अन्या - १

Submitted by बेफ़िकीर on 6 November, 2013 - 08:46

अन्या चौथीपर्यंत शाळेत गेलेला होता. पाचवीत प्रवेश न मिळण्याचे दुय्यम कारण हे होते की चौथीत तो पुन्हा एकदा नापास झाला होता. पण प्रमुख कारण हे होते की त्या वर्षी त्याने शाळेची घंटा चोरून भंगारात विकून आलेल्या पैश्यांमधून तमाशा पाहिलेला होता. चौथीत असताना मनुष्याचे सरासरी वय नऊ किंवा दहा असावे असा एक अलिखित दंडक आहे. याबाबतीत अन्या जरा पुढे होता. तो चौथीतच बारा वर्षाचा झालेला होता. प्रत्येक यत्तेत प्रदीर्घकाळ उपासना करून त्याने हे यश प्राप्त केलेले होते.

चौथीतच बाराचा झालेला अन्या समवर्गीय मात्र लहानश्या नऊ दहा वर्षाच्या मुलांचा दादा होणे स्वाभाविक होते. रोज दोन तीन पोरे त्याच्याकडून पिटली जायची. त्यांचे आई बाप रात्री अन्याच्या घरासमोर हैदोस घालायचे. एखाददोघांनी तर अन्याच्या बापाला आणि अन्याला सडकवलाही होता. पण अन्याचा बाप संत होता. तो जगरहाटीच्या क्षुल्लक मानसिक वेदना जाणवू नयेत या उद्देशाने सकाळीच पिऊन बसायचा. हळूहळू कोटा संपवून रात्री बिचारा निजून जाई. मग अधेमधे येऊन कोणी बदडले तर त्याला इतकेच कळायचे की कोणीतरी आपल्याला आत्ता मारले. कोणी मारले, का मारले, आपण हा मार टाळू शकलो असतो का वगैरे शंका त्याला भेडसवायच्याच नाहीत. उठायचे, मार खायचा, चार घोट लावायचे आणि आडवे व्हायचे. त्यात काय विशेष? फक्त रोज प्यायला पैसे लागतात म्हणून तो पैसे मिळवण्यापुरता कुठेतरी राबायचा. चार दोन दिवसांचे पैसे खिशात खुळखुळले की तो कामावरून पसार!

अन्याची आई मिळतील त्या झाडाची पाने केसांत फुलांसारखी माळून फिरायची. नटायची हौस फार! एकदा तर तिने वेणीला मेलेली चिमणी बांधलेली होती. ती खायला मागून मांजरे पाठीपर्यंत झेपावू लागल्यावर तिने ती चिमणी फेकून दिली. त्या दिवसापासून ती घराबाहेर पडली की मांजरांची एक रांग काही वेळ तिचा पाठलाग करे. अन्याच्या आईला लहान मुलांचा अतिशय लळा होता. कोणाचेही लहान मूल दिसले की ते उचलून ती गावातून कर्कश्श ओरडत पळत सुटे. लोकांना उगीचच ह्या प्रकाराची भीती वाटत असे. त्यामुळे ते तिला वाटेत अडवत आणि तिच्या ताब्यातून ते मूल घेत असत. काहीवेळा तिला बडवतही असत मूल उचलून पळत सुटल्याची शिक्षा म्हणून! गावातले लोक अन्याच्या आईला वेडी समजत! तिला दोनतीनदा पोलिसांनी चौकीवर नेलेले होते. पण कॉन्स्टेबलच्या पीळदार मिशांवर भाळून तिने एकदा त्याचा लाडीक गालगुच्चा घेतला तेव्हापासून पोलिसांनी तिचे नांव टाकले. अन्याच्या आईला पाणी वाचवण्याचे महत्व केव्हाच समजलेले होते. ती आठवड्यातून एखादवेळेला आंघोळ करे.

अन्याच्या बापाला अन्याची आई अस्तित्वात आहे की नाही याची कल्पना नसे. दोघे समोरासमोर आली तर 'ही कोण बुवा किंवा हा कोण बाई आता' असा चेहरा करून निघून जात असत. कोणत्यातरी पराकोटीच्या दुर्मीळ क्षणी त्यांनी अन्याच्या जन्माला कारणीभूत होण्याची शारीरिक अवस्था प्राप्त केलेली होती एवढेच!

