पावसाळी दुपार हो की तू

Submitted by बेफ़िकीर on 3 July, 2020 - 04:29

पावसाळी दुपार हो की तू
ओलसरसा विचार हो की तू

गच्च आभाळ मागणी करते
टाळलेला नकार हो की तू

काय वातावरण तुफानी हे
जाउया चल, तयार हो की तू

ज्यामुळे शुष्कता समजते तो
जीवघेणा तुषार हो की तू

पंख नसल्यामुळे इथे आहे
जग म्हणे जा, फरार हो की तू

पार कंगाल मी खयालांनी
आज कविते उदार हो की तू

तेच ते, तेच ते सुरू आहे
एक अनवट थरार हो की तू

येत बसतात नित्यनेमाने
त्या ऋतूंचा जुगार हो की तू

थांबले 'बेफिकीर' का लेखन
चल पुन्हा बेसुमार हो की तू
=====

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच मस्त. बेफिकीर दादा. फक्त लेखन थांबवू नका. आमच्या सारख्यांचे प्रयत्न आत्ता आत्ता सुरू व्हायला लागलेत. तुम्हीच लिहीलेले लेख वाचतोय
गझल कशी असावी याबद्दल!! बरच लिहूनठेवलय तुम्ही. मनापासून धन्यवाद!! मयेकर दादांनी तुमच्या लेखनाच्या लिंक्स दिल्या.

>>>थांबले 'बेफिकीर' का लेखन
वॉव ! बरंय, चांगलं सुचेपर्यंत थांबलंच पाहिजे.

>>>चल पुन्हा बेसुमार हो की तू
ओ, नो...!

-दिलीप बिरुटे

बिरुटे सर. आपला प्रतिसाद इथे पाहून आनंद झाला.
बेफिकीर, अंतर्मनात प्रतिभेचे मूळ घट्ट रुजलेले असेल तर पानगळीमध्ये पाने झडली तरी वसंतात नवे धुमारे फुटणारच. ती बहार लवकर अवतरेलच.