भस्मबीज - भाग १३
पूर्वभाग
अभिजितला महिलांविरुद्धच्या वाढत्या गुन्ह्यांत भस्मबीजाच्या छायेचा प्रभाव स्पष्ट जाणवतो, तर देवप्पाचे मल्लीपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न पुन्हा अपयशी ठरतात आणि एका रक्षकाचा बळी जातो. कुटुंबासोबत सुप्याला गेलेल्या अभिजितला अनन्याच्या शेजारी रहस्यमय राखाडी आकृती दिसते, ज्यामुळे संकट आता त्याच्या घरापर्यंत पोहोचल्याची जाणीव होते. खंडोबाच्या जत्रेत त्याला ईश्वरी संकेत म्हणून मधुकेश्वर मंदिर, लपवलेला वीरगळ आणि त्यामागील गुप्त शिलालेख दिसतो. या संकेतामुळे अभिजितला पुढचा मार्ग सापडल्याची खात्री वाटते.
************************************************************************************************************************
भस्मबीज - भाग १४ - शिलालेख
"सर? ऐकताय ना?" नेहाचा आवाज पलीकडून आला.
"नेहा..." अभिजित हळू आवाजात, नजर त्या कावळ्यावरून न हटवता म्हणाला, "मी नंतर फोन करतो. आत्ता ठेवतो."
"पण सर, मामांना काय सांगू?"
"नंतर सांगतो." त्याने त्या कावळ्याकडे रोखून बघत घाईघाईने फोन कट केला,
काही वेळाने, वाड्यात परतल्यावर, अभिजितने पुन्हा नेहाला फोन लावला; यावेळी घराच्या आतल्या खोलीत, दार लावून.
"सर, आधी फोन का कट केलात?" नेहाने विचारलं, आवाजात काळजी.
"नंतर सांगतो," अभिजित म्हणाला, आवाज अजूनही सावध. "आत्ता ऐका. मामांना सांगा की मधुकेश्वराच्या मुख्य मंदिराच्या मागे उजव्या बाजूला एक उपमंदिर आहे जिथे अलीकडच्या काळात फरशी बसवण्याचे काम झालंय त्या भिंतीलगत एक वीरगळ त्याचा कोरीव भाग भिंतीच्या दिशेने उलट वळवलेला आहे आणि त्याच वीरगळाच्या अगदी मागे भिंतीच्या तळाशी एक शिलालेख आहे.
मामांना घाई करून त्याचे फोटो काढून ठेवायला सांगा. कारण हे कल्लेश्वरला कळण्याआधी आपल्याला शोधून काढायचे आहे.”
"ठीक आहे सर. मी मामांना सांगते”
फोन ठेवल्यावर अभिजित मनात चिंता दाटली की कदाचित, कल्लेश्वरचे डोळे त्याच्याही आधी तिथे पोहोचलेले असतील का?
************************************************************************************************************************
मध्यरात्र उलटून गेली होती. बनवासी गाव गाढ झोपेत होतं. रस्ते ओस पडले होते आणि मधुकेश्वर मंदिराच्या विस्तीर्ण आवारात फक्त रातकिड्यांचा किर्र आवाज अधूनमधून ऐकू येत होता.
मंदिराच्या मागच्या बाजूच्या झाडांतून तीन हांडी जोगी अलगद आत शिरले. त्यांच्या अंगावरची राख चांदण्याच्या फिकट प्रकाशात अस्पष्ट चमकत होती. तिघांनीही एकमेकांकडे पाहिलं आणि आवाज न करता मंदिराच्या भिंतीलगत पुढे सरकू लागले.
कल्लेश्वरला खात्रीशीर बातमी मिळाली होती की मधुकेश्वर मंदिरात कुठेतरी कवचाचा माग दडलेला आहे. नेमकी जागा त्याला ठाऊक नव्हती; पण मधुकेश्वर मंदिराच्या उल्लेखाने त्याचा संशय बळावला होता.
काही वेळ शोध घेतल्यानंतर त्यांना तो वीरगळ दिसला. शेकडो वर्ष ऊन-पावसात उभा, अर्धवट शेवाळलेला, पण त्याचं कोरीव काम अजूनही स्पष्ट दिसत होतं: एक योद्धा, हातात तलवार, खाली एक ओळ जुनी कन्नड लिपीत. जोग्यांपैकी एकाने त्याच्यावर हात फिरवला. "हेच असेल," तो म्हणाला, अनिश्चित आवाजात. दुसरा म्हणाला. "घे उचलून. जास्त वेळ थांबू नका, चला."
