अन्या - १
Submitted by बेफ़िकीर on 6 November, 2013 - 08:46
अन्या चौथीपर्यंत शाळेत गेलेला होता. पाचवीत प्रवेश न मिळण्याचे दुय्यम कारण हे होते की चौथीत तो पुन्हा एकदा नापास झाला होता. पण प्रमुख कारण हे होते की त्या वर्षी त्याने शाळेची घंटा चोरून भंगारात विकून आलेल्या पैश्यांमधून तमाशा पाहिलेला होता. चौथीत असताना मनुष्याचे सरासरी वय नऊ किंवा दहा असावे असा एक अलिखित दंडक आहे. याबाबतीत अन्या जरा पुढे होता. तो चौथीतच बारा वर्षाचा झालेला होता. प्रत्येक यत्तेत प्रदीर्घकाळ उपासना करून त्याने हे यश प्राप्त केलेले होते.
विषय:
शब्दखुणा: