पावसाळी दुपार हो की तू
Submitted by बेफ़िकीर on 3 July, 2020 - 04:29
पावसाळी दुपार हो की तू
ओलसरसा विचार हो की तू
गच्च आभाळ मागणी करते
टाळलेला नकार हो की तू
काय वातावरण तुफानी हे
जाउया चल, तयार हो की तू
ज्यामुळे शुष्कता समजते तो
जीवघेणा तुषार हो की तू
पंख नसल्यामुळे इथे आहे
जग म्हणे जा, फरार हो की तू
पार कंगाल मी खयालांनी
आज कविते उदार हो की तू
तेच ते, तेच ते सुरू आहे
एक अनवट थरार हो की तू
येत बसतात नित्यनेमाने
त्या ऋतूंचा जुगार हो की तू
थांबले 'बेफिकीर' का लेखन
चल पुन्हा बेसुमार हो की तू
=====
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा: