शेवटची बस गेल्यावरचा उदास रस्ता

Submitted by बेफ़िकीर on 10 October, 2012 - 11:42

पाचोळ्याची अस्थिर सत्ता
बघत राहतो
शेवटची बस गेल्यावरचा उदास रस्ता

मग रस्त्यावर एक भिकारी
उपडे करतो
फुफ्फुस त्याचे अन उरलेले श्वास मोजतो

लुत भरलेले कुत्रे फिरते
हुंगत शोधत
काय चाटुनी टळेल ही वणवण कायमची

सकाळणारी रात्र यायच्या
अपेक्षेतुनी
अंग झटकुनी सर्व वेदना नाचनाचती

माझ्या त्या परवाच्या रात्री
सकाळण्याच्या
सर्व शक्यता जवळपास विरलेल्या होत्या

चुकून आली डेपोमध्ये
डिझेलसाठी
निराळ्याच मार्गावरची कुठलीशी गाडी

मी त्या गाडीमध्ये बसुनी
अजूनसुद्धा
मागे बघुनी हातच करतो आहे नुसता

निराळीच बस घेत पुढे मी
मागे आहे
शेवटची बस गेल्यावरचा उदास रस्ता

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप वेगळं प्रभावी रितेपणाचं चित्रण .
<<पाचोळ्याची अस्थिर सत्ता
बघत राहतो
शेवटची बस गेल्यावरचा उदास रस्ता >>

चर्र्कन जाणवणारी अर्थहीनता. अनेक ओळींतून.

'सकाळणे ' हे क्रियापदही ग्रेट.

फक्त, मधे आलेले 'अपेक्षेतुनी' ,'झटकुनी ', 'बसुनी' असे शब्द्प्रयोग कवितेच्या अंतःस्वराशी विसंगत वाटले.

अनेक शुभेच्छा.

फक्त, मधे आलेले 'अपेक्षेतुनी' ,'झटकुनी ', 'बसुनी' असे शब्द्प्रयोग कवितेच्या अंतःस्वराशी विसंगत वाटले.

<<
स.म.
नी पेक्षा न लावला असता तर झक्कास वाटले असते कानांना.
पण असो.

आजकाल खोकला फारच बळावलाय काहो?
काळजी घ्या!

,,,,,,

बेफि, मी वाचत असतो नेह्मी, सर्वच कविता.. पण ही खास आवडली, म्हणून प्रतिक्रिया देतोय..
यातल्या शेवटच्या ओळी या मला खास आपल्या वाटल्या, शेवटच्या नंतरही काहितरी असतेच.. थोडी वाट पहावी लागते, एवढेच.

मी त्या गाडीमध्ये बसुनी
अजूनसुद्धा
मागे बघुनी हातच करतो आहे नुसता

ढंग आवडला ,रंगही आवडला
सूंदर

दोन-तीनवेळा वाचली, तरी पूर्ण टोटल लागली नाही. पण अशी काही जादू जाणवली की मी अजून काही वेळा ही कविता परत परत वाचणार आहे.
खूप सुन्न, विषण्ण असं काहीसं वाटलं..

शीर्षक परवा वाचलं, तेव्हाच वेगळेपण जाणवलं होतं. पण त्या वेळी मी मुद्दामच कविता उघडलीच नाही कारण 'फुरसतीत' वाचायची होती... वाचली, चीज झालं!

अत्यंत वेगळा फॉर्मॅट आहे. यमक टाळून वृत्तात लिहिणे म्हणजे एका हाताने घंटानाद करणे आणि दुसर्‍या हाताने आरती ओवाळणे, अशी कसरत.. पण लीलया केलीत.. संमोहनशक्ती असलेली एक कविता आहे ही..

....... काही वेळी अर्थ शोधणे वृथा असते.. अनुभूतीच जबरदस्त असते.

_____/\_____ !!

'यमक टाळून वृत्तात लिहिणे..' हं.. यासाठी ते लिरिकल शब्द 'झटकुनी' 'बसुनी ' वगैरे..
धन्स रसप, कवी चूक करत नसतो,प्रयोग करत असतो हे पुनःप्रत्ययास आले.
कवितेचाही पुनःप्रत्यय क्रमप्राप्त.

>> ....... काही वेळी अर्थ शोधणे वृथा असते.. अनुभूतीच जबरदस्त असते.
+१
नवीन शब्दप्रयोग तडाखेबंद एकदम.
"बापरे" झाले वाचताना.