तो स्वच्छंदी कचरा मी

नशिबाचा वारा उडवे, तो स्वच्छंदी कचरा मी

Submitted by बेफ़िकीर on 23 October, 2013 - 12:38

नशिबाचा वारा उडवे, तो स्वच्छंदी कचरा मी
केव्हाचा घालत आहे, या विश्वाला चकरा मी

ज्यांच्या रंगावर सारे जग मरते त्यांचा नाही
झालेत पांढरे नुकते त्या केसांचा गजरा मी

हे आठवण्यापुरता तर वृत्तीत मीपणा राहो
मीपणा विसरण्यासाठी सर्वात प्रथम विसरा 'मी'

मी लांब राहणार्‍यांशी जवळीक साधली इतकी
की त्यांच्यासाठीसुद्धा बनलो आहे उपरा मी

कल्पनेतल्या प्रतिभेने व्यक्तित्व मढवले आहे
वास्तवास जो सोसेना तो दुर्दैवी नखरा मी

अप्राप्य राहतो आधी, अप्राप्य वाटतो नंतर
घालेल तो सुखी व्हावा इतका साधा सदरा मी

ते सारे या हृदयाच्या ओलांडुन सीमा गेले
मी माझी वेस स्वतःची अन् दुनियेचा दसरा मी

Subscribe to RSS - तो स्वच्छंदी कचरा मी