पाककृती लेखन स्पर्धा - स्वयंपाक न जमणार्‍या बाबाचे अंड्याचे फंडे - ऋन्मेऽऽष

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 September, 2026 - 15:32

लांबलचक शीर्षक घाईघाईत व्यवस्थित वाचले नसल्यास, सर्वप्रथम एक महत्वाची सूचना - लिखाणासाठी निवडलेली पाककृती अंड्याची आहे!

तसेच लोकं लेख वाचण्यात गुंग झाल्याने पाककृतीची रील बघायला विसरत आहेत हे ध्यानात आल्याने तिची लिंक लेखाच्या सुरुवातीला सुद्धा देत आहे.
पाककृतीची रील- https://www.youtube.com/shorts/215KpBmwIGA

गणपतीत पाककृती स्पर्धेत मांसाहारी पदार्थ असावेत की नसावेत यावर बरेचदा चर्चा होते. माझे मत मांसाहारी पदार्थ असण्यास काही हरकत नाही या पारड्यात जाते. कारण समाजात वावरताना आपल्या श्रद्धेचे कोणालाही बंधन नसावे. आणि तसेही महाराष्ट्राच्या कित्येक भागात गौरीला मांसाहाराचा नैवैद्य दाखवायची प्रथा असते. म्हणजे या देखील आपल्यापैकीच काहींच्या श्रद्धा झाल्या. त्यामुळे श्रद्धा जपायच्याच झाल्यास सर्वांच्याच जपल्या गेल्या पाहिजेत.

आता या सगळ्यात मी स्वत: नास्तिक आणि मांसाहारप्रेमी आहे. त्यामुळे सण-उत्सवाच्या काळात देखील मांसाहार करतो. पण त्या मांसाहाराचे मुद्दाम प्रदर्शन करणे टाळतो.

पण मग तरीही मी अंडे का निवडले?

आणि निवडले तर ठीक, पण या वरच्या स्पष्टीकरणाची गरज काय होती?

तर या दोन्ही प्रश्नाची उत्तरे लेख संपता संपता मिळतीलच..
आणि नाही मिळाली म्हणालात तर स्वतंत्र धागा काढतोच बघा Happy

आता लेखाकडे वळूया,

मायबोलीवर दरवर्षी गणपतीला स्पर्धा होतात. विविध उपक्रम राबवले जातात. झब्बू आणि मीमचे धागे सुद्धा निघतात. मी एकूण एक प्रकारात भाग घेतो. कविता बिलकुल जमत नाही. पण एके वर्षी संगीतक स्पर्धा होती, तर त्यातही भाग घेतला होता. इथे सवयीने थोडी स्वतःची पाठ थोपटतो. त्यात जिंकलो सुद्धा होतो. थोडक्यात, मी काही म्हणजे काही सोडत नाही. अपवाद, पाककृती स्पर्धा!

पण या पाककृती स्पर्धेत आलेल्या एकूण एक एन्ट्री मी चाळतो. फोटो बघून डोळे शेकतो आणि मन सुखावून घेतो. प्रतिसाद सुद्धा देतो. पण कधी कुठली पाककृती डिटेलमध्ये जाऊन वाचत नाही. कारण ज्या गावी जायचेच नाही त्या ट्रेनमध्ये चढायचेच कश्याला.. म्हणून फक्त प्लॅटफॉर्म तिकीट काढून स्टेशन फिरून येतो. एखादा स्टॉल आवडलाच तर खाऊन घेतो.

बाकी पाककृती वाचून करणारच काय जर आपल्याला साधा कांदा कापता येत नाही.
मिरची चिरता येत नाही. पोळीही लाटता येत नाही. कुकर कसा लावायचा हे कोणी शिकवले नाही.
फक्त आई फोडणी देत असताना आपण गॅस जवळ लुडबूड करायची नाही इतकेच काय ते शिकवले गेले.

