“अप्रूप”

Submitted by nileshrs1 on 1 November, 2026 - 01:35

वेगळेच हे चांदणे इथल्या नभीचे,
वर्ख नाही त्यास कालच्या भेटीचे!
डावलून जाई सुख माळ ढगांची,
की लपवते सल मुक्या संवादाचे!

माहीत नाही कुणाला नाव माझे,
चेहरेच सारखे इथे ज्याचे त्याचे!
सांग तूच ओळख कशी पटावी,
आरोप वेगळाले जिथे प्रत्येकाचे!

गुमसुम रात्र नी थवे काजव्यांचे,
शल्य वाहे वार्‍यामधुनी तार्‍यांचे!
वाटते असावी लढाई प्रकाशाची,
कसे राखू नयनी स्वप्न उजेडाचे!

कुंपण करी लाड इथे काट्यांचे,
हाल बेहाल गंधाळल्या फुलांचे!
सार्‍या ऋतूंत तटबंदी महत्त्वाची,
सुस्त ते महाली रोपटे चाफ्याचे!

प्रवाशास स्वातंत्र्य ना गुंतण्याचे,
लुप्त पायवाटा ना पाश परतीचे!
बेधुंदीत आसमंती शीळ घुमावी,
गाणे उपजावे हरवलेल्या मनाचे!

क्षितिजी कळे नसणे क्षितिजाचे,
व्यर्थ प्रयत्न आकाश खोदण्याचे!
उड्डाणे भरा, तुम्ही धरा जिंकावी,
शून्य असते अंती मूल्य वाहनाचे!

नसे वेड नाही लक्षण शहाण्यांचे,
गोंधळ खरे बाकी भोपळे भ्रमाचे!
सूज्ञ फक्त जाणारी वेळ असावी,
अप्रूप नाही माणसास माणसाचे!

-निलेश सकपाळ
३० ऑक्टोबर २०२६

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users