भस्मबीज - भाग २४

Submitted by नितनवे on 4 October, 2026 - 13:37

भस्मबीज - भाग २३
पूर्वभाग
कल्लेश्वरची एकवीस रात्रींची तामसिक क्रोध भैरव साधना अंतिम टप्प्यात पोहोचते, तर अभिजितची सात्विक साधना स्थिरपणे सुरू असते आणि देवप्पा मल्लीच्या मनातील गाठ सोडवण्यासाठी गुप्त मोहिनी तंत्र साधना करतो. मोहिनीदेवीच्या स्वप्नातील गरुड आणि नागाचा संकेत अखेर देवप्पाला उमगतो आणि तो गरुडाला एका निर्णायक मोहिमेसाठी तयार करतो. एकवीसाव्या रात्री कल्लेश्वर साधनेच्या अंतिम विधीत असताना गरुड काळाकुट्ट नाग त्याच्यावर सोडतो आणि त्याचा मंत्र अर्धवट तुटतो. राखेतून प्रकट झालेली प्रचंड काळी शक्ती वर्तुळाबाहेर गेलेल्या तरुण जोग्याचा बळी घेते, त्याचे रक्त हवेतच शोषून घेते आणि पुन्हा राखेत विलीन होते. एकवीस रात्रींची साधना शेवटच्या क्षणी फसल्याने कल्लेश्वर हादरतो; मात्र त्याची भीती आता सूडाच्या अधिक धोकादायक निर्धारात बदलते.
************************************************************************************************************************

भस्मबीज - भाग २४ - पिशाच्चबन्धन

स्मशानातील धूर विरून गेला तरी वातावरणातील ती भेसूर, जड दुर्गंधी कल्लेश्वरच्या नाकातून जात नव्हती. वाटेवर चालताना त्याचे पाय अक्षरशः थरथरत होते. एकवीस रात्रींची कठोर, जिवावर बेतलेली साधना एका क्षणात मातीमोल झाली होती. क्रोध भैरवाचे ते अभेद्य तामसिक कवच सिद्ध होण्याऐवजी अर्धवट जागे झालेली ती सावली जोग्याचे मुंडके घेऊन नाहीशी झाली होती.

कल्लेश्वरच्या मनात त्या तरुण हांडी जोगीच्या मृत्यूचं दुःख फार वेळ टिकलं नाही. त्याची एकवीस रात्रींची साधना, त्याचं इतकं परिश्रम, एका म्हाताऱ्या रक्षकाने इतक्या सहज उधळून लावलं होतं याचंच त्याला जास्त दुःख आणि शरम वाटत होती. देवप्पाकडे त्याच्याइतकं अघोरी ज्ञान नव्हतं, त्याची साधना-शक्तीही त्याच्याइतकी उग्र नव्हती. एक साधा रक्षक-कुळाचा वारसदार, जो जास्तीत जास्त काही रक्षा-मंत्र, काही जुनाट कुळाचार जाणत होता इतकंच. आणि तरीही, त्याने कल्लेश्वरसारख्या तांत्रिकाला नामोहरम केलं होतं. सरळ शक्तीच्या जोरावर नाही तर चातुर्याने, डावपेचाने.
"ठीक आहे म्हाताऱ्या तुला गनिमी कावा खेळायचा असेल तर तुला तुझ्याच भाषेत उत्तर मिळेल" कल्लेश्वर स्वतःशीच पुटपुटला.

त्याने ठरवलं आता थेट हल्ला नाही. देवप्पाच्या उपस्थितीत अभिजितवर दुरून काही करणं म्हणजे स्वतःची शक्ती फुकट घालवण्यासारखं होतं; त्या म्हाताऱ्याकडे अशा प्रयत्नांना ओळखण्याची, उधळण्याची हातोटी होती हे आता सिद्ध झालं होतं. सरळ शक्तीचा वापर बंद. यापुढे तोही डाव खेळणार होता...सावकाश, छुपेपणाने.

येत्या अमावास्येला तो एक निर्णायक पाऊल उचलणार होता. यावेळी यंत्र-तंत्र नाही; थेट मुळावरच घाव. अभिजितला संपवायचं, कायमचं.
पण असा घाव घालण्याआधी त्याला शत्रूची पूर्ण माहिती हवी होती. देवप्पा आणि अभिजितची रोजची दिनचर्या, त्यांची जागा, त्यांचे नियम. कल्लेश्वरने डोळे मिटून ध्यान लावले आणि काही वेळातच अंधारातून चार-पाच कावळे येऊन आजूबाजूच्या फांद्यांवर बसले; शांत, स्तब्ध, त्यांचे लाल भारलेले डोळे कल्लेश्वरवर खिळलेले.

"जा," तो त्यांच्याकडे बघत हळू आवाजात म्हणाला. "त्या म्हाताऱ्याच्या झोपडीभोवती, आणि त्या इनामदाराच्या मागोमाग फिरा. काय खातो, कधी उठतो, कुठे जातो, सगळं मला दिसू द्या."
कावळ्यांनी एकसुरात कर्कश काव काव केलं, आणि मग एका मागोमाग एक अंधारात उडून गेले.
************************************************************************************************************************
मुलांची परीक्षा संपली, आणि दुसऱ्याच दिवशी सकाळपासून अभिजितच्या घरात लगबग सुरू झाली. स्वातीने आदल्या रात्रीच बहुतेक सामान बांधून ठेवलं होतं.

"आई, किती दिवस राहायचंय सुप्याला?" अथर्वने सोफ्यावर बसून बूटांची लेस बांधता बांधता विचारलं.

"आत्ता तरी नक्की सांगता येणार नाही." स्वाती उत्तरली.

अनन्या मात्र काहीशी शांत होती. गेल्या काही आठवड्यांत तिच्यात एक सूक्ष्म बदल जाणवत होता. पूर्वीसारखी ती उगाच चिडचिड करत नव्हती, उलट कधीकधी खिडकीबाहेर बघत, स्वतःच्याच विचारात मग्न होऊन बसून राही. आज सकाळीही तिने आपली बॅग स्वतःच भरली होती, न सांगता, न विचारता.

नऊ वाजण्याच्या सुमारास दारावरची बेल वाजली. नेहा होती.

"मी म्हटलं, निघायच्या आधी एकदा भेटूनच जावं," ती आत येत म्हणाली, हातात मुलांसाठी दोन-चार खाऊची पाकिटं घेऊन. "स्वाती, ड्राइव्ह करशील ना व्यवस्थित?"

"हो, फक्त पुण्यात थोडी सांभाळून चालवावी लागेल," स्वाती हसून म्हणाली. "तु उगाच त्रास घेतलास, नेहा."
“त्रास कसला त्यात," नेहा म्हणाली, पण तिचा आवाज नेहमीसारखा सहज नव्हता. गेल्या काही आठवड्यांत ती स्वतःहूनच वारंवार या घरी येत राहिली होती; कधी उगाच काहीतरी निमित्त काढून, तर कधी नुसतीच चौकशी करायला.

ती अनन्याजवळ गेली, तिच्या डोक्यावरून हात फिरवला. "आजोळी मजा करा हं," ती म्हणाली, पण क्षणभर तिची नजर अनन्याच्या चेहऱ्यावर काहीतरी शोधल्यासारखी रेंगाळली; एक अनामिक, स्वतःलाही न कळलेली हुरहुर, जी नेहाला अनेकदा या पोरीकडे बघताना वाटायची, तिला कारण मात्र कधीच सापडलं नव्हतं.

सामान उचलायची घाई सुरू झाली. जाताना स्वातीने एकवार मागे वळून घराकडे बघितलं. किती दिवस हे घर असं रिकामं, कुलूप लावलेलं राहणार होतं, कुणास ठाऊक.

"निघते मी, नेहा.” स्वाती म्हणाली.

