पाककृती स्पर्धा क्रमांक एक (जिन्नस एक पदार्थ अनेक) - अनामिका. - मूगाष्टक - मूगाच्या आठ रूपांची चविष्ट मैफिल.

Submitted by अनामिका. on 22 September, 2026 - 12:25

नमस्कार सगळ्यांना! Happy

गेल्या अनेक वर्षांपासून मायबोली गणेशोत्सवात भाग घ्यायचा होता पण योग आला नाही. ह्यावर्षी संयोजकांनी स्पर्धा घोषित केली आणि ठरवलं कि भाग घ्यायचाच. जिन्नस एक आणि पदार्थ अनेक. मस्तं संकल्पना. दोन तीन जिन्नस आले लगेच डोक्यात. अनेक एन्ट्री चालणार आहेत कळल्यावर उत्साह आला. पण एकेक जिन्नसाने सुरुवात करूया म्हणून मूगडाळ हा जिन्नस आधी नक्की केला आणि कामाला लागले. या मुगाष्टक थाळीत मी मूगडाळीपासून ८ पदार्थ तयार केले आहेत.

१. गाजर मूगडाळ कोशिंबीर
२. मूगडाळ पकोडा
३. मूगडाळ कचोरी
४. मूगडाळ दहीवडा
५. स्टफ्ड मूगडाळ चिल्ला
६. मूगडाळ ढोकळा (राजस्थानी मोगर ढोकळा)
७. मूग (सालीची आणि बिनसालीची मूगडाळ) वरण
८. मूगडाळ हलवा

हि थाळी राजस्थानी प्रकारात मोडेल. ह्यातले बहुतांशी पदार्थ हे राजस्थानी खाद्यसंस्कृतीतून आलेले आहेत, विशेषतः डाळ आणि मोगर ढोकळा.
मूगडाळीला राजस्थानमध्ये मोगर असे म्हणतात. अक्खे मूग किंवा मूगडाळीला त्यांच्याकडे विशेष स्थान आहे.
तर आता रेसिपीकडे वळूया.

पूर्वतयारी -

जिन्नस -

१. मूगडाळ - सगळ्यात आधी मी साधारण ८ वाट्या मूगडाळ भिजत घातली. हि तयारी मी दोन दिवस आधी सुरु केली. संध्याकाळी मूगडाळ भिजवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मूगडाळ वाटायला घेतली. त्यातली साधारण छोटी अर्धी वाटी मूगडाळ मोगर ढोकळ्यांसाठी आणि अर्धी वाटी मूगडाळ कोशिंबिरीसाठी वेगळी काढून ठेवायची आहे.

दोन वाट्या मूगडाळ मी ओबडधोबड वाटून वेगळी काढून ठेवली (कचोरी आणि पकोड्यांसाठी). साधारण २.५ वाट्या अगदी बारीक वाटलेली मूगडाळ हलव्यासाठी वापरली. उरलेल्या मूगडाळ मिश्रणात थोडी हिरवी मिरची, जिरे आणि आलं घालून वाटले (चिल्ला करण्यासाठी). दहीवड्यांसाठी मी अगदी थोडी उडीदडाळ भिजवली होती. मग दोन्ही डाळी थोडे मीठ घालून अगदी गंध वाटून घेतल्या.
IMG_7946_small.jpg

२. दही - हे पण आदल्या रात्री जमवले.

