कसले अल्लड झोके आता

आता कसल्या सुरपारंब्या, कसले अल्लड झोके आता

Submitted by बेफ़िकीर on 1 May, 2017 - 09:53

आता कसल्या सुरपारंब्या, कसले अल्लड झोके आता
ज्या फांदीवर झूला होता तिला टेकते डोके आता

सापशिडी, व्यापार नि ल्युडो, काय काय त्यामध्ये नव्हते
उदास करते अडगळीतले धुळकटलेले खोके आता

गल्लोगल्ली गाड्या हिंडत, पोरे पोरी मागे धावत
आता कुठली काळी मैना अन् कुठले चिंचोके आता

गरिबीच्या टॉनिकवर टिकवत संस्कृतीस दिलदार बिर्‍हाडे
नजर ठेवती त्यांच्यावरती बिल्डररूपी बोके आता

नजरानजरी, आणाभाका, अबोल भेटी, विरह बोलके
ज्यांच्या साक्षीने झाले ते वाडे ओकेबोके आता

Subscribe to RSS - कसले अल्लड झोके आता