शेवटची बस गेल्यावरचा उदास रस्ता

शेवटची बस गेल्यावरचा उदास रस्ता

Submitted by बेफ़िकीर on 10 October, 2012 - 11:42

पाचोळ्याची अस्थिर सत्ता
बघत राहतो
शेवटची बस गेल्यावरचा उदास रस्ता

मग रस्त्यावर एक भिकारी
उपडे करतो
फुफ्फुस त्याचे अन उरलेले श्वास मोजतो

लुत भरलेले कुत्रे फिरते
हुंगत शोधत
काय चाटुनी टळेल ही वणवण कायमची

सकाळणारी रात्र यायच्या
अपेक्षेतुनी
अंग झटकुनी सर्व वेदना नाचनाचती

माझ्या त्या परवाच्या रात्री
सकाळण्याच्या
सर्व शक्यता जवळपास विरलेल्या होत्या

चुकून आली डेपोमध्ये
डिझेलसाठी
निराळ्याच मार्गावरची कुठलीशी गाडी

मी त्या गाडीमध्ये बसुनी
अजूनसुद्धा
मागे बघुनी हातच करतो आहे नुसता

निराळीच बस घेत पुढे मी
मागे आहे
शेवटची बस गेल्यावरचा उदास रस्ता

-'बेफिकीर'!

Subscribe to RSS - शेवटची बस गेल्यावरचा उदास रस्ता