मालिनी वृत्त

पहाट थंडी (मालिनी वृत्त )

Submitted by संतोष वाटपाडे on 17 January, 2014 - 10:04

थरथर करती थंडीमुळे सर्व पक्षी
हिमकण जमताना मांडती छान नक्षी..
कुडकुडत असावे वाहताना कधीचे
खळखळ करणारे नीर वेड्या नदीचे..

नितळजल झर्‍यांचे पाझरे धुंद कोठे
धुसर धुसर सारे रान अभ्रात वाटे..
अविचल शिखरे आच्छादलेली धुक्याने
हतबल चिडलेली रोजच्या गारठ्याने..

नकळत भिजती रानातली सर्व झाडे
टपटप पडती पानातले थेंब थोडे..
दवमय गवताची शाल घेते शरीरी
निपचित निजते थंडीत ओली धरीत्री..

चमचम करते काया निळ्या कातळाची
मखमल उजळे सारी जशी पातळाची..
तलम गवत डोकावून बाहेर आले
क्षणभर दिसते पाचूपरी खोचलेले..

लवकर बदलाया वस्त्र ओली धरेची
उलगडत मिठी जाते प्रभाती धुक्याची..

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मालिनी वृत्त