असा स्वयंपाक न जमणारा नवरा भेटला की बायका हमखास टोमणे मारतात, की आईने काही शिकवले नाही. गंमत म्हणजे हे शिकवायची जबाबदारी सुद्धा त्या आईवरच टाकतात. म्हणजे नकळत त्याही स्वयंपाकाची आणि ते मुलांना शिकवण्याची जबाबदारी एका बाईवरच टाकतात Happy

पण मला स्वयंपाक न शिकवणे यात आईची चूक होती का?
तर बिलकुल नाही!
कारण तेव्हा एकत्र कुटुंबात गुण्यागोविंद्याने नांदताना आपल्या मुलांना काय शिकवावे हे कुठे सूनांच्या हातात असायचे. अन्यथा सासू काय म्हणेल? कशी ही सून मिळाली, जे माझ्या मुलाला स्वयंपाक करायला लावते, जो आजवर त्याने कधी केला नाही. किंवा माझ्या नातवाला स्वयंपाक करायला शिकवते, जी आपल्या घरची पद्धत नाही... त्यामुळे आजच्या तारखेला माझी आई कितीही मॉडर्न सासू असली तरी त्याकाळी तिच्या आई म्हणून वागण्याला मर्यादा होत्याच.

थोडक्यात ज्या एकत्र कुटुंबात पुर्वापार पुरुष स्वयंपाकघरात शिरून काम करायची पद्धत नाही तिथे ओघाने मुलांनाही ते शिकवले जायचे नाही. पुढे स्वतंत्र राहू लागलो तसे मी माझ्या वडिलांना घरची सारे कामे करताना पाहिली आहेत. पण स्वयंपाक त्यांनाही कोणी शिकवला नसल्याने त्यापासून ते कायम दूरच राहिले. माझीही गत काही वेगळी नव्हती.

घरात मुलांचा अभ्यास, खेळ, सूसू शीशी, आजारपण, लाड, हट्ट, त्यांना ईतर कोणापेक्षाही जास्त वेळ देणे, अश्या सगळ्या आघाड्यांवर लढून सुद्धा जेव्हा त्यांच्यासाठी काही खायला बनवायची वेळ यायची. तेव्हा त्यात मागे पडल्याची खंत वाटायची.

कधी आपण कौतुकाने आईच्या हातचा सारभाताचा फोटो सोशल मिडियावर शेअर करावा आणि आपल्याला स्वयंपाक जमत नाही हे माहीत असणाऱ्याची त्यावर कॉमेंट यावी- कधीतरी तू देखील आईला किंवा बायकोला हे बनवून खाऊ घाल आणि सरप्राईज कर..

आता यात समोरच्याने आपल्याला खरेच एखादी छान कल्पना सुचवलेली असते, की ऐतखाऊ म्हणून टोमणा मारलेला असतो, की बायकांनीच खूप वर्षे स्वयंपाक केला आता पुरुषांनीही शिकायला हवे अशी कळकळ त्यामागे असते याची कल्पना नाही. पण हे ऐकावे लागते.

एकदा का स्वयंपाक हा आपला प्रांत नाही असा मेंटल ब्लॉक तयार झाला आणि ते शिकायची तशीच गरज नसली, म्हणजे त्यावाचून अडत नसले आणि इतर पर्याय उपलब्ध असले, तर ते ठरवून शिकणे तितके सोपे नसते. कारण त्यात नुसते जेवण बनवायचे नसते तर आपल्या आई-बायकोने जे बेंचमार्क सेट केले असतात त्याच्या जवळ जाणे गरजेचे असते. अन्यथा ते निकृष्ठ चवीचे अन्न आपल्यासह सर्वांना खावे लागेल.

म्हणून मी तुमची भांडी घासून देतो, मुले सांभाळतो, मला जमणारी घरातली ईतर सारी कामे करतो पण स्वयंपाक तुम्हीच करा. हवे तर ऑर्डर करतो, स्वयंपाकाला बाई ठेवतो, म्हणजे तुम्हालाही चूल-मूल मध्ये अडकून राहायची गरज नाही. पण जे काम मला जमत नाही, आवडत नाही, त्यात मला अडकवू नका. कारण ते बनवणे आणि त्याहून महत्वाचे म्हणजे जसे बनेल तसे खाणे ही शिक्षा मला नको. असाच स्टँड सोयीचा पडतो. मी तसाच होतो!

... आणि मग एकापाठोपाठ एक दोन गोंडस मुले झाली Happy

ते आपल्या काळजाचा तुकडा असतात आणि खाण्यासाठी पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असतात. त्यामुळे त्यांना काहीतरी करून खाऊ घालण्यात आनंद असतो. त्यांनी ते आवडीने खात त्यांचे पोट भरण्यात आपल्याला यश आले तर त्यापेक्षा दुसरे मोठे समाधान नसते, हा नवीन साक्षात्कार झाला!

पण मला येत होती ती फक्त मॅगी! जी मी बिल्डिंगमधील मित्रांसोबत करायचो, जेव्हा ते माझ्या घरी पडीक असायचे. तसेच आई सकाळी जो भात करून जायची त्यात वरण, भाज्या, तळलेले अंडे वगैरे मिसळून रावडाचिवडा करणे सुद्धा छान जमायचे.

या दोन्हीबद्दल आधी मायबोलीवर लिहून झाले आहे. त्यात फारसे पाककौशल्य नसून लेखनकौशल्य दाखवत आपले अनुभव शेअर करणे इतकाच हेतू होता. पण मुलांचे पोट भरायला आणि एखादा पदार्थ त्यांना आवडीने खाऊ घालायला पाककौशल्यच गरजेचे असते. तिथे केवळ शब्दांचे बुडबुडे कामाचे नव्हते.

आजही मला ना कांदा कापता येत होता, ना फोडणी देता येत होती. पण एक गोष्ट मला शाळेत असल्यापासून येत होती, जी माझ्या बायकोला देखील येत नाही. कदाचित आजच्या कित्येक मुलींना येत नसेल, ती म्हणजे मला स्टोव्ह पेटवता यायचा. रॉकेलमध्ये काकडा घालून, तो पेटवून, स्टोव्हला पिन मारून त्याचा छान भडका उडवून देण्यात मी एक्सपर्ट होतो. तेवढे आईने मला शिकवले होते. बहुधा ते आमच्या पुरुषप्रधान संस्कृतीत अलाऊड होते. Wink भले हे कौशल्य आजच्या काळात कामाचे नव्हते, पण त्यामुळे किमान माझ्याकडे गॅसच्या आगीशी आणि गरम तेलाशी खेळायचा कॉन्फिडन्स होता.

मला स्वतःला एक हाफफ्राय तेवढे बनवता यायचे ज्यात कापलेल्या कांद्याची गरज नव्हती. पण त्यातले अर्धकच्चे अंडे खायचे असते हेच मुलांच्या पचनी पडणे जड होते. म्हणून मग आधी पास्ता आणि मॅगीचे काही शास्त्रशुध्द प्रकार शिकलो. ज्याला मुलांच्या आवडीच्या बटर आणि चीजची जोड दिली. हळूहळू दोन्ही मुलांच्या आवडी स्वतंत्रपणे ओळखून त्यात प्रयोग सुरू केले. जे आजच्या तारखेला आम्हाला मॅगी पप्पाच्या हातचीच आवडते म्हणून मुले माझ्या पाककौशल्याला पावती देतात ईतकी प्रगती झाली आहे. तर बटर ईडली फ्राय ही सुद्धा आमच्या घरी माझीच स्पेशालिटी समजली जाते.

तर असेच काहीसे कौशल्य, मुलांची आवड, आणि आपले नशीब आजमावून अंड्याचे दोन तीन प्रकार शोधून काढले आहेत ज्यावर मुले तुटून पडतात. आणि एका वेळेस प्रत्येकी किमान तीन अंडी तरी खातात!

आज माझ्या त्याच जगावेगळ्या, अदभुत, थक्क करून टाकणाऱ्या.. या पैकी काहीही नसलेल्या Wink , पण तरीही मुलांच्या फेवरेट असलेल्या पाककृती शेअर करत आहे.

१) मसाला ऑमलेट - हाफ फ्राय मला जमत होतेच. प्रश्न होता कच्च्या अंड्याचा. अंडे पलटले. उत्तर सापडले. पलटण्याआधी त्यावरचे बलक फोडून छानसे पसरवून घेतले. त्यावर मीठ मसाला पेरला. ते पाहून मुलांनीच त्याला मसाला ऑमलेट असे नाव दिले. यासाठी कांदा कापायची गरज नव्हती. पण कांद्याचे ऑमलेट दोन्ही मुलांना आवडतही नव्हते. "मेड फॉर ईच अदर - रब ने बना दी तिकडी" बहुधा यालाच म्हणत असावेत.

