वांझ

Submitted by मिरिंडा on 17 September, 2026 - 13:56

Skip to main content
स्वगृह
मनोगत
आस्वाद विवाद संवाद
User account menu
Main navigation
Breadcrumb
स्वगृह वांझ
वांझ
Primary tabs
प्रे. गंगाधरसुत
( गुरु, १७|०९|२०२६ - दु १२:४३ )
वांझ
साठ-सत्तर वर्षांपूर्वीची बयो मावशी...
नवऱ्याने ‘वांझ’ म्हणून माहेरी सोडलं आणि घरच्यांनीही तिची साथ सोडली.
एकाकी रात्री घडलेली भयंकर घटना तिचं आयुष्यच बदलून गेली.
पण नियतीने तिच्यासमोर आणखी एक कठीण प्रश्न उभा केला...
आणि शेवटी तिच्या आयुष्यात असा माणूस उभा राहिला, ज्याने सगळे आरोप नाकारून तिचा स्वीकार केला!
साठ सत्तर वर्षांपूर्वीची गोष्ट. आमची एक मावशी होती. तिचं खरं नावं माहिती नाही. तिला आम्ही "बयो मावशी" म्हणायचो. ती आमच्या आईच्या चुलत बहिणीची मुलगी. ती दिसायला फार सुंदर अशी नव्हती. वय साधारण तिशीच्या पुढे. विटक्या तपकिरी रंगाची, अंगाने बारीक, साडेपाच फुटाच्या आसपास उंची, मोठ्या डोळ्यांची तरतरीत नाकाची आणि लहानसरं जिवणी असणारी, हसतमुख, आम्हा लहान मुलांशी गोड बोलणारी, एरवी अगदीच कमी बोलणारी. ती सतत काही ना काही कामात असायची. दुपारी केव्हातरी मागच्या ओटीवर पडायची. घरात विधवा आई, बयोचा मोठा भाऊ नारायणदादा पण होता. तो थोडा तिरसट होता. तो घरात असला की आम्ही चुपचाप बसायचो. तो दहा अकरा वाजता शेतावर गेला की आम्ही खेळायचो. वाडा तीन मजली होता. बयोची आई विठी. म्हातारी असली तरी कणखर होती. ती विधवा आणि केशवपन केलेली होती. पांढरं लुगड नेसून डोक्यावर पदर घेऊन असायची. कायम झोपाळा अडवून बसायची.

बयो मावशीच लग्न झालं नव्हतं म्हणण्यापेक्षा होतं नव्हतं असच म्हणावं लागेल. त्यावरून तिची आई सारखी तिला शिव्या द्यायची. म्हणायची, "रांडेच्या नशिबात काय आहे काय माहित?"

... अशाच एका मे महिन्याच्या सुटीत आम्ही बयो मावशीकडे गेलो होतो. मी, आई, माझी बहीण लीना. यावेळी जवळजवळ पंधरावीस दिवस तिघेच होतो. एका रविवारी सकाळी अचानक सगळ्या खोल्या गडीमाणसं आवरून नीटनेटक्या करीत होती. मी आईला आज काय आहे असं विचारल्यावर समजलं की बयोमावशीला पाहायला पाव्हणे येणार आहेत. मग मी पण जरा बरे कपडे घालून एका खुर्चीवर बसलो होतो. खुर्च्या अर्थातच समोरच्या मणीलाल शेटच्या घरून मागून आणल्या होत्या. त्याच्याकडे ऑफिस असल्याने मिळाल्या. साडेदहा होतं आले. अजून कोणीच आलं नाही. चहा पोहे तयार होते. चार माणसं आली. गावातले जोशी काका पण आले. नारायण दादा आणि इतर सगळेच उठून उभे राहिले. ओळखी झाल्या. विनायकराव, त्यांचे काका काकू, आणि एक लांबची बहीण, इतकेच लोकं आले होते. विनायक म्हणजे मुलगा. ओळखी नंतर हे समजलं की मुलाला आईवडील नाहीत, सख्खे भाऊ बहिणीही नाहीत. बयोच्या आईने तोंड वाकडं केलं.

