आता कसल्या सुरपारंब्या, कसले अल्लड झोके आता

Submitted by बेफ़िकीर on 1 May, 2017 - 09:53

आता कसल्या सुरपारंब्या, कसले अल्लड झोके आता
ज्या फांदीवर झूला होता तिला टेकते डोके आता

सापशिडी, व्यापार नि ल्युडो, काय काय त्यामध्ये नव्हते
उदास करते अडगळीतले धुळकटलेले खोके आता

गल्लोगल्ली गाड्या हिंडत, पोरे पोरी मागे धावत
आता कुठली काळी मैना अन् कुठले चिंचोके आता

गरिबीच्या टॉनिकवर टिकवत संस्कृतीस दिलदार बिर्‍हाडे
नजर ठेवती त्यांच्यावरती बिल्डररूपी बोके आता

नजरानजरी, आणाभाका, अबोल भेटी, विरह बोलके
ज्यांच्या साक्षीने झाले ते वाडे ओकेबोके आता

सिमेंटची तटबंदीवाले फ्लॅट बांधले बिनदारांचे
भिंतींच्या कानांचे फुटकळ कुठे राहिले धोके आता

थकलेली ती नजर मिसळली नजरेमध्ये हळूच परवा
चुकणारच इतक्या वर्षांनी 'बेफिकीर'चे ठोके आता

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

सापशिडी, व्यापार नि ल्युडो, काय काय त्यामध्ये नव्हते
उदास करते अडगळीतले धुळकटलेले खोके आता

हा शेर फार आवडला!

नजरानजरी, आणाभाका, अबोल भेटी, विरह बोलके
ज्यांच्या साक्षीने झाले ते वाडे ओकेबोके आता
सिमेंटची तटबंदीवाले फ्लॅट बांधले बिनदारांचे
भिंतींच्या कानांचे फुटकळ कुठे राहिले धोके आता
थकलेली ती नजर मिसळली नजरेमध्ये हळूच परवा
चुकणारच इतक्या वर्षांनी 'बेफिकीर'चे ठोके आता

खूप छान !! चाळ संस्कृतीतल्या जुन्या आठवणी चाळवल्या ........
एकंदरीत तुम्ही फक्त नावाचेच 'बेफिकीर' वाटतां .....

गरिबीच्या टॉनिकवर टिकवत संस्कृतीस दिलदार बिर्‍हाडे
नजर ठेवती त्यांच्यावरती बिल्डररूपी बोके आता>> हे अगदि खरं... छान लिहिलय.