शब्देविण संवादु

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

कम्युनिकेशन म्हणजे काय? असा पंधरा मार्काचा पहिलाच प्रश्न... मग त्यामधे सेंडर रीसीव्हर मेसेज नॉइज हे सर्व लिहिलं की मार्क मिळायचे... पण एकदा रमा मॅडम क्लासमधे म्हणाल्या, "प्लीज पाठ करून लिहू नका. तुम्हाला काय म्हणायचेय हे मला समजले की तुम्हाला मार्क मिळाले असे समजा."

पण कधीच पंधराच्या पंधरा मार्क मिळाले नाहीत. मला काय म्हणायचेय ते मॅडमना समजले नाही किंवा समजावण्यात माझेच शब्द तोकडे पडेल.. जे काय असेल ते.

हे सर्व आठवायला कारण म्हणजे माझी मागच्या आठवड्यातील पुण्याची फेरी. वर्ल्ड चँपियनशिप होती व्हॉलीबॉलची. तीपण एकवीस वर्षाखालच्या मुलांची. जगभरातून सोळा देश आले होते.. सॉरी पंधरा.. भारताची पण टीम होतीच की!! सेमी फायनल पर्यंत पहिल्यादाच पोचली. यामधले फ्रान्स, यु एस वगैरे देश ओळखीचे होतेच पण ट्युनिशिया, बेलारूस वगैरे देश जगाच्या नकाशावर कुठे आहेत हे ही ठाऊक नव्हतं.

मी आयुष्यात कधी व्हॉलीबॉल खेळ पाह्यला नव्हता. मग सम्जणे तर दूरच. पहिलीच मॅच बघताना दोन्ही टीममधला एक एक खेळाडू टीमच्या युनिफॉर्ममधे नव्हता. आधी वाटलं की तो कॅप्टन असेल, मग समजले की तो लिबेरो नामक खेळाडू असतो. तो नक्की काय करतो हे मला अजूनही माहित नाही.

फ्रान्स विरूद्ध क्युबाची मॅच चालू असताना मी मिडिया सेंटरमधे एकटीच बसले होते. बाजूला क्युबा टीमची पी आर ओ नोट्स काढत होती. कुठूनतरी तिने हौसेने टिकली लावून घेतली होती. कुठल्यातरी स्पॅनिश गाणं तिने लावलं होत.. अगदी खुशीत झूमत होती, क्युबा खेळत पण होती तसली खतरनाक.. (हे मला पॉइंट्स वरून समजलं होतं बरं का.. काहीतरी १२-२३ असा गेम चालू होता)

मधेच ती ओरडली.. "लिबेरो...." पुढचे शब्द डोक्यावरून गेले, पण तिला लिबेरोने काहीतरी घोडचूक केली हे समजलं.. मी विचारलं. "व्हॉट इज लिबेरो?"

तिचे इंग्लिश अगदी यथा तथा. मला तिच्या भाषेचा गंध नाही. तिने अगदी हातवारे करत मला खेळ समजवायला सुरूवात केली. त्यातून मला इतकंच समजलं की लिबेरोला फक्त डिफेन्स करता येतो, तो बहुतेकदा टीममधला सर्वात लहान (उंचीने) असतो.. वगैरे वगैरे. पण खरं सांगू.. तो लिबेरो काय करतो यापेक्षा तिची देहबोली बघण्यातच मी हरवले होते.

ती चांगली चाळीशीची होती. तरूण असताना सायकलिंग करायची. रेसमधे भाग घ्यायची. हे सांगताना तिने मिडिया सेंटरमधे काल्पनिक सायकल घेऊन धावली.

"व्हॉत स्पोर्त प्ले यु?" माझ्याकडे प्रश्न आला.
"डोंबल" मी उत्तर दिलं..
"ओह, गूड गूड.. सो यु स्लिम. फिट"

मी हसू आवरलं तरी तो ओठांवर आलंच. ती पण मनमुरादपणे हसली. आपण चुकीचं बोललो हे तिलाही समजलं... संवादाला शब्दाची खरंच गरज असते का?? तिचं हसणं मला समजलं आणि माझं हसणं तिला.

प्रत्येक गेम संपल्यावर एक छोटीशी प्रेस कॉन्फरन्स असायची. दोन्ही टीमचे कोच आणि कॅप्टन याच्यासोबत. बेलारूसमधल्या कोचला इंग्लिश अजिबात येत नव्हतं.. ट्रान्स्लेटर म्हणून टीमचाच एक प्लेअर होता. त्याचं इंग्रजी पण यथा तथाच. कोचने मी प्रश्न विचारल्यावर लांबलचक उत्तर दिलं. इथे ट्रान्सलेटर ढेपाळला. (ही पोरं ऊंचीने सहा साडे सहा फूट असली तरी मला तरी ती बाळंच वाटायची Happy )
"वे वेर नॉत फित सिकॉलॉजिकली.."
"सायकॉलॉजिकली?"
"नो.. नो.. सीकॉलोजी.." त्याचा हात कोचच्या डो़क्याकडे.. Happy

बेल्जियमबरोबर इजिप्त वाईट रित्या हरलं होतं. इजिप्तचा कोच सर्व खेळाडूना अक्षरश: शिव्या घालत होता.
पीसीमधला ठराविक प्रश्न "हाऊ डू यु फील आफ्टर लूजिंग?" हे विचारल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी आलं.
"तुम्ही मला सांगा, मी काय करू शकतो? मी जाऊन कोर्टवर खेळू तर शकत नाही? अजून किती शिकवणार मी त्याना? अजून किती मेहनत करून घेणार?"

नाही, तो मराठीत बोलला नाही, आणि मला पण अरेबिक समजत नाही. पण तो जे काही बोलला ते समजलं. शब्दांशिवायच.. त्याच्या नजरेतून.

त्याच्या नजरेतून अजून एक आठवण झाली. लेडिज डब्यामधला रोजचा तोच कंटाळवाणा प्रवास. प्रत्येक स्टेशनला कमी होणारी आणि वाढणारी गर्दी. सहज लक्ष समोरच्या अपंगाच्या डब्याकडे गेलं. दोन मित्र एकेम्काची मस्करी करत होते.

आणि हसत होते. एखाद्या ओढ्यासारखं त्याचं खळखळणारं हसू... आवाजाशिवायच. अख्ख्या ट्रेनचा गोंगाट त्याच्यासाठी नव्हताच... ते त्याच्याच विश्वात मग्न होते. कसल्याही शब्दांशिवाय. पण संवाद होतच होता ना??

कम्युनिकेशन म्हणजे काय? अवघ्या पंधरा मार्काचा प्रश्न.. सेंडर रीसीव्हर मेसेज मिडियम नॉइज??? छे.. कम्युनिकेशन म्हणजे तुझा आणि माझा मनातल्या मनात झालेला संवाद. त्याला शब्दाची, भाषेची आणि इतर कशाची गरजच काय? गरज आहे ती फक्त तुझी आणि माझी!!!!

मला जे काय सांगायचय ते तुला समजत नाही.. पण किमान तुला इतकं तरी कळतं मला काहीतरी सांगायचं आहे. तू जाणून घ्यायला लागतोस की मला काय म्हणायचय.. आपला संवाद सुरू होतो. म्हटलं तर एका आत्म्याने एका आत्म्याशी केलेला संवाद. आणि म्हटलं तर माझ्याशीच मीच केलेला संवाद.

शेवटी, तू म्हणजे मीच आहे. आणि मी म्हणजे पण तूच आहेस. चराचरात वसलेला तू. आणि तुझाच एक अंश असलेली मी..

गेल्या कित्येक दिवसापासून प्रयत्न करतेय,, तुझ्याशी संवाद साधायचा. तू मात्र किती विविध तर्हेने माझाशी संवाद साधतोस??? कसं जमतं तुला हे संवादाच्या आधीच जाणून घेणं माझं मन?? कसं जमतं तुला हे असं शब्दातीत संवाद साधणं???

सांगशील कधी तरी उत्तर? की तू सांगितलयस मला आधीच?

प्रकार: 

छान लिहिलयं. मला आई/ बाबा आणि लहान बाळ यांचा संवाद आठवला. एकिकडून शब्द बोलणं आणि दुसरीकडून फक्त हं,हं,हं असा घशातून निघणारा स्वर. पण दोघांनाही आनंद देणारा!

.

अरे देवा, मी हे प्रकाशित केलं की काय???
अर्धवट आहे अजून Sad काल झोपेत वेंधळेपणा केला बहुतेक!! थोडं अजून संपादन करेन आज दिवसभरात. Happy

तरीपणं तुम्ही सर्वानी वाचलंत आणि तुम्हाला आवडलं हे बघून आनंद झाला.धन्यवाद. योगेश, तुम्ही खरंच छान लिहिलय. आवडलं. Happy

नंदीनी चांगल लिहिलं आहे . तुम्ही संवेदनशील आहात असं जाणवत , तुमच्या प्रत्येक पोस्ट मधून....

@ योगेश : तुम्ही तर अफाट्च ...... मला आवडेल तुम्हाला भेटायला.

नंदिनी.. मस्तच(व बरोबरही!) लिहीले आहेस.. डोंबल! Rofl

बाय द वे.. फायनल कोणी जिंकली? आणि आपली टिम उपांत्य फेरीपर्यंत? म्हणजे २०२० मधे दिल्लीला जर ऑलिंपिक्स झाले तर आपल्याला पदकाची आशा करायला हरकत नाही या मुलांकडुन...:)

मुकुंद... भारत यजमान होता म्हणून त्याला स्पर्धेत भाग घेता आला होता. तरीपण सेमी पर्यंत पोचला. आणि ते पण रशिया यु एस आणि अर्जेंटिना यांना हरवून!!!
ब्रझिल आणि क्युबामधे फायनल झाली. ब्राझिल जिंकले. Happy

नंदीनी, पटलं. थोडा वेगळा विषय आहे पण, डॉग ट्रेनिंग किंवा अ‍ॅटलिस्ट डोग शो पहा एखादा. हॅन्डलर आणि कुत्र्याची जोडी ओबिडीयन्स मध्ये उतरते ना, तेव्हा त्यांच्यातलं कम्युनिकेशन बघण्यासारखं असतं हो.
माणसं समजून घ्यायला मी कुत्र्यांकडून शिकलो.

आणि एक निरीक्षण. साधारण एकाच वयोगटातली भिन्नभाषिक मुलं एकत्र खेळताना पाहिलीत का ? त्यांना भाषेचा अडसर येत नाही. Happy

शेवटी काय तर मनातलं सांगायच भाषा हे एक माध्यम आहे. पण एकमेव नव्हे.

अमित देसाई. प्लीज मला ते "दी" वगैरे लावू नका. अगदी विचित्र वाटतं. आणि सध्या तर "दा" लोकाची लिखाणं बघून ते दा दी म्हणजे मायबोलीवरचा विनोद झालेला आहे.
नंदिनी म्हटलंत तरी चालेल किंवा नंदिनी२९११ असं म्ह्टलंत तरी चालेल.

नंदीनी छान लिहीले आहेस. योगेश तुझी प्रतिक्रीया पण मस्तच. Happy

देहबोली मात्र कमाल असते. जपानी शिकुन पहील्यांदा जपानला गेलो तेव्हा तिथे दुभाषी म्हणुन काम करत असताना असे जाणवले की बोली जपानी ही खूपच वेगळी आहे. आपल्याकडे मराठी भाषा जशी बदलत जाते तसेच जपानच्या बाबतीत होते. पहील्या दिवशी मी अक्षरशः देहबोलीमुळे दुभाष्याचे काम करु शकलो होतो.

अरे ये कलईच लिखेला है? अपुनको दिखा कैसा नही? Sad
लेकिन जबरी लिखेला!
की तू सांगितलयस मला आधीच? >>>
इसपे तो आपुन एकदम किल हो गया! सही!! Happy

योगेश, आपका भी पढा आपुनने बादमें. सही लिखेला रे. Happy

नंदिनी,
मस्तच लिहितेस तु. तुझ्या सगळ्या लिखणात एक प्रकारचा रोखठोकपणा , बिनधास्त पणा आहे. तो मला खुप आवड्तो. अशीच लिहीत रहा,
धनु.

छान लिहिलंयस गं!
>>"डोंबल" मी उत्तर दिलं.. Lol
मी नुकतंच माझ्या क्लायंटच्या एका मोठ्ठ्ठ्ठ्या (तुमचं प्रॉडक्ट हे अमकं ढमकं आणि तमकं ढमकं एकत्र करु शकतं का वगैरे) प्रश्नाला हे एकशब्दी उत्तर दिलं होतं.. तो ऐकून "वा, अशी जिगर पाहिजे करुन दाखवण्याची" म्हणाला होता आणि मला कुठे तोंड लपवून हसू असं झालं होतं..

.

नंदिनी,
सुंदर अन सुस्पष्ट !!!!!!!
मला ती भाषा समजत नाही, पण चित्रपटची भाषा समजते अस शाहरुख खान कुठेतरी बोलला होता.

लेख एकदम सुंदर, नविन कल्पना सुचायला उद्युक्त करणारा.
<< मोबाईलवरून हा माणूस दूरच्या माणसांशी तासंनतास गप्पा मारत होता, पण शेजारी बसलेल्याशी दोन शब्द बोलावेत असे त्याला का वाटले नाही? संपर्क साधनांच्या वेगाने जग जवळ आले खरे, पण मने तितकीच दुरावली.>> या अ‍ॅप्रोचचा मला वैयक्तिकदृष्ट्या भयानक कंटाळा आला आहे,ही सर्व मांडणी मला आत्यंतिक सरळसोट आणि अतीभावूक वाटते.

छान लिहिलंय Happy
चिमणला अनुमोदन. माझ्याकडूनही तुला पंधरा पैकी पंधरा मार्क्स. Happy

`अपूर्वाई'त पु.लं. नी पण एका ठिकाणी असंच काहीसं लिहिलं आहे. ते एडिंबरा महोत्सव पहायला गेलेले असताना तिथे सादर होणार्‍या कार्यक्रमांपैकी अनेक न कळणार्‍या भाषेत होते. पण त्याचा अडसर तिथे जाणवला नाही, व्यक्त होणार्‍या भावना सर्वांच्या मनापर्यंत पोचत होत्या असं त्यांनी नमूद केलंय.

(अवांतर : तू कुठल्या चॅनलमध्ये जॉब करतेस का?)

Pages