खराब रस्ते विरक्त झाडे उजाड सारा प्रवास माझा

खराब रस्ते विरक्त झाडे उजाड सारा प्रवास माझा

Submitted by बेफ़िकीर on 13 November, 2017 - 09:20

खराब रस्ते विरक्त झाडे उजाड सारा प्रवास माझा
नका सुखासीन स्थानकांनो उगीच घेऊ तपास माझा

तुला हवे ते तुला दिले पण दया न आली तुला कधीही
अरे खरच की दिलाच नाही स्वभाव मी दिलखुलास माझा

परिस्थितीने मला शिकवले परिस्थिती फक्त आपली हे
नसेल कोणीच आपले हा अचूक ठरला कयास माझा

मुशायरे गाजवून आपापल्या घरी पोचतात तेव्हा
अनेक मंचीय शायरांना खयाल स्मरतो उदास माझा

तुझा नि माझा जुना जमाना कुणी इथे आणला कधी तर
इमारतींच्या विषण्णतेला भिडेल वाडा भकास माझा

Subscribe to RSS - खराब रस्ते विरक्त झाडे उजाड सारा प्रवास माझा