सफर संपायला आली

सफर संपायला आली, उदासी व्यापते आहे

Submitted by बेफ़िकीर on 26 December, 2016 - 11:13

सफर संपायला आली, उदासी व्यापते आहे
कधी संपेल ही शिक्षा, असेही वाटते आहे

किनारा शोधतो आहे कधीचा 'खास' लाटेला
तसे प्रत्येक उर्मीला कुणी शांतावते आहे

'अरे हा व्यर्थ गेला रे' असे माझेच मत नाही
निराळा जन्म आता लेखणीही मागते आहे

न काही वाचणे हा थोर दुर्गुण लेखकाचा पण....
न काही वाचणार्‍याचेच दुनिया वाचते आहे

'जिथे बुडशील तेथे थांबतो' कंत्राट सूर्याशी
जिथे राहीन तेथे ह्यामुळे अंधारते आहे

क्षितीजाएवढी अप्राप्य तू झालीस आताशा
नवल म्हणजे मनाला ही अवस्था सोसते आहे

नको त्या माणसाशी मी घरोबा ठेवला होता
असे प्रत्येक व्यक्ती बोलताना भासते आहे

Subscribe to RSS - सफर संपायला आली