"आई नाही म्हणजे शिस्त नाही," असं माझ्या आईजवळ बयोची आई बडबडली.

ते ऐकून कोणीच काही बोललं नाही. विनायक दिसायला चांगला, गोरागोमटा आणि ताकदवान वाटला. तेवढ्यात काका म्हणाले, "आम्हाला जरा वेळ कमी आहे. मुलीला आणलीत तर बरं होईल. कारण बस एकदा गेली की लवकर येत नाही."

नारायण दादा आणि आई यांनी आत जाऊन बयोला आणली. ती खाली मान घालून पाय जवळ घेऊन, बसली. दादा म्हणाले, "मुलीला काय विचारायचं ते विचारून घ्या."

मग चार प्रश्न मुलाच्या काकूनेच विचारले. नंतर बयोला आत पाठवली. आईने सर्वाना चहा पोहे दिले. विनायकराव सरकारी नोकरीत असल्यामुळे पसंत पडले. फक्त जिल्ह्यात कुठेही बदल्या होतं असत. पण त्याचं फारस कोणालाच महत्व वाटलं नाही. त्यांनी लवकरच कळवू असं सांगितलं. नमस्कार चमत्कार झाले. थोड्याच वेळात सगळे पाहुणे निघाले.

विठा आजी सोडून मुलगा सगळ्यांनाच पसंत पडला. नारायण दादांनी विठा आजीला समजावलं. पण समजली तर जुनी आणि म्हातारी माणसं कसली. बयोला विचारण्याचा प्रश्नच नव्हता. एवढ्या जुन्या काळी मुलींना मत नसायचं आणि असलं तरी विचारात घेतं नसत. अर्थातच आम्ही एकदोन दिवसात आमच्या घरी पोहोचलो. चारपाच दिवसांनी नारायण दादांना मुलगी पसंत असल्याचा निरोप आला. दोनतीन महिन्यात लग्न ठरून होऊनही गेलं. आई आणि बहीण गेली होती. माझी परीक्षा असल्याने मला जाता आलं नाही. मध्ये असा तीनचार वर्षांचा अवधी गेला...

नंतर एक दिवस बातमी आली की बयो मावशीला नवऱ्याने सोडली. त्यामुळे ती आजकाल घरीच असायची. लग्न झाल्याने तिची तब्येत जरा बरी झाली होती. एकदोन वेळा आई एकटीच मध्ये जाऊन आली. तेव्हा कळलं की नारायण दादा आणि विठा आजी दोघे चारपाच दिवस यात्रेला जाणार आहेत. आजीने आईला इथे येऊन राहिलीस तर बयोवर लक्ष राहिल, असं म्हंटलं. पण माझ्या इंजिनीरिंगच्या परीक्षा असल्याने आईने नकार दिला. त्यामुळे विठा आजीने आईबरोबर अबोला धरला. अधूनमधून नारायणदादाचीही तब्येत बिघडते असं तिने सांगितलं होतं. पण पुढे जे घडलं त्यामुळे आईला बराच पश्चताप करावा लागला. पण माणूस आपापल्या पद्धतीनेच वागतो हेच खरं. माझं बोलण तर आईला अजिबात आवडलं नाही. त्यावर आई म्हणाली होती, "का तुझ्या परीक्षेच महत्व ठेवलं ही चूक झाली का?"

मी खूप समजवायचा प्रयत्न केला, पण आईला ते पटलं नाही...

