भेटली फारा दिसांनी
Submitted by चैतन्य दीक्षित on 18 April, 2019 - 06:47
भेटली फारा दिसांनी
बोलली मनमोकळे
बदलले संदर्भ तरिही
हास्य ओठी कोवळे!
प्रश्न होते जे मनातच
लाभली त्यां उत्तरे
अन् नव्या प्रश्नावलीचे
भेटले मज चेहरे
बोलणे, बघणे तिचे
अन् मौन वा झुकती नजर
शक्यतांच्या शक्यतांचे
लाघवी फसवे पदर!
भेटल्याची एक तृप्ती
आणि हुरहुरही जरा
यातले लपवू न शकला
कोणताही चेहरा!
भेटणे पुन्हा घडावे
वाटते दोघांसही
पण कधी? केव्हा? कसे?
ठाऊक ना दोघांसही!
~ चैतन्य
विषय:
शब्दखुणा: