भस्मबीज - भाग २३

Submitted by नितनवे on 19 September, 2026 - 12:04

भस्मबीज - भाग २२
पूर्वभाग
हाकिनीच्या दर्शनाने हादरलेल्या देवप्पाला मोहिनी देवी स्वप्नात मार्गदर्शन करते आणि गरुडाच्या पंज्यातील काळाकुट्ट नागाची गूढ प्रतिमा दाखवते. गुढीपाडव्याच्या दिवशी देवप्पाच्या तातडीच्या निरोपामुळे अभिजित यानाकडे रवाना होतो, कारण कल्लेश्वर भूतडामरीला जागृत करण्याच्या तयारीत असतो. यानात देवप्पा अभिजितला क्रोध भैरवाची सात्विक साधना, शस्त्रपूजा आणि भस्मतिलकाचे विधी सुरू करून त्याच्या संरक्षणाची तयारी करतो. त्याच वेळी कल्लेश्वर जुन्या ग्रंथातून भूतडामरीपासून बचाव करण्यासाठी तामसिक क्रोध भैरव कवचाची माहिती मिळवून स्मशानात एकवीस रात्रींच्या भयाण साधनेला सुरुवात करतो. अशा प्रकारे अभिजितची सात्विक साधना, कल्लेश्वरची तामसिक साधना आणि देवप्पाचा गूढ मार्ग; या तिन्ही शक्तींचा संघर्ष निर्णायक टप्प्याकडे सरकतो.
************************************************************************************************************************
भस्मबीज - भाग २३ - गरुड आणि नाग
कल्लेश्वरची एकवीस रात्रींची तामसिक साधना आता दहाव्या रात्रीपर्यंत पोहोचली होती. प्रत्येक रात्रीगणिक राखेतील ती लालसर चमक अधिक तीव्र होत चालली होती, पण त्यासोबतच कल्लेश्वरचा चेहराही अधिकाधिक ओढलेला, अधिकाधिक थकलेला दिसू लागला होता. त्याच्याबरोबर एक तरुण हांडी जोगी होता.

कल्लेश्वरने या तरुणाला जाणीवपूर्वक निवडलं होतं.
चेहऱ्यावर एक मायाळू भाव आणत कल्लेश्वर म्हणालेला. "आजपासून तू माझ्याबरोबर येत जा. तुला एक खास विधी शिकवणार आहे मी. माझ्यानंतर हे ज्ञान कुणाकडे तरी असायलाच हवं ना."

पण खरं तर शेवटच्या, सर्वांत महत्त्वाच्या रात्री, क्रोध भैरवाने हाकिणीप्रमाणे अर्पण मागितलं, तर हाच तरुण त्याच्या कामी येणार होता. पण हे त्याने त्या भोळ्या तरुणाला सांगितलं नाही.

"किती दिवस अजून, बाबा?" तरुण जोग्याने कल्लेश्वरच्या त्या थकलेल्या चेहऱ्याकडे बघत एकदा हळूच विचारलं.

"अकरा, अकरा रात्री अजून." कल्लेश्वर गुरगुरला, आवाज कर्कश, थकलेला.
************************************************************************************************************************
अभिजितची सात्विक क्रोध भैरव साधना आता स्थिर, नियमित लयीत चालू होती, रोज तीच वेळ, तोच मंत्र श्रद्धापूर्वक जपल्यामुळे, हळूहळू अभिजीतला स्वतःभोवती कसलीतरी सुरक्षितता जाणवायला लागली. आणि त्याच सुमारास, देवाप्पाने घराच्या मागच्या अंगणात, स्वतःची एक वेगळीच साधना सुरू केली होती...मोहिनी तंत्र साधना.

बाहेरच्या ओसरीवरचा दिवा मंदावला होता. सगळं शांत झाल्याची खात्री झाल्यावर देवप्पा अलगद उठला. आणि अंगणात गेला. त्याने प्रथम चारही दिशांकडे पाहिलं. मग गुडघ्यावर बसून मातीवर हात ठेवला. जणू त्या भूमीची परवानगी मागत होता.

देवप्पाने जमिनीवर प्रथम एक वर्तुळ आखलं. त्या वर्तुळाच्या आत त्याने त्रिकोण काढला. त्रिकोणाच्या तीनही टोकांवर त्याने अक्षतांचे तीन छोटे ढीग ठेवले आणि मध्यभागी एक पांढरं फूल ठेवलं. देवप्पाच्या चेहऱ्यावर गंभीर ताण होता. तो काहीतरी ठरवून आला होता.