असो. एका रात्री विनायकराव, त्यांची दूरची बहीण आणि त्यांचे काका बयोला घेऊन आले. दादाला वाटलं ते बयोला माहेरपणासाठी सोडायला आले आहेत. आल्या आल्या त्यांनी... "ठेवा तुमची बहीण तुमच्याच घरी कायमची. वांझोटी. आधी माहिती असतं तर विनायकने लग्न केलच नसतं. तीन तीन चार चार वर्षं झाली वंशाला दिवा देऊ शकत नाही..." असं म्हणून बयोला ओटीवर ढकलली. आणि ते तिघे लगेचच निघाले...

"अहो, आल्यासारखे दोन दिवस राहा तरी. आपण मुंबईला जाऊन डॉक्टरांना दाखवू. काहीतरी उपाय नक्की सापडेल..."

आता मात्र विनायक राव म्हणाले, "हे पाहा आम्हाला ते काही माहिती नाही. आमचा विश्वास नाही. आम्ही निघतो," असं म्हणून ते तिघेही निघाले.

बयो गुडघ्यात चेहरा लपवून रडत राहिली. ते सगळे गेल्यावर विठा आजीने तिला ओढून मागच्या ओटीवर ढकलून दिले. आणि दरवाजा लावून घेतला. नारायण दादा मात्र डोक्याला हात लावून बैठकीवर तसाच बसून राहिला. आजीची बडबड आणि शिव्याशाप चालूच होते. "मला वाटलं नाही, ही अशी निघेल. अपशकुनी. जन्माला आली तीही पालथी. बापाच्या मुळावर आली. बापाला खाल्लंन मेलीनी," असं म्हणून आजींनी बयोला मारायला सुरवात केली.

ती विव्हळत राहिली.

"आज रात्री कोणीच जेवणार नाही. झोपा तसेच सगळे..." असं म्हणून दरवाजा बंद करून ती बाहेर येऊन बसली. "नीताला (म्हणजे माझी आई) सांगितलं येऊन राहा. तर तिचीही तयारी नाही. बयोला सोडून गेल्याला आता महिना होऊन गेला... अचानक एक दिवस यात्रेला जाण्याचं ठरल. विठीच्या मनात आलं, या अपशकुनीला एकटीला ठेवून जायचं म्हणजे ही काय तारे उधळेल, काय माहित?"

नारायणची तब्येत ठीक नसल्याने जायच्या आदल्या दिवशी नारायण कडे वळून म्हणाली, "ठीक आहेस ना? उद्या जायचंय. का रद्द करू या?"

"नाही नाही, आपण जाऊन येऊ. दोनतीन दिवसांचाच तर प्रश्न आहे. मणीलालच्या बायकोला लक्ष ठेवायला सांगू."

... दुसऱ्या दिवशी सकाळी आठ साडेआठ पर्यंत दोघे निघाले. जाताना पुन्हा एकदा बयीचे कान पिळून तंबी दिली. "नीट वाग, नाहीतरी आल्यावर बघतेच तुला. हे बघ, मागचं दार नीट लावून घे. कोणालाही विचारल्याशिवाय घरात घेऊ नकोस." आणि ते निघाले.

खरंतर हे सगळं मारल्याशिवायही सांगता आलं असतं. पण ती विठी आजी होती... असो. दरवाजा लावून बयो आत वळली. वेळ घालवायचा म्हणून आवरावर केली. थोडा चहा ठेवला. मग अंघोळीला गेली. राहून राहून तिला आश्चर्य वाटत होतं की आपला काय दोष आहे? आपण आजपर्यंत सगळ्यांशीच चांगले वागलो. कोणालाही दुरुत्तर केली नाही. देवाची आराधना केली. म्हणून तर विनायकरावां सारखा नवरा मिळाला...

