उदयोन्मुख शेफ व हवाईसुंदरी तेजल देशपांडे : संयुक्ता मुलाखत (सार्वजनिक धागा)
Submitted by अरुंधती कुलकर्णी on 25 September, 2014 - 08:37
सध्याच्या तरुणाईत स्वतःच्या हिमतीवर शिकण्याची व स्वतःच्या पायांवर उभे राहून आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रात पुढे काम करण्याची प्रवृत्ती वाढीस लागलेली दिसते. हे चित्र निश्चितच सुखावह आहे. याच पिढीच्या एका एकवीस वर्षांच्या तरुणीशी माझी काही दिवसांपूर्वी ओळख झाली. तेजल देशपांडे! एक हसतमुख, प्रसन्न व्यक्तिमत्त्व. पंचतारांकित हॉटेलमधील कामाचा अनुभव गाठीशी असलेली ही एक उदयोन्मुख शेफ, पर्यटन विषयातील पदवीधर आणि काही दिवसांतच एका आंतरराष्ट्रीय एअरलाईन्समध्ये रुजू होणारी हवाईसुंदरी. शिवाय हे सर्व शिक्षण तिने स्वतःच्या हिमतीवर, 'कमवा व शिका' या तत्वावर घेतले आहे हे विशेष!