शब्देविण संवादु

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

कम्युनिकेशन म्हणजे काय? असा पंधरा मार्काचा पहिलाच प्रश्न... मग त्यामधे सेंडर रीसीव्हर मेसेज नॉइज हे सर्व लिहिलं की मार्क मिळायचे... पण एकदा रमा मॅडम क्लासमधे म्हणाल्या, "प्लीज पाठ करून लिहू नका. तुम्हाला काय म्हणायचेय हे मला समजले की तुम्हाला मार्क मिळाले असे समजा."

पण कधीच पंधराच्या पंधरा मार्क मिळाले नाहीत. मला काय म्हणायचेय ते मॅडमना समजले नाही किंवा समजावण्यात माझेच शब्द तोकडे पडेल.. जे काय असेल ते.

हे सर्व आठवायला कारण म्हणजे माझी मागच्या आठवड्यातील पुण्याची फेरी. वर्ल्ड चँपियनशिप होती व्हॉलीबॉलची. तीपण एकवीस वर्षाखालच्या मुलांची. जगभरातून सोळा देश आले होते.. सॉरी पंधरा.. भारताची पण टीम होतीच की!! सेमी फायनल पर्यंत पहिल्यादाच पोचली. यामधले फ्रान्स, यु एस वगैरे देश ओळखीचे होतेच पण ट्युनिशिया, बेलारूस वगैरे देश जगाच्या नकाशावर कुठे आहेत हे ही ठाऊक नव्हतं.

मी आयुष्यात कधी व्हॉलीबॉल खेळ पाह्यला नव्हता. मग सम्जणे तर दूरच. पहिलीच मॅच बघताना दोन्ही टीममधला एक एक खेळाडू टीमच्या युनिफॉर्ममधे नव्हता. आधी वाटलं की तो कॅप्टन असेल, मग समजले की तो लिबेरो नामक खेळाडू असतो. तो नक्की काय करतो हे मला अजूनही माहित नाही.

फ्रान्स विरूद्ध क्युबाची मॅच चालू असताना मी मिडिया सेंटरमधे एकटीच बसले होते. बाजूला क्युबा टीमची पी आर ओ नोट्स काढत होती. कुठूनतरी तिने हौसेने टिकली लावून घेतली होती. कुठल्यातरी स्पॅनिश गाणं तिने लावलं होत.. अगदी खुशीत झूमत होती, क्युबा खेळत पण होती तसली खतरनाक.. (हे मला पॉइंट्स वरून समजलं होतं बरं का.. काहीतरी १२-२३ असा गेम चालू होता)

मधेच ती ओरडली.. "लिबेरो...." पुढचे शब्द डोक्यावरून गेले, पण तिला लिबेरोने काहीतरी घोडचूक केली हे समजलं.. मी विचारलं. "व्हॉट इज लिबेरो?"

तिचे इंग्लिश अगदी यथा तथा. मला तिच्या भाषेचा गंध नाही. तिने अगदी हातवारे करत मला खेळ समजवायला सुरूवात केली. त्यातून मला इतकंच समजलं की लिबेरोला फक्त डिफेन्स करता येतो, तो बहुतेकदा टीममधला सर्वात लहान (उंचीने) असतो.. वगैरे वगैरे. पण खरं सांगू.. तो लिबेरो काय करतो यापेक्षा तिची देहबोली बघण्यातच मी हरवले होते.

ती चांगली चाळीशीची होती. तरूण असताना सायकलिंग करायची. रेसमधे भाग घ्यायची. हे सांगताना तिने मिडिया सेंटरमधे काल्पनिक सायकल घेऊन धावली.

"व्हॉत स्पोर्त प्ले यु?" माझ्याकडे प्रश्न आला.
"डोंबल" मी उत्तर दिलं..
"ओह, गूड गूड.. सो यु स्लिम. फिट"

मी हसू आवरलं तरी तो ओठांवर आलंच. ती पण मनमुरादपणे हसली. आपण चुकीचं बोललो हे तिलाही समजलं... संवादाला शब्दाची खरंच गरज असते का?? तिचं हसणं मला समजलं आणि माझं हसणं तिला.

प्रत्येक गेम संपल्यावर एक छोटीशी प्रेस कॉन्फरन्स असायची. दोन्ही टीमचे कोच आणि कॅप्टन याच्यासोबत. बेलारूसमधल्या कोचला इंग्लिश अजिबात येत नव्हतं.. ट्रान्स्लेटर म्हणून टीमचाच एक प्लेअर होता. त्याचं इंग्रजी पण यथा तथाच. कोचने मी प्रश्न विचारल्यावर लांबलचक उत्तर दिलं. इथे ट्रान्सलेटर ढेपाळला. (ही पोरं ऊंचीने सहा साडे सहा फूट असली तरी मला तरी ती बाळंच वाटायची Happy )
"वे वेर नॉत फित सिकॉलॉजिकली.."
"सायकॉलॉजिकली?"
"नो.. नो.. सीकॉलोजी.." त्याचा हात कोचच्या डो़क्याकडे.. Happy

बेल्जियमबरोबर इजिप्त वाईट रित्या हरलं होतं. इजिप्तचा कोच सर्व खेळाडूना अक्षरश: शिव्या घालत होता.
पीसीमधला ठराविक प्रश्न "हाऊ डू यु फील आफ्टर लूजिंग?" हे विचारल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी आलं.
"तुम्ही मला सांगा, मी काय करू शकतो? मी जाऊन कोर्टवर खेळू तर शकत नाही? अजून किती शिकवणार मी त्याना? अजून किती मेहनत करून घेणार?"

नाही, तो मराठीत बोलला नाही, आणि मला पण अरेबिक समजत नाही. पण तो जे काही बोलला ते समजलं. शब्दांशिवायच.. त्याच्या नजरेतून.

त्याच्या नजरेतून अजून एक आठवण झाली. लेडिज डब्यामधला रोजचा तोच कंटाळवाणा प्रवास. प्रत्येक स्टेशनला कमी होणारी आणि वाढणारी गर्दी. सहज लक्ष समोरच्या अपंगाच्या डब्याकडे गेलं. दोन मित्र एकेम्काची मस्करी करत होते.

आणि हसत होते. एखाद्या ओढ्यासारखं त्याचं खळखळणारं हसू... आवाजाशिवायच. अख्ख्या ट्रेनचा गोंगाट त्याच्यासाठी नव्हताच... ते त्याच्याच विश्वात मग्न होते. कसल्याही शब्दांशिवाय. पण संवाद होतच होता ना??

कम्युनिकेशन म्हणजे काय? अवघ्या पंधरा मार्काचा प्रश्न.. सेंडर रीसीव्हर मेसेज मिडियम नॉइज??? छे.. कम्युनिकेशन म्हणजे तुझा आणि माझा मनातल्या मनात झालेला संवाद. त्याला शब्दाची, भाषेची आणि इतर कशाची गरजच काय? गरज आहे ती फक्त तुझी आणि माझी!!!!

मला जे काय सांगायचय ते तुला समजत नाही.. पण किमान तुला इतकं तरी कळतं मला काहीतरी सांगायचं आहे. तू जाणून घ्यायला लागतोस की मला काय म्हणायचय.. आपला संवाद सुरू होतो. म्हटलं तर एका आत्म्याने एका आत्म्याशी केलेला संवाद. आणि म्हटलं तर माझ्याशीच मीच केलेला संवाद.

शेवटी, तू म्हणजे मीच आहे. आणि मी म्हणजे पण तूच आहेस. चराचरात वसलेला तू. आणि तुझाच एक अंश असलेली मी..

गेल्या कित्येक दिवसापासून प्रयत्न करतेय,, तुझ्याशी संवाद साधायचा. तू मात्र किती विविध तर्हेने माझाशी संवाद साधतोस??? कसं जमतं तुला हे संवादाच्या आधीच जाणून घेणं माझं मन?? कसं जमतं तुला हे असं शब्दातीत संवाद साधणं???

सांगशील कधी तरी उत्तर? की तू सांगितलयस मला आधीच?

प्रकार: 

नंदिनी

खुपच अर्थपुर्ण वाटले तुझे विचार.

खरंतर केवळ (आपल्याला) बोलता येते म्हणुन आपण मनुष्यप्राणी तोंडाने बडबड करत असतो, एखादा अगदी साधा विचार दुसर्‍याला समजण्यासाठी बरेच शब्द खर्च करावेसे वाटतात (लागतात).

कधी कधी वाटते मानवाची समजशक्तीच कमी आहे की काय?

कारण निसर्गात आजुबाजुला पाहिले की ज्यांना बोलता येत नाही असे चतुष्पाद केवळ स्पर्शाने, हुंकाराने, देहबोलीतुन एकमेकांशी अर्थपुर्ण संवाद साधताना दिसतात. तु कधी दोन पिंगळे(पक्षी) गप्पा मारताना पाहिले आहेस का? फार कमी बोलुन पण बराच वेळ चालते त्यांचे संभाषण (अगदी अ. बिहारी भाषणात बोलतात तसे)

अचल झाडे देखिल त्यांची पाने/फांद्या हलवुन परस्परांना काहीतरी सांगत असल्याचे जाणवते.

जेव्हा सारा आसमंत स्तब्द, निच्च्ल होतो ते देखील काहीतरी सांगण्यासाठीच ना?

हे सगळे संवादाचे प्रकार कधी आपण समजून घेऊ शकु का?

आवडलं (शेवटचे ३ परिच्छेद सोडून :)).
प्रभुणेंचेही पोस्ट आवडले. ते म्हणतात तसे संवाद साधण्यासाठी मुळात 'परस्परांना जाणून घेण्याची ह्रदयापासून ओढ हवी'. अशी ओढ आहे हे आपण एकमेकांपर्यंत कसे पोहोचवतो ? अगदी साधे स्मित... किती समर्थसुंदर तर्‍हा !
When you smile, I smile – that’s the deal.
I will not walk past you and not look you in the eyes and not acknowledge you
Instead we will pass each other and say hello
Not with our words, for they are not the same
But with our faces.

I meet you and I see there is good in your eyes
There is passion in your heart
There is a friendly hello in your smile
And for the first time we can relate and appreciate each other.
Thats all it takes; thats where it starts
Because I know that you will smile and I will smile
And all the rest is easy.

http://www.youtube.com/watch?v=k4dfbevBYQ4

नंदिनी, खूप सुंदर लेख.
शब्दं नंतर... आधी भावना, उर्मी!
लेखाचा शेवट उत्कृष्टं सतारवादनाच्या शेवटच्या झाल्यासारखा झालाय... प्रश्नं आणि उत्तरं... सगळं एकच तरीही वेगवेगळं.... आणि तरीही एकच!
जियो!
(ते डोंबल एकदम पटलं. मीही वापरलाय भर मीटिंगमधे हा शब्दं.)

Pages