भेट्

वडवानळ

Submitted by संतोष वाटपाडे on 29 October, 2014 - 07:14

भेटली मला ती जेथे वडवानळ उठले होते
माझिया प्रियेने मजला ओठांनी लुटले होते

डोळ्यांची अबोल भाषा श्वासांना कळली नाही
स्पर्शांतिल उष्मा दिसता ते धावत सुटले होते

ठरवले जरीही नव्हते जे झाले नकळत झाले
बाहुपाश गुंफ़त गेले मी डोळे मिटले होते

गंधाळून गेला वारा थरथरली अल्लड गात्रे
निर्बंध मनाचे सारे वादळात तुटले होते

स्वप्नांचा कागद पसरून रंगवले जेव्हा घरटे
कुंचल्यास मम शब्दांच्या का अंकुर फ़ुटले होते

ओढणी तिने सावरली निसटली हातांची बेडी
पण श्वास अधूरे काही अधरी गुरफ़टले होते

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

Subscribe to RSS - भेट्