२) मसाला ब्रेड ऑमलेट - नुसती अंडी तरी किती पोटभरीची ठरणार म्हणून मग मसाला ऑमलेट सोबत ब्रेडचा तुकडा जोडून प्रयोग सुरू केले. त्यातला मुलांना आवडलेला प्रकार म्हणजे मसाला ऑमलेट पलटायच्या आधी त्यावर ब्रेड ठेवून त्यावर चीज किंवा बटरचे तुकडे पसरवायचे, आणि मग त्याला "डीडीएलजेच्या शाहरुख"सारखे पलट म्हणावे. विशेष काही नाही. ब्रेड खरपूस भाजला जातो आणि ऑमलेटलाच चिकटला जातो. जे काटे चमचे घेत खायला मुलांना मजा येते. त्यामुळे दोन मसाला ऑमलेट हादडल्यानंतर तिसरा ब्रेड सोबत अशी फर्माईश येते.

३) आणि हा तिसरा आमचा आजच्या तारखेचा अंड्याचा सर्वात हिट आयटम ज्यावर मुलगा नुसते तुटून पडतो. आणि ते म्हणजे उकडलेली अंडी.
हो, उकडलेली अंडीच! छानपैकी मीठ मसाला शिंपडून त्याचा चखना आयटम बनवून!

पण ईतके सोपे प्रकरण नसते ते.
जेव्हा मुलगी लहान होती तेव्हा तिला उकडलेले अंडे द्या असे कोणीतरी सुचवले होते. तेव्हा मला जाणवले की मी आयुष्यात स्वत:हून अंडे कधी उकडलेच नव्हते. तसे हॉस्टेलमध्ये असताना आम्ही आंघोळीच्या भरलेल्या बादलीत हिटर सोडून त्यात अपारंपारिक पद्धतीने अंडी उकडायचो. पण तो अनुभव इथे कामाचा नव्हता. बरे बायको लग्नाआधी शाकाहारी असल्याने तिलाही कल्पना नव्हती. त्यामुळे आईची फोनवर मदत घेऊन तेव्हा कसेबसे अंडे उकडले होते. पण लेकीला तो प्रकारच न आवडल्याने पुन्हा ती वेळ आली नव्हती.

पण नुकतेच मुलाला उकडलेले अंडे आवडते हा शोध लागला तेव्हा मात्र पुन्हा कंबर कसली. यावेळी चॅट जीपीटी हाताशी होता. पण त्याने अजून गोंधळात टाकले. सॉफ्ट-मिडियम-हार्ड बॉईल अशी तीन वेगवेगळ्या लेव्हलची समीकरणे त्याने मांडली. प्रत्येकात टाईम वेगळा होता. गॅस मिडीयम होता. घरच्या तीन बर्नरच्या शेगडीवर कुठला बर्नर कुठल्या आचेवर वापरायचा, हे काहीच न उमगल्याने मग मीच स्वत:चे कोष्टक बनवायचे ठरवले.

तीनपैकी एक बर्नर फिक्स केला, मिडीयम गॅस सेट केला आणि पाणी उकळू लागल्यावर त्यात तीन अंडी प्रत्येकी अडीच मिनिटांच्या अंतराने सोडली. त्यावर व्यवस्थित मार्करने नंबर लिहून उकडली. ईंजिनिअरीग कामात आली. तीनही अंडी एकाच वेळी बाहेर काढली जी वेगवेगळ्या प्रमाणात उकडली गेली होती. त्यातील सर्वाधिक वेळ उकडलेले अंडे मुलाला आवडले आणि माझे काम सोपे झाले.

उकडलेले अंडे सोलणे सुद्धा दिव्य असते हे सुरुवातीचा उत्साह ओसरल्यावर ध्यानात आले. तेव्हा पुन्हा चॅटजीपीटी मदतीला धावून आला. गरमागरम अंडे थंड पाण्यात सोडल्यास आंकुंचन पावते जेणेकरून कवच आणि अंड्यात गॅप पडते हे सायन्स समजले. अंडे फोडताना निमुळत्या टोकाकडून फोडावे जिथे आधीच गॅप असते, तिथून पाणी आत सोडावे जेणेकरून कवच मोकळे होण्यास मदत होते हे फंडे समजले. हळूहळू अंडे सोलण्यात सुद्धा मजा येऊ लागली. एखाद्या उकडीच्या मोदकाच्या छान कळ्या जमल्यावर जितका आनंद होतो त्याहून किंचित जास्त आनंद मला किंचितही धक्क्का न बसलेले अंडे सोलून काढल्यावर होतो. त्या मोदकाचा जसा हातावर ठेवून फोटो काढला जातो, तसेच मग मी त्या अंड्याचा हातावर ठेवून छानसा फोटो काढतो Happy