"हो, सांभाळून जा. आणि सुप्याला पोहोचल्यावर एक फोन कर." नेहा म्हणाली

गाडी निघाली, गर्दीच्या रस्त्यांतून वाट काढत. मागे उभी राहिलेली नेहा बराच वेळ तशीच बघत राहिली, गाडी वळणावर दिसेनाशी होईपर्यंत आणि मग एक दीर्घ श्वास सोडून, स्वतःशीच पुटपुटली, "देवा, यांना नीट सुखरूप पोहोचव."
तिला स्वतःलाही माहीत नव्हतं, ती नेमकं कुणासाठी, कशासाठी इतकी अस्वस्थ आहे पण गेल्या काही महिन्यांपासून तिच्या मनात एक सतत जाणवणारी हुरहुर होती, जी आता या घराच्या कुलुपासोबतच आणखी गडद होत गेली.

स्वाती आणि मुलं संध्याकाळपर्यंत सुप्याला सुखरूप पोहोचली.
रात्री जेवणं आटोपल्यावर, मुलं थकून लवकरच झोपी गेली. स्वाती मात्र अंगणात एकटीच उभी राहिली, आकाशातल्या चांदण्यांकडे बघत, मनात एकच विचार घोळत होता…अभिजित आत्ता कुठे असेल, कसा असेल, आणि हे सगळं कधी संपणार.

ती वळून घराकडे बघत राहिली. मंद उजेडात मुलं शांत झोपलेली दिसत होती. निदान आज रात्रीपुरती तरी, इथे, या जुन्या वाड्यात, ती सुरक्षित होती. पण उद्याचं कुणी सांगावं.
************************************************************************************************************************
एकादशीची संध्याकाळ होती. अंगणात दिवा लावून, भस्मशैल समोर ठेवून अभिजित नेहमीप्रमाणे आपला जप करत बसला होता. जप सुरू होऊन बराच वेळ झाला असेल, त्याला अचानक जाणवलं की आजुबाजुला एक विचित्र ऊब पसरतेय. आधी त्याला वाटलं, हा नुसता दिव्याचा उजेड आहे, त्याची उष्णता लागत असेल. पण ती ऊब वाढत गेली; त्वचेपर्यंत झिरपणारी, तरीही न जाळणारी, जणू आतून एक जिवंत स्पंदन उमटतंय.

त्याने डोळे उघडले आणि खाली बघितलं आणि त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले. तो भस्मशैल लाल रंगात चमकू लागला होता आणि त्यावर मंत्राचं प्रत्येक अक्षर स्पष्ट, सोन्याच्या तारेसारखं तेजस्वी, जणू आतून स्वतःचाच प्रकाश फेकत होतं.
ॐ वीरशास्ते महाशक्तये रणरङ्गोद्धुरेशाय नमः॥

दिव्याच्या मंद उजेडातही ती अक्षरं इतकी ठळक दिसत होती की अभिजितला क्षणभर वाटलं, आपण स्वप्नातच आहोत. त्याचे ओठ आपोआप हलले, आणि तो मंत्र त्याच्या तोंडून बाहेर पडला. पहिल्यांदाच, संपूर्ण, दोन्ही भाग एकत्र असलेला.

ॐ हं पं रं क्ष्रौं कौं सं खं हरिहरपुत्राय नमः।
ॐ वीरशास्ते महाशक्तये रणरङ्गोद्धुरेशाय नमः॥

अभिजीतच्या हातातली माळ गळून पडली. तो थरथरत्या पावलांनी उठला आणि देवप्पाच्या झोपडीकडे धावला. "देवप्पा! देवप्पा, बघा!" तो आत शिरत ओरडला, हातातले कवच पुढे करत. "मला... मला अक्षरं दिसतायत! पूर्ण मंत्र दिसतोय, वाचता येतोय मला!"

देवप्पा दिव्याजवळ बसला होता, तो पटकन उठला आणि कवचाजवळ आला. त्याचेही डोळे विस्फारले.

बराच वेळ तो नुसता त्या कवचाकडे बघत राहिला, मग हळूहळू त्याच्या चेहऱ्यावर एक खोल, समाधानाचं हसू उमटलं. "अभिजित," तो म्हणाला, आवाजात एक वेगळाच भाव होता जणू कित्येक वर्षांची प्रतीक्षा आज फळाला आलीय. "तुझी दीक्षा आता खऱ्या अर्थाने पूर्णत्वाकडे चाललीय. कवच आता तुला ओळखतंय. आणि म्हणूनच त्याने स्वतःचं रहस्य तुझ्यासमोर उघड केलं."

