हार

बाप्पाच्या सजावटीसाठी क्रोशे मोदक आणि कंठी हार

Submitted by मीसाक्षी on 30 August, 2020 - 14:24

खरंतर मायबोली गणेशोत्सवात मोदक स्पर्धेत भाग घेण्यासाठी मैत्रिणींनी सांगितलेले पण मला उकडीचे मोदक साच्यानेच जमतात त्यामुळे स्पर्धेच्या नियमात बसत नव्हते. मैत्रिणींना माझं क्रोशे वेड माहीत होतच मग त्यांनी तू क्रोशाचे मोदक कर म्हणून सांगितलं.. मग काय प्रयोग करायला घेतलाच आणि कुठेही पॅटर्न वगैरे न बघता स्वतःच करता करता जमला की.. मज्जा वाटली. मी ऑर्डरप्रमाणे क्रोशाच्या वस्तू करून देते, तर मग एका ऑर्डरसाठी हे अजून केशरवाले आंबा मोदक आणि कंठी हार केला. आणि बाप्पासाठी इतर सेटप म्हणजेच बाप्पा मागचा मखर, फुल, दुर्वा, दिवा ही क्रोशेने केले... कसं वाटतंय?

विषय: 

बदलायला शिक

Submitted by दत्तात्रय साळुंके on 31 August, 2017 - 13:25

बदलायला शिक

कधी कधी घडते ते स्विकारायला शिक
मनासारखे घडेलच असे नाही
मुरड मनाला घालायला शिक
पुढे चाल, जसे काही घडलेच नाही

क्षीण होता गात्र कधी
चड फड तू करु नकोस
दगडावर डोके आपटून
कपाळमोक्ष होऊ नकोस

रक्तबंबाळ होशिल तू
दया कोणा येणार नाही
एकटयाने जखमा बांधणे
आत्ता तुला जमणार नाही

जग बदलू नाही शकत
स्वत: बदलायला शिक
माघारीत हार नसते
उर्जा भविष्यासाठी राखायला शिक

दत्तात्रय साळुंके

अलवार झाली पाहिजे..

Submitted by संतोष वाटपाडे on 12 October, 2014 - 05:13

फ़क्त शब्दांनी जगाची हार झाली पाहिजे
लेखणीचीही अशी तलवार झाली पाहिजे....

गायचा आहे असा मल्हार मजला रोज की
आसवे डोळ्यातली फनकार झाली पाहिजे ...

घाव देताना तिने छातीत द्यावा नेमका
प्रेयसी तेव्हातरी दिलदार झाली पाहिजे....

एकही जखमेस खपली यायला आता नको
वेदना माझी तशी दमदार झाली पाहिजे.....

खंत आहे... बोललो काहीच नाही मी तिला
हाक शेवटची तरी ललकार झाली पाहिजे....

काढ देहातून काळिज संपली तगमग प्रिये
ऐक ना... चिरफ़ाड पण अलवार झाली पाहिजे....

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - हार