
देवी म्हणजे आद्यशक्ती - ब्रह्मांडीय ऊर्जा - वैश्विक ऊर्जा!
ही ऊर्जा शक्तिपीठांमध्ये अधिक सक्रिय असते असे मानले जाते.
शक्तीपीठ म्हणजे काय?
जिथे देवी विराजते, मुक्काम करते ते नैसर्गिक ऊर्जेचे स्थान म्हणजे शक्तीपीठ ! 'शक्तिपीठ' म्हणजे आदिशक्ती (देवी) च्या उपासनेची आणि तिच्या ऊर्जेची अतिशय पवित्र अशी मुख्य स्थाने किंवा केंद्रे. देशभरात पसरलेली ही अशी ठिकाणे आहेत, जिथे देवीच्या विविध रूपांची विशेष पूजा केली जाते.
महापुराणांमध्ये शक्तीपीठांच्या उत्पत्ती विषयी एक कथा सांगितली आहे.
राजा दक्षाने एक मोठा यज्ञ केला होता. त्या यज्ञात त्याची कन्या, शिवपत्नी सती, निमंत्रण नसतानाही ती तिथे गेली. तेथे झालेला शिवाचा अपमान सहन न होऊन माता सतीने त्या यज्ञात स्वतःला झोकून दिले. ते बघून भगवान शिव अत्यंत क्रुद्ध होऊन सतीचे शव खांद्यावर घेऊन तांडव करू लागले. त्यांच्या त्या रौद्र रूपाने संपूर्ण विश्व - नद्या , नाले, पर्वत , धरती हादरून गेले, डळमळीत झाले. त्यावेळी सर्व शांत करण्यासाठी - सृष्टीचा पालनकर्ता या नात्याने- भगवान विष्णूनी, आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या देहाचे तुकडे केले. ते तुकडे आणि देवीचे अलंकार भारतीय उपखंडात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पडले. जिथे जिथे ते भाग पडले त्यातही भूमी अत्यंत चैतन्यमय आणि उर्जावान झाली, त्या प्रत्येक ठिकाणाला एक पवित्र शक्तीपीठ मानले गेले.
या ऊर्जा स्थानांकडे किंवा शक्तिपीठांकडे थोडं चौकसतेने बघितले असता, काही अतिशय अचंबित करणारी माहिती किंवा तथ्ये समोर आली.
बरीचशी शक्तिपीठे ही टेकड्यांवर, डोंगराच्या शिखरावर, नद्यांच्या संगमावर किंवा घनदाट जंगलाच्या मध्यभागी आहेत. अशा ठिकाणी जिथे निसर्गाचे घटक, पंच महाभूते - पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश- अत्यंत सक्रिय असतात.
वाहणारे पाणी, भरपूर झाडे अशा नैसर्गिक वातावरणात माणसाचा ताण (Stress) कमी होतो आणि शरीर ताजेतवाने होते.
शिवाय अशा दुर्गम भागात बाह्य कोलाहल नसल्यामुळे, उच्च ऊर्जा क्षेत्रात मन शांत होते. तसेच, गर्भगृहाची रचना, तिथला अंधार, तेलाच्या दिव्याचा प्रकाश आणि मंत्रोच्चारांचे कंपन (Vibrations) मन एकाग्र करण्यास मदत करत असावेत.
प्राचीन काळात ही पीठे एक 'मानसिक विश्रामगृह' (Mental Sanctuary) म्हणून काम करत असत. अत्यंत ताणाखाली असलेली व्यक्ती अशा उर्जायुक्त पण शांत वातावरणात गेली की तिला एक आंतरिक आधार मिळतो. त्यामुळे नकारात्मक विचार नष्ट होऊन मनाची एकाग्रता वाढून आत्मबल बळकट होत असावे.
थोडक्यात सांगायचे तर, आदिशक्तीची ही पीठे म्हणजे मानवी चेतनेला तिच्या मूळ स्त्रोताशी जोडणारी केंद्रे आहेत, ज्यांचा अनुभव आजही अनेक साधकांना तिथे गेल्यावर येतो.
त्या प्राचीन काळात ऋषी मुनींनी त्या विशिष्ट ठिकाणी ही पीठे किंवा प्राचीन मंदिरे बांधली, यामागे मुख्यत्वे त्यांची जबरदस्त निरीक्षण शक्ती, निसर्गाचा अभ्यास, मुख्य नैसर्गिक घटकांविषयीचे अवलोकन ( पॅटर्न रेकग्निशन) अशा अनेक गोष्टी कारणीभूत असाव्यात.