पहिला दिवस असाच सरला. रात्र पडली. दहा वाजून गेले. बयोने कडेकोट बंदोबस्त केला. थोडीशी हवा यावी म्हणून फक्त मागचा दरवाजा लोटून घेतला. पावसाला मात्र उधाण आलं होतं. कंदीलाची वात थोडी लहान केली होती. तिने अंथरुणावर पाठ टेकली. अर्ध्या तासातच तिला डुलकी लागली. वारा, पाऊस आणि वीज जणू खेळ खेळत होते. ढगांच्या गदगडाटा बरोबर वीजही अधूनमधून धडाम... धुम... धड धड असा आवाज करीत पडत होती. बाहेर वारा, पाऊस आणि वीज मनमुराद खेळत होते. वातावरणात थन्डी निर्माण झाली. बयोने अंगाभोवती पदर आणि पांघरूण घट्ट गुंडाळून घेतले. आता तिला मागचा दरवाजा नुसताच लोटल्याचा पश्चाताप हाऊ लागला. पण एवढ्या थंडीत तिला उठून दरवाजा लावण्याच धाडस होईना. मधेच मोरीवर जावं लागलं तर बंद करू. असा विचार करून ती झोपली. आता रात्र उत्तरोत्तर चढत हाती. बारा साडेबारा वाजत असावेत...

... अचानक काहीतरी धाडकन पडल्याचा आवाज झाला. अतिशय गाढ झोपेत असलेल्या बयोला तो ऐकू येणं शक्यच नव्हतं. मागचा दरवाजा... कर्र कर्र... आवाज करीत उघडला गेला. आणि आत मध्ये भक्कम बांधायच्या "सोम्या" रामोशाने प्रवेश केला. आणि दूर कुठेतरी... कड... कड... कड... धडाम... धूम असा आवाज करीत वीज कोसळली. पावसाचा वाऱ्यासहित धिंगाणा चालूच होतय. आवाज ऐकून बयो घाबऱ्या घुबऱ्या उठून बसली. कंदिलांच्या मंद प्रकाशात सोम्याचा हातात लखलखणारा सुरा घेतलेला, अंगावर घोंगडं पांघरलेला अजस्त्र देह तिला दिसला. भयाने थरथर कापत ती थोडी मागे सरकली. तिने "कोण आहे" विचारण्यासाठी तोंड उघडलं. पण फक्त हवा बाहेर पडली. सोमा अंगावरच घोंगडं बाजूला फेकून तिचे केस धरून हातातला सुरा मानेवर ठेवीत म्हणाला, "अजिबात आवाज नाय पायजे. सांगतो ते कर."

असं म्हणून त्याने स्वतःच तिचं लुगडं ओढून काढलं. आणि सुरा एका बाजूला फेकत तो तिच्या अंगावर झेपावला. भोवतालचा अंधार विकटपणे हसू लागला...

मग पुढचं सगळंच पाऊस आणि विजेच्या कडकडाटात जबरदस्तीने पुढील पंधरावीस मिनिटात पार पडलं. बयोला त्याच्या तोंडाच्या आणि अंगाच्या दुर्गंधीने मळमळू लागलं. पुढच्या दहा मिनिटात तो बाजूला झाला. तिच सर्व अंग ठणकत होतं. जबरदस्तीच्या वेदना, मानहानी आणि नको असलेली शारीरिक जवळीक यांनी तिचं अशा अवस्थेतलं जखमी मन रडू लागलं. तो बाजूला होऊन स्वतःचे कपडे सावरून तिला म्हणाला, "रडतीस काय ल्हान पोरीवाणी? कधी कोनाखाली झोपली नाय काय? नवरा पावणेआठ निघाला का? आपल्या बरोबर चल, राणीसारकी ठेवील."

बयो त्वेशाने ओरडली, "चालायला लाग, नालायका. आत्ताच्या आत्ता."

त्यावर तो म्हणाला, "जास्त बोलू नग. निगालोच की."

असं म्हणून तो मागला दरवाजा उघडून निघून गेला. बयोने उरलेली रात्र रडून काढली. पहाटे पहाटे तिला झोप लागली. जाग आली ती कुणाच्या तरी ओरडण्याने.

