मदिरा वृत्त

अव्यक्त (मदिरा वृत्त)

Submitted by संतोष वाटपाडे on 26 January, 2015 - 23:26

घाव मनावर बालपणी ,जर योग्य कुणी दिधले असते
वाट कधी चुकलो नसतो , अन ध्येय कधी सुटले नसते...
कौरव मित्र जरी बनले , मन रोज उदासिन होत असे
सूतपुत्र म्हणतात मला , सल हाच मला दररोज डसे..

मत्सर द्वेष मनी भरले , अपमान सुडागत बाळगले
भिष्म पितामह द्रोण तथा, मुरलीधर गप्प कसे बसले..
जीवन प्राक्तन मोह घृणा , जर मातृदयेवर सोपवले
केवळ जन्म दिला म्हणुनी , मज का घटकाभर थांबवले..

युद्ध जरी ठरले हरले , मज सौख्य परी मिळणार कसे
जीत पराजय गौण मला , गणगोत सदोदित प्रीय असे..
अर्जुन भीम नकूल तथा , सहदेव युधिष्ठिर सर्व रिपू
भ्रातर हे जर सांग प्रभू , शर साधून आज कुणास टिपू ..

Subscribe to RSS - मदिरा वृत्त