आइसलँड. नाव ऐकलं तरी अंगात कुडकुडा भरतो. हे पृथ्वीवरचं ठिकाण नाहीच, हे पटवून देणारे आइसलँडचे सौंदर्य आहे, हे मी अनेकदा ऐकलेलं. पण मी जर्मनीतल्या उन्हाळ्यातही गारठणारा माणूस. मग मी अजून कुडकुडायला कशाला बरं जाईन आइसलँडला? पण तिथल्या निसर्गसौंदर्याची स्तुती ऐकून, अखेर रहावलं नाही. इतकी वर्षं युरोपमध्ये राहून थंडी सोसायची थोडीफार सवयही झाली आहे. म्हणून शेवटी ठरवलं आणि आइसलँडसाठी हनुमान-झेप घेतली. चोवीस मे रोजी, मी, माझा भाऊ आणि माझी बायको - असं आमचं राम, लक्ष्मण आणि सीतेचं त्रिकुट बारा दिवसांसाठी आइसलँडला पोहोचलं.
मी जेव्हा पहिल्यांदा जर्मनीचा उन्हाळा अनुभवला तेव्हा आमच्या शेजारच्या आजोबांनी दाखवलेला एक फोटो मला आठवला. मी तेव्हा शाळेत होतो. ते अमेरिकेचा दौरा करून परतलेले. त्यांनी आपल्या बायकोचा काढलेला एक छापील फोटो मला दाखवला. त्यांनी विचारलं, “या फोटोत किती वाजले असतील सांग?” उन्हाची दिशा तिरपी आणि रंग सोनेरी होता. या माझ्या तीक्ष्ण निरीक्षणाचा मला भलताच आनंद झाला. मी ठामपणे म्हणालो, “सहा साडेसहा वाजले असतील”. ते हसले. म्हणाले, “रात्रीचे साडेनऊ वाजून गेलेले”. इतक्या उशिरा इतकं ऊन कसं काय असू शकतं? मला त्यांचं बोलणं साफ खोटं वाटलं. इतकं खोटं की बारा-पंधरा वर्षांनंतरही मला त्याची जर्मनीत आठवण झाली. पण ते मुळीच खोटं बोलत नव्हते. जर्मनीत मी सूर्यास्त रात्री साडेनऊ वाजता झालेला पाहिला आणि थक्क झालो. मला भूगोलाचे धडे व्यवस्थित मिळाले नव्हते का मी शाळेत झोपा काढत होतो, असा मला प्रश्न पडला. अजून गंमत म्हणजे, सूर्यास्तानंतर लगेच अंधारही होत नाही. चहासाठी आलेले पाहुणे रात्रीच्या जेवणानंतरही रेंगाळत राहावेत, तसा एक-दिड तास आकाशात प्रकाश रेंगाळत असतो.
उन्हाळ्यात आइसलँडमध्ये कधी अंधारच होत नाही म्हणे. सूर्यास्त मध्यरात्रीनंतर होतो आणि पुन्हा दोन-अडीच वाजता सूर्योदय. आणि मधल्या अडीच तासाच्या कालावधीत पुन्हा ते आकाशात रेंगाळणारे पाहुणे. आइसलँडला जाताना आमचा फक्त वरवरचा कार्यक्रम ठरलेला. कॅम्पिंग-व्हॅन भाड्याने घेतली असल्यामुळे उत्स्फूर्त सहली करायला वाव होती. एक गोष्ट मात्र मला आवर्जून बघायची होती, ती म्हणजे मध्यरात्रीनंतरचा सूर्यास्त. पण आइसलँडमध्ये सतत मळभ दाटलेले असते. ते त्यासाठी कुप्रसिद्ध आहे. यामुळे आपली इच्छा पूर्तीस जाईल की नाही, हा संकोच आधीपासूनच मनात होता.
आइसलँड हा देश खरंच जगावेगळा आहे. विमानतळावरून आम्ही गाडी घेऊन निघालो. तिथून जो ‘वाह! वाह!’ चा जप सुरू झाला, तो अगदी शेवटपर्यंत. जसं हवेच्या असंख्य पोकळीतून अचानक धुके जन्माला येते, तसंच जमिनीच्या अदृश्य छिद्रांतून दाट पांढऱ्या वाफेचे ढग जन्माला येताना दिसतात. पृथ्वीच्या गर्भातून एका वर्षापूर्वी जन्मलेला लावारस नवजात बाळासारखा तांबडा आणि उष्ण होता आणि अजूनही वाफळत असताना आम्ही पाहिला. भू-उष्णतेने नैसर्गिक रित्या तापलेल्या नदीत आणि धबधब्यात आम्ही अंघोळ केली. खूप दूर थांबून बघताना भीती आणि आदर वाटवा असे डझनभर गरजणारे रुद्र धबधबे आम्ही बघितले. काळ्या रेतीच्या वाळवंटाला आलिंगणारा गार समुद्र, षटकोनी खांबांचे भव्य डोंगरकडे, हजारो वर्षांचे अनुभवी हिमनग आणि या सर्वांना विनम्र अभिवादन करत चाललेली वळणा-वळणाची वाट, जी पूर्ण बेटाला रिंगण घालीत होती. तिच्या अद्भुततेला ना सुरुवात होती ना अंत.