अश्या या दांपत्याच्या पोटी जन्माला आलेला अन्या आत्ता गावाबाहेरील डोंगराच्या एका गुहेत जाऊन बसलेला होता. त्याला काही संशोधन करायचे होते व त्यासाठी ही अंधारी गुहा योग्य जागा होती. परवा तमाशाला जाऊन आल्यापासून त्याला आपल्या पोटाच्या खाली असलेल्या अवयवाचा नेहमीचा ज्ञात असलेला उपयोग सोडून आणखी एक उपयोग समजल्यासारखे वाटत होते. त्याला खात्री नव्हती, पण शक्यता मात्र वाटत होती. तोच उपयोग नेमका काय असावा हे शोधण्यासाठी तो गुहेत बसलेला होता. डोळे त्या अवयवावर रोखलेले होते. मनात तो सारखी चारू नाचणारणीच्या पाठीची पन्हाळ आठवत होता. हात शिवशिवत असूनही त्याच्या मनात भय दाटलेले होते. बराच वेळ त्याच अवस्थेत बसल्यानंतर जेव्हा मन चारूच्या पन्हाळीवरून तिच्या नववारीच्या फुगीरतेच्या दिशेने खाली घसरले तेव्हा अचानक शिवशिवणारे हात त्या अवयवाकडे झेपावले आणि मिटलेल्या डोळ्यांपुढे चारू नाचणारणीच्या भावमुद्रा ओसंडल्या. काही कळायच्या आतच संशोधन पूर्णही झाले. हलके हलके वाटू लागले. अवघे शरीर एका स्वर्गीय स्पंदनशृंखलेच्या पाशातून भानावर आले. हबकलेला अन्या अंधारात स्वतःशीच बडबडून गेला. 'त्याच्यायला आत होतं काय आन् भायेर ग्येलं काय त्येच समजेना'! आता त्याला स्वतःचाच राग आला की आपण उगीच अंधारात बसलो. उजेडात बसलो असतो तर निदान काय गेलं ते तरी दिसलं असतं. आता एक तर जे गेलं ते पुन्हा आत येणार नाही आणि काय गेलं ते आयुष्यात समजणार नाही. हताश झालेला अन्या घराकडे परतू लागला. वाटेत चारू नाचणारणीच्या तमाशाची जुनी जाहिरात फाटलेल्या अवस्थेत फडफडत होती. आता तिच्या नववारीचा फुगीर भाग बघून काहीही होत नव्हते. गावातून तमाशा निघून गेला की पोटाखाली कायमचे हलके हलके वाटू लागते असा निष्कर्ष काढून अन्या घरी परतला.

घरी बाप भिंतीला टेकवलेल्या देवमाश्यासारखा निर्जीव होऊन लुढकलेला होता. आईने झुरळे भाजलेली होती. बापाच्या खिशातील चार दोन नाणी तपासून अन्याने स्टॉलवरून एक पाव आणि दोन तीन भजी आणली आणि खाल्ली.