त्याने डोळे मिटले. त्याच्या मनात मल्लीचा चेहरा उमटला. मल्लीच्या डोळ्यांतला राग, त्याच्या आवाजातली वेदना आणि त्याच्या मनातील अनेक वर्षे घर करून असलेली चंद्रिकेची आठवण; सगळं एकाच वेळी देवप्पाच्या ध्यानात आलं.

देवप्पाने डोळे उघडले.

“तुझ्यावर अधिकार मिळवण्यासाठी नाही,” तो मंद स्वरात म्हणाला, “तुला तुझ्या स्वतःच्या मनापर्यंत परत नेण्यासाठी ही साधना आहे.”

त्याने पितळी वाटीतलं पाणी त्रिकोणाभोवती शिंपडलं. मग हात जोडून तो ध्यानस्थ झाला. काही क्षण फक्त रातकिड्यांचा आवाज ऐकू येत होता. हळूहळू त्याचा श्वास मंद होत गेला. दिव्याची ज्योत स्थिर झाली. देवप्पाने अत्यंत मंद स्वरात मंत्र सुरू केला,

ॐ ह्रीं मोहिन्यै महाशक्त्यै नमः।
दूरस्थं मनसि स्पृश, चित्तं तस्य विमोहय।
क्रोधं शमय शमय, चित्तद्वारं विवर्तय।
मम संकल्पं तत्र नय, मोहिनि स्वप्नमार्गेण।
ह्रीं ह्रीं मोहय मोहय, हुं फट् स्वाहा॥

शेवटचं “स्वाहा” उच्चारताच दिव्याची ज्योत क्षणभर उंच झाली. देवप्पाने डोळे उघडले नाहीत. त्याने पुन्हा जप सुरू केला. यावेळी त्याच्या आवाजात अधिक स्थैर्य होतं. त्याला माहीत होतं दूरवर कुठेतरी, यानाच्या जंगलाच्या अंधारात, मल्लीच्या मनाभोवती अनेक वर्षांपासून घट्ट होत गेलेली एक अदृश्य गाठ होती. जी शक्तीने तोडता येणार नव्हती. तिला हळुवारपणे उघडावं लागणार होतं. आणि त्याची किल्ली होती मल्लीची स्वतःची स्मृती.

देवप्पाने डोळे मिटूनच मनात एक प्रतिमा उभी केली.
एक नदी. तिच्या काठावर उभं असलेलं एक तरुण रूप. निळी साडी. आणि दूरवरून येणारा चंद्रप्रकाश.

त्याचा मंत्र पुन्हा मंदपणे घुमला. पण यावेळी देवप्पाच्या ध्यानात एक विचित्र गोष्ट घडली. निळ्या साडीच्या मागे त्याला आणखी काहीतरी दिसले.
देवप्पाने डोळे उघडले. दिव्याची ज्योत आता पूर्वीपेक्षा कमी झाली होती. त्याने समोरच्या पांढऱ्या फुलाकडे पाहिलं. फुलाच्या एका पाकळीवर काळसर ठिपका उमटला होता. ते पाहून देवप्पाच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. मल्लीच्या मनात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना त्याने ज्या शक्तीला स्पर्श केला होता, ती केवळ मल्लीची नव्हती. कल्लेश्वरलाही त्या हालचालीची चाहूल लागली होती.
************************************************************************************************************************
वीस रात्री उलटून गेल्या होत्या. प्रत्येक रात्रीबरोबर देवप्पाची अस्वस्थता वाढतच चालली होती. कल्लेश्वरची तामसिक साधना जर यशस्वी झाली, तर नव्याने प्राप्त होणाऱ्या संरक्षक कवचाच्या बळावर तो पुढची साधना करणार, याची देवप्पाला खात्री होती. आणि त्यानंतरचा टप्पा त्याला अधिक भयावह वाटत होता...भूतडामरी साधना. ती साधनाही जर कल्लेश्वरने पूर्ण केली, तर अभिजितचा अंत निश्चित होता.

फक्त एक दिवस उरला होता. देवप्पा गेल्या कित्येक दिवसांपासून मोहिनीदेवीने दाखवलेल्या त्या विचित्र स्वप्नाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होता. स्वप्नात दिसलेला गरुड... आणि नाग. दोघांचा एकमेकांशी संबंध काय?
मोहिनीदेवीने त्याला तोच संकेत का दाखवला?
अभिजितची सात्विक क्रोध भैरव साधना सुरूच होती, पण ती त्याला किती सुरक्षित ठेवेल, हा प्रश्न देवप्पाच्या मनात कायम घोंगावत राहिला होता. काहीतरी करावं लागणार होतं. आणि तेही आज.

देवप्पा अंगणातल्या अंधारात बराच वेळ निश्चल उभा राहिला. त्याच्या नजरेसमोर पुन्हा एकदा तेच स्वप्न तरळलं; गरुड, नाग.. त्यांच्यामधला संघर्ष.

आणि अचानक त्याच्या डोळ्यांत चमक आली. एक विचार मनात विजेसारखा चमकून गेला. मग त्याच्या चेहऱ्यावर हळूहळू अविश्वासाचं हास्य उमटलं.

“अरे... हे तर इतकं सोपं होतं!” त्याने कपाळावर हात मारला.

वीस दिवस. पूर्ण वीस दिवस तो एका स्पष्ट संकेताभोवती फिरत राहिला होता. देवप्पाला स्वतःच्याच बुद्धीचा राग आला आणि त्याच वेळी मोहिनीदेवीच्या संकेताबद्दल कृतज्ञताही वाटली.

त्याने दोन्ही हात जोडले. “देवी... इतका स्पष्ट मार्ग दाखवूनही मला तो समजायला वीस दिवस लागले.”
तो घराच्या मागच्या मोकळ्या जागेत गेला आणि आकाशाकडे बघत ती विशिष्ट शीळ वाजवली. दोन लहान... एक लांब. शीळ जंगलाच्या शांततेत विरून गेली.

मग काही क्षणांतच दूरवरच्या झाडांच्या फांद्या कोणाच्या तरी हालचालीने हलल्यासारख्या दिसू लागल्या आणि त्याच दिशेने पंखांची अस्पष्ट फडफड ऐकू आली. तो आवाज क्षणाक्षणाला जवळ येत गेला आणि पुढच्याच क्षणी गरुड अंधारातून खाली झेपावत घरामागच्या झाडाच्या फांदीवर अलगद येऊन बसला. त्याने मान वळवून आपली तीक्ष्ण नजर देवप्पावर स्थिर केली आणि काही क्षण दोघेही निःशब्द एकमेकांकडे पाहत राहिले.

देवप्पाने हळूहळू डोळे मिटले. मनात त्याने संपूर्ण योजना उलगडायला सुरुवात केली. गरुडाच्या डोळ्यांतील चमक क्षणाक्षणाला तीव्र होत गेली. देवप्पाने डोळे उघडताच गरुडाने...समजले…याअर्थी पापण्यांची उघडझाप केली.

"उद्या रात्री कसेही करून तुला हे पार पाडावेत लागेल."

गरुडाने मान किंचित वाकवून हवेत पंख पसरले आणि अंधारात दिसेनासा झाला.
************************************************************************************************************************
एकवीसावी आणि शेवटची रात्र होती.
कल्लेश्वर नेहमीच्या जागी पोहोचला तेव्हा रात्रीचा अंधार आणखी गडद झाला होता. त्याच्यासोबत तोच तरुण हांडी जोगी होता. गेल्या काही दिवसांत पाहिलेल्या विधींच्या आठवणींनी त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती; मात्र कल्लेश्वरच्या चेहऱ्यावर नेहमीसारखाच निर्विकार भाव होता.

आज त्याने मध्यभागी असलेल्या राखेच्या मुख्य वर्तुळाभोवती काळजीपूर्वक आणखी दोन वर्तुळे आखली. प्रत्येक वर्तुळ पूर्ण झाल्यावर त्याने त्यावर बोटांनी काही अस्पष्ट चिन्हे उमटवली आणि मग त्या तरुणाकडे वळून गंभीर स्वरात म्हणाला, “तुला काही दिसलं, काही ऐकू आलं किंवा आणखी काहीही घडलं, तरी या वर्तुळातून बाहेर पाऊल टाकायचं नाही. काहीही झालं तरी नाही. समजलं?”
तरुणाने घाबरून मान हलवली.