(खाली शेअर केलेल्या फोटोतील हातावरच्या मेहंदीवर जाऊ नका. ते अंडे मीच उकडलेले आहे आणि तो मेहंदीने रंगलेला हात देखील याच पुरुषाचा आहे. "व्हाई शूड गर्लज हॅव ऑल द फन" हे तत्व मी कायम पाळतो Happy )

लेखाच्या सुरुवातीला जसे म्हटले होते की अंडेच का निवडले याचे उत्तर लेख संपता संपता मिळेल, तर ते एव्हाना मिळाले असेलच. मला मोजके चार-पाच पदार्थच जमतात ज्यात अंड्याचे स्थान वरचे आहे. बाकी मुले मोठी होतील तसे त्यांच्या आवडी बदलतील. आणि त्यानुसार जमेल तसे नवनवीन पदार्थ मी शिकत जाईनच Happy

इथवर तुम्ही वाचत आला असाल तर ते तुमचे पेशंस असतील, पण माझ्यासाठी ते तुमचे प्रेम आहे. सुरुवातीच्या भल्या मोठ्या लेखाची/प्रस्तावनेची गरज होतीच, अन्यथा एका स्वयंपाक न जमणाऱ्या बापाच्या भावना तुम्हाला कधी कळल्याच नसत्या आणि पाककृती हसण्यावारीच नेली असती.

आपण किचन ओट्यासमोर उभे राहावे. एक अंडे तव्यावर, तर एक अंडे हातात. तर दुसर्‍या हातात एक लसपशीत काविलता. एकीकडे दोन्ही मुले दणादण ऑम्लेटवर तुटून पडली आहेत. आपण हौसेने केलेले आवडीने खात आहेत. तर दुसरीकडे या कौतुकात रमतानाच दोघांच्या ताटात आलटून पालटून एकेक ऑमलेट सरकवत त्यांना न थांबता रसद पुरवायची आहे. अन्यथा मूड चेंज झाल्यास ते कधी बस्स झाले म्हणतील आणि त्यामुळे आपलाच मूड ऑफ होईल हे सांगता येत नाही. अशी ही लढाई जिंकल्यावरचा आनंद, मेहनत वसूल झाल्याचे समाधान, हे सारे काही मला जमणारे चार पाच साधेसे पदार्थच मिळवून देतात.

आम्हालाही वाटते की आपण काहीतरी मुलांसाठी करून त्यांना खाऊ घालावे आणि त्यांनी मोठे झाल्यावरही ते लक्षात ठेवून आठवण काढावी. त्यामुळे माझ्यासाठी चीज मॅगी, बटर ईडली फ्राय, मसाला ऑमलेट, ब्रेड ऑमलेट, उकडलेले अंडे हे निव्वळ खाद्यपदार्थ नसून इमोशन्स आहेत Happy

थोडक्यात ही पाककृती लिखाण स्पर्धेतील एन्ट्री म्हणजे या निमित्ताने माझ्यासारख्या स्वयंपाक न जमणाऱ्या बाबांच्या भावना उतरवायचा एक छोटासा प्रयत्न आहे!

अरे हो, समाप्त करायच्या आधी एक मिनिट, ही पाककृती लेखन स्पर्धा आहे ना. तर मग त्या निमित्ताने ते करूया जे मायबोलीच्या ईतिहासात आजवर कधी झाले नसावे Happy

सदर पाककृती आपणच केली याचे पुरावे देऊया. फोटो सोबत जोडत आहेच. पण काही क्षणचित्रांची छोटीशी विडिओ रील सुद्धा बनवली आहे. ज्यात कच्चे अंडे फोडण्यापासून, पसरवणे, पलटणे ते सर्व्ह करणे सारे काही सापडून जाईल.

आणि हो, सर्व फोटो विडिओ जुनेच आहेत. जे त्या त्या वेळी आठवणी म्हणून टिपलेले आहेत. इथे लिहायचे म्हणून काही सेटअप करून काढलेले नाहीत. Happy

exclusively for मायबोली युट्यूब शॉर्ट्स लिंक - https://www.youtube.com/shorts/215KpBmwIGA

IMG-20260916-WA0018.jpg

धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद वावे, आशू आणि अनु Happy

बरे झाले मी तो लसपशीत काविलता शब्दप्रयोग वापरला. त्यामुळे माझे चार प्रतिसाद वाढले Proud

आशू, व्हॉईस टायपिंग नावातच आहे की अर्थ Happy

मी तर गेले दोनेक वर्ष हे वापरत आहे आणि बोलूनच टाईप करत आहे. कारण मला मायबोलीच नाही तर व्हाट्सअप चॅट मध्ये सुद्धा मोठमोठ्या पोस्ट लिहायची सवय आहे. Proud

Gboard - The Google keyboard इंस्टॉल केले आहे. त्यात इंग्लिश अल्फाबेट कीबोर्ड वापरून मराठी टाईप होते.

तसेच माईक आयकॉन असतो. त्याला क्लिक केले की तो ऍक्टिव्हेट होतो. आणि "आता बोला" असा मेसेज येतो. मग जे बोलू ते टाईप होत जाते. मराठी, इंग्लिश किंवा ज्या भाषेचा कीबोर्ड सिलेक्ट केला असेल त्या भाषेत टाईप होते. त्यामुळे आता मला ऑफिसचे काम सुद्धा लॅपटॉप वर टाईप करून करायला बोर होते.

हवे तर हाच वापरून बघा. सुरुवातीला काही क्लिष्ट शब्द तो चुकवेल सुद्धा. पण एकदा तुम्ही ते करेक्ट केले की तो लक्षात ठेवून बरोबर वापरतो.

अंडे पुराण देखणे आणि वाचनीय झाले आहे. मुलं भाग्यवान आहेत. विविध अंगांनी रसद (विकासासाठी) पुरवणारे बाबा आहेत (संदर्भ =उदा. =राणीच्या बागेत वगैरे)

भारी लिहिलंय.

तो रणवीर ब्रारचा व्हिडिओ मलाही बघायला हवा. साल सोलताना दर वेळी आतले खवले निघाले की खट्टू होतो मी.

प्राचीन, हपा धन्यवाद

<<<< दर वेळी आतले खवले निघाले की खट्टू होतो मी.>>>
हो हो अगदीच..
लहान मुलांना तुटलेले बिस्कीट मिळाले की त्यांना ते याचसाठी नको असते.. भले आपण त्यांना कितीही म्हणालो की टेस्ट सेमच असते रे काय फरक पडतो तरी कुठे फरक पडतो हे आता समजू लागले आहे Happy

काल अंडी उकडली आणि जाई यांनी सुचवले तसे फरशीवर रगडली. त्या आधी नेहमीप्रमाणे थंड पाण्यात सुद्धा टाकली होती. एकत्रित फायदा होत पटकन सोलली गेली. जराही टवका न उडता. मुलगा सुद्धा खुश होतो ते बघून.

IMG-20260922-WA0031.jpg

लेख छान झालाय. आवडलाय! मुले नक्की एंजॉय करत असतील आणि मोठेपणी ह्याच आठवणी लेगसी बनतील! हे दिवस मस्त एंजॉय करा.
आधी रात्रीचे आकाश फोटो आणि मग बाबाने केलेले खाद्यपदार्थ हे वाचुन मला पण लहानपणी दिवे गेले की सगळे गॅलरीत खाली बसून जेवायचो ते दिवस आठवले. आणि तेंव्हा बाबा शेवटचा आमटी भात आणि त्यात सायीचे दही घालून भात छान कालवून द्यायचे ते पण आठवले. लेगसी म्हणते ती हीच.
रच्याकने, तो मिसळणाचा डबा आवडला आहे. नवशिक्यांसाठी बेस्ट आहे. फोडणीत आधी काय घालायचे मग काय ह्याचे सिक्वेन्सिंग सहज करता येईल. कुचेकातकुचेका

धन्यवाद आभा, अनिंद्य, ऋतुराज आणि जयू Happy
रीळ बघणाऱ्यांचे विशेष आभार Proud

<<< लहानपणी दिवे गेले की सगळे गॅलरीत खाली बसून जेवायचो ते दिवस आठवले. आणि तेंव्हा बाबा शेवटचा आमटी भात आणि त्यात सायीचे दही घालून भात छान कालवून द्यायचे ते पण आठवले.
>>>>

अश्याच आठवणी लक्षात राहतात. जशा आपल्या राहिल्या तशा मुलांच्याही राहतील. आणि त्यांच्या या आठवणीत आपण कायम राहू.. बस हाच स्वार्थ आहे Happy