कॅम्पिंग-व्हॅन मधलं जीवन सोपं होतं. सकाळी उठलो की मागे पसरवलेली गादी गुंडाळायचो आणि सामान आवरून ठेवायचो. जिथे कुठे जाऊ तिथे आमचा संसार आमच्या बरोबर यायचा. बारा दिवस ना कुठलं घर, ना कुठली काळजी. थंडी असो किंवा पाऊस, आमच्या भटकेपणाला विराम नव्हता. ऐकल्याप्रमाणे आम्हाला सहसा पाऊस आणि मळभ लाभले. मध्येमध्ये ऊन यायचं. पण ते कधीच संपूर्ण दिवस टिकलं नाही. टिकलंच, तर कधी अबाधित सूर्यास्त बघायची सोय नव्हती. बघता बघता पाच दिवस निघून गेले. त्यानंतर परिस्थिती अजूनच चिघळली. तापमान पंधरावरून घसरून अगदी शून्य अंश सेल्सिअसला पोहोचलं. भरपूर पाऊस पडू लागला. वाटेत बर्फही लागला. पण अशातही आइसलँडचं एक रहस्यमय सौंदर्य समोर आलं. सर्व काही अंधुक आणि काळं-पांढरं दिसत होतं. डोळ्यात कुणी राख फुंकली की काय, असं वाटू लागलं. मध्यरात्रीचा सूर्यास्त राहू दे, आम्हाला काहीतरी बघता येईल का हा प्रश्न पडू लागला.
इतकी वर्षे प्रवास केल्याचा प्रसाद म्हणा किंवा वय झालं म्हणा, पण मी एक शिकलो आहे. प्रवासात सर्व काही इच्छेप्रमाणे होईल असं नाही. पण ते ठीक आहे. प्रवासाचा आनंद घेणं मात्र थांबवू नये. एखादी गोष्ट अनुभवता आली नाही, तरी ती किंवा तसंच काही कधीतरी पुन्हा अनुभवता येतं. पण गेलेली वेळ ही कायमस्वरूपी जाते. म्हणून ती वेळ महत्त्वाची आणि त्याचा आनंद घेणं हा ध्येय असावा. आता आमचा अर्धा प्रवास झाला होता. दोन दिवस गारठल्यामुळे माझ्या बायकोला एखाद्या थर्मल-स्पाला जायची इच्छा होती. आइसलँडच्या कुठल्या एका टोकाशी तिने एक जागा शोधून काढली. तिथे घरं-माणसांपेक्षा मेंढ्या आणि घोडे जास्त होते.
खडबडीत रस्त्यांवरून जाताना, आम्हाला समोर संपूर्णपणे साफ क्षितिज दिसू लागलं. त्याने अंगावर सागराची ओढणी ओढलेली आणि कपाळावर लख्ख सोनेरी टिकली होती. आज माझी इच्छा पूर्तीस जाणार होती का? मनाची हुरहूर वाढू लागली. आम्ही ग्रेटिस लाऊग या ठिकाणी पोहोचलो. ब्रेनियोल्स्फर तिथला मालक होता. उंचीला साडेसहा फूट, सडपातळ बांधा आणि पांढरी दाढी ठेवणारा गमतीशीर माणूस. पहिल्या वाक्यापासूनच आमच्या तारा चांगल्या जुळल्या. मी त्याला लगेच विचारले - “इथून सूर्यास्त दिसेल का?” एका दिशेने बोट दाखवत तो म्हणाला, “नशीब असेल तर त्या कड्यावरून दिसेल”.
जसजशी सूर्यास्ताची वेळ जवळ येऊ लागली, तसतसा मी अधीर होऊ लागलो. जेवण करून आम्ही एक तास छप्पन अंश सेल्सिअसच्या नैसर्गिक पाण्यात अंग शेकत काढला. त्यानंतर मी बायकोसोबत त्या कड्याकडे गेलो. मागून भाऊही आला. डोंगरावरून पाण्यात सूर मारावा, तसा सूर्य पाण्याच्या दिशेने तिरपा जाऊ लागला. घड्याळात जवळ जवळ रात्रीचे बारा वाजलेले. बाजूला आठ-दहा लोकं होती. सुरुवातीला खूप कल्लोळ होता. जसा सूर्य क्षितिजाजवळ पोहोचू लागला, तसे आकाश पेट घेऊ लागले. सर्व आवाज शांत झाले. अंगावरून शंभर किलोचे चिलखत धाडकरून जमिनीवर कोसळावे, तसा असंख्य वर्षांचा थकवा झडल्यासारखा वाटला. बारा वर्षांपूर्वी, दोन बॅग घेऊन मी जर्मनीत एकटा आलेलो तेव्हा मी अनपेक्षित एका घनघोर रात्रीच्या तोंडाशी उभा होतो. आज एका बाजूला माझा भाऊ होता, दुसऱ्या बाजूला माझी बायको आणि समोर प्रकाशच प्रकाश.
टीप: एकूण चार लेखांची ही मालिका असणार आहे. हे लेख पूर्णतः माझ्या अनुभवांवर आधारित असून काल्पनिक नाहीत. तुमचे विचार, मत आणि सुधारणा जाणून घ्यायला मी खूप उत्सुक आहे. धन्यवाद.
(१/४) प्रदोष https://www.maayboli.com/node/88535
(२/४) प्रवास https://www.maayboli.com/node/88596
(३/४) प्रेयसी https://www.maayboli.com/node/88636
भन्नाट
भन्नाट
अप्रतिम!
अप्रतिम!