'जिव्नात' काहीही अर्थ नसल्याची भावना पुन्हा एकदा अन्याच्या हृदयावर पसरली. लुढकलेल्या बापाकडे बघत तो घरातल्या जमीनीवरच पच्चकन् थुंकला. हा बाप आणि ही आई ह्या दोघांबरोबरच आपण राहिले पाहिजे असे तरी कुठे आहे हा विचार अलीकडे त्याच्या मनात येऊ लागला होता. तेवढ्यात बाहेर कसलातरी कालवा झाला. 'चला, काहीही का होईना पण घडतंय' या आनंदात अन्या दारातून बाहेर आला आणि बाहेर पाऊल टाकताच त्याच्या गालावर सणसणीत थप्पड बसली आणि तो ओरडत दारातच आडवा झाला. झुरळे खाणार्‍या आईने वळूनही बघितले नाही. बाहेर उभा असलेला माणूस एक प्रामाणिक शेतकरी होता आणि त्याच्या दहा वर्षाच्या मुलाचे नाक आज दुपारपासून सुजलेले होते. त्या नाक सुजण्याचा अन्याच्या उजव्या हाताच्या मुठीशी घनिष्ट संबंध आहे हे सिद्ध झाल्याक्षणी तो शेतकरी अन्याला धोपटायला निघाला होता व अन्या दिसताच त्याने पहिला आघात केलाही होता. धुळीत लोळत असलेल्या अन्याच्या पाठीत आणि पोटात शेतकर्‍याच्या काही मजबूत लाथा बसल्या व पाठोपाठ अर्वाच्य शिव्या ऐकू आल्या. प्रथमच एका भरदार पुरुषाचा आवाज आल्यामुळे मनात चलबिचल झालेली अन्याची आई लगबगीने दारात आली आणि स्वतःच पदर पाडून हातात धरून मुरकून शेतकर्‍याला म्हणाली....

"माझ्या पदरात पडलंय खुळं... पानी थ्येंब थ्येंब गळं"

शेतकर्‍याने बाई पाहिली नाही अन बुवा पाहिला नाही. त्याने तिच्याही कानाखाली एक ठेवून दिली तशी ती किंचाळून बाहेर धावत सुटली. या प्रसंगात गेलेल्या तीन चार सेकंदांचा योग्य वापर करून अन्या अंधारात सटकला. शेतकरी घरात आला आणि अन्याचा बाप लुढकलेला पाहून त्याने त्यालाही एक लाथ घातली. अन्याच्या बापाने अस्ताव्यस्तपणे डोळे उघडून शेतकर्‍याकडे पाहिले आणि पुन्हा समाधी अवस्थेत गेला. शेतकर्‍याला ह्याचा राग आल्याने त्याने आणखीन दोन तीन लाथा घातल्या आणि निरुपाय होऊन तो घराकडे निघाला.

अन्याशिवाय घरातल्या कोणालाही समजले नाही की आत्ता आपण सगळ्यांनी मार खाल्ला कशासाठी!

वेदना कमी झाल्या तसा अन्या नुकताच घडलेला प्रसंग कित्येक वर्षापूर्वी घडला असावा अश्या पद्धतीने विसरून गेला. त्याच्या मनात शेतकर्‍याबद्दल सूडाची वगैरे भावनाच नव्हती. पुढेमागे जमले तर त्या शेतकर्‍याला अद्दल घडवायची इतकेच त्याने ठरवलेले होते. आता तो आज रात्री काय खाता येईल यावर विचार करत होता. भज्यांनी नुसतेच तोंड चाळवले गेलेले होते. चोरी करण्याशिवाय पर्यायच नव्हता. अन्या बेमालूमपणे चोरी करू शकायचा. महिन्यातून पंधरावीसवेळा तरी त्याला अन्नासाठी चोरी करणे क्रमप्राप्तच होते. अन्या आता लपूनछपून गावातून हिंडू लागला. एकमेव हॉटेलात मिसळीच्या कटाचा वास येत होता. एका गुत्त्यात दारूशिवाय काही नसणार हे अन्याला माहीत होते. एका गाडीवर भुर्जी मिळते हे ठाऊक होते. पण आज एखाद्या घरात डल्ला मारण्याचा त्याचा विचार होता. आजवर अन्याने केलेली एकही अन्नाची चोरी पकडली गेलेली नव्हती. आत्ता तो एका घाणेरड्या बोळातून कसाबसा हातपाय सांभाळत एका घराच्या मागच्या बाजूला आला. त्याच्या अंदाजाप्रमाणे ते स्वयंपाकघरच निघाले. आत एक बाई भाकरी भाजत होती. भाकरी इतक्या लांब होत्या की हात पोचणे शक्यच नव्हते. घरात प्रवेश मिळवणेही शक्य वाटत नव्हते. अन्या तसाच अंधारात काही वेळ उभा राहिला. अचानक पुढच्या खोलीतून एक पुरुष आत आला. आला तोच त्याने मागून त्या बाईला आवळलेले अन्याने पाहिले. ती बाई मात्र दचकायच्या ऐवजी खुसखुसतच होती. हळूहळू दोघे चुलीजवळच आडवे झाले. आता ती बाई सोडा सोडा म्हणू लागली. अन्याला वाटले तिला उकडत वगैरे असावे. पण माणूस काही सोडेना! ते पाहून त्या बाईने हात लांब करून चुलीवर पाणी शिंपडले आणि मग उठून बत्ती बंद केली. अंधार झाल्यामुळे अन्याला काही दिसेना! वैतागलेला अन्या तिथून निघाला. आत काय चालले असावे यावर त्याने थोडा विचार केला. शेवटी तो विचार झटकून अन्या बिनदिक्कत गावातून फिरू लागला. बिनदिक्कत फिरणार्‍याकडे कोणीही लक्ष देत नाही हे त्याला माहीत होते.