>>>>>अश्याच आठवणी लक्षात राहतात. जशा आपल्या राहिल्या तशा मुलांच्याही राहतील. आणि त्यांच्या या आठवणीत आपण कायम राहू.. बस हाच स्वार्थ आहे Happy
ट्रेस अ‍ॅडकिन्स चे 'जस्ट फिशिंग' गाणे पहा. त्याची लेक आणि तो फिशिंगकरता एका तळ्यावरती गेलेले आहेत. लेख अमिष लावलेला, गळ टाकते-ओढते-परत टाकते ...
तो म्हणतोय - तिला वाटतय की आम्ही मासेमारी करतोय. पण खूबी ही आहे की आम्ही तिला आयुष्यभर पुरेल, पुरुन उरेल अश्या आठवणींची शिदोरी गोळा करतोय.
जस्ट फिशिंग

छान आहे गाणे सामो.. रिलेट होणारे. इंग्लिश तेवढे कळत नाही. पण मी त्या खालच्या कॉमेंट सर्व वाचून काढल्या Happy

कित्येक भागात गौरीला मांसाहाराचा नैवैद्य दाखवायची प्रथा असते.>> हो, आमच्या भागात आहे काही समाजामध्ये हि प्रथा..!

लेख मस्त आहे. फोटोही छान.. मेंदीच्या हातासकट..!

>>>इंग्लिश तेवढे कळत नाही.
अर्रेच्या मला तरी कुठे कळतं. मी क्लोझड कॅप्शन्स्मध्ये मुव्हीज , गाणी सगळं पहाते.

हो सामो, तसे वाचून कळतेही. शेवटी इंजीनियरिंग त्याच भाषेत केली आहे. पण मला इंग्लिश भाषेत साहित्य वाचले की त्या शब्दातील भावना भिडत नाहीत. आत पोहोचत नाहीत Happy

रुपाली धन्यवाद, आणि हो. कोकणात सुद्धा काही समाजात अशी प्रथा आहे. तो मांसाहाराचा नैवेद्य गौरीसाठी आणि तिच्या सोबत आलेल्या राक्षस गणासाठी असतो अशी काहीतरी कथा आहे. गणपती आणि गौरीच्या मध्ये पडदा ठेवला जातो ज्यामुळे दोन्ही नेवैद्य वेगळे राहतील.

Chat gpt झिंदाबाद

दक्षिण कोकण / तळकोकण — सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या काही भागांत ही परंपरा ठळकपणे आढळते. सिंधुदुर्गातील काही ठिकाणी गौरीला मटणाची सागोती, वडे असा नैवेद्य देण्याचा उल्लेख आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील काही गावांमध्येही गौरीच्या दुसऱ्या दिवशी 'तिखटा' म्हणजे मांसाहारी नैवेद्य करण्याची परंपरा असल्याचे संदर्भ आहेत.

उत्तर कोकणात, उदा. उरण परिसरात, विशेषतः कोळी समाजातील काही कुटुंबांमध्ये चिंबोरी, मासे, मटण, चिकन इत्यादींचा नैवेद्य करण्याची प्रथा आढळते.

ऋ,
माझा पेशन्स कमी असल्याने पुर्ण वाचले नाही पण रीळ आता पाहिलय. ते गाणं मस्तय.

विशेषतः कोळी समाजातील काही कुटुंबांमध्ये चिंबोरी, मासे, मटण, चिकन इत्यादींचा नैवेद्य करण्याची प्रथा आढळते.>> ही प्रथा ckp मधेही आहे. गौरी च्या नेवेद्याला. आणि नवरात्रात अष्टमीला.

झंपी धन्यवाद आणि रीळ बघणे जास्त महत्त्वाचे होते, त्यांना मी स्पेशल धन्यवाद देतो Wink

कारण खास या मायबोली लेखासाठी फोटो व्हिडिओ जोडून बनवली होती आणि मायबोली व्यतिरिक्त अजून कुठेच म्हणजे फॅमिली ग्रुपवर सुद्धा शेअर केली नाहीये.

>>>>>>>ही प्रथा ckp मधेही आहे. गौरी च्या नेवेद्याला. आणि नवरात्रात अष्टमीला.
होय शर्मिला Happy बरोबर.

Pages