तिघांनी मिळून वीरगळ हलवण्याचा प्रयत्न केला. दगड अपेक्षेपेक्षा कितीतरी जड होता. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर शेवटी तो जमिनीतून हलला. मातीचा मोठा ढिगारा बाजूला झाला आणि दगड मुळापासून सुटला.
"लवकर!"
तिघांनी मिळून तो वीरगळ उचलला आणि अंधारात एका पिकअपमध्ये टाकून गावाबाहेर सटकले.
सकाळी बनवासीत गलका उडाला. मंदिराच्या पुजाऱ्याने जागा रिकामी बघितली आणि हादरलाच...वीरगळ रातोरात गायब! त्याने लगेच पोलिसात तक्रार दिली. "पुरातन वस्तूची चोरी" म्हणून प्रकरण गंभीर झालं; स्थानिक पुरातत्व खात्यालाही कळवण्यात आलं. गावात कुजबुज सुरू झाली. कोणीतरी जुनी काळी जादू करण्यासाठी नेला असेल असे काही जणांचं मत होतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी मामांची गाडी मंदिराजवळ थांबताच त्यांना जाणवलं, काहीतरी बिनसलंय. मंदिराच्या आवारात नेहमीपेक्षा जास्त गर्दी, पोलिसांची जीप दारातच उभी, आणि आतबाहेर करणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता.
"काय झालं?" मामांनी जवळच्या एका माणसाला विचारलं.
"वीरगळ चोरीला गेला रात्री," तो म्हणाला, आवाजात संताप आणि आश्चर्य दोन्ही. "शेकडो वर्षे इथे होता, आणि रातोरात गायब! पोलीस चौकशी करतायत."
मामांच्या पोटात एकदम खड्डा पडला. "आत जाता येईल का?" त्यांनी विचारलं, शक्य तितक्या सहज आवाजात.
"आज नाही साहेब," दारातल्या हवालदाराने हात आडवा करत सांगितलं. "पंचनामा चाललाय. उद्या बघू."
मामा तिथेच घुटमळत राहिले, आत डोकावण्याचा एक क्षणिक प्रयत्नही करून बघितला पण हवालदाराची करडी नजर बघून माघार घेतली. कुठला वीरगळ नेला हे आतून बघितल्याशिवाय कळणं अशक्य होतं. आणि आज ते शक्य नव्हतं.
मामाने ही बातमी नेहाला आणि मग नेहाने अभिजीतला सांगितली.
"आणि आता?" त्याने निराशा दाबत विचारलं .
"मामा उद्या परत जाणार आहे, तोपर्यंत कदाचित मंदिरात प्रवेश सुरु करतील."
फोन ठेवल्यावर अभिजित बराच वेळ स्तब्ध बसून राहिला. दोन शक्यता त्याच्या डोक्यात घुमत होत्या. एक ज्यात आशेचा किरण होता आणि एक ज्यात... सगळंच हातातून निसटल्यासारखं वाटत होतं. आणि त्या दोन्हींमधला फरक फक्त एका दिवसाच्या प्रतीक्षेवर अडकला होता.
************************************************************************************************************************
दुसऱ्या दिवशी सकाळी आजी आणि मामा दोघेही एकत्र निघाले. मामांनी कालचा अनुभव सांगितल्यावर आजीच म्हणाली होती, "एकटा जाशील तर पुन्हा संशय येईल. काल हवालदाराने बघितलं असेल तुला, आज परत तूच एकटा गेलास, अस्वस्थ चेहऱ्याने विचारत फिरलास, तर लक्ष वेधून घेशील उगाच. आपण दोघं जाऊ, देवदर्शनाला आलोय असं वाटेल"
बनवासीला पोचल्यावर परिस्थिती काल इतकी तंग नव्हती. पोलिसांची जीप अजून उभी होती, पण गर्दी कमी झाली होती; पंचनामा आटोपला असावा. आजी आणि मामा हळूहळू अगदी सामान्य भाविकांसारखे मंदिराच्या आवारात शिरले, हातात फुलं, नारळ, जणू निव्वळ दर्शनासाठीच आलेत.
मुख्य मंदिरात एक फेरी मारून, अगदी सहज पावलांनी ते मागच्या बाजूला वळले. उपमंदिराजवळ पोचताच त्यांच्या छातीत धडधड वाढू लागली आणि कोपऱ्यातला तो तोंड भिंतीकडे वळवलेला वीरगळ अजूनही जागच्या जागी होता हे पाहून त्यांनी सुटकेचा निःस्वास टाकला.
कालचा चोरीचा थरार मंदिरासमोरील वडाखालच्या वीरगळापुरताच मर्यादित राहिला होता.
