल्या का कविता रचताय? क्षमस्व, जरा अधिक 'जवळतेने' लिहीले. (ही जाणीव कोणत्याही पातळीला होते हा युक्तिवाद देणार्‍यातले आपण नाही आहात म्हणून लिहीले.)

अजून कवितांच्या प्रतीक्षेत! खर्‍याखुर्‍या आणि चांगल्या कविता सगळ्यांनाच आवडतातच!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार !

बेफिकीर,
दिलखुलास प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
संस्कृतात- न खलु वयस्तेजसो हेतु: असं म्हणतात, (म्हणजे वयाचा आणि तेजाचा/कृतीचा/कर्तुत्वाचा काहीही संबंध नाही)
म्हणजे, तुम्ही म्हणताय तोच युक्तिवाद झाला. Happy
असो, उरली थोडी वहीत पाने यावरून असं म्हणायचं होतं, की जरी मी आत्ता तरुण असलो,
तरी (म्हणजे अजून बरंच आयुष्य शिल्लक असलं तरी) शेवटी तेही कमीच पडेल इतकं आयुष्य गहन, अथांग आणि जाणिवेत न मावणारं आहे. मग मला जर आयुष्यावर लिहायचं (बोलायचं नाही हा... ते पेटंट संदीप खरेचं:)) असेल, तर मला फक्त एवढ्या आयुष्यावर भागणार नाही, मला 'लिहिण्यासाठी' म्हणून अजून आयुष्य हवंय.

हिऱ्यासारखे असंख्य पैलू, गूढ तुझे अन् माझे नाते
लिहिणे यावर अशक्य केवळ, तरी लेखणी लिहीत जाते ।

अप्रतिम! सुंदर कविता!

काय अशक्य लिहितोस रे....
सुरेख, अप्रतिम असले सगळे शब्दही अपुरेच वाटू लागतात दाद द्यायला !

सुंदर !!

कितीक खाडाखोडी होत्या, सुवाच्य तरिही होते काही,
कितीक असतिल खाडाखोडी, सुवाच्य तरिही असेल काही । >>>> Happy

फारच अप्रतिम....अतिशय आवडली.
<<उरली थोडी वहीत पाने, अन् थोडी लेखणीत शाई,
लिहीन म्हणतो, जमेल तितके, तुझे नि माझे थोडे काही>>
लिहित रहा.......या कवितेच्या एकेका कडव्यावर नवी कविता लिहिता येईल......:)
पु.ले.शु.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार!

निखिल, मग येऊ दे की कविता.... !!

वाचनोत्सुक,
चैतन्य !

हिऱ्यासारखे असंख्य पैलू, गूढ तुझे अन् माझे नाते
लिहिणे यावर अशक्य केवळ, तरी लेखणी लिहीत जाते ।.........क्या बात है!!!!

एक अतिशय सुंदर कविता वाचनानुभव आला.

आपले मनःपूर्वक आभार चैतन्य. Happy

चैतन्य,
<<निखिल, मग येऊ दे की कविता.... !!>> विनोद सुद्धा उत्तम करतोस की.......
अश्या कवितेच्या समोर मी काही लिहिण्याची बिशादच नाही..... Happy
तू मात्र मोठा ब्रेक न घेता लवकर आणि अशाच कविता येऊ दे......