"म्हणजे आता मंत्र पूर्ण माहीत झालाय आपल्याला?" अभिजितने विचारलं, आवाजात अजूनही आश्चर्याची छटा.

"हो," देवप्पा म्हणाला, मान डोलावत. "पण मंत्र माहीत असणं, आणि तो सिद्ध असणं यात फरक आहे. नुसता शब्द पाठ असून उपयोग नाही, अभिजित. आता हा मंत्र तुझ्या मनात...सुप्त आणि जागृत दोन्हीत भिनवावा लागेल."

अभिजित शांतपणे ऐकत राहिला, देवप्पाची पुढची वाक्यं येण्याची वाट बघत.

"येणारी अमावास्या उलटली, की लगेच त्या दुसऱ्या दिवसापासून तुला शास्तव्रत सुरू करावं लागेल," देवप्पा गंभीर आवाजात म्हणाला. "हे व्रतच तुझा मंत्र पूर्णपणे सिद्ध करेल, आणि तेव्हाच हे कवच खऱ्या अर्थाने जागं होईल."

"४१ दिवस व्रत ना, ते करेन मी." अभिजित आत्मविश्वासाने म्हणाला.

"अभिजित, हे व्रत म्हणजे नुसतं उपोषण नाही, नुसता नियम नाही. हे तुझ्या शरीराला, तुझ्या मनाला त्या मंत्रासाठी तयार करायचं साधन आहे. आणि म्हणून प्रत्येक नियम, मी सांगतो तसाच, काटेकोर पाळावा लागेल."

देवप्पाने एक दीर्घ श्वास घेतला आणि सुरुवात केली.

"एकेचाळीस दिवस तू फक्त काळी किंवा निळी वस्त्रं घालशील. आणि ही वस्त्रं रोज स्वच्छ धुतलेली, कोरडी असावीत; मळकी, ओली वस्त्रं घालून व्रत पुढे नेता येणार नाही."

अभिजितने मान डोलावली.

"एकेचाळीस दिवस तुझ्या पायाला कुठलंही पादत्राण, चप्पल, बूट काहीच लागणार नाही. ऊन असो, पाऊस असो, काटे असोत अनवाणीच चालावं लागेल."

त्याने पुढे सांगायला सुरुवात केली. "एकेचाळीस दिवस पलंग, गादी, उशी काहीच वापरायचं नाही. फक्त एक साधी चटई जमिनीवर टाकून तिच्यावर झोपावं लागेल. आणि ब्रह्मचर्य... हा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात कठीण नियम आहे. एकेचाळीस दिवस पूर्ण ब्रह्मचर्य पाळावं लागेल. शरीराने, मनाने, आणि विचारानेसुद्धा."

देवप्पाने एक क्षण थांबून अभिजितच्या चेहऱ्याकडे बघितलं त्याला कळत होतं, हे नियम सांगताना समोरच्या माणसाच्या मनात किती प्रश्न, किती शंका उठत असतील.

"आणि शेवटचा, सगळ्यात कडक नियम केस आणि नखं कापायची नाहीत. आणि यातला कुठलाही एक नियम मोडला, मग तो कितीही लहान, कितीही अनवधानाने झालेला असला, तरी व्रत तिथेच संपतं. आणि मग परत पहिल्या दिवसापासून, पुन्हा नवीन सुरुवात."

अभिजितच्या चेहऱ्यावर एक क्षण काळजीची छटा उमटली. "आणि जर असं पुन्हा पुन्हा झालं, देवप्पा? आपल्याकडे तर वेळच नाहीये."