हळूहळू अन्या गावाबाहेरच्या देवळापाशी गेला. तेथे रात्री नित्य भजन चालत असे. अन्या असे ऐकून होता की ते भजन मध्यरात्रीपर्यंत चाले आणि निघताना माणसे नारळ फोडून प्रसाद वाटून मग जात. आज मध्यरात्रीऐवजी पहाट झाली तरी बेहत्तर पण पोटात काहीतरी गेल्याशिवाय देवळातून हलायचे नाही असा निर्धार करून अन्या तिथेच बसला.

हे बेणं पोरगं आज इथे कुठे येऊन बसलं या चिंतेने काही मुंडकी अस्वस्थ होऊन भजन करू लागली. निम्म्यांचे भजनातून लक्ष उडाले. हे पोरगं काहीतरी भयावह चमत्कार करून दाखवणार ही चिंता बहुतेकांना ग्रासू लागली. मात्र भजन गाणारा जो होता तो एकटाच तल्लीनतेने डोळे मिटून भसाड्या आवाजात देवाची झोप घालवत होता. अन्याची नजर भिरभिरली. एकुण तीन नारळ आणि कसल्याश्या वड्या मधोमध ठेवलेल्या दिसल्या. आज काहीतरी पोटात जाणार हे नक्की हे अन्याला समजले. तोही टाळ्या वाजवू लागला. पोरगं सुधारलं की काय अशीही एक शंका काहींच्या मनात येऊन गेली. पंधरा वीस मिनिटे झाली तरी ठेका आणि भजने बदलण्यापलीकडे मजल जाईना तसा अन्या हळूहळू नारळाकडे सरकू लागला. कशाला झाटमारी करायची मध्यरात्रीपर्यंत असा विचार करून त्याने ठरवले की एक नारळ उचलून पळत सुटावे. पुढचे पुढे! खायची गोष्ट न खाता मधे ठेवून उगाच देवाची भजनं म्हणण्यात काय अर्थ आहे ही त्याची थिअरी होती.

तर अचानक भजन गाणार्‍याने भजन थांबवले व सर्वांना उद्देशून म्हणाला...

"तर मंडळी! मान्सानं न्हेमी पार्माणिकपणं वागावं! सत्य बोलावं. परक्याचं धन, परक्याचं शेत आणि परक्याची बाई ह्यावर नजर ठिवू नये."

मंडळींच्या माना होकारार्थी हालत होत्या. पण अन्या उडालेला होता. कारण आत्ता त्याच्या टकुर्‍यात अचानकच ते आलेलं होतं. मगाशी चुलीशी लवंडलेली बाई ह्या भजन गाणार्‍याची बायको असल्याचे त्याला आठवलेले होते. अन्या मनात म्हणत होता. 'च्या मारी! ह्यो तर बुवा म्हन्तोय की भलत्या बाईवर नजर नसावी. पर ह्याची तर स्वतःच्याबी बाईवर नजर दिसत न्हाई. आता ह्याला ह्ये समजलं तर काय वाटेल? काई का वाटंना! आपला नारळ नक्की झाला ह्ये खरं! पर आपलं ऐकनार कोन हितं? कायतरी निराळं सोंग कराया हवं'!