मूळ महापुराणातील कथेनुसार माता सतीच्या अवशेषांतून ५१ शक्तीपीठे तयार झाली. पुढे शाक्त संप्रदायाचा जसजसा प्रसार झाला, अनेक छोटी मोठी स्थानिक जागृत देवस्थाने, मंदिरे यांनाही शाक्तपीठांमध्ये गणले गेले. त्यानुसार एकंदर १०८ शक्तिपीठे मनाली जातात.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशात ‘साडेतीन शक्तिपीठे’ ही अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र मानली जातात. ही स्थाने ॐ च्या चार भागांचे (अ, उ, म आणि अर्धमात्रा) प्रतीक आहेत. आदिशक्तीच्या उपासनेची ही मुख्य केंद्रे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या चार भौगोलिक भागात विखुरलेली आहेत, जी जणू संपूर्ण महाराष्ट्राचे रक्षण करत आहेत.
१. तुळजापूरची भवानी माता:
उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील तुळजापूर येथे बाळघाट पर्वताच्या शिखरावर हे मंदिर वसलेले आहे हे आदिशक्तीचे पहिले पूर्ण पीठ मानले जाते. येथे उजवा बाहू पडला अशी श्रद्धा आहे, त्यामुळे ही मुख्यत्वे पराक्रमाशी जोडली जाते.
देवीची मुख्य अष्टभुजा मूर्ती स्वयंभू, चल आणि काळ्या पाषाणाची आहे.
या प्राचीन मंदिराचा उल्लेख राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादव राजवटींच्या काळातील ताम्रपत्रांमध्ये आणि शिलालेख मध्ये आढळतो. बाराव्या-तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव राजांच्या काळात या मंदिराचा मोठा विस्तार झाला. तुळजापूरच्या मंदिराला राष्ट्रकूट आणि यादवांपासून मराठा साम्राज्यापर्यंत सातत्याने मोठा राजाश्रय मिळाला. ही भवानीमाता म्हणजे साक्षात, छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी आणि खरं तर अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानली जाते.
२.कोल्हापूरची महालक्ष्मी / अंबाबाई
कोल्हापूरचे मंदिर हे वास्तुकलेच्या दृष्टीने अत्यंत प्राचीन असून यात चालुक्य, शिलाहार आणि मराठा स्थापत्य शैलीचा संगम आढळतो. पुराणांनुसार हे विष्णू आणि लक्ष्मीचे निवासस्थान मानले गेले आहे. इथे सतीचे नेत्र पडले होते असे मानतात, त्यामुळे हे स्थान अज्ञानाचा अंधार दूर करणारे ज्ञान, कृपादृष्टी आणि ऐश्वर्याचे मुख्य केंद्र मानले जाते
चालुक्य राजांच्या काळात याचे मूळ बांधकाम सुरू झाले. त्यानंतर पुढे शिलाहार राजवटीत मंदिराचा मोठा भाग आणि सभामंडप बांधला गेला. पुढे यादवांनी आणि नंतरच्या काळात मराठा राजवटीत (छत्रपती संभाजी महाराज व शाहू छत्रपतींच्या काळात) या मंदिराचा जीर्णोद्धार आणि सुशोभिकरणाचे कार्य झाले. त्याचे स्थापत्य वैशिष्ट्य म्हणजे वर्षातून दोन वेळा सूर्याचे किरण प्रत्यक्ष देवीवर पडून अंबाबाईला सूर्यकिरणांचा अभिषेक होतो.
३. माहूरची रेणुका माता
माहूर गडावर वसलेल्या या शक्तिपीठाला यादव, गोंड आणि मराठा सरदारांनी मोठे योगदान दिले.
माहूर हे भगवान दत्तात्रयानाचे जन्मस्थान आणि रेणुकामातेचे स्थान म्हणून पुराणकाळात प्रसिद्ध आहे. देवी सतीचा मुख पडल्याची श्रद्धा आहे.
माहूरचा किल्ला आणि येथील परिसराचा विकास यादव काळाशी जोडला जातो. मध्ययुगीन काळात गोंड राजांच्या अधिपत्याखाली हा परिसर होता. त्यानंतर बेरार सुभ्यांतर्गत आणि पुढे हैदराबादच्या निजाम राजवटीच्या प्रभावाखाली हे क्षेत्र राहिले. येथील देवीचे मुख्य मंदिर आणि परिसरातील वास्तूवर मध्ययुगीन वास्तुकलेचा प्रभाव दिसून येतो. पुढे अहिल्याबाई होळकरांनी भाविकांच्या सोयीसाठी धर्मशाळा, घाट व पायऱ्यांची बांधणी केली
४. वणीची सप्तशृंगी माता
याला महाराष्ट्रातील अर्धपीठ मानले गेले. सप्तशृंगीच्या डोंगरावर देवी सतीचा 'चिबुक' किंवा चेहऱ्याचा खालचा भाग पडला होता अशी श्रद्धा आहे.
देवी भागवत पुराणातील 'दुर्गा सप्तशती' (देवी महात्म्य) मध्ये सप्तशृंगी डोंगराचा आणि देवीच्या स्थानाचा उल्लेख येतो.
सप्तशृंगीचा डोंगर अत्यंत दुर्गम असल्याने मराठा आणि पेशवे काळात येथे जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या. तसेच मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. पुढे अहिल्याबाई होळकरांनी मंदिराजवळ भाविकांसाठी पायऱ्या, पाण्याची कुंडे आणि निवासाची सोय उभारली.
