शशक स्पर्धा - ओबामा - बाप्पाचे हेडफोन!

Submitted by ओबामा on 22 September, 2026 - 21:12

पृथ्वीवर येण्यापूर्वी बाप्पांनी महागडे Noise Cancellation Headphones मागवले. शंकरांनी विचारलं, “काय रे, एवढा खर्च?”

बाप्पा वैतागून, “आरती पाच मिनिटं आणि डीजे पाच तास! गेल्या वर्षी ‘झिंगाट’ इतकं ऐकलं की माझा उंदीर दोन दिवस तिरका चालत होता आणि ‘मोरया’ऐवजी ‘झिंगाट... झिंगाट!’ म्हणत होता!”

दुसऱ्या दिवशी सगळ्या गणेशमूर्ती हेडफोन घालून प्रकट झाल्या. भक्त चक्रावले. विध्याधर बापट आनंदाने म्हणाले, “वा! निदान बाप्पांना तरी म्हणणं पटलं!” पण लगेच हळहळले, “अरेरे, आता आपल्या प्रार्थना कशा ऐकणार?”

डीजे मात्र पूर्वीसारखाच धडाडत राहिला. हेडफोनच्या दुकानांबाहेर रांगा लागल्या!

हे पाहून बाप्पा हसले, “समस्या डीजेची, उपाय हेडफोनचा! पुढच्या वर्षी मी मूर्तीऐवजी WhatsApp DP पाठवेन आणि संदेश पाठवीन... "You Are On Mute!"

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults