साथ सोडुनी गेली शेवटी मनःशांती

Submitted by बेफ़िकीर on 19 June, 2013 - 12:47

साथ सोडुनी गेली शेवटी मनःशांती
भय मनात गर्दीचे भय मनात एकांती

काय काय सोडावे हे विचार सोडू... या
निर्णयाप्रती आलो पूर्णतः विचारांती

ते तुझ्याहुनी गोरे मानले सदा आम्ही
ज्या उन्हामुळे झाली सावळी तुझी कांती

जो दिसेल तो येथे धीट लोळ आगीचा
पण कधी न भ्याडांनो व्हायची इथे क्रांती

सांगुनी व्यथा घरच्या ते रजेवरी जाती
मी घरामधे नेतो नोकरीतल्या भ्रांती

स्पष्ट कोसळे तो मी गोड बोलणे शिकलो
ऐन श्रावणामध्ये गाठलेस संक्रांती

माणसाळले प्राणी माणसे पशू झाली
रोज याइथे होते वेगळीच उत्क्रांती

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लय अशी लय प्रथमच पाहिली

सर्व शेरात भरपूर नाविन्य आढळले

बरेच काही नवीन शिकायला मिळते आहे

अजून अनेकदा वाचावी लागणार आहे त्यामुळे प्रतिसाद आवरता घेतो

धन्यवाद बेफीजी

एक सांगायचे राहिलेच अख्खी गझल खूप आवडली

सांगुनी व्यथा घरच्या ते रजेवरी जाती
मी घरामधे नेतो नोकरीतल्या भ्रांती

माणसाळले प्राणी माणसे पशू झाली
रोज या इथे होते वेगळीच उत्क्रांती
गझलेत चमत्कृती इतक्या साधेपणाने आणता बेफिकीर !

सर्वच शेर नाविन्यपूर्ण...

आवडली गझल.

गझलेची लय फार आवडली.

ते तुझ्याहुनी गोरे मानले सदा आम्ही
ज्या उन्हामुळे झाली सावळी तुझी कांती>>> व्वा!

छान गझल बेफि,

खयाल आवडले..... कवाफी/ रदिफ .. काही ठिकाणी फारच गद्य वाटले किंवा मिसर्‍यावर तसा प्रभाव वाटला.

उदा . निर्णयाप्रती आलो पूर्णतः विचारांती

पु.ले.शु!

Happy

सांगुनी व्यथा घरच्या ते रजेवरी जाती
मी घरामधे नेतो नोकरीतल्या भ्रांती

माणसाळले प्राणी माणसे पशू झाली
रोज या इथे होते वेगळीच उत्क्रांती

आवडेश Happy

शामच्या मताशी सहमत. रचनेला चौकट गझलेची आहे, पण एक एक ओळ गद्यच होत गेले आहे, असे वाटले.

उदा. निर्णयाप्रती आलो पूर्णतः विचारांती, ज्या उन्हामुळे झाली सावळी तुझी कांती, मी घरामधे नेतो नोकरीतल्या भ्रांती.

पण चालायचंच....!

पुलेशु.

-दिलीप बिरुटे

साथ सोडुनी गेली शेवटी मनःशांती
भय मनात गर्दीचे भय मनात एकांती

सांगुनी व्यथा घरच्या ते रजेवरी जाती
मी घरामधे नेतो नोकरीतल्या भ्रांती

हे दोन शेर अधिक भावले.

साथ सोडुनी गेली शेवटी मनःशांती
भय मनात गर्दीचे भय मनात एकांती... हे खूप खूप आवडले..:) अगदी मनातले बोललात...:)

सांगुनी व्यथा घरच्या ते रजेवरी जाती
मी घरामधे नेतो नोकरीतल्या भ्रांती--:)

पु. ले. शु.