साथ सोडुनी गेली शेवटी मनःशांती

साथ सोडुनी गेली शेवटी मनःशांती

Submitted by बेफ़िकीर on 19 June, 2013 - 12:47

साथ सोडुनी गेली शेवटी मनःशांती
भय मनात गर्दीचे भय मनात एकांती

काय काय सोडावे हे विचार सोडू... या
निर्णयाप्रती आलो पूर्णतः विचारांती

ते तुझ्याहुनी गोरे मानले सदा आम्ही
ज्या उन्हामुळे झाली सावळी तुझी कांती

जो दिसेल तो येथे धीट लोळ आगीचा
पण कधी न भ्याडांनो व्हायची इथे क्रांती

सांगुनी व्यथा घरच्या ते रजेवरी जाती
मी घरामधे नेतो नोकरीतल्या भ्रांती

स्पष्ट कोसळे तो मी गोड बोलणे शिकलो
ऐन श्रावणामध्ये गाठलेस संक्रांती

माणसाळले प्राणी माणसे पशू झाली
रोज याइथे होते वेगळीच उत्क्रांती

-'बेफिकीर'!

Subscribe to RSS - साथ सोडुनी गेली शेवटी मनःशांती