गझल - दे, नको देऊस तू....

Submitted by बेफ़िकीर on 22 March, 2018 - 09:21

गझल - दे, नको देऊस तू....

दे, नको देऊस तू, पण एवढे करशील ना
मी तुला जे मन दिले ते नीट वापरशील ना

पाहण्यालायक जगाने ठेवला नाहीच तर
ओंजळीमध्ये तुझ्या हा चेहरा धरशील ना

बातमी येईल माझ्या संपण्याची लवकरच
सांग तू तेव्हातरी वेळेत आवरशील ना

फार संतापून जेव्हा देह भेगाळेल हा
त्याचवेळी तू तुझा होकार पाझरशील ना

मागतो आहे कुठे मी सांग बाकीचे प्रहर
होत संध्याकाळ माझी रोज कातरशील ना

कामना मनसोक्त भिजण्याची तुझ्या विरहामधे
पावसा तू नेमक्या वेळेस ओसरशील ना

पावले जातात कोठे हे नको पाहूस तू
वेळ आली की घराला तूच सावरशील ना

रोज आई प्रार्थना करतो तुझ्या फोटोपुढे
वाट चुकले वासरू, पाहून हंबरशील ना

मी कसा टिकलो इथे नाही कळत माझे मला
तू नको होऊस दुसरा 'बेफिकिर'.... मरशील ना!

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच छान. बेफिकीर, सुप्रिया जाधव, सत्यजित.. यांच्यामुळे गझल आणि कविता यांची गोडी लागली आहे, म्हणून मी त्यांचा ऋणी आहे. _/\_