देवप्पाचा चेहरा अधिकच गंभीर झाला. "म्हणूनच म्हणतोय, अभिजित हे व्रत नुसतं शरीराने नाही, मनाने करायचं आहे. जो मनाने पक्का असतो, तोच निभावतो. तुझी आतापर्यंतची साधना, तुझी कुळशपथ, तुझं शस्त्रपूजन हे सगळं याच क्षणासाठी तुला तयार करत होतं... स्वतःवर विश्वास ठेव.
************************************************************************************************************************
दोन-तीन रात्रींतच कावळ्यांनी आणलेली खबर कल्लेश्वरच्या मनात एक स्पष्ट चित्र उभं करू लागली. त्याने डोळे मिटून, त्या कावळ्यांच्या नजरेतून बघितलेली दृश्यं एकवटायला सुरुवात केली देवप्पाची दिनचर्या, अभिजितची साधना, दोघांच्या हालचालींतला नेमका क्रम. आणि मग एक गोष्ट त्याच्या नजरेत ठळकपणे उभी राहिली.

रोज रात्री उशिरा, जेव्हा देवप्पा स्वतःच्या अंगणात आपली गुप्त साधना करत बसे तेव्हा अभिजित एकटाच असे. देवप्पाची नजर, त्याची उपस्थिती, त्या वेळेपुरती दुसरीकडे गुंतलेली असे. अभिजितभोवती क्रोध भैरवाचं संरक्षण-कवच होतं खरं, पण कल्लेश्वरला ते किती क्षीण, किती प्राथमिक आहे हे स्पष्ट दिसत होतं, अजून पूर्ण सिद्ध न झालेली साधना, नुसती सुरुवात. कल्लेश्वरच्या ओठांवर एक थंड स्मित उमटलं.

पण त्याने घाई केली नाही. त्याला माहीत होतं की स्तंभन किंवा उच्चाटनासारखे थेट प्रहार आता उपयोगाचे नव्हते; देवप्पाची नजर, त्याची यंत्रणा, अशा कुठल्याही प्रत्यक्ष हल्ल्याला लगेच ओळखून प्रतिकार करेल, कदाचित उलटवूनही टाकेल...जसं आतापर्यंत दोनदा घडलं होतं.

पण जर अभिजितला मारायचं नसून, फक्त इथून तिथून उचलून न्यायचं असेल तर? कल्लेश्वरच्या मनात ती कल्पना स्पष्ट होत गेली... पिशाच्चबंधन.

अभिजितचं क्षीण संरक्षण-कवच कदाचित एखाद्या थेट प्रहाराला रोखू शकेल, पण असं अनपेक्षित, अप्रत्यक्ष अपहरण रोखण्याइतकं ते अजून सक्षम नव्हतं याची कल्लेश्वरला जवळपास खात्री होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं एकदा अभिजित त्याच्या हद्दीत, त्याच्या जंगलात आला, की मग देवप्पाचा प्रत्यक्ष विरोधही निरुपयोगी ठरणार होता. तिथे कल्लेश्वर आपल्या संपूर्ण अघोरी शक्तीनिशी त्याला संपवू शकत होता. किंवा येत्या अमावास्येला हाकिणीला बळी म्हणून अभिजीतला अर्पण करू शकत होता. आता त्याला फक्त योग्य रात्रीची, योग्य क्षणाची वाट बघायची होती जेव्हा देवप्पा त्याच्या स्वतःच्या साधनेत इतका गुंतलेला असेल की अभिजित खरंच एकटा, असुरक्षित राहील.
************************************************************************************************************************
संध्याकाळचा तो चमत्कारिक क्षण उलटून रात्र झाली. अभिजित अजूनही त्या मंत्र-प्रकटनाच्या धुंदीत होता, पण देवप्पाने त्याला लवकर झोपायला सांगितलं.

"अभिजित, आज लवकर झोप," देवप्पा म्हणाला, आवाजात नेहमीपेक्षा अधिक गांभीर्य. "आज एकादशी, माझी मोहिनी साधना आज लांबेल, मध्येच उठून बघायला येऊ नकोस. उद्या सकाळी सगळं सांगतो."

अभिजितने प्रश्न विचारला नाही. गेल्या काही महिन्यांत त्याला हे कळून चुकलं होतं, देवप्पा जेव्हा असं गंभीर होई, तेव्हा उगाच कुतूहल दाखवण्यापेक्षा ऐकलेलं बरं. आज तर त्याचं मनही त्या मंत्र-प्रकटनाच्या धक्क्याने थकलेलं होतं. तो आपल्या खोलीत गेला, अंथरुणावर पडला, आणि दिवसभराच्या थकव्याने लवकरच गाढ झोपेत गेला.

