नशिबाचा वारा उडवे, तो स्वच्छंदी कचरा मी

Submitted by बेफ़िकीर on 23 October, 2013 - 12:38

नशिबाचा वारा उडवे, तो स्वच्छंदी कचरा मी
केव्हाचा घालत आहे, या विश्वाला चकरा मी

ज्यांच्या रंगावर सारे जग मरते त्यांचा नाही
झालेत पांढरे नुकते त्या केसांचा गजरा मी

हे आठवण्यापुरता तर वृत्तीत मीपणा राहो
मीपणा विसरण्यासाठी सर्वात प्रथम विसरा 'मी'

मी लांब राहणार्‍यांशी जवळीक साधली इतकी
की त्यांच्यासाठीसुद्धा बनलो आहे उपरा मी

कल्पनेतल्या प्रतिभेने व्यक्तित्व मढवले आहे
वास्तवास जो सोसेना तो दुर्दैवी नखरा मी

अप्राप्य राहतो आधी, अप्राप्य वाटतो नंतर
घालेल तो सुखी व्हावा इतका साधा सदरा मी

ते सारे या हृदयाच्या ओलांडुन सीमा गेले
मी माझी वेस स्वतःची अन् दुनियेचा दसरा मी

आधीच्या शब्दप्रभूंना कोणीही विसरत नाही
दारिद्र्य सोसतो आहे गझलेत युगे अठरा मी

ज्याचा ना सानी आहे ना उला कुणीही ज्याचा
जो एकटा नशा देतो, तो 'बेफिकीर' मिसरा मी

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम गझल.
गजरा, सदरा, दसरा, मक्ता .. आपसूक वाह निघाले. जबरदस्त वाचनानुभव. एखाद्या virtuoso चा (चपखल मराठी शब्द सुचत नाहीये) समर्थ performance पाहिल्यासारखी अनुभूती मिळाली.

मतला, मक्ता अफाट जमून आले आहेत दोन्ही .

विसरा, उपरा ,नखरा, सदरा वाह वा वा क्या बात!!

'गजरा' हासिल-ए-गझल .

धन्यवाद !

गझल आवडली.

हे आठवण्यापुरता तर वृत्तीत मीपणा राहो
मीपणा विसरण्यासाठी सर्वात प्रथम विसरा 'मी'>> मस्त

कल्पनेतल्या प्रतिभेने व्यक्तित्व मढवले आहे
वास्तवास जो सोसेना तो दुर्दैवी नखरा मी>>> व्वा

ते सारे या हृदयाच्या ओलांडुन सीमा गेले
मी माझी वेस स्वतःची अन् दुनियेचा दसरा मी>>> व्वा व्वा

आधीच्या शब्दप्रभूंना कोणीही विसरत नाही
दारिद्र्य सोसतो आहे गझलेत युगे अठरा मी>>> उपरोध आवडला आणि पटला

ज्याचा ना सानी आहे ना उला कुणीही ज्याचा
जो एकटा नशा देतो, तो 'बेफिकीर' मिसरा मी>>> झकास मक्ता

नशिबाचा वारा उडवे, तो स्वच्छंदी कचरा मी
केव्हाचा घालत आहे, या विश्वाला चकरा मी

व्वा. एकीकडे तुच्छ वा नशिबाच्या अधीन असे म्हणताना दुसरीकडे स्वच्छंदी आणि विश्वात स्वैर वावरणारा, अशी वरवर परस्परविरोधी मात्र एक्मेकांना पूरक विधाने. शेर फार-फार आवडला.
मक्ताही बढिया.
गझल नेहमीप्रमाणे सफाईदार.
परंतु सांगावेसे वाटते की आपले चांगले शेर अनेक ठीकठाक शेरांच्या गर्दीत हरवून राहतात.

बे.फि.

नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट गजल.

पण मी दुसर्‍याच विषयावर खरडणार आहे

<<'गजरा' हासिल-ए-गझल .>> इति. सुप्रिया

सध्या बर्‍याच ठिकाणी मी "हासिल-ए-गजल" हा शब्द प्रयोग वाचतो. माझ्यामते तो चुकीचा आहे. "हासिल-ए-गजल" चा अर्थ काय? काहीच नाही. योग्य शब्दप्रयोग "हुस्न-ए-गजल" अर्थात "गजलचे सौंदर्य" हा आहे. "हासिल-ए-मेहफिल" हा शब्दप्रयोग कदाचित होऊ शकतो. कोणी प्रकाश पाडेल का?

