नका होऊ नव्या पानांमुळे बेभान वृक्षांनो

नका होऊ नव्या पानांमुळे बेभान वृक्षांनो

Submitted by बेफ़िकीर on 18 May, 2017 - 10:32

नका होऊ नव्या पानांमुळे बेभान वृक्षांनो
पुन्हा घालूच आम्ही मानवी थैमान वृक्षांनो

पुन्हा दिसणार नाही ती पुण्याची शान वृक्षांनो
कधी जे रान होते, आज रेगिस्तान वृक्षांनो

मुलायम हायवे झालेत तुमच्या पार्थिवांवरती
तरी करता कडेने महिरपी नादान वृक्षांनो

फुले पाने फळे छाया वगैरे ठीक आहे पण
करा केव्हातरी वृत्तीच तुमची दान वृक्षांनो

मुलांना सूरपारंब्या, मुलींना देत जा झोके
तुम्ही निपजू नका केव्हाच नि:संतान वृक्षांनो

स्वतःला धड उभे ना राहता येते तरी फुलते
अश्या वेलीमुळे होता तुम्ही सज्ञान वृक्षांनो

Subscribe to RSS - नका होऊ नव्या पानांमुळे बेभान वृक्षांनो