देवप्पा अंगणात आला. मध्यभागी आधीच रेखलेलं एक गुंतागुंतीचं यंत्र, चार दिशांना चार दिवे, आणि हातात रुद्राक्षाची माळ घेऊन तो मांडी घालून बसला. एकादशीच्या या विशेष, वर्षातून ठरावीक वेळीच करायच्या टप्प्यासाठी आज त्याला संपूर्ण एकाग्रता, संपूर्ण गुप्तता आवश्यक होती. त्याने डोळे मिटले आणि मंत्रोच्चारणाला सुरुवात केली. त्याचा आवाज हळूहळू खोल, एकाग्र होत गेला, बाहेरच्या जगाची जाणीवच हरवत गेली.

त्याच क्षणी, दूर, त्या पडक्या देवळाच्या आवारात, कल्लेश्वरही तयारीत होता.

त्याने एका फाटक्या वस्त्रावर काळे तीळ, कवड्या, आणि एका कवटीत साठवलेलं रक्त मांडलं. भोवती अंधार दाटलेला, आणि त्या भग्न मूर्तीसमोर उभा राहून त्याने हात पसरले, ओठ हलू लागले,

"ॐ क्रीं क्रां पिशाच्चाय, प्रेतराजाय|
कवचं छिन्धि, शृङ्खलां बन्ध, आनय शत्रुम् ममाग्रतः हुं फट् स्वाहा॥

कल्लेश्वरचा तालबद्ध, विषारी आवाज चढत गेला. हवेत अचानक एक गारवा पसरला पण तो नैसर्गिक गारवा नव्हता, तो कसल्यातरी अस्तित्वाच्या जवळ येण्याची जाणीव होती. झाडांच्या फांद्या विनावाऱ्याने हलू लागल्या, आणि अंधारातून, एकामागोमाग एक, अस्पष्ट, धुरकट आकृती जमा होऊ लागल्या ...डोळ्यांविना, पण तरीही बघत असल्यासारख्या, हवेत तरंगणाऱ्या, कुजक्या दुर्गंधीचा वास घेऊन येणाऱ्या.

तीन... चार... पाच अशा आकृती हळूहळू कल्लेश्वरभोवती जमल्या, त्याच्या हुकुमाची वाट बघत.

"त्या म्हाताऱ्याच्या झोपडीत जा," कल्लेश्वर पुटपुटला, त्याच्या डोळ्यांत एक क्रूर चमक. "आतल्या खोलीत, इनामदार झोपलाय. त्याला उचला, आणि इथे, माझ्यासमोर आणून टाका."

त्या आकृती एकसुरात एक भेसूर, कर्कश हुंकार देत हवेत विरल्या आणि क्षणार्धात नाहीशा झाल्या.

नेहमीप्रमाणे यल्लाप्पा आणि त्याचे दोन रक्षक झोपडीभोवती पहारा देत उभे होते; हातात भाले, डोळे सताड उघडे आणि रात्रीच्या प्रत्येक संशयास्पद सळसळीवर कान टवकारलेले. पण त्यांना अजिबात कल्पना नव्हती की, आज धोका नेमका कोणत्या दिशेने येणार आहे.

त्या चार अंधुक, धुरकट आकृती अत्यंत सावकाशपणे त्यांच्याजवळ पोहोचल्या. यल्लाप्पाला अचानक काहीतरी जाणीव झाली; एक अनोळखी, अंगात धडकी भरवणारा गारवा पाठीमागून सरकत येत होता. त्याने मागे वळून बघण्याचा प्रयत्न करत आपला भाला उचलला पण फार उशीर झाला होता.

त्या आकृतींनी तिघांभोवती एक गिरकी घेतली आणि त्याच क्षणी यल्लाप्पाचा हात भाला उचललेल्या अवस्थेतच थिजून राहिला. त्याचे पाय जणू जमिनीला चिकटले होते. तोंड किंचित उघडं राहिलं, पण घशातून एक शब्दही फुटला नाही. त्याचे दोन्ही रक्षकही त्याच क्षणी, त्याच स्थितीत एखाद्या पुतळ्यासारखे गोठून गेले...डोळे सताड उघडे, जाणीव पूर्ण जागी, पण शरीर पूर्णपणे निष्क्रिय!