क्या बात है... आवडले म्हणून द्यायचे तर सगळेच द्यावे लागतिल शेर...
पण खास आवडलेला -
झालेत पांढरे नुकते त्या केसांचा गजरा मी...

अत्यंत जवळचा वाटला... Happy

सध्या बर्‍याच ठिकाणी मी "हासिल-ए-गजल" हा शब्द प्रयोग वाचतो. माझ्यामते तो चुकीचा आहे. "हासिल-ए-गजल" चा अर्थ काय? काहीच नाही. योग्य शब्दप्रयोग "हुस्न-ए-गजल" अर्थात "गजलचे सौंदर्य" हा आहे. "हासिल-ए-मेहफिल" हा शब्दप्रयोग कदाचित होऊ शकतो. कोणी प्रकाश पाडेल का?>>> शंभर टक्के सहमत आहे.

नेहमीप्रमाणेच अजून एक अप्रतीम गझल
गजरा आणि दसरा सर्वाधिक आवडले

२ ओळी शब्दक्रम असा बदलून वाचल्या असे केल्याने मला व्यक्तिशः अधिक सुलभ वाटले बाकी काही विशेष कारण नाही
>>ते सारे या हृदयाच्या सीमा ओलांडुन गेले
>>जो नशा एकटा देतो, तो 'बेफिकीर' मिसरा मी

(प्रतिसादास विलंब झाल्याबद्दल क्षमस्व)

वा! सुरेखच.
आशय आवडला.
काही शेर खूपच आवडले, बाकी छान आहेत.
शेवटच्या शेरात सानी आणि उला ह्या दोन शब्दांचे अर्थ समजले नाहीत.

दक्षिणा, <<शेवटच्या शेरात सानी आणि उला ह्या दोन शब्दांचे अर्थ समजले नाहीत.>>

कुठल्याही शेरातल्या पहिल्या ओळीला उला मिसरा म्हणतात आणि दुसर्‍या ओळीला सानी मिसरा म्हणतात. आता अर्थ लावून बघ; म्हणजे किती सुंदर शेर आहे ते लक्षात येईल तुझ्या. Happy

मला कोणीही साथीदार नाही; आणि तरीही (किंवा कदाचित त्यामुळेच) मी खुश असतो, सदैव सुखी असतो, बेफिकीर असतो... व्वा!!

उला आणि सानीचा अर्थ सांगीतल्याबद्दल धन्स शरद जी (हजार वेळा घोकले असूनही मला कन्फ्यूजन होतेच होते आता लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो :))

आपण संगीतलेला शेराचा अर्थही आवडला
मी ह्या शेराबबत जरा अधिक विचार केला
माझ्या मते उला -सानी एकमकास पूर्णत्व देण्यासाठी पूरक व अनिवार्य असे दोन स्वतंत्र मिसरे असतात आणि त्यांच्यातून एक शेर बनतो जेव्हा ते एकमेकात मिक्सअप होणारे एकजीव होणारे असतात इथे कवी म्हणतो की मला उल्याची गरज नाही की सानीची मी स्वतःच एका अख्या शेराची नशा देण्यास समर्थ/परिपूर्ण आहे मला ना उल्याची ना सानीची ना गरज ना काळजी असा मी 'बेफिकीर' मिसरा आहे ...
Happy
धन्यवाद

वै.व.कु.

<<<मी स्वतःच एका अख्या शेराची नशा देण्यास समर्थ/परिपूर्ण आहे>>>

आवडले. Happy

पाशताई(दादा), ज्यांना कचर्‍यात रहायची आवड असते त्यांना कचराच दिसतो..... इतरांना नाही. Lol Rofl

बेफिकीर!

काय हो? मला सांगता सांगता तुम्हीही जरा लय बदलून लिहायला लागलात की..... शेर क्र. 2,3,4,6...

असो...

ज्याचा ना सानी आहे ना उला कुणीही ज्याचा
जो एकटा नशा देतो, तो 'बेफिकीर' मिसरा मी

सुंदर शेर...

बेफिकीर!

काय हो? मला सांगता सांगता तुम्हीही जरा लय बदलून लिहायला लागलात की..... शेर क्र. 2,3,4,6...<<<

तुम्हाला लय म्हणजे काय हे समजलेले नाही ह्याचे हा तुमचा प्रतिसाद हे उत्तम उदाहरण आहे. शुभेच्छा!

दणदणीत मक्ता.

मक्त्यात विशेष हे की..
जो नशा एकटा देतो, तो 'बेफिकीर' मिसरा मी>
फक्त हा मिसराच संपूर्ण गज़ल झाला आहे.

Pages