मोल

मोल

Submitted by आनंदयात्री on 5 August, 2009 - 10:18

जे घडले ते तुजला बहुधा नंतर कळले होते
अपुल्यामधले अंतर तोवर फसवे बनले होते

दिसण्यामधली सुंदरता कुरवाळत बसलो होतो
असण्याचेही मोल जरा उशिराने पटले होते

वाद अकारण झाला आणिक खूप बोललो दोघे
तेव्हा कळले, तुझे नि माझे मौन चिघळले होते

सावध झालो तेव्हा आधी तुझी आठवण झाली
तूच मला बोलावुन अलगद दूर ढकलले होते

शब्दांच्या गावातच मी मुक्काम ठोकला होता
भेट तुझी झाली अन् त्यांचे अर्थ गवसले होते

पुस्तक मिटण्यापूर्वी मी शेवटचे पान उघडले
तुझी आठवण बनून तेथे फूल अडकले होते

गुलमोहर: 
Subscribe to RSS - मोल