"... ऐका हॊ ऐका. एक गुन्हेगार जिल्ह्याच्या तुरुंगातून पळून गेला हाये. तो लयी डेंजर हाय. तो पंचक्रोशीतल्या कुणाच्या बी घरी येऊन लपू शकतो. तो सुऱ्याचा धाक दाखवतो. असा कोणी आल्यास पोलिसपाटलाकडे खबर करा हॊ... ठण... ठण... ठण. पोलीस पाटील प्रत्येकाच्या घरी येऊन तपासणी करणार आहेत हॊ... ठण... ठण... ठण..."

असे बोलून हवालदाराने थाळी वाजवली. बयो धडपडत उठून खिडकी उघडून पाहू लागली. तिला कालच्या रात्रीची आठवण झाली. पण ती पोलीस पाटलाकडे जाणार कशी. फार कशाला आई आणि दादा आल्यावर तरी सांगण्याच्या कल्पनेने तिच्या अंगावर काटा आला.

स्वतःला सावरत तिने घरातली कामं करायला सुरुवात केली. दोन तास त्यात गेले. मग स्वतःसाठी तिने स्वयंपाक केला. इच्छा नसली तरी जेवणं भाग होतं. मग तिला कुठून बळ आलं कुणास ठाऊक. ती बेताची शिकलेली असली तरी तिच्या मनावर ताबा आणणारा वास्तववादी विचार आला. नवऱ्याचं घर बंद झालेलं होतं. हे सगळं कळल्यावर काय करतील काय माहित? घराबाहेर काढल तर आपण जाणार तरी कुठे. त्या कल्पनेनी ती शहरली. सध्या काहीच बोलता येणार नाही. या कल्पनेनी तिचं मन व्यथित झालं. काही घडलं नाही असच वागावं लागेल. जेमतेम दिवस सरला. उद्या संध्याकाळी आई आणि दादा येतील. आलेल्या गडीमाणसांना तिने काही कामं सांगितली... रात्र पडली. पुन्हा दवंडी पिटली गेली. पुन्हा तिचं मन तिला कुरतडू लागलं. आपण पोलीस पाटलांकडे जाऊन सांगत का नाही...??? तिची घुसमट वाढत गेली. नवऱ्याजवळ आपण सांगितलं असतं का? त्यानी ऐकून घेतलं असतं का? असंख्य विचार... तिला सहन होतं नव्हते... अचानक तिला रडू फुटलं. ती मोठमोठ्याने काही वेळ रडली. तेव्हा तिला जरा बरं वाटलं... दुपारचंच उरलेल तिनी खाल्लं. अंथरुणावर तळमळत पडली. झोप जेमतेमच लागत होती... कालच्या रात्रीच्या भीतीने ती दचकून जागी होतहोती...

सकाळ झाली. तिने चेहरा साफसुफ करायचा प्रयत्न केला. दहा वाजायला आले. आणि मुख्य दरवाजावरून हाक ऐकू आली. "अगं ए बये, सामान धर की. कुठे उलथलीस?"

... हे ऐकल्यावर बयो हातातलं कामं टाकून धावत आली. सामान घेऊन ओटीवर ठेवलं. मग दादाही आला. तो थोडा जास्त थकल्यासारखा वाटला. बयोने चहा ठेवला. पाणी आणून दिलं. तेव्हा कुठे म्हातारी थोडी शांत झाली. दिवस साधारण गेला. बयो काहीच बोलू शकली नाही. खरतर खूप भरून येत होतं. आईच्या कुशीत तिला शिरावंसं वाटत होतं. पण विठी म्हणजे आईपेक्षा कैदाशिणीचाच अवतार जास्त होता. त्यामुळे शक्यच नव्हतं. असेच काही दिवस गेले. महिना दीडमहिना झाला. जखमेवर खरपुडी धरत होती. पण निसर्ग आपलं कामं चोख बजावीत होता. बयोच्या चेहऱ्यावर थोडा तजेला दिसू लागला. विठीच्या बारीक नजरेने ते टिपलं होतं. पण मनातली शंका तिने झटकून टाकली. वांझोटी म्हणून तर टाकली...

