खराब रस्ते विरक्त झाडे उजाड सारा प्रवास माझा

Submitted by बेफ़िकीर on 13 November, 2017 - 09:20

खराब रस्ते विरक्त झाडे उजाड सारा प्रवास माझा
नका सुखासीन स्थानकांनो उगीच घेऊ तपास माझा

तुला हवे ते तुला दिले पण दया न आली तुला कधीही
अरे खरच की दिलाच नाही स्वभाव मी दिलखुलास माझा

परिस्थितीने मला शिकवले परिस्थिती फक्त आपली हे
नसेल कोणीच आपले हा अचूक ठरला कयास माझा

मुशायरे गाजवून आपापल्या घरी पोचतात तेव्हा
अनेक मंचीय शायरांना खयाल स्मरतो उदास माझा

तुझा नि माझा जुना जमाना कुणी इथे आणला कधी तर
इमारतींच्या विषण्णतेला भिडेल वाडा भकास माझा

जुन्या ऋतूंनी तुडुंबण्याची समर्थने कर तयार अथवा
कधीच फिरकू नकोस देऊ विचारही आसपास माझा

किती सजवतो तनास ह्या अन् किती मिरवतो जगापुढे मी
कधी मला हे कळायचे की शरीर आहे लिबास माझा

जगाप्रमाणे कसा बनू हा विचार व्यापून राहिलेला
स्वतःप्रमाणे बनायचा वांझ होत आहे प्रयास माझा

म्हणून जातो अशा ठिकाणी जिथे मला मीच ओळखेना
मला जगाचा न त्रास होवो जगास होवो न त्रास माझा

अशी भरारीच का जमेना जिथे कुठे संपतात सीमा
परीघ माझा नि केंद्र माझे असूनही का न व्यास माझा

तुझा असा शाप लाभल्याने अखंड वणवण करीत आहे
जिथे जिथे पोचशील ना, घमघमेल तेथे सुवास माझा

कळेल त्याला 'गरीब होता तरी मनाने अमीर होता'
कुणीतरी 'बेफिकीर' जेव्हा करेल अभ्यास खास माझा

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा!
बेफी रिटर्न..
सुरेख गझल.. आवडले सगळे शेर.. Happy

सगळेच सुरेख, पण त्यातही

किती सजवतो तनास ह्या अन् किती मिरवतो जगापुढे मी
कधी मला हे कळायचे की शरीर आहे लिबास माझा

हा जास्त आवडला.

जगाप्रमाणे कसा बनू हा विचार व्यापून राहिलेला
स्वतःप्रमाणे बनायचा वांझ होत आहे प्रयास माझा>>
वाह, झक्कासच जमलंय!

वाव्वा... दिलखुलास,उदास,भकास...खूप आवडले!
सुवास आणि मक्ताही मस्तंच!
>>>परीघ माझा नि केंद्र माझे असूनही का न व्यास माझा>>>ही ओळही खास!