दाखव डहाळ्या हालवत माझे जुने वैभव मला

दाखव डहाळ्या हालवत माझे जुने वैभव मला

Submitted by बेफ़िकीर on 19 October, 2012 - 07:56

दाखव डहाळ्या हालवत माझे जुने वैभव मला
एकांत माझ्या भोवतीचा वेचुनी हासव मला

सीमेवरी ठेवून तू हसतोस कसला ईश्वरा
अपुला तरी कर वा पुन्हा अपुल्यांमधे पाठव मला

नि:श्वास घाले साकडे प्रत्येक श्वासाला जणू
निर्दोष कैदी ओरडे मारू नको वाचव मला

रोमांच देहाचे तुझ्या माझ्यात असते गुंतले
थोडी तरी होती हवी या काळजावर लव मला

सार्‍या दिशांचे वावडे सार्‍या ऋतुंशी वाकडे
कंटाळलो आहे जवळ घे थोपटत जोजव मला

कवितेमधे इतके तिला निर्भीड मी रेखाटले
की ती म्हणाली शेवटी की एकदा लाजव मला

शाळेपुढे अद्यापही तो चिंचवाला थांबतो
अद्यापही भंडावते गाभूळलेली चव मला

Subscribe to RSS - दाखव डहाळ्या हालवत माझे जुने वैभव मला