३. पनीर - स्टफ्ड चिल्ल्यासाठी लागणार आहे. हे सुद्धा मी घरीच बनवले. क्रम्बल करायला सोपे आणि घरी केलेले म्हणून खात्रीशीर. १ लिटर दूध उकळी आल्यावर त्यात दिड चमचा व्हिनेगर घातले. पाणी वेगळे झाले कि गॅस बंद. गाळून घेतले. उरलेले पाणी नंतर पोळ्या वगैरेंसाठी वापरले.
IMG_7948_small.jpg

४. शिमला मिरची, जांभळा कोबी आणि कांदा बारीक चिरून (स्टफिंग साठी)
५. तेल
६. तूप
७. साखर
८. केशर आणि सुकामेवा (काजू आणि बदाम पातळ काप करून)
९. सालाची मूगडाळ - डाळीसाठी
१०. हिरवी मिरची
११. टोमॅटो
१२. लसूण
१३. चिंचेची चटणी
१४. कणिक आणि मैदा (कचोरीच्या पारीसाठी)
१५. ओवा
१६. कोथिंबीर
१७. सुका मसाला (थोडा पकोड्यात आणि थोडा कचोरीच्या सारणात वापरला) - धने, बडीशेप, मिरे, जिरे, पांढरे तीळ. कोरडेच भाजून ओबडधोबड वाटून घेतले.
१८. बेसन - कचोरीच्या सारणासाठी
१९. बारीक रवा - मूगडाळ हलव्यासाठी
२०. गाजर
२१. खोवलेले खोबरे
२२. डाळिंबाचे दाणे - कोशिंबिरीसाठी
२३. लिंबूरस
२४. इतर लागेल तसे.

रेसिपी -
१. गाजर मूगडाळ कोशिंबीर -
गाजर किसून + भिजवलेली मूगडाळ + खोवलेले खोबरे + थोडे डाळिंबाचे दाणे (ऐच्छिक) + बारीक चिरलेली कोथिंबीर + मीठ + थोडी साखर + लिंबूरस + फोडणी (हिंग, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता)

२. मूगडाळ पकोडे -
ओबडधोबड वाटलेली मूगडाळ + सुका मसाला + बारीक चिरलेला कांदा + आलं मिरची वाटण + मीठ + हळद.
तेल माध्यम आचेवर तापले कि छोट्या चमच्याने वरील मिश्रणाचे पकोडे छान सोनेरी रंगावर तळून घेतले.

३. मूगडाळ कचोरी -
पारी -
अर्धी कणिक आणि अर्धा मैदा असे दोन वाटी प्रमाण. त्यात २ छोटे चमचे तेल, चिमूटभर ओवा आणि मीठ घालून पीठ मळून झाकून ठेवले.

कचोरी सारण -
एका कढईत तेल तापल्यावर त्यात हिंग, हळद आणि आलं मिरची वाटण (ऐच्छिक) घालून बेसन सोनेरी रंगावर भाजून घेतले. त्यावर ओबडधोबड वाटलेली मूगडाळ चांगली मोकळी होईपर्यंत परतून घेतली. ह्याला थोडा वेळ लागतो. मग त्यात लाल तिखट, आमचूर पावडर, सुका मसाला, मीठ आणि थोडी साखर घालून मिनिटभर परतले. एक वाफ काढून गॅस बंद केला. सारण गार होऊ दिले.
IMG_7950_small.jpg

सगळ्या कचोऱ्या भरून घेतल्या आणि आधी मंद आचेवर, मग माध्यम आचेवर तळून घेतल्या.
IMG_7963_small.jpg

४. मूगडाळ दहीवडा
वर लिहिल्याप्रमाणे मूगडाळ आणि थोडी उडीदडाळ चवीपुरते मीठ घालून गंध वाटून घेतली. ते मिश्रण हलके होईपर्यंत खूप फेटले.
कचोऱ्यांच्या आधी हे वडे टाळून घेतले आणि पाण्यात भिजवले. साधारण दहा मिनिटांनी वडे बाहेर काढून हाताने दाबून त्यातले पाणी काढून घेतले आणि फ्रिजमध्ये ठेवले.
दही फेटून घेतले. प्लेट मध्ये वडे, त्यावर दही, त्यावर जिरेपूड, थोडे लाल तिखट, चाट मसाला, बारीक चिरलेली कोथिम्बिर, चिंचेची चटणी असे वाढले.
IMG_7966_2_under200KB.jpg

५. स्टफ्ड मूगडाळ चिल्ला
मूगडाळ चिल्ल्यासाठी तयार मिश्रणात थोडे पाणी घालून सारखे करून घेतले आणि बाजूला ठेवले.
IMG_7945_under200KB.jpg

स्टफिंग तयार करण्यासाठी कढईत तेल तापवून हळद, हिंग, मोहऱ्यांची फोडणी केली, त्यात कांदा सोनेरी रंगावर परतून घेतला. मग इतर भाज्या, शिमला मिरची आणि जांभळा कोबी घालून मोठ्या आचेवर परतले. लाल तिखट, थोडा चाट मसाला आणि थोडी धणेपूड, मीठ घालून मिनिटभर परतले. त्यात पनीर घालून एक वाफ काढली. आणखी थोडे मीठ घातले. मीठ दोन भागात घालायचे आहे. दोन मिनिटांनी गॅस बंद केला.

तवा चांगला तापल्यावर त्यावर धिरडे / चिल्ला घातला. एक बाजू छान सोनेरी रंगावर भाजून उलटली. परत एकदा उलटून त्यात स्टफिंग भरले. फोटोमध्ये दिसतेय तसे फोल्ड करून स्प्रिंग रोल सारखे कट केले. नुसतेच छान लागतात किंवा थोडा टोमॅटो सॉस चालेल.
IMG_7956_small.jpg

६. मूगडाळ ढोकळा (राजस्थानी मोगर ढोकळा)
एका ताटात किंवा खोलगट पसरट भांड्यात कणिक काढून घ्यावी. मी तीन वाट्या घेतली. त्यात सालाचा रवा, अर्धी वाटी (कुरडईसाठी गहू भिजवून चीक काढल्यानंतर जी साल उरते ती वाळवून मिक्सरमध्ये बारीक करून.) हा माझ्या साबा करतात, दरवर्षी. अतिशय पौष्टिक असतो असे सांगतात. पण हा कोंडा वापरणे ऐच्छिक आहे.

कणिक, सालाचा रवा, भिजवलेली अक्खी मूगडाळ, थोडे लाल तिखट, २ चमचे तेल, जिरे, मीठ आणि चिमूटभर पापडखार घालून मळून घेतले. पोळीच्या कणकेपेक्षा थोडे सैल हवे आहे. ह्याचे डोनट आकारात ढोकळे करून वाफवून घेतले. ह्या प्रमाणात ७ ढोकळे झाले. २० मिनिटात गॅस बंद केला.
IMG_7962_small.jpg

७. मूग (सालीची आणि बिनसालीची मूगडाळ) वरण -
दोन्ही डाळी मऊ शिजवून घेतल्या. ४ शिट्ट्या. घोटून त्यावर ३ चमचे तेलात - हळद, हिंग, मोहऱ्या, हिरवी मिरची (मध्ये चिरून ४ तुकडे), कढीपत्ता, ठेचलेला लसूण घालून परतले. त्यावर टोमॅटोच्या चौकोनी फोडी घालून मऊ होऊ दिल्या. थोडे लाल तिखट घालून हि फोडणी डाळीत ओतली. डाळ चांगली उकळल्यावर त्यात मीठ आणि थोडा गुल घालून मिनिटभर उकळून गॅस बंद केला. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवले.

८. मूगडाळ हलवा
ह्या हलव्यासाठी भरपूर तूप लागते पण थोड्या प्रमाणात खाणार असू तर तितके जड वाटत नाही.
साधारण १/२ वाटी तूप तापवून त्यात सुकामेव्याचे काप तळून बाजूला ठेवले. त्याच तुपात १/४ वाटी रवा खमंग भाजून घेतला. मग त्यात २.५ वाट्या बारीक वाटलेली मूगडाळ घालून तूप सुटेपर्यंत परतले. ह्याला जवळजवळ १/२ तास लागला. अध्ये मध्ये अजून १ वाटी तूप घातले.
IMG_7938_under200KB.jpg

एकीकडे १.५ वाटी साखर ३ वाट्या पाण्यात केशर घालून विरघळून घेतली. मूगडाळीच्या मिश्रणाला तूप सुटल्यानंतर आणि अक्ख्या फ्लोअरला आपण हलवा करतोय हे कळल्यानंतर त्यात साखर पाण्याचे मिश्रण हळू हळू ओतले. दोन तीन वाफा काढून गॅस बंद केला.
वाढतांना तळलेले सुकामेव्याचे काप मुदाळ्याच्या तळाशी ठेवून वर हलवा ठेवून मूद पाडली.
हा मेनू जरी खूप खटाटोपाचा वाटत असला तरी योग्य नियोजन केले तर खूप दमवणूक होत नाही. थोडा वेळ हाताशी असावा हे मात्र खरं.

ताटात वाढलेले सगळे पदार्थ एक सर्विंग आणि अजून थोडी कोशिंबीर घेतली तर पोटभरीचे जेवण झाले. अजिबात जड झाले नाही. फोटोत दिसतेय त्या बोलमध्ये आधी दोन ढोकळी आणि वरून डाळ वाढली. त्यावर एक चमचा साजूक तूप.

अशी हि मूगाष्टकाची कहाणी गणेशोत्सवानिमित्त सुफळ संपूर्ण.
गणपती बाप्प्पा मोरया.
IMG_7966_2_small.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूगाष्टक जबरदस्त !!

मुगाचा दहीवडा आणि भजी तर ऑटाफे प्रकार ! ते डोनट आकाराचे ढोकळे फक्त बघितले आहेत, चाखले कधी नाहीत. विंटर स्पेशल असतात ना ?

धागा दोन-तीन दा प्रकाशित झाला आहे बहुतेक. एक ठेवून बाकी काढून टाका प्लीज.

भारी झालंय सगळं!!

मुगडाळ हलवा खूप आवडता आहे. आणि मूग भजी पण. हे बाकीचे नवीन पदार्थ interesting आहेत.

जबरदस्त दिसते आहे थाळी.
बरीच मेहनत घेतली आहे. पदार्थांची निवड भारी..
मला अनिंद्य म्हणतात ते डोनट आकाराचे ढोकळे खायला आवडतील. Never tried before.
Plate, plating आणि tablecloth आवडले.

सगळ्यांचे मनापासून आभार. Happy
@अनिंद्य - हो, इतर धाग्यांवरील मजकूर काढून टाकला आहे. वेमांना कळवून ते धागे लवकरात लवकर डिलिट करण्याची विनंती करते. हे ढोकळे कुठल्याही सीझन मध्ये केलेले चालतात पण हिवाळ्यात गरम खायला जास्त छान वाटतात आणि हा प्रकार थोडा पोटभरीचा आहे त्यामुळे शक्यतो हिवाळ्यात करतात.
@रिया - कधी येतेस सांग.
@ऋतुराज - पुढच्या गटगला. Happy

जबरदस्त झालेत सगळे पदार्थ.. आणि सगळे पदार्थ मेहनतीचे आणि स्किल लागणारे आहेत.
आठ वाट्या मुगडाळ .. वाचूनच बाप रे झालं.

फारच सुंदर. खूप मेहनत आणि निगुतीने केलेले आहेत सगळे पदार्थ. >>+१००
नावापासून प्रेझेंटेशन पर्यंत सर्वच सुंदर.

केवढा हा उरक! _/\_

मस्त दिसताहेत सगळे प्रकार! Happy

मस्तच केलं आहे ! नवीन पदार्थ ही कळले. नक्की करून बघणार, उच्च उरक आणि सादरीकरण!!
८ वाट्या मुगडाळ वाचून अरे बापरे झाले. मापाला नेहमीची आमटी ची वाटी घेतली का ?

केवळ दंडवत!
काय जबरदस्त थाळी!! रेसिपी पण वेगळ्या आहेत नेहमी पेक्षा.>>+1

Pages