कल्लेश्वर काही क्षण त्याच्याकडे रोखून पाहत राहिला आणि मग म्हणाला, “तुला भीती वाटेल. तुला बाहेरून कोणीतरी हाक मारताना ऐकू येईल. कदाचित तुला तुझ्या ओळखीची माणसंही दिसतील. पण त्या आवाजांवर विश्वास ठेवायचा नाही. या वर्तुळाच्या बाहेर जे काही आहे, ते तुझ्यासाठी सत्य नाही.”
तरुणाने पुन्हा मान हलवली.

कल्लेश्वरने बकऱ्याचा बळी दिला. त्या मुंडक्यातून गळणारे त्याचं ताजं रक्त त्या राखेवर शिंपडलं. आणि मग डोळे मिटून मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्याचा आवाज आता पूर्वीपेक्षाही खोल आणि भयाण झाला होता; जणू गेल्या वीस रात्रींच्या साधनेने त्याच्या आवाजालाच एखाद्या अनोळखी शक्तीचा भार दिला होता.

आणि मग, आजूबाजूच्या अंधारात काहीतरी हालू लागलं. सुरुवातीला झाडांच्या खालच्या सावल्या वेगळ्या झाल्यासारख्या वाटल्या; पण पुढच्याच क्षणी त्या सावल्यांना मानवी आकार येऊ लागला. एक आकृती झाडामागून बाहेर आली, तिच्यामागून दुसरी, मग तिसरी... आणि काही क्षणांतच चारही बाजूंनी काळसर, विकृत पिशाच्चाकृती उमटू लागल्या. पाहता पाहता त्यांनी कल्लेश्वर आणि तरुण जोग्याभोवती वर्तुळ तयार केलं. तरुण जोग्याच्या अंगातलं बळच निघून गेलं. त्याच्या हातापायांना थरकाप सुटला आणि त्याची नजर वारंवार त्या काळोख्या आकृत्यांकडे जाऊ लागली.

कल्लेश्वरने मात्र त्याच्याकडे पाहिलंही नाही. तो आपला मंत्र म्हणत राहिला आणि अत्यंत कठोर आवाजात फक्त एवढंच म्हणाला, “हलू नकोस!”

तरुण जागच्या जागी थिजला.

कल्लेश्वरने डोळे मिटले आणि पुन्हा मंत्रोच्चार सुरू केला.

“ॐ ह्रां ह्रीं ह्रूं क्रोधभैरवाय नमः...”

मंत्राचा प्रत्येक उच्चार हवेत विरताच समोरची राख हळूहळू लालसर होऊ लागली. सुरुवातीला राखेत एखादं स्फुल्लिंग चमकावं तशी ती केवळ क्षणभर लुकलुकली; पण पुढच्या आवर्तनाबरोबर त्या लालसरपणाला तीव्रता आली. राखेच्या थराखाली जणू काहीतरी धगधगत होतं.

कल्लेश्वरचा आवाज अधिकाधिक घन होत गेला.

“ॐ ह्रां ह्रीं ह्रूं...”

यावेळी राखेच्या मध्यभागी एक बारीक तडा उमटला.
कल्लेश्वर मात्र डोळे मिटून मंत्र म्हणतच राहिला. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते, अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आपल्या साधनेचा परिणाम डोळ्यांसमोर पाहणाऱ्या साधकाच्या चेहऱ्यावर जसा समाधानाचा भाव उमटतो, तसाच एक विचित्र आत्मविश्वास त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.

पुढचं आवर्तन सुरू होताच राखेतील लालसर धग अचानक वाढली.
राखेचा एक छोटासा पुंजका हवेत उडाला. कल्लेश्वरने मंत्र थांबवला नाही. उलट त्याचा स्वर आणखी गंभीर झाला.

“भूतप्रेतपिशाचेभ्यः, दुष्टशक्तिभ्य एव च...”
त्या शब्दांबरोबरच राखेभोवती आखलेल्या वर्तुळांच्या रेषा एकामागोमाग एक लालसर चमकू लागल्या. जणू ती संपूर्ण साधना, त्या शेवटच्या क्षणाच्या दिशेने, वेगाने धावत होती. विधीचा तो शेवटचा आणि सर्वांत महत्त्वाचा भाग सुरू झाला होता.