अन्याने क्षणभर विचार केला आणि तो उठला. हनुमानासमोर जाऊन त्याने साष्टांग नमस्कार केला. काही नजरा त्याच्यावर खिळलेल्या होत्याच. हा आज देवळात आलाच कसा हेच काहींना समजत नव्हते. नमस्कार करून उठलेला अन्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून थेट हनुमानाला उद्देशून म्हणाला....

"द्येवा, हितं चाललंय भजन... पर गावात चाललीयत पापं.... माझा हात कर तिकडं... ज्याच्या घरात चाललंय पाप... "

मंडळी लक्ष देऊन ऐकत होती. भजन काही क्षणांसाठी थांबवलेलेच होते त्या मंडळींनी! कारण हे बेणं डोक्यातून काय काढेल ते सांगता येत नव्हतं!

अचानक अन्याचा उजवा हात खांद्यातून क्रिकेटच्या बोलरसारखा गरागरा फिरू लागला. हाताचा वेग वाढला. अन्या मागे वळला. चेहर्‍यावर दैवी भाव धारण करून त्याने हात फिरवता फिरवता अचानक थांबवला. त्याचा हात थांबला तोच मुळी भजन गाणार्‍याकडे निर्देश करत. ताबडतोब अन्या तोंडावर हात ठेवून डोळे विस्फारून म्हणाला...

"म्हाराज... पैले घरी जा आपल्या... तुमच्या घरच्या मंडळींना कोनतरी आवळतोय हे माझ्या डोळ्यासमोर आलेलंय... ही इथली मंडळी तुमचं ऐकत्यात... पर घरची मंडळी???"

भडकलेल्या महाराजांनी खाडकन अन्याच्या कानसुलात भडकावली. तिरमिरून पडतानाही अन्या मुद्दाम नारळावर पडला. महाराज काही ते दृष्य बघायला थांबले नाहीत. त्यांनी घराकडे धाव घेतली. महाराज धावले तशी हबकलेली मंडळीही मागून धावली. तीन नारळ आणि राजगिर्‍याच्या वड्या हा लाभ झालेला अन्या अंधारात जाऊन नारळ फोडत बसला.

फटाफटा फोडलेले नारळ त्याने बकाबका खाल्ले. वड्याही संपवल्या. एक नारळ मात्र जाईना! तो सदर्‍यात लपवून अन्या अंधार्‍या वाटेने घराकडे निघाला. बघतो तर काय? गावाच्या वेशीपाशीच ती मगाचची चुलीजवळ निजणारी बाई मार खाऊन लुढकलेली. अन्या धावत तिच्या घराकडे पोचला तर भजनी मंडळाने त्याला पाहून हातच जोडले.

हनुमंताचा अवतार अन्या त्या रात्री छाती फुगवून स्वतःच्या घरात प्रवेश करता झाला. त्या रात्री काही केल्या त्याला झोप येईना. भरल्या पोटी झोप न येण्याचे कारणच तसे होते. आपण केलेल्या एका नाटकामुळे जर उलथापालथी घडू शकत असतील, तर ही अशीच हेरगिरी करायला हरकत काय आहे? हळूहळु स्वप्नरंजनात रंगत असताना त्याच्या डोळ्यासमोर ती मार खाल्लेली बाई आली. मार खाण्याआधीचे तिचे रूपही मग डोळ्यापुढे आले. तिच्या नववारीचा फुगीर भाग आणि चारू नाचणारणीच्या नववारीचा फुगीर भाग यातील साम्य लक्षात आले. फरकही लक्षात आला. पुन्हा पोटाखाली काहीतरी झाले. म्हणजे जे गुहेत गेले तेवढेच नव्हते तर, असे अन्याला वाटले. तेवढ्यात शुद्धीवर आलेला बाप अन्याच्या आईला उद्देशून पुटपुटला.