तिघेही भारल्यासारखे जागच्या जागी निमूट उभे राहिले; डोळ्यांसमोर सगळं पाहत असलेले, पण काहीच करू न शकणारे हतबल! आणि त्याच वेळी, पिशाच्चांनी झोपडीची भिंत ओलांडून आतल्या खोलीत प्रवेश केला.

खोलीतली हवा अचानक जड झाली. एक विचित्र, कुबट वास सर्वत्र पसरला. अभिजित गाढ झोपेत होता, त्यामुळे त्याला कशाचीच जाणीव झाली नाही; ना त्या चार अंधुक आकृतींची, ज्या खिडकीच्या फटीतून आणि भिंतींच्या सावलीतून सावकाश आत झिरपल्या होत्या, ना त्या गार, बर्फासारख्या स्पर्शाची, ज्याने त्याच्या हातापायांना घट्ट धरून ठेवले होते.

फक्त एका क्षणासाठी त्याला स्वप्नात असं वाटलं की, कुणीतरी त्याला उचलून हवेत तरंगत जातंय आणि मग सगळं काही गाढ काळोखात विरून गेलं.

बाहेर अंगणात देवप्पाचं मंत्रोच्चारण सुरूच होतं इतकं गहिरं आणि एकाग्र की, आतल्या खोलीत नक्की काय घडतंय, याची पुसटशीही जाणीव त्याला झाली नाही.

जेव्हा अभिजितची चेतना परतली, तेव्हा त्याचं डोकं गरगरत होतं आणि अंग जड व बर्फासारखं थंड पडलं होतं. डोळे उघडण्याचा प्रयत्न करताच त्याला जाणवलं की तो आपल्या अंथरुणावर नव्हता.खालची जमीन खडबडीत आणि दगडी होती. भोवतीच्या हवेत काहीतरी जळाल्यासारखा आणि कुजल्यासारखा दर्प दरवळत होता.

त्याने कसाबसा डोळ्यांवरचा ताण झटकून डोळे उघडले आणि समोरच्या अंधुक उजेडात त्याला दिसलं, एक भग्न, कोसळलेलं देऊळ, तुटलेले खांब आणि त्या सगळ्याच्या मध्यभागी, त्याच्याकडे खाली नजर रोखून उभा असलेला अघोरी साधू कल्लेश्वर.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडी देर से आये लेकीन एकदम दुरुस्त आये
मस्त आहे भाग.
धक्कादायक twist, सरळ अभिजीत वर घाव?
पण मग हा विचार कल्लू ने आधी का नाही केला? हाकिणी वैगरे प्रकार त्यामानाने कठीण होते की.

अभिजीतची सुटका होईल का यातून ... झाली तर कशी होईल
पुढचा भाग येईपर्यंत हेच विचार डोक्यात राहणार.

खूप मोठे आणि वाचनाचा पुरेपूर आनंद देणारे भाग टाकताय.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत!

अरे बापरे , अभिजित आता कसा सुटेल? त्याच्या साधनेचे काय ?
नितीन जी जास्त वाट बघायला लावू नका. लवकर पुढचा भाग येऊ द्या

बाब्बो.. काटा आला अंगावर...
आपला हिरो वाचणार हे नक्की.. पण तो सुखरुप परत देवप्पा कडे जाईतो जीवाला घोर.. लवकर टाका पुढचा भाग...
आता उशीर नको..

अरे अपना कल्लू तो एकदम गल्ली का चीपस्टर भाई निकला !

भारी मंत्र तंत्र सोडून डायरेक्ट अपहरण करायला लागला की कल्लेश्वर. कहानी में ट्विस्ट.

येऊ द्या अजून 👍

जबरदस्त ...
मी हे होणार असे गृहीत धरले होतेच.
कल्लूमामा कोणत्याही थराला जाऊ शकतो. पण आता अभिजीत कसा सुटेल याची उत्सुकता.
लवकर टाका पुढचा भाग....