कल्लेश्वर मंत्राच्या अंतिम आवर्तनाकडे पुढे जात असतानाच, अंधाऱ्या आकाशातून अचानक पंखांचा आवाज घुमला.
कुणालाही वर पाहण्याची संधी मिळण्याआधीच गरुड विजेसारखा झेपावला. आणि पंज्यांत घट्ट पकडलेला काळाकुट्ट नाग वरून त्याने नेमक्या जागी सोडून दिला.

नाग थेट कल्लेश्वरच्या खांद्यावर, मानेजवळ येऊन पडला आणि पुढच्याच क्षणी त्याने फणा उभारून आपलं डोकं कल्लेश्वरच्या चेहऱ्यासमोर आणलं.

कल्लेश्वर दचकून मागे सरकला. त्याच्या तोंडून निघणारा मंत्र अर्ध्यावरच थांबला; शेवटचे शब्द ओठांवरच अडकून राहिले. गेल्या वीस रात्रींमध्ये कसोशीने साधलेली त्याची एकाग्रता त्या एका अनपेक्षित क्षणाने भंगली. त्याचं संपूर्ण लक्ष नागावर खिळलं. मंत्राची लय तुटली, शब्द अर्धवट राहिला, आणि हातातली भस्माची मुठ गळून खाली सांडली. नाग फुत्कारत त्याच्या अंगावरून खाली सरपटला, अंधारात नाहीसा झाला. पण जे व्हायचं ते होऊन गेलं होतं.

तेवढ्यात वातावरणच बदललं. काही क्षणांपूर्वी मंत्रोच्चारांनी भारलेली हवा अचानक जड झाली. आजूबाजूच्या पिशाच्च आकृत्या निश्चल उभ्या राहिल्या. झाडांच्या फांद्यांवरचा वारा थांबला आणि जंगलावर अशी शांतता पसरली, जणू पुढे काय घडणार आहे याची चाहूल खुद्द अंधारालाच लागली होती.

तरुण जोग्याच्या अंगावरचे केस ताठ उभे राहिले. त्याच्या घशातून आवाज फुटेना.

त्या राखेतून हळूहळू एक काळी, प्रचंड छाया वर येऊ लागली. सुरुवातीला ती केवळ धुराचा दाट पुंजका भासत होती; पण काही क्षणांत त्या धुराला आकार येऊ लागला. दोन लांब हातांसारख्या सावल्या बाजूला पसरल्या आणि तिच्या मध्यभागी दोन लालसर ठिपके चमकले.

पुढच्याच क्षणी ती छाया एका भेदक, कर्णकर्कश किंकाळीसह गरजली. त्या आवाजाने आसपासचं जंगल अक्षरशः हादरलं. झाडांच्या फांद्या जोराने हलल्या, पानांचा सडा खाली पडला आणि जमिनीवरची राख हवेत उडून सर्वत्र पसरली.

कल्लेश्वर आणि त्या तरुण जोग्याभोवती कोंडाळं करून उभे असलेले सगळे पिशाच्च एकाच वेळी थबकले. त्यांच्या नजरा त्या काळ्या छायेकडे वळल्या. तिची चाहूल लागताच त्यांच्या अंगातली सारी उग्रता नाहीशी झाली. पुढच्याच क्षणी एकामागून एक ती पिशाच्चं मागे सरकू लागली आणि क्षणार्धात आजूबाजूच्या दाट जंगलात गुडूप झाली.

ती काळी आकृती कल्लेश्वर आणि तरुण जोग्याभोवती वेगाने फिरू लागली. तिचा वेग इतका प्रचंड होता की तिचं स्पष्ट रूप क्षणभरही दिसत नव्हतं; फक्त काळ्या वाऱ्यासारखी एक सावली त्यांच्या भोवती फिरत होती आणि तिच्या हालचालीने हवा धारदार सुरीने कापल्यासारखी भासत होती.

कल्लेश्वरच्या अंगात भीतीने थरकाप उडाला. तरीही त्याने स्वतःभोवती आखलेलं वर्तुळ सोडलं नाही. अनेक वर्षांच्या साधनेने त्याला एक गोष्ट शिकवली होती; या क्षणी वर्तुळाबाहेर पाऊल टाकणं म्हणजे मृत्यूला स्वतःहून आमंत्रण देणं.