"यमे? खिशात चार नाणी व्हती गं! पाहिलीस काय? भूक लागलीय लय"

अन्याची आई घोरत होती. अन्याचा बाप एक एक पाऊल उचलून घराच्या बाहेर पडला अन्न शोधायला. अन्याला आठवले. आपण ती नाणी घेऊन त्याची भजी खाल्लेली आहेत. ती नाणी मिळवण्यासाठी आपला बाप राबलेला आहे. आपण नाही. हीच आई आणि हाच बाप, ह्याच दोघांबरोबर आपण का राहायला हवे हे आता त्याच्या लक्षात आले. चटकन् उठून अन्या दारात आला आणि म्हणाला....

"बा... ह्यो नारळ खा... तुझ्यासाठी ठिवलाय"

सुखद धक्का बसलेल्या बापाने लाचार हासत तो नारळ हातात घेतला आणि आयुष्यात प्रथमच त्याने अन्याच्या केसांमधून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाला..

"आयेलाबी उठव... तिघं मिळून खाऊ चल"

कोणतेही भांडण नाही, कोणी किती खाल्ले यावर वाद नाही, अक्षरही न बोलता तिघांनी मिळून एक नारळ संपवला. अचानक बाप कण्हला. अन्याने विचारले.

"काय झालं रं?"

"कोन्तरी यून मारून ग्येलंन् मगाचच्याला"

अन्याला भयंकर वाईट वाटले. त्याने बापाच्या छातीवरून हात फिरवला. तसे बापाने त्याला जवळ घेतले आणि रडत म्हणाला..

"काय पायजेल ते कर अन्या... पर पिऊ नको बघ कधी बी... दारू नको पिऊ"

आत्ता कुठे अन्याला झोपावेसे वाटू लागले. पोटही भरले होते. मनही भरले होते. आता उद्या पहाटे उठून गावात हेरगिरी करायला जायचे होते.

हनुमंताचा अवतार मुटकुळे करून घोरू लागला तेव्हा...

... भजनी मंडळींपैकी एक दोघे गावाबाहेरच्या हनुमंतापुढे उभे राहून आपलाही हात गरगर फिरवून काही होते का ते बघत होते.

क्रमशः

====================

-'बेफिकीर'!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या अन्याच्या आईला झुरळं खायला दिलीत्? यक्क्स! काय बेफिकीर! कथा तर मजेदार दिसतीय, पण जरा ती झुरळं काढा की बाहेर. आता त्या गावात या चोरट्यांना ( अन्याची आई/ अन्या ) कणसं पण मिळणार नाहीत का झुरळा ऐवजी?:फिदी:

बाय द वे, तो भुक्कड कुठे गेला? की त्याला भुक्कड समजुन साईडिंगला टाकलात्.:फिदी:( ह्यांच्या सतत मागे लागुन तो भुक्कड पूर्ण करायला पाहिजे.)

काय लिहीता हो तुम्ही जबरी !
मी एक सीर्यसली सजेशन देतो कि तुमच्या कादंब-यांचा एक टॅब मायबोलीवर द्यायला पाहीजे. मायबोली विशेष सारखंच. एकेक भाग शोधून वाचताना खूप दमछाक होते.
(दिवाळी अंकात तुमचं नावच नाही हे पाहून निराशा झाली)

<बाय द वे, तो भुक्कड कुठे गेला? की त्याला भुक्कड समजुन साईडिंगला टाकलात्.( ह्यांच्या सतत मागे लागुन तो भुक्कड पूर्ण करायला पाहिजे.)>+१०००

बेफि:
हि देखील आवडली!!!!!!!!

आपणास एक विनंती करतो कि 'सनम' देखील पुर्ण करा!

मुग्धा मला बेफिकीर यांच्या प्रोफाईलमध्ये लेखनात ती भुक्कड कादंबरी दिसली नाही.:अरेरे: तु शोधुन बघ. नाहीतर शोध मध्ये भुक्कड टाकुन बघ. माझ्याकडे मराठीत बघता येत नाही. प्रतीसादात जाऊन टाईप करावे लागतेय.

कही भुक्कड को भुक्कड समझकर उसका कत्ले आम तो नही कर दिया गया?:राग::अओ:
अगर ऐसा हुआ है तो बहुत नाइन्साफी हो गयी है उसके साथ, और इसके जिम्मेदार है मशहूर शायर बेफिकीर. मत छोडके पकडो उनको.

sorry