... आणि एक दिवस चमत्कार झाला. चमत्कार कसला, साडेसातीच लागली की बयोच्या मागे. सकाळचा चहा जेमतेम घेतला. आणि बयोला मळमळ सुटली. पळत पळत ती मोरीकडे धावली. आणि कोरडी उलटी झाली. एक नाही चांगल्या एका पाठोपाठ एक दोन झाल्या. ती तिथेच डोकं धरून बसली. विठीला ती वांझ आहे, म्हणून सोडल्याच आठवलं. ती स्वतःशीच म्हणाली, "मग हे काय...?? म्हणजे ही वांझ नाही? आणि विनायक्रवांचं काय?... मग हे आलं कुठून...?? हिनी कोणाला जवळ केलन? आपण घरी नव्हतो, तेव्हा तर नाही?"

... विठीच्या मस्तकात तिडीक गेली. एखाद श्वापद जस भक्ष्याकडे पाहातं तशी पाहत ती पुढे सरकली. बयोचा चेहरा वर करून विठीने फटाफट तिच्या दोनतीन कानफाटात मारीत विचारलं, "रांडे कोणाला बोलावलंस घरी? मी नसताना? का तू गेली होतीस कोणाकडे?"

बयोला बोलू न देताच ती मारत सुटली. आता हिचा नवरा काय म्हणेल? आजूबाजूला कळलं तर काय होईल. तिने बाहेर जाऊन नारायणला सांगितलं. ते ऐकून तोही मारायला धावला. मग मात्र तिने जे घडलं ते कसतरी सांगितलं. तरीही त्यांच्या डोक्यात हे येईना की पोलीस पाटलाला सांगावं. मग बयोने दवंडी बद्दल सांगितलं. हिला घरात ठेवायचीच नाही. सुईणीला सांगून पाडून घ्यायला हवं. नाही तर गावभर बभ्रा होईल. असा विचार प्रबळ झाला. नंतर कोणीच जेवलं नाही.

मग नारायण दादा म्हणाला आपण हिला तालुक्याच्या गावी महिलांश्रमात सोडू. पण पोलिसांकडे जाण्याची तयारी नव्हती. दिवस कसातरी गेला. तीनचार दिवस असेच गेले. मग नारायण दादा तिचा चेहरा झाकून घेऊन बस पकडण्यासाठी एक दिवस स्टॅन्ड वर उभा होता. लोकांना वाटलं दादाने लग्न केलंय. जाण्याआधी बयोने खूप हातपाय जोडले. मला उपाशी ठेवा, मारा, पायजे तर माझं पोट पाडा पण घराबाहेर काढून नका. पण त्या दोघांनी ऐकलं नाही. एकदाची बस मिळाली. निर्मल महिलाश्रम जवळच होतय. तिथे जुजबी पैसे भरून आश्रमाच्या व्यवस्थापकाना लवकरच येईन असेल खोटे आश्वासन देऊन दादा निघून आला. आश्रमातल्या लोकांना खरी परिस्थिती कळल्यावर बयोला सांभाळून घेतलं. परत पोलिसांकडे कोणाचीच तयारी नव्हती...