मामांनी इकडे-तिकडे नजर फिरवली, जवळपास कुणी नव्हतं. त्यांनी हळूच फोन काढला आणि एकामागून एक फोटो काढायला सुरुवात केली; वीरगळाचा कोरीव भाग, त्याच्या मागचा शिलालेख, वेगवेगळ्या कोनांतून, प्रकाश नीट पडेल असं बघत. आजी शेजारी उभी राहून लक्ष ठेवत होती, कुणी येताना दिसलं तर इशारा द्यायला.
"झालं," मामा हलक्या आवाजात म्हणाले, फोन खिशात टाकत. "आता निघू आपण, जास्त वेळ थांबणं बरं नाही."
गाडीत बसल्यावर आजीने ते फोटो बघायला मागितले. शिलालेखावरची अक्षरं बघताच तिचा चेहरा किंचित उतरला. जुनी, वळणदार कन्नड लिपी, तिच्या मोडी-मराठीच्या ज्ञानाच्या कक्षेबाहेरची.
"हे मला वाचता येणार नाही, याला डॉ. हेगडेच हवेत." ती म्हणाली.
मामांनी गाडी सुरू करत विचारलं, "कोण डॉ. हेगडे?"
"रामचंद्र हेगडे," आजी म्हणाली, नजर अजूनही फोनच्या स्क्रीनवर खिळलेली. "धारवाडच्या पुरातत्व खात्यात होते. काही वर्षांपूर्वी एक मराठी मोडी कागदपत्र वाचायला मी त्यांना मदत केली होती, तेव्हापासून ओळख आहे. जुनी कन्नड मोडी लिपी वाचणारी फार थोडी माणसं उरलीयेत आता, ते त्यातले एक आहेत."
तिने फोन उचलला आणि डॉ. हेगडेंचा नंबर शोधू लागली, हात किंचित थरथरत होते. इतक्या वर्षांनी संपर्क साधण्याच्या संकोचाने, की आतल्या एका अनामिक भीतीने, हे तिलाही नीट सांगता येत नव्हतं.
डॉ. हेगडेंचा नंबर सापडताच आजीने फोन लावला. रिंग वाजत राहिली' एक, दोन, तीन वेळा आणि मामांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता वाढतच गेली, जणू या एका फोनवर बरंच काही अवलंबून आहे याची त्यांनाही जाणीव झाली होती.
चौथ्या रिंगला पलीकडून एक करडा, वयस्क आवाज आला. "हॅलो?"
"डॉ. हेगडे?" आजीचा आवाज किंचित कापरा. "मी... सुलक्षणा भागवत बोलतेय. आठवतंय का? कुमठ्याची.
क्षणभर शांतता. मग तो आवाज हलकासा उजळला. "अरे, सुलक्षणाताई! किती वर्षांनी! बऱ्या आहात ना? अचानक आठवण काढलीत..."
"बरी आहे," आजी म्हणाली, आणि मग जरा घुटमळत पुढे बोलली. "डॉक्टर, तुमची एक मदत हवी होती. जुन्या कन्नड मोडी लिपीतला एक शिलालेख आहे फोटो आहेत माझ्याकडे. लिप्यंतर करून मिळेल का?"
"शिलालेख? कुठला?" आवाजात आता व्यावसायिक उत्सुकता डोकावली.
आजीने एक क्षण मामांकडे बघितलं. काय सांगायचं, किती सांगायचं हा प्रश्न तिच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होता. शेवटी ती जपून बोलली: "बनवासीच्या मधुकेश्वर मंदिरातला. एका वीरगळामागचा. जुना...कदाचित मध्ययुगीन असेल."
"बनवासी..." डॉ. हेगडे विचारात पडल्यासारखे बोलले. "तिथे बरेच शिलालेख आहेत माहितेय मला, विजयनगरकालीन हरिहर राजाचा दानपत्राचा लेख, कदंबकुळातला एक उइक्कीदेवाला दिलेल्या दानाचा लेख, वोडेयांच्या घराण्याबद्दलचे काही उल्लेख... पण वीरगळामागचा, म्हणालात?" त्यांच्या आवाजात एक बारीकसा गोंधळ जाणवला. "तो तर आमच्या नोंदींमध्ये नाहीये मला वाटतं. कुठे आहे नक्की?"
आजीच्या हातातला फोन किंचित घट्ट झाला. "मुख्य मंदिराच्या मागच्या उपमंदिराजवळ. भिंतीलगत."
"बरं, पाठवा फोटो. बघतो काय करता येईल ते. पण सुलक्षणाताई एक विचारू का? हे इतकं तातडीचं का वाटतंय तुम्हाला? आवाजात काळजी जाणवतेय. असो...फोटो पाठवा. आजच बघतो, वेळ मिळेल तसा."
"धन्यवाद, डॉक्टर."
गाडी गावाबाहेर पडत असताना आजीने फोटो व्हॉट्सअॅपवरून डॉ. हेगडेंना पाठवले, वीरगळाचा कोरीव भाग, शिलालेखाचे जवळून घेतलेले तीन-चार फोटो, वेगवेगळ्या कोनांतले. मेसेज पाठवताच तिने फोन मांडीवर ठेवला आणि खिडकीबाहेर बघत राहिली. शेतं, ताडाची झाडं मागे पळत होती, पण तिचं मन कुठेतरी दुसरीकडेच अडकलं होतं. त्या रात्री, कुमठ्याच्या घरी, आजी लवकर झोपायला गेली तरी झोप लागेना. डोक्यात सारखं तेच घुमत होतं.
************************************************************************************************************************
डॉ. हेगडेंकडून प्रतिसाद यायला तीन दिवस लागले. मधल्या काळात घरात एक अस्वस्थ शांतता पसरली होती; आजी वरचेवर फोन तपासत राही.
तिसऱ्या दिवशी संध्याकाळी आजीचा फोन वाजला. स्क्रीनवर डॉ. हेगडेंचं नाव बघताच तिने घाईघाईने घेतला.
"सुलक्षणाताई," त्यांचा आवाज यावेळी वेगळाच वाटला, थकलेला, पण त्याच वेळी उत्साहीही. "काम पूर्ण झालं, पण हे इतकं सोपं नव्हतं. काही अक्षरं इतकी घासलेली होती...जवळजवळ अकरा तास लागले मला."
"मिळालं का काही?" आजीचा आवाज उत्सुकतेने कापत होता.
"मिळालं," डॉ. हेगडे म्हणाले, "पण सुलक्षणाताई, हे लिहिलेलं जे आहे ना... हा साधासुधा शिलालेख नाही, हा शके १५४२ चा म्हणजे इसवी सन १६२० ला कोरलेला शिलालेख आहे. यात एका तृतीयपंथी साधकाच्या आत्मत्यागाचा उल्लेख आहे कुणालातरी वाचवण्यासाठी दिलेला बळी. आणि नाव कुठेच नाही फक्त एक ओळ आहे, 'नाम न ज्ञायते, कर्म एव स्मर्यते."
आजीच्या हातातला फोन थरथरला. मामांनी तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून जवळ सरकत विचारलं, "काय म्हणाले?"
आजीने हाताने त्यांना थांबवलं, फोन कानाला घट्ट धरत. "आणि पुढे, डॉक्टर?"
"पुढे एक श्लोक आहे," डॉ. हेगडे म्हणाले, "लिपी कन्नड मोडी असली तरी संस्कृत भाषा, पाठवतो तुम्हाला मेसेजवर.”
डॉ. हेगडेंकडून पुढचा मेसेज आला. आजीने तो उघडताच मामाही जवळ सरकले, दोघांचं डोकं एकाच स्क्रीनवर वाकलं. "सुलक्षणाताई, हा राहिला मजकूर, जसाच्या तसा, माझ्या समजुतीसह.
रक्तपुष्पप्रवाहान्तः शिलासंघे सहस्रधा ।
स्वस्वामिमुखाः सर्वे वृषभाः, एकस्तु प्रातिलोमुखः ॥
तस्याधस्तात् करतलमात्रं स्वदत्ताग्निसमुद्भवम् ।
मन्त्रसंकीर्णं दुर्लभं भस्मशैलं तदाश्रितम् ॥
ढोबळ अर्थ सांगतो, " रक्तपुष्पप्रवाहात हजारो शिळा आहेत. त्यात असलेले सगळे बैल आपापल्या स्वामीच्या दिशेला तोंड करून आहेत फक्त एक सोडून, ज्याचं तोंड उलट दिशेला आहे. त्या एकाच्या पायाखाली, तळहाताच्या आकाराचं, स्वतःच्या अग्नीतून जन्मलेलं, मंत्रांनी भारलेलं, दुर्मीळ असं 'भस्मशैल' आहे."
मामांनी तो श्लोक पुन्हा वाचला, जणू पाठ करत आहेत. "पण रक्तपुष्पप्रवाह म्हणजे कुठली नदी? आणि हजारो दगडांत एक बैल उलटा. हे कुठे शोधायचं?"
************************************************************************************************************************
रात्र अजून गडद होत चालली होती. हळुवार वाऱ्याच्या झोतावर झाडांच्या उंच फांद्या हळूहळू हलत होत्या. दूरवरून एखादा अनोळखी आवाज उठायचा आणि क्षणात पुन्हा सगळं जंगल भयाण शांततेत बुडून जायचं. त्या काळोखात स्वतःच्या श्वासाचाही आवाज मोठा वाटत होता.
देवप्पा दारात उभा होता. हातात पितळी मूठ असलेली जुनी काठी होती तिच्या टोकाला एक छोटी घंटा आणि पूर्ण काठीवर कोरलेली गुप्त भाषेतील मंत्राक्षरं. त्याची नजर अंधारावर खिळलेली होती. गरुडाने आधीच इशारा दिला होता…आज रात्री धोका आहे.
यल्लाप्पा त्याच्या शेजारी सहा-सात धर्म-शास्त रक्षकांसह उभा होता. सर्वांनी पांढरी वस्त्रं परिधान केली होती, कपाळावर टिळे होते आणि त्यांच्या हातातल्या तलवारींवर मशालींचा थरथरता प्रकाश पडत होता.
जंगलाच्या अगदी आतून अस्पष्ट आवाज आला, हळूहळू त्याची लय स्पष्ट होऊ लागली. दूरवरून पावलांचा संथ आवाज ऐकू येऊ लागला. एकसारख्या अंतराने पडणारी ती पावलं हळूहळू जवळ येत होती; पण अंधारात अजूनही कुणीच दिसत नव्हतं. आवाज जवळ येत होता, मात्र त्याच्या दिशेचा अंदाजच लागत नव्हता.
देवप्पाने नजर अंधारावर रोखली. आणि मग हवेत एक उग्र वास पसरला, जळलेल्या केसांचा आणि कुजलेल्या मांसाचा. काही रक्षकांनी नकळत नाक झाकलं. यल्लाप्पाने तलवारीची मूठ घट्ट पकडली.
अंधाराच्या पडद्याआड काही सावल्या हलल्या आणि पुढच्याच क्षणी आठ हांडी जोगी झाडांच्या सावल्यांतून बाहेर आले. अंगावर राखेचे थर, गळ्यात हाडांच्या माळा…त्यांच्या मागून पाच-सहा पिशाच्च जमिनीवरून सरकत बाहेर आली. अंगावर मांस आहे की केवळ काळी सावली, हे दूरून ओळखू येत नव्हतं. केस मोकळे आणि विस्कटलेले, डोळे खोल गेलेले आणि त्यांच्या पांढऱ्या बुबुळांत विचित्र स्थिरता होती. त्यांच्या पावलांचा जमिनीवर कोणताही आवाज होत नव्हता, पण ती जवळ येताच अंगावर अचानक शहारा उठत होता. त्यांच्या अंगाभोवती कुजलेल्या मातीचा आणि जुन्या चितेच्या राखेचा वास दरवळत होता. कधी त्यांचा आकार माणसासारखा दिसे, तर पुढच्याच क्षणी अंधारात ते केवळ सावल्यांसारखे भासत.
"देवप्पा" एक जोगी गुरगुरला, "आज तुला कळेल बाबांचा क्रोध काय असतो." आणि पुढच्याच क्षणी अंधारातून मृत्यूच जणू त्यांच्यावर चालून आला.
धर्म-शास्त रक्षक एकाच वेळी पुढे झेपावले. तलवारी म्यानातून बाहेर आल्या आणि त्यांच्या खणखणाटाने रात्रीची शांतता क्षणात भंगली. यल्लाप्पाचा पहिलाच वार एका जोग्याच्या खांद्यावर बसला आणि त्याच्या तोंडून एक कर्कश किंकाळी बाहेर पडली.
पण तो खाली पडण्याआधीच दुसरे जोगी त्याच्यावर तुटून पडले. तीन जोगी मिळून एका रक्षकाला जमिनीवर दाबत होते, तर उरलेले रक्षक तलवारी फिरवत त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होते.
देवप्पा इथे वेगळीच लढाई लढत होता. चार पिशाच्च चार दिशांनी त्याच्याकडे सरकत होती, कधी जमिनीवरून सावल्यांसारखी सरकत होती, तर पुढच्याच क्षणी झाडाच्या खोडावर चढून त्याच्यावर झेपावत होती. त्यांच्या हालचालींमध्ये माणसाचा कोणताही नियम नव्हता. एक क्षण त्या दूर दिसत, तर दुसऱ्याच क्षणी त्यांची काळी आकृती अगदी जवळ येऊन उभी राहत होती.
देवप्पाने काठी दोन्ही हातांनी घट्ट पकडली. पहिलं पिशाच्च अचानक त्याच्यावर झेपावलं.
मंत्राचा शेवटचा उच्चार होताच काठीवर कोरलेली मंत्राक्षरं अचानक थरथरू लागली. क्षणभर ती केवळ कोरीव अक्षरं नव्हती; जणू त्यांच्यात कुठलीतरी सुप्त शक्ती जागी झाली होती. एकेक अक्षर मंद शुभ्र प्रकाशाने धगधगू लागलं आणि त्या प्रकाशाची लय देवप्पाच्या मंत्रोच्चाराशी जुळत गेली.
पुढच्याच क्षणी त्या जिवंत झालेल्या अक्षरांतून तेजस्वी प्रकाश उसळला आणि काठीच्या पितळी मुठीतून शुभ्र, तीव्र झोत बाहेर पडला. तो प्रकाश हवेत वळला आणि क्षणार्धात तलवारीच्या पात्यासारखा त्या पिशाच्चाकडे झेपावला. प्रकाश त्याच्या देहातून आरपार गेला.
पिशाच्च हवेतच थिजल्यासारखं झालं. त्याच्या तोंडातून एक भेदक किंकाळी फुटली आणि पुढच्याच क्षणी त्याचा देह काळसर राख होऊन कोसळला.
उरलेली तीन पिशाच्च आता आणखी चवताळली होती. त्यांनी हळूहळू देवप्पाला तीन बाजूंनी घेरलं.
"देवप्पा! मागे!" यल्लाप्पाचा आवाज रणधुमाळीतून घुमला, तो त्याच्या समोरच्या दोन जोग्यांशी झुंजत होता.
देवप्पाने मागे उडी घेतली, पण जरा उशीर झाला. एका पिशाच्चाच्या नखांनी त्याच्या दंडावर खोल रेघ ओढली. रक्त उसळलं. वेदनेची तीव्र लाट संपूर्ण हातातून वर चढली, पण देवप्पाने काठीची पकड ढिली होऊ दिली नाही.
त्याने रक्ताळलेल्या दंडाकडे एक क्षण पाहिलं आणि मग डोळे मिटले. त्याच्या ओठांवरून यावेळी अधिक गंभीर, खोल स्वर उमटला, "ॐ ह्रीं मोहिन्यै महाशक्त्यै, दुष्टसंहारिण्यै फट्!"
शेवटचा "फट्!" उच्चारताच देवप्पाने काठी जमिनीवर आपटली.
क्षणार्धात काठीच्या पितळी मुठीतून शुभ्र प्रकाशाचा प्रचंड स्फोट झाला. तो प्रकाश इतका तीव्र होता, की क्षणभर संपूर्ण अंगण दुपारच्या उजेडासारखं झळाळून निघालं.
देवप्पाने काठी स्वतःभोवती फिरवली आणि त्या प्रकाशाने त्याच्याभोवती एक तेजस्वी वर्तुळ निर्माण झालं. त्यातून सतत सूक्ष्म स्पंदन उठत होतं, जणू एखादी अदृश्य शक्ती त्याची सीमा राखून उभी होती.
तीनही पिशाच्च त्या सीमेजवळ येताच मागे फेकली गेली. त्यांच्या तोंडून एकाच वेळी कर्कश किंकाळी फुटली. त्या प्रकाशाच्या पलीकडे त्या गुरगुरत राहिल्या, पण त्याला स्पर्श करण्याचं धाडस त्यांना होत नव्हतं.
पलीकडे यल्लाप्पाची तलवार पुन्हा एकदा चमकली. त्याच्या सलग वारांनी आणखी दोन जोगी जखमी झाले. उरलेले तीन जोगी काही क्षण प्रतिकार करत राहिले, पण समोरची परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर गेली होती. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि हळूहळू मागे सरकायला सुरुवात केली.
"मागे हटा!" त्यांच्यापैकी एक अखेर ओरडला. त्याच्या आवाजात आता भीती होती.
क्षणात ते अंधारात विलीन झाले. आता अंगणात फक्त देवप्पा, यल्लाप्पा आणि उरलेले धर्म-शास्त रक्षक होते. आणि त्या प्रकाशाच्या वर्तुळात अडकलेली तीन पिशाच्च.
ती तिघंही वर्तुळाभोवती फिरत होती. कधी गुरगुरत, कधी दात विचकत, तर कधी अचानक प्रकाशाच्या सीमेकडे झेपावत होती; पण प्रत्येक वेळी अदृश्य शक्तीने त्यांना मागे फेकलं जात होतं.