पण तरुण जोग्याची अवस्था हाताबाहेर गेली होती. त्याची नजर त्या फिरणाऱ्या काळ्या छायेला चिकटली होती. श्वास वेगाने चालला होता आणि पायाखालची जमीनच जणू नाहीशी झाल्यासारखी त्याला वाटत होती. त्याच्या तोंडून एक अस्फुट किंकाळी बाहेर पडली आणि त्याने घाबरून मागे सरकून धूम ठोकण्याच्या प्रयत्न केला.
“थांब!” कल्लेश्वर जोरात ओरडला. पण त्याचा आवाज त्या भेसूर गर्जनेत विरून गेला.

तरुण जोग्याचा पाय वर्तुळाच्या सीमारेषेबाहेर पडला. आणि त्याच क्षणी काळी आकृती थांबली. क्षणभर सगळं जंगल स्तब्ध झालं.

पुढच्याच क्षणी ती सावली जणू विजेच्या वेगाने त्याच्यावर झेपावली. डोळ्याची पापणी लवण्याइतका वेळही मिळाला नाही. एक भेसूर, हृदय गोठवून टाकणारी किंकाळी स्मशानभर घुमली. आणि ती किंकाळी संपण्याआधीच तरुण जोग्याचं मुंडकं धडापासून वेगळं झालं. त्याचं शरीर वर्तुळाच्या बाहेरच कोसळलं आणि थोडावेळ थरथरत स्तब्ध झालं.

रक्त फवाऱ्यासारखं उसळायला हवं होतं पण तसं झालं नाही. त्या तुटलेल्या मानेतून जे रक्त वाहू लागलं, ते जमिनीला स्पर्शही करू शकलं नाही.

त्या सावलीला जणू तहानच लागली होती. त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाला हवेतल्या हवेत शोषून घेत होती, एक थेंबही जमिनीवर सांडला नाही.

ती सावली आता मुंडक्याविरहित धडाभोवती एकवार गरगर फिरली, आणि कल्लेश्वरकडे बघत त्या मुंडक्याला हातात धरून समोरच्या राखेच्या ढिगात हळूहळू विरून गेली. ते पाहून कल्लेश्वरच्या डोळ्यांसमोर काही क्षण अंधारी आली.

काही क्षणांतच सगळं शांत झालं. फक्त राखेचा तो ढीग अजूनही अंधुक तांबूस चमकत होता, जणू आतून अजूनही काहीतरी धुमसत होतं.

कल्लेश्वरने बराच वेळ त्या शांततेत घालवला, पण मन थाऱ्यावर येताच त्याच्यातला जुना, व्यवहारी तांत्रिक पुन्हा जागा झाला. इथे उजाडायच्या आत हे सगळं संपवायला हवं होतं

त्याने कसाबसा धीर एकवटला, त्या थंड पडलेल्या धडाजवळ गेला; हात थरथरत होते, पोटात ढवळत होतं, पण त्याने स्वतःला रेटलं. ओढत ओढत त्याने ते धड नेऊन राखेच्या ढिगावर टाकलं. कोपऱ्यात ठेवलेला तेलाचा डबा त्याने उचलला आणि त्या देहावर, राखेवर भरपूर तेल ओतलं. हात अजूनही थरथरत होते. मग एक जळती मशाल त्याने त्यावर टाकली. त्या बरोबर ज्वाळा उसळल्या आणि सोबत धुराचा लोट.

कल्लेश्वर मागे सरकला, हाताने नाक-तोंड झाकून त्या धुराच्या लोटापासून दूर उभा राहिला. ज्वाळांमध्ये त्याला क्षणभर त्या मघाच्या काळ्या सावलीसारखा एक आकार तरळून गेल्यासारखा वाटला, जणू ती अजूनही आसपास घोटाळत होती, आपल्या भक्ष्याचा शेवटचा भाग स्वतःत सामावून घेत होती.

बराच वेळ आग धगधगत राहिली. पहाटेचा फिकट उजेड फुटेपर्यंत कल्लेश्वर तिथेच, दूर उभा राहून, त्या जळत्या चितेकडे टक लावून बघत राहिला.

घराकडे परत जाताना त्याची पावलं जड होती, मन बधिर झालं होतं. एकवीस रात्रींची साधना आज शेवटच्या क्षणी हुकली होती. आणि आता याचा सूड घेतल्याशिवाय कल्लेश्वर शांत बसणार नव्हता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता याचा सूड घेतल्याशिवाय कल्लेश्वर शांत बसणार नव्हता.>>> म्हणजे लढाई अजून रंगणार!
नेहमी सारखीच उत्कंठावर्धक!

नवीन प्रतिसाद लिहा