भारतातील प्रमुख शक्तिपीठांमध्ये खालील शक्तिपीठांचा उल्लेख करावा लागेल.
कामाख्या देवी (आसाम - गुवाहाटी): हे शाक्त संप्रदायाचे सर्वात प्रमुख आणि तंत्रसाधनेचे मुख्य केंद्र मानले जाते. येथे देवीच्या 'योनी' भागाची पूजा केली जाते.
कालीघाट व तारापीठ (पश्चिम बंगाल - कोलकाता): पूर्व भारतातील अत्यंत जागृत स्थाने होत. कालीघाट, येथे देवी सतीचे उजव्या पायाचे बोट पडल्याचे तर तारापीठ येथे तृतीय नेत्र पडल्याचं मानल आहे.
वैष्णोदेवी (जम्मू आणि काश्मीर): त्रिकुटा पर्वतावर स्थित हे उत्तर भारतातील अत्यंत लोकप्रिय आणि पवित्र शक्तिपीठ आहे.
ज्वालामुखी मंदिर (हिमाचल प्रदेश - कांगडा): येथे कोणत्याही मूर्तीऐवजी नैसर्गिकरीत्या जमिनीतून निघणाऱ्या अग्नीच्या ज्वालांची देवी रूपात पूजा केली जाते (सतीची जीभ येथे पडल्याचे मानले जाते).
विशालाक्षी (उत्तर प्रदेश - वाराणसी): गंगा किनाऱ्यावर वसलेले हे पीठ देवीच्या डोळ्यांशी (अक्ष) संबंधित मानले जाते.
भारताबाहेरील प्रमुख शक्तिपीठे:
हिंगलाज माता (पाकिस्तान - बलुचिस्तान): कराचीपासून पश्चिमेस हिंगोल राष्ट्रीय उद्यानात आहे. येथे देवी सतीचे डोके (ब्रह्मरंध्र) पडले होते. हे अतिशय दुर्गम आणि अतिप्राचीन शक्तिपीठ मानले जाते, जिथे स्थानिक समुदायही तिला 'नानी की मंदी' म्हणून पूजतो.
गुह्येश्वरी देवी (नेपाळ - काठमांडू): पशुपतीनाथ मंदिराच्या जवळ आहे. येथे देवी सतीचे दोन्ही गुडघे पडले होते असे मानले जाते.
शारदा पीठ (पाकव्याप्त काश्मीर - POK): नीलम खोऱ्यात,किशनगंगा नदीच्या काठी, आहे . प्राचीन काळी हे पीठ केवळ देवीचे स्थान नव्हते, तर ज्ञान आणि शिक्षणाचे खूप मोठे जागतिक केंद्र (शारदा पीठ विद्यापीठ) होते.
भवानी मंदिर / चट्टल (बांगलादेश - चितगाव): सीताकुंड टेकडीवर आहे. बांगलादेशात एकूण प्रमुख शक्तिपीठांपैकी चितगावचे भवानी मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे . येथे सतीची उजवी बाहू पडली होती असे मानतात.
शंकरी देवी (श्रीलंका - त्रिकोणामली): श्रीलंकेच्या पूर्व किनाऱ्यावर. महत्त्व: १८ महाशक्तिपीठांपैकी एक मानले जाणारे हे स्थान देवीच्या पायाच्या अलंकारांशी (नूपुर) संबंधित मानले जाते.
हे सर्व वाचत असताना, लिहिताना जाणवत राहत की हे समोर दिसणारं सारं फक्त हिमनगाचे टोक आहे. त्याची पूर्ण व्याप्ती, खोली आणि पूर्णार्थ माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी अनाकलनीय आहे.
तरीही एक जाणवले,
आज आपण मोठ्या उत्साहाने नवरात्र साजरा करतो. काही अंशी पूर्वापार चालत आलेल्या परंपरा जपत, तर त्यात नवीन प्रथा, पद्धती यांची भर घालत भारतातच नव्हे तर भारत बाहेरही वेगवेगळ्या ढंगात, रूपात साजऱ्या होणाऱ्या या उसवाच्या मुळाशी एक मुलतत्व आहे, ती म्हणजे देवी - आदिशक्ती, ऊर्जा!
ही शक्ती दुष्ट प्रवृत्तीचा संहार करते, सुख-समृद्धी आणते, सृजनाचा अविष्कार घडविते आणि तीच विद्येचा -आत्मज्ञानाचा रस्ता दाखवते.
शक्तीच्या या विविध रूपांचे स्मरण, यथाशक्ती आकलन आणि तिजप्रती वंदन करून, हा शोध घेण्याचा केलेला हा अल्प प्रयत्न इथे थांबवते!
सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्रम्ब्यके गौरी, नारायणी नमोस्तुते।।
छान लिहिलंय
छान लिहिलंय