मधेच विनायकराव येऊन उभे राहिले. बयोला घेऊन जायला ते आले होते. आजी आणि नारायण दादा यांची घाबरगुंडी उडाली. आता यांना बयोबद्दल काय सांगसायचं कळेना. त्त्यांनी पुन्हा पुन्हा विचारल्यावर त्यांनी ती यात्रेला गेल्याच सांगितलं. अर्थातच त्यांना ते पटल नाही. काही नाही बोलता ते निघून तर गेले. पण आजी आणि दादा चांगलेच घाबरले... काही दिवस असेच गेले. अचानक दोन अडीच महिन्यांनी तालुक्याच्या गावाकडून पोलीस हवालदार दाराशी आले. आणि विठी आजी आणि नारायण दादा यांना इन्स्पेक्टर साहेबांनी त्या दोघांविरुद्ध तक्रार असल्याच सांगितलं. त्यासाठी त्या दोघांना ताबडतोब बोलवलंय असं सांगितल्यावर दोघेही घाबरून तिकडे गेले. ती पावसाळी संध्यकाळहोती... साडेसात वाजत होते. तिथे बसलेल्या विनायक्रवाना पाहून दोघे डोळे विसफारून पाहू लागले. इन्स्पेक्टर दाभाडे त्त्यांच्या अंगावर ओरडले, "म्हातारपणी आत बसायचा शोक चढलाय काय? आजी बोला की. काय केलत यांच्या बायकोच? आणि खोटं सांगितलंत की ती यात्राला गेल्ये.?"

... दोघेही थरथर कापू लागले. मग धीर करून म्हणाले, "आमची चूक झाली. आम्ही तिला निर्मल महिलांश्रमात सोडून आलोय."

मग त्यांनी साद्यन्त कहाणी सांगितली. ते ऐकून साहेब म्हणाले, "तुम्ही बलात्काराबद्दल तक्रार करायच सोडून तिला आश्रमात पाठवलीत. तुम्ही त्या गुन्हेगाराला मदत केलीत आता बसा आतमध्ये."

पण विनायकरावांनी त्त्यांना समजावून बलात्काराची तक्रार नोंदवून घायला सांगितली. आणि आपल्या ताब्यात देण्यास सांगितलं. पुष्कळ आढेवेढे घेऊन दाभाडे साहेबांच्या तयारी झाले. मग गाडी काढून इन्स्पेक्टर सगळ्यांना घेऊन निर्मळ महिलाश्रमाकडे निघाले. तिकडे गेल्यावर व्यवस्थापक म्हणाले, "खरतर आम्ही बयोची तब्येत ठीक नाही. त्यामुळे तुमच्या बरोबर पाठवू इच्छित नाही. पण तिची इच्छा नसेल तर नेऊ नका."

मग सगळेच बयोच्या खोलीकडे निघाले. अतिशय मंद प्रकाश असलेल्या खोलीत बयो बेडवर भिंतीला टेकून बसली होती. विठीला पाहून तर तिचं अंग शहारलं. आणि ती पटकन म्हणाली, "मी नाही हिच्या बरोबर जाणार."

... मधेच विनायकराव म्हणाले, "पण तू माझ्या बरोबर तर येशील ना? आता नाही मी तुला सोडणार."

"... माझ्या बरोबर काय घडलंय ते माहिती असूनसुद्धा असं म्हणताय?"

त्यावर विनायकराव म्हणाले, "तरीही तुझा स्वीकार करण्याची माझी तयारी आहे, जे घडलं त्यात तुझा काहीच दोष नाही. फार कशाला जे मूल आहे तेही आपण वाढवू. त्या मुलाचा तरी काय दोष?"

हे ऐकून इन्स्पेक्टर साहेब म्हणाले, "मी माझ्या आयुष्यात पुष्कळ माणसं पाहिली पण अशा परिस्थितीत स्वीकार करणारा माणूस प्रथमच पाहतोय. माझ्याकडून सर्वतोपरी सहकार्य तुम्हाला मिळेल."

... मग सगळेच निघाले. पोलीस स्टेशनला येऊन सगळे उपचार पूर्ण झाले. बयोची वैद्यकीय तपासणीही झाली. आता चौथा महिना चालू होता. तिला नीट चालता येत नव्हतं. परत एकदा इन्स्पेक्टर साहेबांनी विठी आजी आणि नारायण दादा यांना ताकीद दिली. विनायकरावांकडे बोट करून ते म्हणाले, "केवळ यांच्या चांगुलपणाच्या जोरावर तुम्हाला सोडतोय."

