गझल - दे

गझल - दे, नको देऊस तू....

Submitted by बेफ़िकीर on 22 March, 2018 - 09:21

गझल - दे, नको देऊस तू....

दे, नको देऊस तू, पण एवढे करशील ना
मी तुला जे मन दिले ते नीट वापरशील ना

पाहण्यालायक जगाने ठेवला नाहीच तर
ओंजळीमध्ये तुझ्या हा चेहरा धरशील ना

बातमी येईल माझ्या संपण्याची लवकरच
सांग तू तेव्हातरी वेळेत आवरशील ना

फार संतापून जेव्हा देह भेगाळेल हा
त्याचवेळी तू तुझा होकार पाझरशील ना

मागतो आहे कुठे मी सांग बाकीचे प्रहर
होत संध्याकाळ माझी रोज कातरशील ना

कामना मनसोक्त भिजण्याची तुझ्या विरहामधे
पावसा तू नेमक्या वेळेस ओसरशील ना

Subscribe to RSS - गझल - दे