देवप्पाने डोळे मिटले. दंडावरून रक्त अजूनही ठिबकत होतं, पण त्याचं भान त्याला नव्हतं. त्याने काठी दोन्ही हातांनी घट्ट पकडली आणि पुन्हा मंत्राचा जप सुरू केला. प्रत्येक आवर्तनागणिक त्याचा स्वर अधिक गंभीर होत गेला आणि त्याच्यासोबत काठीभोवतीचं प्रकाशाचं वलयही अधिक प्रखर होत गेलं.
हळूहळू तो प्रकाश वर्तुळाच्या पलीकडे पसरू लागला. त्याने देवप्पाभोवती वळसा घेतला, वर उंच गेला आणि क्षणभर आकाशात स्थिरावला. त्या तेजस्वी प्रकाशाने एक अस्पष्ट स्त्रीरूप आकार घेतला.
आकार पूर्ण होताच तिन्ही पिशाच्च एकाच वेळी मागे सरकली. त्यांच्या तोंडून एक भेदक किंकाळी फुटली. क्षणभर त्यांच्या काळ्या देहांभोवती धुराचे वलय उठले आणि पुढच्याच क्षणी तिन्ही पिशाच्च राखेच्या तीन लोटांसारखी हवेत विरून गेली.
अंगणात अचानक शांतता पसरली. मशालींचा ज्योतीचा तडतडाट, जखमी रक्षकांचे धापा टाकणारे श्वास आणि दूर अंधारात नाहीसे होत जाणाऱ्या जोग्यांच्या पावलांचा क्षीण आवाज एवढंच उरलं होतं.
देवप्पाने हळूहळू डोळे उघडले. मोहिनीचं ते दिव्य रूप अजूनही क्षणभर त्याच्या समोर होतं. मग प्रकाश हळूहळू विरला आणि अंगण पुन्हा अंधार मय झालं..
देवप्पा हळूहळू गुडघ्यावर कोसळला. दंडावरची जखम अजूनही ठिबकत होती आणि अंगातली सगळी शक्ती जणू त्या मंत्रासोबतच निघून गेली होती. यल्लाप्पा धावत त्याच्याजवळ आला आणि त्याला आधार देत म्हणाला, "देवप्पा! ठीक आहेस?"
देवप्पा कसाबसा श्वास घेत म्हणाला, " हो, मी ठीक आहे...काही झालं नाही." त्याच्या ओठांवर थकलेलं, हसू उमटलं. "पण हा फक्त इशारा होता"
यल्लाप्पाने त्याच्याकडे पाहिलं. "मग आता?"
देवप्पा हळूहळू उभा राहिला. जखमेची वेदना होत असूनही त्याने स्वतःला सावरलं आणि दूरवर पसरलेल्या अंधाऱ्या जंगलाकडे पाहत राहिला. त्या काळोखाच्या पलीकडे, कुठेतरी त्या पडक्या देवळात, कल्लेश्वरला आज रात्री जे घडलं ते कळलं असणार, याची त्याला खात्री होती.
"तो शांत बसणार नाही," देवप्पा म्हणाला. "आज त्याचा डाव फसला आहे. त्यामुळे पुढचा वार यापेक्षा भयंकर असेल."
"आणि जेव्हा खरी लढाई सुरू होईल, तेव्हा ही काठी, हा मंत्र... कदाचित पुरेसा ठरणार नाही."
त्याने आकाशाकडे पाहिलं. त्याचा गरुड अजूनही काळोखात उंच घिरट्या घालत होता. देवप्पाच्या चेहऱ्यावरचा थकवा आता नाहीसा झाला होता. त्याजागी एक गंभीर चिंता होती.
"तेव्हा अभिजित लागेल, यल्लाप्पा."
यल्लाप्पाने त्याच्याकडे पाहिलं. देवप्पाचा आवाज आणखी गंभीर झाला.
"पण तोपर्यंत अभिजितला पूर्ण तयार व्हावं लागेल. त्याला स्वतःची शक्ती कळली पाहिजे... आणि ती कशी वापरायची, हेही."
अ फा ट!!!!! पण आता प्रतीक्षा
अ फा ट!!!!! पण आता प्रतीक्षा करता येत नाहीय!! पु. भा. ल. टा.!
अ फा ट!!!!! पण आता प्रतीक्षा
अ फा ट!!!!! पण आता प्रतीक्षा करता येत नाहीय!! पु. भा. ल. टा.!
प्रत्येक भाग अजूनच जास्त गडद
प्रत्येक भाग अजूनच जास्त गडद होत चालला आहे.
कथा उत्तम फुलवली आहे, डिटेल्स वर खूप लक्ष दिले आहे हे जाणवते.
वा !
वा !
देवप्पाच्या तोंडी “मोहिनीमंत्र” असणे फार सूचक आहे, चपखल उपयोग. Simply Brilliant !
पुराणातल्या कथेत विष्णूचे मोहिनीरूप, (तो पुरुषच आहे हे नक्की माहित असूनही) शिवाचे मोहिनीवर भाळून कामविव्हळ होणे, त्यांची queerish कामक्रिडा- मुखमैथुन, त्यातून सांडलेल्या वीर्यातून पुढे सप्त जलचरी कन्यांकडून स्कंदाचा जन्म वगैरे पसाऱ्यातून तुम्ही इथे मोहिनीचा सुयोग्य reference/ metaphor वापरला. तृतीयपंथी / Queer/ gender binary च्या बाहेरच्या प्रेमी जिवांची कथा असल्याने हे असे सुचणे फारच उच्च प्रतिभेचे लक्षण.
स्कंदकथेत शिवाचे रेत धवलशुभ्र तेजस्वी वगैरे असे डीटेलिंग असल्याने मंत्रशक्तीने शुभ्र प्रकाश पडला हे ही very appropriate !
सिरसीला कुठल्याश्या नदीपात्रात शेकडो दगडी शिवलिंगे आहेत असे ऐकले होते. डॉ हेगडेंनी कूटप्रश्नात “बैल” सांगितलेत, म्हणजे नंदी ?
एक क़बुली:
एक क़बुली:
ह्या जॉनरच्या कथांची आवड नसूनही फक्त तुमच्या compact, चित्रदर्शी कथातंत्रासाठी आणि detailing skills साठी वाचतोय.
कथेच्या शीर्षकानीच खेचून घेतले. देवीपुराणातला व्हिलन रक्तबीज तसा इथे भस्मबीज 👍
हा भाग सुद्धा छान
हा भाग सुद्धा छान
मस्त चालली आहे कथा. वाचायला
मस्त चालली आहे कथा. वाचायला मजा येतेय. डीटेलिंग छान!
ख त र ना क!
ख त र ना क!
व्वा व्वा व्वा
व्वा व्वा व्वा
जबरदस्त.
काय डिटेलिंग आहे. अभ्यास जबरी आहे तुमचा.
वातावरण निर्मितीदेखील जबरदस्त.
अनिंद्य यांच्या पहिल्या पोस्टला मम.
आता आणखी वाट बघायला लावू नका.
पटापट पुढील भाग टाका.
सिरसीला कुठल्याश्या नदीपात्रात शेकडो दगडी शिवलिंगे आहेत असे ऐकले होते. डॉ हेगडेंनी कूटप्रश्नात “बैल” सांगितलेत, म्हणजे नंदी ?>>>> शाल्मला नदी.
इथे नदीपात्रात हजारो शिवलिंगे आहेत. काही शिवलिंगासमोर नंदी पण आहे. त्यातील एखादा नंदी विरुद्ध दिशेला असल्यास त्याखाली काहीतरी सापडेल का?.
टाका लवकर पुढचा भाग..
व्वा व्वा व्वा
.
काय भारी डिटेलिंग आहे, मस्तच!
काय भारी डिटेलिंग आहे, मस्तच!
अनिंद्य आणि ऋतुराज... तुमचे प्रतिसादही माहितीपूर्ण.
जरा वेळ लागला तरी चालेल पण आता कथेने जी उंची पकडली आहे ती सोडू नका
जबरदस्त लिहिले आहे. फक्त एक
जबरदस्त लिहिले आहे. फक्त एक गोष्ट खटकत राहतेय. मधे मधे आठवडा गेला, महिना गेला असे उल्लेख आहेत - ह्या कालावधी मधे काहीच होत नाहिये. कल्लेश्वरला जर अभिजित नि देवप्पाला थांबवायचे असेल अर तो मधे असा शांत कशाला बसेल.
नवीन भागाची वाट पाहत आहे...
नवीन भागाची वाट पाहत आहे...
@अनिंद्य मोहिनीमंत्र,
@अनिंद्य मोहिनीमंत्र, मोहिनीचा पुराणातील संदर्भ आणि कथेतल्या लैंगिक द्वैताच्या पलीकडच्या व्यक्तिरेखांशी त्याचा साधलेला संबंध तुम्ही किती बारकाईने हेरलात.
शिवाचे मोहिनीवर भाळून कामविव्हळ होऊन शिवाचे वीर्य जिथे जिथे पडले, तिथे शिवलिंगक्षेत्रं आणि सोन्याच्या खाणी निर्माण झाल्या असे भागवत पुराणात सांगितले आहे.
@ऋतुराज. तुमचा अंदाज बरोबर आहे.
इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्या प्रतिसादकांचे मनापासून धन्यवाद!