पोलिसागाडीने त्या सगळ्यांना आपापल्या घरी सोडलं.

त्याच दिवशी रात्री विनायकराव बयोला जवळ घेतं म्हणाले, "खरतर मला तुझी माफी मागायच्ये. खरा गुन्हेगार मीच आहे. तुला जर माहेरी सोडून आलो नसतो तर हे घडलंच नसतं. खाता दोष हा माझ्यात आहे. खरा वांझ मी आहे बयो."

त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले... "असं नका म्हणू," आणि बयोने त्यांना जवळ घेऊन त्त्यांच्या डोक्यावरून हातं फिरवू लागली. मग त्यांनी खरं काय घडलं ते सांगितलं. "माझी बहीण आहे ना. तिला डॉक्टरांचा रिपोर्ट दाखवला. तिने त्याबद्दल नाही बोलण्याचं सांगितलं. उलट तुझ्यावराच वांझपणाचा आरोप लावून तुला सोडायला लावल. मला तिच्या बोलण्याची भुरळ पडली. आणि मी तुला माहेरी नेऊन सोडली. मला माफ कर."

"... छे छे, माफी मागू नका. उलट मकाच तुमच्या मोठ्या मनाचा अनुभव आला."

असं म्हणून त्या दिवशी त्या दोघाना शांत झोप लागली.

बयोचे दिवस बरे चालले होते. पोलीस स्टेशनला एकदोनवेळा बोलवण्यात आलं. आता बयोवर बलात्कार करणारा सोमू रामोशी पकडला गेला होता. जिल्ह्याच्या पोलीस कोठडीमध्ये त्याला डांबवून ठेवला होता. विनायकराव आणि बयो एकदाच गेले होते. तिचे दिवस आता भरत चालले होते. समोर जेव्हा सोमू आला तेव्हा ती त्याला ओळखू शकली नाही. कारण अंधुक प्रकाशात त्याचा चेहरा तिला आठवेना. पण तो मोठयाने हसला. त्याबरोबर बयोने त्याला ओळखला. बयो मागे वळली. त्या बरोबर तो म्हणाला, "झाल्यावर पोर दाखवायला घेऊन ये."

तिला ते शब्द ग्राम शिक्षसारखे कानात घुसले. ती मागे वळून न बघता बाहेर पडली. पुढे लवकरच बयोची डिलिव्हरी झाली. तिला मुलगा झाला होता. जास्त मोठा सोहळा न करता, नामकरण करण्यात आलं. हे सगळं झाल्याला दोन वर्षं झाली. काही प्रमाणात बयो आणि विनायकराव यांना कोर्टाच्या फेऱ्या कराव्या लागल्या. दर वेळी तो दरोडेखोर बयोकडे रोखून पाहत असे. त्या दरोडेखोराला पंधरा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा झाली. मी त्यानंतर वर्षाने इंजिनिअर झालो. मध्यंतरी विठी आजी आणि नारायण दादाही गेले. मग थोड्या दिवसांसाठी मी आणि आई बयो मावशीला भेटायला गेलो. आईची फारशी इच्छा नव्हती. पण मी तिला समजावलं, की जे झालं त्यात बयोचा काहीच दोष नव्हता. विनायकरावांचा चेहरा अगदीच निर्विकार वाटला. आयुष्यातल्या या प्रसंगाच अप्रूप वाटावं की पश्चाताप करावा हे त्त्यांना ठरवता येत नसावं.

असो एक प्रश्न माझ्या मनात सलत राहिला की स्त्रीला जर ताबडतोब मूल झाला नाही तर तिला वांझ ठरवण्याचा अधिकार पुरुषाला आहे का? काळ कोणताही असो.

(संपूर्ण)

अरुण गंगाधर कोर्डे
९००४८०८४८६

Group content visibility: 
Public - accessible to all site users